दुखतामां,दुखतालाच तां,दुखुकच होयां

March 16, 2007 at 12:55 pm (गम्मत)

दुखतामां?, दुखतालाचतां,दुखुकच होयां
(दुखतेना? दुखणारच ते,दुखायलाच हवं)

अण्णांना त्यांच्या आयुष्यात दोनदा स्ट्रोक आला.एकदा त्यांच्या वयाच्या चाळीसाव्या वर्षी आणि नंतर दहा वर्षानंतर,म्हणजे पन्नासाव्या वर्षी.पहिल्या खेपेला ते लवकरच बरे झाले.एक तर ते तरूण होते,आणि स्ट्रोक त्यामानाने माईल्ड होता.त्यांची डावी बाजू परयालेसीसमुळे निकामी झाली होती.पण लवकरच बरे होवून ते कामावर जावू लागले होते.

कामावर जॉईन होण्यापुर्वी त्यांची मेडिकल टेस्ट घेतली गेली.तांच्या सांगण्याप्रमाणे डॊक्टरने त्यांना पेन उचलून उघडून द्यायला सांगीतले .ते त्यांनी केले पण देतांना उलट करून न देता पेनची बाजू डॉक्टरच्या हातात दिली.त्यामुळे त्यांचे फिझीकल आणि मेंटल काम कोऑर्डिनेट होत नाही असे अनमान काढून त्यांना नोकरीवर नाकारले होते.नंतर वरच्या डॉक्टर कडे परत तपासणी केल्यावर त्याने कामावर जाण्यास परवानगी दिली असे ते म्हणाले.त्यामुळे ते नोकरीवर जॉईन झाले.

दुसरा स्ट्रोक जरा जास्त जोरदार असल्याने आणि वाढलेले वय सांथ न देऊं शकल्याने त्यांचे दोन पाय आणि डावा हात कमकुवत झाला होता.अशा स्थितीत ते बारा वर्षे अंथरुणावर पडून होते.आम्ही सर्व त्यांची परी,परीने सेवा करीत होतो.

अण्णाकडून घेण्यासारखे म्हणजे ते कधीही कसलीच कुरकुर करीत नसत.विनोद करीत असत,गम्मती सांगत असत,कडूतले कडू औषध घेण्याची त्यांची तयारी असे,घरचे सर्व हिशोब तोंडपाठ असत.

तर सांगायची गोष्ट अशी की,त्यांना मालीश करायला एक गृहस्थ यायचे.त्यांचे नांव कुष्णमुर्ती.पुर्वी ते सर्कसमधे काम करीत असत.सर्कसचं काम सोडल्यावर व्यायामाचा आभाव आणि खाण्याला अंत नाही त्यामुळे हे गृहस्थ एखाद्या हत्ती सारखे दिसायचे.

अण्णांचे सगळे अंग चोळून चोळून मालीश करायचे.त्यामुळे अण्णा बरे होतील असे त्यांना वाटत होते.मालीश करून मेंदुतल्या तुटलेल्या नसां(नर्वझ) परत जोडल्या जातील अशा खुळचटत समजुतीच्या आहारी जाण्याईतके अण्णा अशिक्षीत मुळीच नव्हते.ते म्हणायचे “एकदां माणूस आजारी झाला की सुश्रुषा करणाऱ्या ईतरावर त्याला अवलंबून रहावे लागते.”

मालीश करायला कृष्णमुर्ती आल्यावर त्याला ते म्हणायचे “अंग फार दुखते हो”ते ऐकून तो म्हणायचा “दुखतांमां, दुखतालाच तां, दुखुकच व्होव्यां” आणि हा संवाद त्यांचा दोघांचा रोजचाच असायचा.
नंतर हा संवाद आमच्या घरी विनोदाचा विषय  झाला होता.

                        श्रीकृष्ण सामंत (स्यान होझे कॅलिफोरनीया) 

Post a Comment

You must be logged in to post a comment.