तरी हरकत नाही

March 31, 2007 at 1:41 am (कवितेतून विचार)

कां कुणास ठाऊक आज प्रो.देसाई मला म्हणाले ” सामंत,आज तुम्ही जरा उदास,उदास दिसता.कारण समजले का? मी म्हणालो ” हे बघा, भाऊसाहेब मी एव्हड्या कविता लिहीतो,बरेच वेळा तुम्ही मला स्फूर्ती दिलीत आणि मी लिहीत गेलो.बरेच जणाना मी कविता पाठवतो,पण मी पहातोय तुम्ही आणि एक दोन सोडले तर इतर कोणी टिका पण करत नाहीत.का कळत नाही.” त्यावर भाऊसाहेब म्हणाले ” सामंत तुम्ही लिहीत चला,कुणी गाइली नाही,वाचली नाही,आणि वाचून ऐकली नाही तरी हर्कत नाही.”हे त्यांचे शब्द ऐकल्यावर मला एक कविता सुचली.ती अशी

तरी हरकत नाही.

माझ्या कविता
कुणिही गात नाही
कुणिही वाचत नाही
वाचली तरी ऐकत नाही
परंतु
कविता लिहील्याविना
मला राहवत नाही

लिहूया कविता म्हणून
लिहीली जात नाही
विचारांच्या वेलीची
शब्दरुपी फुलें जेव्हा
मनाच्या पाण्यात
एकत्र तरंगतात
तेव्हा कविता लिहील्या
वाचून रहावत नाही

दुःखा मागून
आनंद डोकावतो
यातना मागून
निर्मीती होते
कवितेचे असेच आहे
अशावेळी
कविता लिहील्यावाचून
रहावत नाही

अन तुम्ही
गायिलीत नाही
वाचलीत नाही
आणि वाचून
ऐकलीत नाहीत
तरी हर्कत नाही

कविता लिहील्या शिवाय
मी सोडणार नाही.
                               श्रीक्रुष्ण सामंत (स्यान होझे कॅलिफोरनीया)         

Permalink No Comments

आता काढ दिवस

March 27, 2007 at 11:50 pm (कवितेतून विचार)

त्या दिवशी प्रो.देसाईंचा वाढदिवस होता.मला संध्याकाळी तळ्यावर जेव्हां भेटले तेव्हां म्हणाले “सामंत,दगडाला शेंदूर फासून लोक त्याला देव मानतात.देव मानायला श्रध्दा असावी लागते.ती कमी झाली की मग देवाचे देवपण कमी होतं नाही काय?वयोमान वाढल्यावर परावलंबन वाढतं.छोटे छोटे प्रसंग पण मनस्वी होतात.मग अशा वाढदिवसा सारख्या दिवशी पण असं वाटतं,कसले वाढदिवस? आता फक्त राहीले काढ दिवस.
या विषयावर एखादी कविता लिहाल कां?”
त्यासाठी ही कविता सुचली.

काढ दिवस

वंय झाले आता सत्तर
कसे म्हणू आता
झाले तरी बेहत्तर
आता कसले वाढदिवस
राहीले ते फक्त काढदिवस

पर्वताच्या उतरणीवर
दिसू लागले आभाळ
चढणीच्या वाटेवर
स्वैर पक्षांचा थवा हेरण्याचा
गेला तो काळ

अपेक्षा लोपून गेली
उमेदीने पाठ फिरविली
नैराशाने गांठ बांधली

भुतकाळातील यातनां
भविष्यकाळातील स्वपनें
मिसळती एकच वेळी
चेहऱ्यावरी दिसती
दुःख अन कष्ट
राहूं कसा मी संतुष्ट?

म्हणावे त्याला जाणकार
कल्पनेने जाणतो भविष्यकाळ
झाले आता वंय फार
आता कसले वाढदिवस
राहिले ते आता काढदिवस

          श्रीकृष्ण सामंत (स्यान होझे कॅलिफोरनीया)

Permalink No Comments

कधी झाला हो हा एव्हढा मोठा?

March 24, 2007 at 3:20 am (कविता)

प्रो.देसायांच्या एका मुलीचा मुलगा आज पंधरा वर्षांचा झाला.मला ते म्हणाले “सामंत, वेळ कसा जातो बघा”.ते नंतर मला म्हणाले ” मी माझ्या नातवाला म्हणालो”अरे, तुझी आई मला सारखी विचारते “अहो,हा कधी एव्हढा मोठा झाला?”मी काय उत्तर देऊ? तुम्हीच कवितेच्या रुपाने त्याला सांगीतले तरी चालेल.
त्यांच्यासाठी ही कविता.

रुढी

कधी झाला हो हा पंधरा?
पुसीले आईने तुझ्या मला
वळून बघीतले मी
माझ्या भूतकाळाला

विचारला होता
असाच प्रश्न
हिच्याच आईने मला

निघून गेली एक पिढी
होईल पण ती एक रुढी
विचारसी तुझ्या आईला
असेल जेव्हां पंधरा
वर्षाचे मुल तुला

          श्रीकृष्ण सामंत (स्यान होझे कॅलिफोरनीया)
 

Permalink No Comments

आजीची काठी

March 20, 2007 at 1:12 am (कविता)

आजी आजाला काठीवीना चालण्याचे आपले मनोदय सांगत असताना,ते संभाषण तानुच्या कानावर पडते.स्वपनाळू तानु दुसऱ्या दिवशी आपले स्वप्न आजाला सांगते.

आजीची काठी.

चिमुकल्या तानुला
स्वप्न पडे पाहाटेला
आजी आणि काठी
एकमेकांशी बोलताना

काठी म्हणे आजीला
नको सोडू कधी मला
संगतीत राहून तुझ्या
महत्व आलेच मला

आजी सांगे काठीला
नकोच घालू गळ मला
इतक्या वर्षाच्या सोबतीने
आला कंटाळा तुझाच मला

ऐकून त्यांच्या संभाषणाला
म्हणे तानु स्वत:ला
स्वप्नांत का असेना
पाहीन माझ्या आजीला
काठीवीना चालताना

           श्रीकृष्ण सामंत (स्यान होझे कॅलिफोरनीया)
 

Permalink No Comments

न विचारलेला ऊपदेश

March 18, 2007 at 7:41 pm (गम्मत)

“सुख जवा पाडे दु:ख पर्वता एव्हडे” ह्यालाच “जिवन ऐसे नांव” असे म्हणतात.जिवनात “कधी खूशी कधी गम”असते.बालपण,तरूणपण आणि म्हातारपण ह्या शेवट पर्यंत जगल्यावर अनुभवायच्या stages आहेत.वसंत,ग्रीष्म हे ऋतु सर्व stages मधे येणारच.”नाचरे मोरा अंब्याच्या वनात” असे म्हणता म्हणता “कां नाही हंसला नुसते,मी नाही म्ह्टले नसते” असे म्हणे पर्यंत “जन पळ भर म्हणतील हाय हाय” म्हणण्याची वेळ केव्हां येऊन ठेपते,हे कळे पर्यंत “आम्ही जातो अमुच्या गावा” म्हणावे लागाते.म्हणून काय कधी तरी “जिवनात ही घडी अशीच राहूं दे” असे म्हणावेसे वाटत नाही, असे मुळीच नाही.कधी कधी तर “मोहूनीया तुज संगे नयन खेळले जुगार” असे म्हणताना “थकले रे नंदलाला”असे सांगायला कांहिही वाटत नाही

थोडक्यात काय? “फिरून जन्मेन मी” असे धड्धडीत वाटते.

श्रीकृष्ण सामंत (स्यान होझे कॅलिफोरनीया)

Permalink No Comments

दुखतामां,दुखतालाच तां,दुखुकच होयां

March 16, 2007 at 12:55 pm (गम्मत)

दुखतामां?, दुखतालाचतां,दुखुकच होयां
(दुखतेना? दुखणारच ते,दुखायलाच हवं)

अण्णांना त्यांच्या आयुष्यात दोनदा स्ट्रोक आला.एकदा त्यांच्या वयाच्या चाळीसाव्या वर्षी आणि नंतर दहा वर्षानंतर,म्हणजे पन्नासाव्या वर्षी.पहिल्या खेपेला ते लवकरच बरे झाले.एक तर ते तरूण होते,आणि स्ट्रोक त्यामानाने माईल्ड होता.त्यांची डावी बाजू परयालेसीसमुळे निकामी झाली होती.पण लवकरच बरे होवून ते कामावर जावू लागले होते.

कामावर जॉईन होण्यापुर्वी त्यांची मेडिकल टेस्ट घेतली गेली.तांच्या सांगण्याप्रमाणे डॊक्टरने त्यांना पेन उचलून उघडून द्यायला सांगीतले .ते त्यांनी केले पण देतांना उलट करून न देता पेनची बाजू डॉक्टरच्या हातात दिली.त्यामुळे त्यांचे फिझीकल आणि मेंटल काम कोऑर्डिनेट होत नाही असे अनमान काढून त्यांना नोकरीवर नाकारले होते.नंतर वरच्या डॉक्टर कडे परत तपासणी केल्यावर त्याने कामावर जाण्यास परवानगी दिली असे ते म्हणाले.त्यामुळे ते नोकरीवर जॉईन झाले.

दुसरा स्ट्रोक जरा जास्त जोरदार असल्याने आणि वाढलेले वय सांथ न देऊं शकल्याने त्यांचे दोन पाय आणि डावा हात कमकुवत झाला होता.अशा स्थितीत ते बारा वर्षे अंथरुणावर पडून होते.आम्ही सर्व त्यांची परी,परीने सेवा करीत होतो.

अण्णाकडून घेण्यासारखे म्हणजे ते कधीही कसलीच कुरकुर करीत नसत.विनोद करीत असत,गम्मती सांगत असत,कडूतले कडू औषध घेण्याची त्यांची तयारी असे,घरचे सर्व हिशोब तोंडपाठ असत.

तर सांगायची गोष्ट अशी की,त्यांना मालीश करायला एक गृहस्थ यायचे.त्यांचे नांव कुष्णमुर्ती.पुर्वी ते सर्कसमधे काम करीत असत.सर्कसचं काम सोडल्यावर व्यायामाचा आभाव आणि खाण्याला अंत नाही त्यामुळे हे गृहस्थ एखाद्या हत्ती सारखे दिसायचे.

अण्णांचे सगळे अंग चोळून चोळून मालीश करायचे.त्यामुळे अण्णा बरे होतील असे त्यांना वाटत होते.मालीश करून मेंदुतल्या तुटलेल्या नसां(नर्वझ) परत जोडल्या जातील अशा खुळचटत समजुतीच्या आहारी जाण्याईतके अण्णा अशिक्षीत मुळीच नव्हते.ते म्हणायचे “एकदां माणूस आजारी झाला की सुश्रुषा करणाऱ्या ईतरावर त्याला अवलंबून रहावे लागते.”

मालीश करायला कृष्णमुर्ती आल्यावर त्याला ते म्हणायचे “अंग फार दुखते हो”ते ऐकून तो म्हणायचा “दुखतांमां, दुखतालाच तां, दुखुकच व्होव्यां” आणि हा संवाद त्यांचा दोघांचा रोजचाच असायचा.
नंतर हा संवाद आमच्या घरी विनोदाचा विषय  झाला होता.

                        श्रीकृष्ण सामंत (स्यान होझे कॅलिफोरनीया) 

Permalink No Comments

सरकारी नोकर

March 15, 2007 at 2:08 pm (लेख)

सरकारी नोकर

अण्णा सुपरींटेन्डन्ट ऒफ़ एक्साईझ ह्या प्रमोशन्वर मुंबईला जाण्यापुर्वी,अख्या रतनागिरीचे हेड होते.पुर्वी सरकारी नोकरांच्या घरी शिपाई नोकर  घरकामाला रहायचे.त्याना घरात आईला मदत करण्या पलिकडे मला आणि माझ्या धाकट्या भावाला संभाळायचे काम पण करावे लागायचे.ब्रिटीश लोकानी ती पद्धत घालून दिली होती.
आमचे आजोबा आमच्याकडे रहायचे.

एकदा काय झाले,एका शिपायाची बदली झाल्यावर त्याच्या जागी दुसरा शिपाई आला होता. तो जरा कायदेबाज होता.नेहमीच्या सवंयी प्रमाणे आजोबानी  त्यांची सुपारी कुटून ठेवायाला त्याला सांगितले.तोंडात दांत नसल्याने आजोबा कुटून ठेवलेली सुपारी खात असत.त्या शिपायाने सांगितले”आजोबानू,मी सरकारी नोकर आसयं,माझां सुपारी कुटूचां काम नाय,”

संध्याकाळी अण्णा घरी आल्यावर आजोबानी त्यांना तो शिपाई काय म्हणाला ते सांगितले.त्यावर अण्णा, आजोबाना म्हणाले “उद्या पासून तुम्ही त्याला तुमचे काही काम सांगू नका.” दुसरया दिवशी तो शिपाई घरी आल्यावर अण्णानी त्याला एक जड फाईलचे बोचके दहा मैलावर असलेल्या त्यांच्याच एका ब्र्यान्च ऒफिसला देऊन तिकडच्या माणसाची पोहचल्याची पावती आणून आजोबाकडे द्यायला सांगितले.त्यावेळी पायी जाण्याशिवाय दुसरे साधने नव्हते.

दुसरया दिवशी आण्णा दोन दिवसाच्या फिरतीवर (टूरवर) गेले.दुसरया दिवशी त्या शिपायाने सम्ध्याकाळी पावती आणून आजोबांच्या स्वाधीन केली.आणि त्यांना म्हणाला “आजोबानूं,जरा उशीर झालो माकां,पाय पण वाईंच दुखतंत.मी तुमची सुपारी कुटून देवूं काय?

दोन दिवसानी अण्णा घरी आल्यावर त्यांनी आजोबाना विचारले”शिपायाने पावती दिली काय? त्यावर आजोबा म्हणाले “हो दिली आणि वर तो मला म्हणाला “सायबानी माकां सरकारी नोकरी म्हणजे काय तां पण समजावलां” हे ऐकून आजोबा आणि अण्णा खो,खो हंसले.
त्यानंतर तो शिपाई न चुकता आजोबांची सुपारी कुटून देत असे

            श्रीक्रुष्ण सामंत (स्यान होझे कॅलिफोरनीया)

Permalink No Comments

गेले ते दिवस

March 13, 2007 at 6:41 pm (लेख)

गेले ते दिवस

“रांव रे, आपा येतां साईट दी” (थांब रे,आपा येतोय साईडला रहा)
असले उद्दगार १९३८-४५ च्या दरम्यान सावंतवाडी-बेळगांव किंवा वेंगुर्ले-बेळगांव ह्या प्रवास मार्गावर ऐकायला मिळत असत.

त्याचं असं झालं,आपांना(माझ्या काकाना) धंद्या मधे जास्त दिल्चस्पी होती.आजोबांच्या लक्ष्यांत आल्यावर त्यांनी अण्णांकडे शब्द टाकला.अण्णा म्हणाले मुंबईवरून मी त्यांच्यासाठी एक नवीन बस (प्यासींजर व्हीएकल) विकत घेतो.त्यावेळी साधारण २०० रुपयाना (मह्णजे आताचे ४० हजार रुपये झाले.अर्थात त्यावेळी गाड्या ईंपोर्ट होत असत म्हणा)विकत घेतली.अण्णाचे लग्न झाले तेव्हां आपा एक वर्ष्याचे होते.आणि त्यांची आई,म्हणजे आमची आजी देवाघरी गेली होती.माझ्या आईनेच त्यांना वाढवले.अण्णांना ते मुलासारखे होते.

ही बस सर्व्हीस आपा चालवीत असत.सुरवातीला ते आठवड्यातून २,३ वेळा मग रोज मग दिवसातून दोन्दा  सेर्वीस वाडी ते बेळगांव अशी  चालवत असत.त्याशिवाय आणखी बरयाच लोकाच्या अश्या सर्वीसीस होत्या.
पण  एक आपांची  खासीएयत होती,की नियमीतपणा, सर्वांच्या अगोदर पोहचणे,कुणालाही नाखुष न करणे,आणि हंसत,हंसत सर्वांना खूष करणे.

सफेद लांब बाह्यांचा शर्ट,डोक्यावर काळी टोपी,ती पण अर्धी मागे गेलेली,कोट बरोबर पण कधीच अंगावर नाही,तर खांद्यावर आणि तो पण अर्धा लटकवलेला,तोंडात पानाचा ठेचा,रंगदार पानाचा तांबडा रंग तो पण दांतावर ठाम बसलेला.ओळखीचा माणूस लांबून दिसल्यावर सुमधुर हास्याचा चेहरा माझ्या मेंदुत रुतून बसलेला आहे.

३०,३५ वयावर तारुण्याचे बेदरकारी,मग नवी करकरीत ईंपोरटेड गाडी चालवताना वेगावर लक्ष्य कसे राहिल?.तशात धूळीने माखलेले रस्ते,प्रवाश्याना वेळेवर पोहचवण्याची हमी,त्यामुळे ईतर रस्त्यावरून चालत जाणारे पाद्चारी आणि गाडी चालवणारे,प्रचंड धुळीचा लोट मागे टाकत जाणारया आपांच्या गाडीला पाहून” रांव रे,आपा येतां साईट दी”किंवा आपा पुढे निघून गेलेले पाहून “आपा,गेलो दिसतां?” असे धूरळा उडाल्यामुळे तोंडावर रुमाल धरून ओरडून बोलणारे लोक आजुबाजूला  बघून “अहो,ते माझे काका समाजलानां?”असे छाती पुढे करून सांगणारे माझे मोठे भाऊ आणि चुलत भाऊ आम्हाला सांगायचे ते ऐकून आमची पण छाती फूगत असे.

आता तेच आपा वार्धक्याने वाकलेले,क्षीण प्रक्रुतीचे,रसत्यावरून जपून चालताना बघून,वाटते “गेले ते दिवस”

                      श्रीक्रुष्ण सामंत (स्यान होझे कॅलिफोरनीया)
 

Permalink No Comments

फाडून टाक डिक्शनरी

March 12, 2007 at 2:58 am (गम्मत)

फाडून टाक डिक्शनरी
अण्णांचे ईंग्रजी  आणि गणित हे दोन विषय एकदम पक्के होते.आईचे सर्व घरगुती व्यवहाराचे हिशेब ते तोंडीच करत.२ ते ३० पर्यन्तचे पाढे,पावकी निमकी,पाउणकी ,सवायकीचे पाढे तोंडपाठ असल्याने गुणाकार,भागाकार,बेरीज आणि वजाबाकी हातचा मळ असायचा.
तसेच ईग्रजी पण.तरकडकरानी लिहीलेले ईंग्रजी भाषेचे व्याक्रणाचे पुस्तक जवळ जवळ तोंडपाठ होते.

आम्हाला काहिही ईंग्रजी मधे लिहायचे असले तर एखादे अडलेले स्पेलीन्ग डिक्शनरी न उघडता चक्क अण्णाना विचारावे.कधी त्यान्चे स्पेलिन्ग बरोबर आहे का म्हणून डिक्शनरी उघडून त्यान्च्या समोर पाहत असल्यास ते कुतुहलाने पहात असत.आणि गम्मत म्हणून “अण्णा स्पेलिन्ग चुकले “म्हणून सांगीतल्यास,ते म्हणत “माझे स्पेलिन्ग चूक वाटल्यास डिक्शनरीचे पान सरळ फाडून टाक.”असे सांगून झाल्यावर त्यांच्या चेहरयावरचा आत्मविश्वास पाहिल्यावर आनद मिळत असे तो कसा विसरायला होणार?

                               श्रीक्रुष्ण सामंत (स्यान होझे कॅलिफोरनीया) 

Permalink No Comments

असेच एक चिंतन

March 10, 2007 at 10:08 pm (चिंतन)

चिंतन

बरेच दिवसानी प्रो.देसाई तळ्यावर फिरताना दिसले.मला बघून खूष झाले.”सामंत खूप दिवसानी दिसला तुम्हाला बघून बरं वाटलं.” मी पण त्याना म्हणालो “भाऊसाहेब,मला पण तुम्हाला बघून खूप आनंद झाला”मी पुढे त्यांना म्हणालो “तुमचा चेहरा जरा उतरलेला दिसतो,बरं आहे ना तुम्हाला?”

“हे बघा सामंत आता बरं काय आणि वाईट काय जो जातो तो दिवस आपला.”सकाळी उठल्यावर जर का प्रक्रुतीने काही कुरकुर केली नाही की समजावं खाही खरं नाही.पण ते जाऊ दे तुमची कविता काय म्हणते? अलिकडे आम्हाला तुमची नवी कविता ऐकाला नाही मिळाली.”मी त्यांना म्हणालो “भाऊसाहेब तुम्ही मला स्फुर्ती दिली नाहीत तर मला कविता कशी सुचणार?”

“असं म्हणता तर आज मी तुम्हाला कविता ऐवजी एका विषयावर चिन्तन करायला स्फुर्ती देतो बघा.आहे का तुमची तयारी?”मी थोडा विचारात पडलो मनात म्हणालो भाऊसाहेब आज काहीतरी नवीन विषयावर चर्च्या करणार असं दिसतं.

त्यांनी अशी सुरवात केली.ते म्हणाले “सामंत,त्यादिवशी माझ्या एका मित्राने मला एक ईमेल पाठवली ती ईंग्रजीतून होती.त्याचा मी मराठीतून अनुवाद सांगतो.तो असा.एका एअरफोर्स पायलटने आयायटीच्या स्पेशल सेमीनारला सांगीतलेली गोष्ट.
“माझे आईवडील गावाला जायला निघाले.आणि आम्ही सर्व एअरपोर्टवर त्याना निरोप द्यायला गेलो होतो.खरं तर माझ्या आईवडीलानी विमान प्रवास कधीच केला नव्हता,त्यांच्या अनुभवासाठी मी त्यांना ह्या प्रवासाने पाठवीत होतो.खरं म्हणजे मला त्यांनी गाडीच्या प्रवासाची तिकीटे काढून आणावयास सांगीतली होती.मी त्याना जेट एअरवेजची तिकीटे काडून आणली.विमानाची तिकीटे पाहून त्यांना खूप आश्च्यर्य वाटलं.त्यांच्या चेहरयावरची उत्सुकता आणि एखाद्या शाळकरी मुलाची अंगातली स्फुर्ती पाहून,त्या दिवसाचा जाण्याची तयारी करीत करीत एअरपोर्टवर पोहचण्यापासून त्यांच्या, सामानासाठी ट्रॊली घेण्यापासून ते ब्यागेजे चेकिंग करून विन्डो सीट मिळाल्यावर चेकीनची वाट अधीरतेने पहात होतो.माझे वडील हे सर्व आनंदाने अनुभवत होते.आणे मी पण त्यांचा अनुभव आनंदाने अनुभवत होतो.सेक्युरीटी चेकला जाण्यापुर्वी माझे वडील साश्रुनयनाने माझ्याकडे येऊन मला थ्यान्क्स म्हणाले.ते खूप भावनाप्रधान झालेले पाहून,आणि मी काही प्रचंड केले असे नसता,त्यांना ते प्रचन्ड वाटत होते.मी त्यांना म्हणालो “नको माझे आभार मानूं.”

 तो पुढे म्हणतो “नंतर ही घटना आठवून मी ज्यावेळी अन्तर्मुख झालो,त्यावेळी मी माझ्या भुतकाळात डोकाऊन पाहिल्यावर लक्षांत आलं की आपल्या आईवडीलानी किती स्वपने पाहिली असतील? आणि किती खरी ठरली असतील?त्यांच्या सांपत्तीक परिस्थीचा विचार न करत त्यांना परवडेल न परवडेल याचा विचार न करता क्रिकेट ब्याट,खेळणी,कपडे वगैरे आणि बाहेरच्या ट्रिपासाठी कितीदा पैशाची मागणी आपण केली असावी?आणि त्यांनी आपल्या सर्व गरजा पुरवील्या पण.कधी काळी आपण विचार तरी केला का त्याना ह्यासाठी किती त्याग करावा लागला असेल?कधी काळी आपण त्यांचे आभार पण मानले का?

आता आपण आपल्या मुलांसाठी त्यांना चांगल्या शाळेत घालायचा विचार करतो.पैसे कितीही पडो आपण त्यांच्या सुखसोईसाठी धडपडत नाही का?पण आपली मनस्थीती आईवडीलांच्या त्यागाचा विचार करणासाठी कुठे प्रव्रुत असते?तेव्हां ते तरूण असताना त्यांची अपुरी स्वपने आता पुरी करण्याची जबाबदारी आपली नाही का होत?त्यांच्या आयुष्याला पुर्तता नाही का येणार?”

 परत तो पुढे म्हणतो “बरेच वेळा वडीलांना मी उद्धट उत्तरे दिल्याची आठवते.आता माझ्या मुलीने काही विचारले की मी अतिशय नम्रतेने उत्तर देतो.पण त्यावेळी त्यांना किती वाईट वाटले असेल याची जाणीव आता मला होते.ह्यावरून आपण एक गोष्ट नक्कीच लक्षांत ठेवली पाहीजे,व्रुद्धावस्ता हे एक दुसरे बालपण आहे.आणि ज्या तर्हेने आपण आपल्या मुलांची काळजी घेतो,आणि त्यांच्याकडे जसे लक्ष देतो तसे त्यांच्याकडे पण लक्ष दिले पाहिजे.माझ्या वडीलानी माझे आभार मानण्या ऐवजी त्यांच्या या लहानश्या स्वप्नपुर्ततेसाठी एव्हडा विलंब लावल्या बद्दल मीच त्यांची माफी मागायला नको का?माझ्यासाठी केलेल्या त्यागासाठी मला आता पुर्ण जाणीव झाल्याने मीच त्यांच्या आशा आकांक्षापुर्ती कडे  जास्त लक्ष देण्याची पराकाष्टा करीन.ते वयस्कर झाले याचा अर्थ परत त्यांनी आपले सर्वस्व देऊन नातवन्डासाठी पण त्याग करत रहावे काय?त्याना पण ईछ्या आहेत.त्यांची पण काळजी घ्या.”

“सामंत,ही ईमेल मी माझ्या मित्राना आणि नातेवाईकाना पाठवली.काहीनी त्याला रिसपॊन्स दिला.त्यात तिनही स्त्रिया होत्या.एकीने (त्यांच्या धाकट्या मुलीने), ” मुलाने वडीलांचे थ्यान्क्स मानल्यामुळे मुलगा कसा भावनावश झाला,आणि थान्क्स ह्या शब्दाबद्दलची पावर लक्शात घेण्यासारखी असून सर्वानीच त्या शब्दाचा भरपूर वापर करून नाती जास्त मजबूत करावी”असा विचार मांडला.दुसरीला (त्यांच्या मोठा मुलीला )लेख आवडला.म्हणून तिने आपल्या मुलीना वाचावयाला पाठवून दिला.आणि तिसरीने(त्यांच्या एका मैत्रीणीने) तो लेख वाचून खूप रडू आल्याने “आपण आपल्या आईवडीलांची ते जीवंत असे पर्यंत आणखीन सेवा करणार”असा विचार मांडला.
ह्या कुणाचाही विचार घेऊन तुम्ही तुमचा विचार मांडा नव्हेतर तुमचे चिंतन लिहा.ज्याला ईंगलीश मधे “पॊंडरींग ” म्हणतात ते करा.ही त्यांची सुचना ऐकून मी खरोखरच चिंतन केले ते असे.

चिंतन

प्रो.देसाईंच्या धाकट्या मुलीने थ्यांकस बद्दल लिहीलेल्या विचारावर थोडे विवेचन करतो.
तिला उद्देशून मी लिहीत आहे.
“मी तुला लिहू की नको,असा सतत विचार मनात येत राहीला मग म्हटलं “एकदाचे होवून जावूदे”(आठवतो दिलीप प्रभावळ्करचा डायलॊग “चिनी पात्राच्या तोंडचा”)तुझं म्हणणं की थ्यान्क्स्चा उपयोग सर्व ठिकाणी करून नाती जास्त मजबूत करावी”खरं आहे तुझं म्हणणं. पश्चिमी देशात त्याचा  भरभरून वापर करायचा मोठा रीवाज आहे.ह्याचं मुख्य कारण त्यांची कुटुंब पद्धती आणि लग्न पद्धती आहे.मी काय म्हणतो ते तुझ्या लक्षांत आलं असेल.त्यावर जास्त उवापोह न करता आपल्या संस्क्रुती बद्दल विचार करुंया. आपल्या संस्क्रुतीतेत नाती तिन ढोबळ वर्गात विभागता येतील.

 १)आईवडील आणि मुले, नातवंडे
ह्या नात्यात प्रेम आणि कर्तव्य ह्यांच्या बंधनानी ही नाती एकजीव असतात.आणि ही नाती अशी आहेत की ती निवडता येत नाहीत.आणि उपकार  ह्या शब्दाला अगदी ( मागची  सीट)दिली गेली आहे.”आई थोर तुझे उपकार “असे मुले म्हणतील बाबडी पण आई म्हणेल”बाबारे,मी माझे कर्तव्य केले”पण आईवडीलानी म्हटलं ” मुलांनो,तुमचे फार उपकार आमच्यावर झाले” तर मुलंच आईवडीलाना असे म्हणू देणार नाहीत.
म्हणूनच तो त्या गोष्टीतल मुलगा वडीलांचा “थ्यान्क्स ” हा शब्द ऐकून प्रव्होक (चान्गल्या अर्थाने)झाला. (हे ऐकायला त्याला आवडले नाही)तो शब्द त्याला अनावश्यक वाटला आणि म्हणून त्याला वर्तमान,भूत आणि भविष्य आठवले.”थ्यान्क्स” असे त्याला दुसरया कोणी म्हटले असते तर तो नक्कीच “दयाट्स ऒके “सारखे काही बोलला असता.असे मला वाटते.ह्यांचा अर्थ मुलांचे थ्यान्क्स मानूं नयेत असे मुळीच नाही.काहीना ते आवडत नसावे.असे मला वाटते.

२)जुळवून जोडलेली नाती.

ही असतात निवडलेली नाती.ह्यात वाटलेतर शेजारी किवा मित्रमंडळी पण सामावून घेता येतील.ही नाती निश्चीतच प्रेमामुळे बांधलेली  असतात.आणि त्याशिवाय उपक्रुततेचा(थ्यान्क्स माणून घेण्याच्या अपेक्षाचा)त्याला”वास”असल्याने,तूं म्हणतेस तसे ही नाती “थ्यान्क्स मुळे निश्चीतच भक्कम (स्ट्रेंदन)होत असतात.ह्या नात्याला अगदी पुढची खुरची(फ़्रंट सीट) दिली पाहीजे (पायजेलाय)

३) व्यवहारातून जोडलीली नाती

ही नाती निवडावी लागत नाहीत.व्यवहाराच्या ओझ्याखाली ही नाती क्षणासाठी किवा संबंध असे पर्यंत असतात.उ.दा. रसत्यात क्षणभर भेटलेले लोक(हाय म्हणण्या पुरते)किवा दुकानदार किवा व्यवसाई लोक(कलीग्स).वगैरे,वगैरे.ह्या नात्यात प्रेमाचा लवलश नसतो.असलाच तर तात्पुरता असतो. मात्र उपक्रुततेचा(थ्यान्क्स मानावे असे ग्रुहीत धरण्याचा)भरपुर वास असतो.अशा नात्यात तूं म्हणतेस तसं थ्यांक्सला भरपूर महत्व आहे.अगदी पुढची खुरची, मंचावरची खुरची(स्टेजवरची)दिली पाहीजे.

थोडक्यात काय, ह्या एकाच लेखातून कुणी थ्यांक्स्चा मुद्दा विचारात घेतला तर कुणी “विषय प्रोव्होकेटीव आहे म्हणून मुलांना वाचायला पाठवले तर कुणी ते वाचून आपल्या आईवडीलांची आणखी सेवा करावी असे मनांत आणले.मी ते वाचून अशी दूरवर विचार करणारी मुले पण असतात असा माझ्या मनात विचार आला.
“माणुसकी “बद्दल लेख लिहून त्या लेखकाने माझ्या मनांत विचारांचे चिंतन (पॊंडरींग)आणले हे खरे.माझ्या सारख्या भरपूर वेळ असलेल्याना वेळ घालवावयाचा हा एक मुद्दा मिळाला.खरं की खोटं?

“भाऊसाहेब धन्यवाद स्फुर्ती देण्याबाबत.”

               श्रीक्रुष्ण सामंत (स्यान होझे कॅलिफोरनीया)

Permalink No Comments

« Previous entries