मम्मी आजीचा बर्थ डे

March 10, 2007 at 3:17 am (कविता)

ही कविता वाचण्यापुर्वी थोडी प्रस्तावना

नाही तरी कुठल्याही कवितेचे अपुरे कौतूक होत असतं, असे कविता लिहीणारयांचा नेहमीच समज असतो.काही अरसीक असतात त्याला कोण काय करणार? “अरसीक किती हा मेला कविता न वाचता टाकून गेला.”असे कुणातरी कवीने म्हटले आहे.
कविता लिहीण्याला शिकण्याचे कुठीही क्लासीस नाहीत.कविता लिहीणं हे उस्फुर्त असतं.शब्दाचे भांडार (ग्रोसरी शॊप)असतं.त्या,त्या आईल मधे जाऊन तो तो शब्द ट्रॊलीमधे घेऊन,मग कवितेचे डिश तयार करायची असते.एखादी कविता आनंदी (गोड डिश)तर एखादी दु:खी (तीखट) तर एखादी आनंदी आणि दु:खी(आंबट)असते.शेवटी सामुग्री (शब्द)काय  घेतले आणि डिश (थीम)काय हे शेफवर(कवीवर) अवलंबून असतं दुसरं काय? ही कविता अशीच उस्फुर्त लिहीली आहे.

मम्मी आजीची सत्तरी.

झालीस तूं आज सत्तर
एकोणपन्नास वर्ष्याच्या संसारात
त्रुप्त होवूनी असे वाटते
आज झाले ते बेहत्तर

प्रेम म्हणजे विश्वास
अन जीवनभरची साथ
प्रेम म्हणजे दु:खावर मात
आणि सुखाची बरसात

मुलेबाळे थोर आणि नातवंडे
जमली सारी ईकडॆ
आनंदी आनंद जिकडे तिकडे
वारा पण सांगे चोहीकडे
की आज आहे
मम्मी आजीचा बर्थ डे

               श्रीकृष्ण सामंत (स्यान होझे कॅलिफोरनीया)
 

Permalink No Comments

कालाय तसमै नम:

March 10, 2007 at 1:19 am (कविता)

२००६ ह्या वर्षाची माझी शेवटची कविता

कालाय तस्मै नम:

सकाळ म्हणाली दुपारला
ही संध्याकाळ,
रोज कुजबुजत असते काळोखाशी
ऐकून हे,
दुपार सांगे तिला (सकाळला)
घेऊन तूं पण जाशी की
पहाटेला रोज फिरायला
अन,
देयी निरोप तुला ती (पहाट)
लगेच,पाहुनी सुर्याला

ऐकुनी त्यांचा संवाद
दिवस म्हणे रात्रीला
दोष असे हा सुर्याचा
करी तो
उदय अन अस्थ दिवसाचा

ऐकून हे,
रात्र सांगे दिवसाला
दोश नको देऊं तूं सुर्याला
दोष असे हा प्रुथ्वीचा
गर,गर फिरुनी सुर्याभोवती
जन्म दिला तिने ह्या सर्वांना

पाणावल्या डोळ्याने
म्हणे प्रुथ्वी सुर्याला
भलेपणाचे “दिवस”संपले
जन्म देऊनी ह्या सर्वांना
अन
मिळे दोष आपल्या दोघांना

स्तिथप्रद्न्य तो सुर्यनारायण
समजावी त्या माउलीला (प्रुथ्वीला)
आठवशी त्या सुभाषीताला
कालाय तस्मै नम: 
                          श्रीकृष्ण सामंत (स्यान होझे कॅलिफोरनीया)
 

Permalink No Comments

आईविना भिकारी

March 10, 2007 at 12:34 am (आई विषयी)

आईची स्तुस्ती कितीही केली तरी ती कमीच म्हणावी लागेल.आईचा आणि मुलांचा शरिराशी असलेला दुवा ही मुलाच्या पोटावर असलेली “बेंबी” साक्ष आहे.जन्म झाल्यावर हा दुवा जरी कापला जातो तरी “रावा पासून रंका पर्यन्त ” सुख दु:खात आईला विसरुं शकत नाही.त्यातच ह्या “महान आईचे”अस्तित्व”अजरामर झाले आहे.

अनेकानी आईची स्तुती अनेक काव्यातून आणि लेखनातून प्रदर्शीत केले आहे.
त्यात माझी एक छोटीशी भर टाकण्याचा प्रयत्न.

आई

आई कुणा म्हणूनी
मी आईस हांक मारू?
येयील कां ती मज जवळी
ही ऐकुनी आर्त हांक

आई तुझ्या उच्चारात
“ब्रम्ह”दिसे मजसी
“आ” मधूनी दिसे ते आकाश
अन
“ई” मधूनी भासे तो ईश्वर

“आई”,”आई” असे म्हणूनी (मै आई)
येतेस तूं सदैव कामा
तुझ्या कष्टाला नसे कसली सीमा
अन
तुझ्या त्यागाल नसे कसली तमा
तुझ्या ममतेला नसे कसली तुलना
अन
तुझ्या कर्तव्याच्या न येयी आड भावना

तूं जन्म देतेस थोराना
शूर आणि थोर
कधीही तुला विसरेना

आई,थोर तुझे उपकार
कुणी ते फेडू शकेल का?
ऐरावती वरचे रत्न देऊनी
कुबेरही ऋणमुक्त होईल का?

किंव येते त्या अभाग्यांची
नसे ज्याना ती माउली
दुरभागी ते असती
नसे ज्याना तिची साउली

स्वामी तिन्ही जगाचा
आईविना भिकारी

                         श्रीकृष्ण सामंत (स्यान होझे कॅलिफोरनीया)

Permalink No Comments

दातांची व्यथा

March 9, 2007 at 5:24 pm (कविता)

दातांची व्यथा

एकदां जिभली बोले दातांस
मी अशी (बिचारी) एकटी
तुम्ही मात्र आहांत पुरे बत्तीस

मला नाही हाड न काड
मी आहे स्नायुचा गोळा
चुकून फिरले ईकडे तिकडे
तुम्ही करता माझा चोळामोळा
करिती ते (लोक) तुमचा उपयोग
म्हणती बोललो आम्ही जिभ “चाऊन”

ऐकून हे जिभलीचे संभाषण
दातं म्हणती तिला
वाईट सवंय आहे तुला
घेतली जिभ लावली टाळ्याला

बडबड करिशी तूं भारी
निस्तरावे लागे आम्हांपरी
वटवट तुझी ऐकून
म्हणती ते (लोक) वैतागून
गप्प रहाण्या काय घेशी
कां पाडू ती बत्तिशी?
(बिचारे दांत)

                     श्रीकृष्ण सामंत (स्यान होझे कॅलिफोरनीया)

Permalink No Comments

आमचे वेंगुर्ले

March 9, 2007 at 3:43 pm (वर्णन)

वेंगुर्ले

वेंगुर्ले या शब्दाचा अर्थ “वेंगेत मारून उरले ते वेंगुर्ले”.
वेंग म्हण्जे “कंबर”.म्हणजेच “कंबरेवर ठेऊन उरले ते”
प्रेक्शणीय स्थळे बघण्याचा ज्याना नाद आहे त्यानी वेंगुर्ल्याला अवश्य भेट द्यावी.रामेश्वर,दत्त,पुर्वस,ताम्बळेशवर,रवाळनाथ अश्या देवाच्या नावाची सुंदर मंदीरे बघायला मिळतील.तांबळेशवर मंदीर डोंगराच्या माथ्यावर आहे.खानोली गावाला जाताना घाटी चढून पाचशे ते सातशे फूट उंचीवर जावे लागते.वाटेत दोनशे ते तिनशे फूटावर तांबळेश्वर मंदीर आहे.

ह्या देवळाची ख्याती अशी की या देवळा जवळच गावाचे स्मश्यान भूमी आहे.त्यामुळे बहूतकरून दिवसा या देवळात दर्शनाला लोक येतात.रात्री हे देवूळ जरा भययुक्त्त वाटते.आजुबाजुचा देखावा तसा रमणीय आहे.

एव्हढ्या उंचीवरून खाली पाहिल्यास वेंगुर्ल्याचा समुद्र आणि फेसाळ लाटा,काळे मोठाले खडक,कोळ्यांची जहाजे,गलबते(मोठ्या होड्या),केव्हांतरी मुंबई ते गोवा जाणारी आगबोट आणि तिच्या नळकांड्यातून कोळशाचा धूर पाहिल्यावर “अरे नांखवा,रे नांखवा कितें रें? गोमू माहेरला जाते रे नाखवा हिच्या घोवाला कोकण दाखवा”हे जितेन्द्र अभिशेकी ने दिलेले सिनेमातले गाणे आठवून मन त्रुप्त होते.कधी कधी ही बोट वेंगुर्ल्याच्या बंदरावर पण थांबते.

तसा बंदराला धक्का नाही.दोन तिन मैलावर समुद्रात बोट थांबते.धक्यावरून पडाव किवा खपाटे (छोट्या होड्या)प्रवाश्याना घेऊन जातात किवा घेऊन येतात.त्यात मुम्बई वरून आलेले प्रवासी किवा गोव्याला जाणारे प्रवासी असतात.बोट लागून लागून ओकारया येऊन हैराण झालेल्या आमच्या सारख्या प्रवाशाना केव्हां एकदा धक्यावर येऊन पडतो असे होते.

दुपारी घरी पोहचल्यावर उकड्या तांदळांचा गरम गरम भात,त्यावर सरंग्याची आंबट तीखट आंबटी,आणि वालीच्या भाजीवर आडवा तिडवा हात मारल्यावर जीवात जीव यायचा.

ताम्ब्ळेश्वर देवाची आख्याईका अशी की तो देव नसून देवचार म्हणजे अर्धा देव आणि अर्ध भूत आहे अशी लोकांची समजूत असायची.आणि रात्री बारा नंतर तो वेंगुर्ल्या गावात फेरफटका मारतो अशी एक आख्याईका होती.त्यावेळी वीज नव्हती तेव्हां काळोख झाल्यावर लोक मिणमिणते दिवे विजवून लवकरच झोपी जायचे.शान्त वेळी भूत देवचार आठवले नाहीत तर नवलच म्हाणाव लागेल.

वेंगुर्ल्या बन्दराच्या ऊंच टेकडीवर एक सुंदर गेस्टहाउस आहे.झूळ झूळ  वारा,समोर अथांग सागर,आणि नजरेला न भिडणारे क्षितीज अशा वातावरणात विनोदी लेख व उत्तम नाटके लिहीण्याचा मूड पु.ल.देशपांडयाना आला नाही तर नवलच म्हणावे लागेल.ते ह्या गेस्टहाउस मधे मुक्कामाला असत असे त्यानीच एका त्यांच्या लेखात लिहून ठेवले आहे ते आठवले.

वेंगुर्ल्याच्या उत्तरेला क्यांप म्हणून खूप मोठे मैदान आहे.तुळस, मठ आणि वेंगुर्ले या तीन गावांच्या विळख्यामधे आहे.माझ्या लहानपणापासून ईथे एखादे  विमानतळ येणार म्हाणून बातम्या यायच्या पण अजून पर्यन्त बातम्याच आहेत.ह्या मैदानावर उन्हाळ्यात बरेच लोक संध्याकाळी फिरायला म्हणून यायचे.घरी परत्ताना वाटेत “बाब्ल्याचे कोल्द्रिन्क हाऊस ” म्हणून एका दुकानात, थंड थंड दूधात आइस्क्रिम घालून रंगी बेरंगी पेय घेण्यास चुरस लागायची.

वेंगुर्ल्याचे मार्केट ज्याला क्राफ़र्ड मार्केट म्हणून उल्लेखतात ते मुंबईला ज्या क्राफ़र्ड साहेबाने बांधले त्यानेच हे पण मार्केट बांधले आहे.मार्केटच्या आतल्या भागात काही दुकाने आसायची ती फक्त बेळगावाहून (घाटावरून) आलेली भाजी म्हणजे बटाटे, टोम्याटो असला माल ठेवायचे.आणि बाहेरच्या उघड्या जागेत जवळपासच्या लहान लहान गांवातून येणारा माल, ताज्या भाज्या, फळे फुले विकायला ठेवायचे.

मार्केटच्या बाजूच्या ईमारतीत मासळी बाजार भरायचा.तरहे तरहेचे मासे वेंगुरल्याच्या समुद्रातून किवा मांडवी वरच्या खाडीतून सरंगे, ईस्वण,बांगडे,कोलंबी,मोरी (शार्क मासा) असले मासे विकायला येत असत.मुंबईच्या समुद्रात मिळणारे पापलेट आणि बोंबील कोकणात मुळीच मिळत नाहीत.

खानोली घाटी चार पांच मैलांची आहे.चढून उतार लागल्यावर खाली चौपाटी (बीच) दिसतो.फेसाळ लाटांचा बीच आता कसा असेल कुणास ठावूक.कुडाळदेशकर द्न्यातीचे लोक खानोलीला दर वर्षी रवाळनाथाचा  उत्सव करायला येतात.घाटी चढताना करवन्दे, जांभळे, बोंडु, लहान लहान आंबे झुडपात जाऊन यथेच्य खायाला मिळायचे.
क्यांपच्या बाबतीत एक सांगावयाचे राहिले.तिथे एक हॊस्पिटल आहे. 
त्याला बाट्याचे हॊस्पिटल म्हणतात.ई.स.सतराशे पंचवीसच्या दरम्यान अमेरिकन मिशनरी लोकानी ते बाधले.जन सेवेबरोबर ते गरीब लोकांचे धर्मांतर करीत.सांगायचे म्हणजे १९३६ साली नुकतेच देशात रडिओ आले होते.ह्या होस्पिटलात एक रडिओ होता.दुसरा रतनागिरीच्या कलेक्टरकडे होता.आणि तिसरा अण्णानी माझ्या मोठ्या भावासाठी घेतला होता.हे रडिओ कार ब्यट्रीवर चालत.गम्मत म्हणजे प्रोगराम फक्त रात्रीचेच ऐकाला येत.रडिओ  आजुबाजुचे लोक ऐकायला येत.त्यांच्या बरोबर लहान मुले पण येत.

दुसरी गम्मत म्हणजे अमेरिकन प्रेसिडेन्ट कार्टरचा जन्म वेंगुर्ल्याच्या बाट्याच्या हॊस्पीटल मधे झाला.त्याचे आई वडील अमेरिकन मिशनरी म्हणून तिकडे रहात असत.कार्टरला मी अभिमानाने “वेंगुर्लेकर ” म्हणतो.तेव्हां असे आहे हे आमचे “वेंगुर्ले”

                                            श्रीकृष्ण सामंत (स्यान होझे कॅलिफोरनीया)

Permalink No Comments

कविता, कविता म्हणजे तरी काय

March 9, 2007 at 1:08 am (चर्चा)

कविता


कविता म्हणजे काय? असा प्रश्न खूप लोक विचारतात.कधी कधी काही लोक आपल्या कडून सुचना वजा उपदेश पण करतात.पण जो कविता लिहीतो त्याला ते ऐकून खूप मजा वाटते असेल कारण “असाच”विषय घेऊन तूं कविता लिही असे कोणी सांगितल्यास ते शक्य होणार नाही.आणि जे तसे लिहू शकतात त्यांचे खरोखरच कौतुक केले पाहिजे.

कविता करणे आणि “सुग्रास”जेवण करणे ह्या दोन गोष्टीची मी सांगड घातली तर अतिशयोक्ती होणार नाही.जेवणा साठी सामुग्री लागते.सामुग्री सर्वांकडे असू शकते पण म्हणून “गाजराचा हलवा”कर म्हणून कोणी सांगितल्यास सुग्रास चटकदार हलवा करायचा झाल्यास प्रथम तो करणाराल्या त्याची (करण्याची) आवड पाहिजे नसल्यास तो त्याचे “घोळ”करून ठेवील.

तसेच शब्दांची सामुग्री असली म्हणून कुठचेही शब्द वापरून  कविता लिहीता येणार नाही असे मला वाटते.लिहीणारयाला त्यावेळी आवड निर्माण झाली पाहिजे.खाण्याची डिश पुस्तक वाचून करता येते,पण उत्तम डिश बनवावयाची झाल्यास करणारयाला त्यामधे स्वत:ची “क्रियेटिविटी” दाखवावी लागते.त्याशिवाय ती डिश सुग्रास होणार नाही.कवितेचा विषय घेऊन सुधा “क्रियेटिविटी”नसेल तर कविता पण तितकी आवडली जाणार नाही.

थोडक्यांत आपल्या जवळ असलेल्या शब्दभांडारातून योग्य ते शब्द घेऊन विषयाला धरून त्यांची नीट जुळणी करता आली तर सुंदर कविता लिहीता येऊ शकेल.ह्या कलाक्रुतीत थोडा निसर्गाचा हात असावा असे पण मला वाटते.कारण स्व अनुभवातून मी सांगेन की कधी कधी डोक्यात विषय आला की शब्द आपोआप जुळून येतात आणि त्या दोन ओळी कागदार वर लिहील्या शिवाय चैन पडत नाही.कधी कधी ती शब्दाची जुळणी डोकयात कायम बसते आणि कागदावर लिहून काढता येते.

कुणाला आनन्द देणारी कविता आवडते तर कुणाला निसर्गावरच लिहीलेली कविता आवडते.पण खरं सामजायचे झाल्यास मला वाटते दु:खी मनातून कवितेची निर्मीती जास्त होते त्यामुळे ह्र्दयाला हलवणारया कविता जास्त वाचणारे लोक असतात.तसेच विनोदी कविता लिहीणारे कवी पण असातात पण बरेच वेळेला तुम्ही पहाल की त्या कविता वाचेपर्यंन्तच आवडतात नंतर विसरून जायला होतं. त्या उलट अखादी चटका देणारी कविता वाचल्या नंतर त्या कवितेचे शब्द आपल्या मनात घोळत असतात.जशी एखादी चटकदार डिश खाल्यावर त्याची चव तोंडात टिकून रहाते तशीच काही.

सर्व आनंद देणारया गोष्टी यातनेतून निर्माण होतात उदाहरणार्थ “जन्म”.बाळाची निर्मीती होत असताना आईला किती यातना होत असतात पण एकदा बाळ जन्माला आले की मग तिला किती आनंद होतो.घनदाट काळोखा नंतर प्रकाशाची थोडीशी पण तिरीप किती सुखदायक वाटते.आगितून पोळून काढलेले सोने किती चमकदार आणि पिवळे धमक दिसते.अशी किती तरी उदाहरणे देता येतील.

डोक्यात,निर्मीती होत असताना जशी होते तशी होवूं द्यावी. निर्मीती हा निसर्गाचा नियम आहे.त्याला कोणी काय ही करू शकणार नाही.

म्हणून म्हणतो मनातल्या भावना प्रदर्शीत करायल कविते सारखे दुसरे प्रभावी माध्यम नाही.कविता ह्रुदयातील कळा प्रदर्शीत करते.मग त्या आनंदाच्या असो दु:खाच्या असो वा विनोदाच्या असो.त्या तशाच येणार.त्यावर कुणाचा कंट्रोल नाही.
कविता एक दोन वेळा नीट वाचली की त्यामधला मतीतार्थ कळतो

                            श्रीकृष्ण सामंत (स्यान होझे कॅलिफोरनीया)

Permalink No Comments

माझी सुंदर आई

March 8, 2007 at 9:42 pm (आई विषयी)

एकदां प्रो.देसाई मला तळ्यावर भेटले.मला म्हणाले “सामंत,खूप दिवसानी बघा मला अलिकडे माझ्या आईची आठवण येते.ह्या वयांत असं होतं.माझे आजोबा मला मी लहान असताना असंच म्हणायचे.आता मला ते पटलं.
देवाचे अस्तीत्व आपण प्रथम आपल्या आई कडून शिकतो.मला आठवते माझी आई सांगायची की “देव खूपच सुंदर दिसतो”खरं तर कुणी पाहिले आहे हो त्याला?”

त्या निरपराध बाळाला आई असं सांगत असताना वाटत असणार की “आई मी काही देवाला पाहिले नाही पण खरं सांगू तुच मला त्याच्या पेक्षां सुंदर दिसतेस” ह्या भाऊसाहेबांच्या बोलण्यावर मला एक हिंदी सिनेमातले गाणे सुचले आणि भाऊसाहेब मला कविता लिहीण्याला सांगण्यापुर्वीच त्या गाण्याचा अनुवाद करायची कल्पना सुचली.

मॉं (ऊली)

पाहीले नसेल मी त्या “देवाला”जरी
त्याला पहाण्याची मला
असे काय जरूरी?
अगे,आई
कमलमुखी तूं संदर असतां
रुप “देवाचे “कसे वेगळे?

मानव कुठले?देव देवताही
फुलती तुझ्याच पदरी
दुनियेत ह्या स्वर्ग असे
पायतळी तुझ्याच तो वसे

ममतेने भरती नयन जिचे
देवमुर्ती पहाण्याची काय जरुरी?
अगे,आई
कमलमुखी तूं संदर असतां
रुप “देवाचे “कसे वेगळे?

कधी दु:खाचे ऊन असे
कधी नैराशाचे मेघ बरसे
हे कमल हस्त तुझ्या दुवांचे
सर्सावती मम माथ्यावरती
अगे,आई
कमलमुखी तूं संदर असतां
रुप “देवाचे “कसे वेगळे?

तूं असतां असे अंधार जरी
तरी सूर्य नारायणाची काय जरुरी
अगे,आई
कमलमुखी तूं संदर असतां
रुप “देवाचे “कसे वेगळे?

तुझ्या स्तुतीसुमनांनाच्या शब्दापुढे
कुठल्याही शब्द थोर नसे
देवा जवळी सर्व माया
तुझ्या ममतेला मोल नसे
अगे,आई
कमलमुखी तूं संदर असतां
रुप “देवाचे “कसे वेगळे?

असता जवळी दुनियेतली दौलत जरी
तुझ्या पुढे आम्हां त्याची काय जरुरी
अगे,आई
कमलमुखी तूं संदर असतां
रुप “देवाचे “कसे वेगळे?

                           श्रीकृष्ण सामंत (स्यान होझे कॅलिफोरनीया)

Permalink No Comments

ईश्वराचे कोडे

March 8, 2007 at 7:24 pm (कविता)

ईश्वराचे कोडे

म्हणे “वनस्रुष्टी” ईश्वराला
केलास तूं दुजा भाव
देवूनी वाचा अन
चाल “जीवस्रुष्टीला”

हंसला ईश्वर मनांत अपुल्या
म्हणे तो “वनस्रुष्टीला”
पस्तावलो मी वाटते मला
देऊन ते “जीवस्रुष्टीला”

एका बिजा पोटी तरुं कोटी
जन्म घेती सुमनें फळें
परी
वाचाळ होवूनी
केली “मानवानें”
सदैव भांडणे
दूर जावूनी विसरला
हा “मानव” अपुली मुळे

                       श्रीकृष्ण सामंत (स्यान होझे कॅलिफोरनीया)

Permalink No Comments

मुक्काम

March 8, 2007 at 3:37 pm (अनुवादीत)

मुक्काम
(अनुवादीत)

जीवनाच्या काही प्रवासात
जातात निसटून काही मुक्काम
ते परत येत नाहीत
परत ते कधीच येत नाहीत

फुलं उमलत असतात
लोक भेटत असतात
फुलं उमलतात,लोक भेटतात
पण
पडझडीत जी कोमेजतात
ती
वसंत येऊनही फुलत नाहेत
परत वसंत येहूनही ती फुलत नाहीत

जे
प्रवासात दुरावतात
ते
हजारो मधे भेटत नाहीत
पुरया जीवनातही जरी
त्यांच्या नावाचा उदघोश केला
तरी ते
कधीही भेटत नाहीत
परत ते कधीच भेटत नाहीत

द्रुष्ठी धोका आहे की भरवंसा?
संशय मित्र की दुष्मन?
थारा नका देऊं त्याना
सतावील याद त्यांची उद्याला
न रुंसता थांबवा त्याना

कितीही संदेश नंतर धाडलेत त्यांना
तरी ते भेटणार नाहीत
परत ते कधीच भेटणार नाहीत

उष:काल येतो संद्या जाते
समय जातच असतो थांबत नाही
मन:चक्शूना पण द्रुष्टी येत नाही
दिन,रात्र,सकाळ,संध्या निघून जाते
ती कधीही परत येत नाहीत
परत ती कधीच येत नाहीत
श्रीक्रुष्ण सामंत (स्यान होझे कॅलिफोरनीयाे)

Permalink No Comments

आठवतं कां तुला?

March 8, 2007 at 3:02 pm (चर्चा)

वेड्या आठ्वणी

अक्का,
आपली माणसं चटका लाऊन जातात,तशी तूं गेलीस.आपली माणसं जातात पण त्यांच्या आठवणी येतात.”आठवणी येतात”,असे आपण म्हणतो कारण आठवणी कधी जात नाहीत.काही आठवणी वेड्या असतात म्हणून त्या सारख्या येत असतात.

तूं बारा एक वर्षाची होतीस.मी सहा वर्षाचा होतो.तुझ्या डाव्या हाताच्या मुठीत माझे बोट धरून तुझ्या बरोबर चालत असताना तिन वर्षाचा सुधाकर तुझ्या कमरेवर,माझ्या हातात फुलाची परडी,असे आपण तिघं मागच्या परड्यात जास्वंदीची फुलं काढायला जात असूं.ही आठवण जेव्हां तूं गम्भीर आजारी झालीस तेव्हां प्रकर्शाने आठवली. आठवत का तुला?

तूं पंधरा सोळा एक वर्षाची असावीस,आपण सर्व दादरला ईंदीरा निवास मधे रहात असूं.त्याच मजल्यावर दहा नंबरच्या फ़्ल्याट मधे प्रसीद्ध मराठी ऍक्टर चन्द्रकान्त रहात असे.तूं सुन्दर दिसायचीस तुझं अक्षर पण किती सुन्दर,चन्द्रकान्तने ईंदीर निवासच्या सार्वजनीक गणपतीच्या कार्यक्रमात,”शारदा” नाटक बसवले होते.त्यात तुला “शारदेची ” मुख्य भुमीका दिली होती.”मुर्तीमंत भिती उभी मज समोर राहीली”हे गाणे आणि “म्हातारा ईतुका न अवघे पाउणशे वयमान”हे सुन्दर गाणे सुरात गाऊन तूं टाळ्या घेतल्यास,आणि वन्समोअर पण घेतलेस
आठवतं का तुला?

म्याट्रीक पर्यंत तूं दादरच्या गर्ल्स स्कूल मधे शिकत होतीस.महात्मा गांधी एकदा मुंबईला आले होते,त्यांची जाहिर सभा शिवाजी पार्कवर झाली होती.त्यांच्या सन्मानासाठी देशाच्या गौरवासाठी आणि त्याना खूप आवडणारे गाणे “वैषव जन तो जेणे कही रे जो पिडपराई जाणे रे”हे गाणे गाण्यासाठी तुला तुझ्या शाळेमधून निवडले होते.स्टेज वरच्या तुम्हा सर्व मुलींची स्वत:हून महात्माजीनी पाठ थोपटली,
हे तूं आम्हाला अभिमानाने सांगायचीस.
आठवते का तुला?

अण्णा आजारी झाले तेव्हां आपण सर्व वेन्गुर्ल्याला रहायला गेलो.तिकडे तूं रेशनींग ऒफ़ीस मधे नोकरी करायचीस.सुट्टी दिवशी तूं,मी,सुधा आणि तुझ्या मैत्रीणी मिळून आपण सर्व वेंगुर्ल्याच्या “क्यांप”मधे फ़िरायला जात असूं.”बाब्ल्याच्या “कोळड्रीन्क हाउस “मधे तूं आम्हा सर्वाना दुध कोळ्ड्रीन्क मधे आईसक्रीम घालून मिळणारे रंगीबेरंगी द्रिन्क पोटभर देत असायचीस.
आठवते का तुला?

मला आठवते एकावन,बावनच्या दर्म्यान तुझं लग्नं झालं.मी कॊलेजला दुसरया वर्गात शिकत होतो.तुझं लग्न मुंबईत (गिरगावांत) झालं.अण्णा आजारी असल्याने अण्णा आणि आई दोघही तुझ्या लग्नाला येऊं शकली नाहीत.तुझ्या सासरी जाताना त्यांची आठवण काढून तूं खूप रडलीस.मी पण तुला जवळ घेऊन तुझे अश्रु पुसत म्हणालो”रडू नकोस हे ही दिवस जातील”त्यानंतर मला टि.आय.एफ़.आर. मधे नोकरी लागली,आपण आई अण्णाना “आराम नगर” मधे आणले.त्रेपन्न मधे तूला विरेन झाला.
आठवते का तुला?

थोडासा मध्यंतरचा काळ सोडल्यास प्रत्येक भाऊबिजे दिवशी तूं माझ्याकडे यायचीस,किती आनंद व्हायचा त्या दिवशी?बोट धरून फुलांची परडी घेऊन देवपुजेला फुले आणण्यासाठी संगत देणारी तूं संगत देत राहीलीस.
आठवतं का तुला असं आतां मी कसं म्हणूं?

परलोकीच्या प्रवासाल निघालेली तूं आता अण्णा,आईला भेटशील,आणि या ईहलोकात राहून तुझ्या फ़क्त वेड्या आठवणी देशील.

                                 श्रीकृष्ण सामंत (स्यान होझे कॅलिफोरनीया)

Permalink No Comments

« Previous entries · Next entries »