छळकुटा देव

June 29, 2007 at 6:16 pm (कविता)

छळकुटा देव

तानुलीला खेळता खेळता पडून  हाताला दुखापत झाली.त्याच हातावर ती परत पडली.
शेवटी तिचा हात प्लास्टर मधे ठेवावा लागला.हे तिला सर्व नवीनच होतं.
तिन आठवडे हात प्लास्टरमधे असणार हे तानुलीला खरंच वाटत नव्हतं.
एका जाग्यावर निमुट न बसाणारी तानु,सतत बागेत फुलांबरोबर स्वगत करणारी
 तानु,हिरमुसली होवून बसलेली पाहून खालील कविता सुचली.

छळकुता देव

किती छळसी रे तू देवा
का करिसी तानुलीचा हेवा?
करिते ती सर्वांची सेवा
का पाडीसी तिला पुन्हा पुन्हा
कसली शिक्षा
अन कसला गुन्हा

बागेत बागडणारी
ती तानुली
फुलाना खुडणारी
ती तानुली
पक्षा संगे गाणारी
ती तानुली
फुल पाखरासवे पळणारी
ती तानुली
बसे होवूनी हिरमुसली
घरी दिवसभरी
समजून घे रे देवा
पाडू नको तिला पुन्हा पुन्हा
करी झटकन उपाय
तिच्या दुखापतीला
ऋणी होवू आम्ही
तुझ्या ह्या मेहरबानीला
पुन्हा आणिल ती घरी चैतन्याला
आनंदी होवू आम्ही फिरूनी
बघुनी तिच्या मधुर हास्याला

                 श्रीकृष्ण सामंत (स्यान होझे कॅलिफोरनीया)

Permalink No Comments

नातीच्या ग्र्याड्यूएशन पार्टीला आजोबांचे भाषण

June 24, 2007 at 1:13 am (भाषण)

अंकिताचे ग्र्याड्युएशन 

अठरावर्षापुर्वी हे छकुलबाळ आजोबा आजीच्या हाताच्या घडीवर झोपायचं.
ते बाळ आता एक सुंदर युवती,एक सॉकर खेळाच्या टिम मधली अप्रतीम
 खेळाडू,भावी डॉक्टर,आणि अतिशय मधूर वाणिने सम्पर्क ठेवणारी अशी ही  प्रियंका
 लवकरच युसीअर्वाईन मधल्या अतिउत्तम वातावरणात आपली पुढली चार वर्ष सत्कारणी व्यतीथ करणार आहे.

मी अंकिताला प्रियंका म्हणालो का? एव्हडा मी वयस्कर झालो आहे का?
खरं सांगू का? तिच्या लहाणपणी तिला अंकिता हे नांव आवडत नव्हतं.
“मला प्रियंका म्हणा” असं सांगायची. तिला अशा प्रसंगी किंवा माझ्या कवितेत मी तिला प्रियंका म्हणतो.

तुम्हाला माहित आहे काय?

ही जेव्हा तिन वर्षाची होती त्यावेळी ती “मुझे निंद न आई ,मुझे निंद न आई “हे
गाणे ऐकण्यासाठी कुरकुर करायची आणि गाणे बंद झाले तर रडून घर डोक्यावर घ्यायची.

तुम्हाला ठाऊक आहे का?

ही सात वर्षाची असताना , हिने तिच्या शाळेत मार्टीन लुथर किंग वर तिच्या गोड गळ्यातून आणि ठसकेदार
 बोलण्यातून  एक लेख वाचला होता आणि  तो तिच्या टिचरला एव्हडा आवडला की त्या टिचरने,
प्रिन्सिपलला सांगून ते तिचे भाषण अख्या शाळेच्या लाऊड स्पिकरवर वाचायला लावलं होतं.

तुम्हाला माहित आहे का?

ही ज्यावेळेला नऊ वर्षाची होती तेव्हा एकटीच ह्युस्टनला विमानातून
 प्रवास करून आपल्या दोन आतेभावंडा बरोबर उन्हाळ्याच्या सुट्टीत मजा करायला गेली होती.
काही दिवस राहिल्यावर ती परत जाताना मी तिच्या जवळ एक कविता लिहून दिली होती
 आणि विमान जेव्हा पूर्ण वर जाईल तेव्हा ती कविता तिला उघडून वाच म्हणून सांगितलं होतं.
 
ती कविता अशी होती.

ज्याला म्हणतात पश्चिम अमेरिका
तिथे रहात होतं एक बर्डी
जीच नाव होत प्रियंका
एके दिवशी ते गेले उडत ह्युस्टनला
आपल्या छोट्या भावंडाशी खेळायला
बार्नी बनीशी ती खेळली
मोनोपली खेळण्यात ती गुंतली
ती सर्व मिळून खेळली
 हाईड आणि सीक
आणि वाळुचे डोंगर करायला
गेली ज्याला म्हणतात
 ग्याल्वस्टन बिच

होता तो गर्मीचा मोसम
खेळली थंड पाण्यात भरभरून
खेळायला गेली ती त्या ठिकाणी
 ज्याला म्हणतात पिक्यान पार्क
आणि घरी परतायची जेव्हा
होत असे पिच डार्क

वेळ झाली प्रियंकाची
परतीच्या प्रवासाला
भावंडे बोलू लागली
“जातेस एव्हड्या लवकर कशाला”?

म्हणाली प्रियंका भावंडाना
“नका होवू दुःखी मी परत जाताना
उन्हाळ्याची सुट्टी येते दर वर्षी
मी पण येईन तशी तशी”

पाहून  प्रियन्काला आकाशात
अश्रू आले भावंडांच्या डोळ्यात
ओरडून म्हणाले ते
प्रियन्का, “बाय बाय”
तुम्हाला ठाऊक आहे का?

ही चवदा वर्षाची असताना टी.व्ही.वर एका लाईव्ह कार्यक्रमात आम्ही तिला पाहिली आम्हाला
खुप आनंद झाला
गेल्या चार वर्षात प्रियंका आपल्या अभ्यासात आणि आपल्या कामात एव्हडी दंग आहे कि आजीआजोबाना
ती जणूं “दूज कि चांदनी “झाली आहे.

लवकरच आमची दोन नातवंडं पुढची चार वर्ष बराच काळ आमच्या पासून दूर असणार.
आम्ही त्यांची वाट बघत असणार

    श्रीकृष्ण सामंत (स्यान होझे कॅलिफोरनीया)

Permalink No Comments

नातवाच्या ग्र्याड्यूएशन पार्टीला आजोबांचे भाषण

June 23, 2007 at 1:39 am (भाषण)

 आजी,आजोबांची दोन नातवंडे,लवकरच कॉलेजमधे जायच्या तयारीत आहेत.
नातू लवकरच यूनिव्हरसीटी ऑफ कॅलिफोरनीया स्यानट्याकृझ म्हणजेच “यूसीएससी” मधे जाणार.
त्याच्या ग्र्याड्यूएशन पार्टीला अर्थातच बरेचजण भाषण करणार.त्या प्रसंगी आजोबांचे भाषण झाले त्याचा
हा उतारा.

 नमस्कार मंडळी ,

  कवितेच्या, दोन ओळीने मी सुरवात करतो.

ओळी अशा आहेत,

“जेथे आजीआजोबा वसती

तेथे नातवन्डे, आनंदे बागडती”

आजीआजोबा, आणि नातवंडं,ही जेव्हा एकेठिकाणी रहातात, तेव्हां,

  त्यातली  मजा, त्यानाच अनुभावाने समजते.मी,

 माझं बालपण आठवूनच, हे म्हणतोय.

 हा सहा फूट चार इंच, उंचीचा, उमदा तरूण, आजच्या ह्या समारंभाचा, हिरो आहे.

ह्या श्याहत्तर इंच, उंचीचीच्या रोपट्याला ,त्याच्या आईबाबाबरोबर,

 आजीआजोबाना पण, खतपाणी घालण्याची संधी मिळालीना ,
 
त्याचा आज  आनंद होत आहे.

नितीशला, नंतर डिगऱ्या मिळतीलच, मी मात्र, त्याला “भाषा पंडीत”

ही डिग्री केव्हांच दिली आहे.त्याचं कारण सांगतो. लहानपणा पासून,

   त्याने, मराठी भाषेची समृद्धी केली आहे.त्याचं ,कौतूक म्हणून, त्याने

 भर घातलेले, मला जे आठवतात ते, त्याचे स्वतःचे काही जोड शब्द ,तुम्हाला

मी सांगतो.त्यावेळी ना, तो खूपच लहान होता.
चषम्याला तो तस्सन म्हणायचा

सकाळी उठल्यावर, आजाच्या डोळ्यावर चष्मा नसला ,की तो दुडु दुडु

धावत जाऊन, चष्मा घेऊन यायचा ,आणि मला हातात देऊन म्हणायचा “आजा तस्सन”

कलिंगडाला  कंगी
पुस्तकाला , फुकत

माझं पुस्तक, मला हातात आणून देत म्हणायचा, “आजा,  तुझ्यं फूक्कत”
 
सुर्याला , बाप्पाशुली
गरम भांडे उचलण्याच्या चिमट्याला, कांची

किचन मधे, लुडबुडत असताना, “आजी, कांची “म्हणून,
 
चिमटा नेऊन ,आजीला द्यायचा

 कृष्णकन्ह्ययाला,  किसनकनी
 
आणि पिस्तूलातून येणाऱ्या, आवाजाची  नक्कल, फुताम, फुताम, अशी करायचा.

त्याचं एक आवडीच गाणं मी तुम्हाला म्हणून सांगतो

ब्यॅड बॉईझ,ब्यॅड बॉईझ वाच्यू क्यान यू डू व्हेन दे कम फॉर यू

ब्यॅड बॉईझ,ब्यॅड बॉईझ वाच्यू क्यान यू डू व्हेन दे कम फॉर यू

हा त्याच्या आजीचा, आणि त्याचा, अगदी आवडीचा कार्यक्रम

 ऐकून झाल्यावर, रोजचा कार्यक्रम

 आजोबा  चोर, आणि हा कॉप.पिस्तूल ,मला दाखवून ,फूताम, फूताम

झाल्यावर, माझे दोन्ही हात, पुढे करून झाल्यावर ,”यू ,आल, अन्दल, ऍलिस्ट”

 असं म्हटल्यावर, मला शरण यावं लागायचंच,”

“ते दिवस निघोन गेले, आठवणी, फक्त राहिल्या “

 नितिश, मराठी भाषा ,अगदी अस्खलीत बोलतो.

आता, हायस्कूल मधे तो, चिनी, म्यांड्यारीन भाषा,  शिकलाय.

मराठी,इंगलीश, आणि म्यांडरीन,हे  शिकून झाल्यावर,

 तुम्हाला गम्मत सांगतो ,आता तो, कंप्युटरच्या ,बऱ्याच भाषा शिकलाय

जावा,पर्ल ,सी प्लस ,सी प्लस प्लस वगैरे वगैरे.आता मला सांगा, अशा वेळी,

 ”भाषापंडीत “ही डिग्र्री, ह्याला देऊन ,मी ह्याचा, सन्मानच केला की नाही?

 मी वापरावं म्हणून, माझ्या पीसीवर, त्याने लिनक्स ,सिस्टीम सॉफ्ट्वेअर

डावून लोड, पण केलंयं, आणि गम्मतीची गोष्ट म्हणजे, लिनक्स मधे,
 
जन्टू,  उबुन्टू, कुबुन्टू, एजुबुन्टू, असले शब्द आहेत, त्यांचा अर्थ ,
 
 मला समजावून पण सांगतो, त्यावेळी मला ,किती आनंद होतो, सांगू तुम्हाला?.

 हे पण शब्द , तस्सन, कंगी,कांची, सारखे, त्याचेच आहेत काय?
 
असा प्रश्न,  त्याच्या आजीच्या मनात मात्र ,कधी कधी येतो.असो.

तुम्हाला ,आठवत असेल कदाचीत, फार पूर्वी , ऋषी मुनींच्या वेळी, मुलं ,

आश्रमात शिकायला जात,

 आता, ती, एकविसाव्या शतकात, क्याम्पस मधे जातात,असं ,मराठीत आपण म्हणतो.

त्यावेळची मुलं, पर्णकुटीत राहत, आता ती  डॉर्म मधे राहतात, असंही मराठीत म्हणतो.

शिकण्याचा वेळकाळ ,जवळ जवळ तसाच. थीम तेच, शब्द मात्र निराळे.
 
ह्या वर्षी ,आमची दोन नातवंडं,आम्हाला सोडून ,शिकायला आश्रमात जाणार.

नितीश आणि अंकिता.एक युसीएससी मधे, तर दुसरी, युसी अर्वाईन मधे.

त्यांच्या आईवडीलाप्रमाणे, आजीआजोबाना पण, ती दोघं सोडून जाणार,

याचा विचार येवून, थोडसं वाईट वाटतं.

पण मग, सर्व अभ्यास संपवून, ते परत येणार, त्याकडे लक्ष्य केंद्रीत करायला,

 बरं वाटतं.

कारण, त्यावेळी, निश्चीतच, एक उमदार, स्मार्ट व्यक्तीमत्व,

 आम्हाला पहायला मिळणार.
 
“ए व्हेरी कूल प्रॉडक्ट” म्हणतातना, अगदी तसं पहायला मिळणार.

 म्हणतात नां अहो,आशेला, मर्यादा कसल्या हो?

शेवटी जाता जाता, दोन ओळींच्या कवितेतून,  आजी आजोबाचे आशिर्वाद.

कवितेच्या ओळी अश्या आहेत 

खडतर आहे, भावी जीवन

बालपणाची, मजा हरवून

सुखदुःखाला, झूंज देवून
                      
होणार तुम्ही, कर्तुत्ववान

 ”गॉड ब्लेस माय गॅंन्डचिल्डरेन “

                   श्रीकृष्ण सामंत (स्यान होझे कॅलिफोरनीया)
 

Permalink No Comments

खऱ्या यशाची व्याख्या.

June 23, 2007 at 12:39 am (विचार)

खऱ्या यशाची व्याख्या  

यशस्वी होणे म्हणजे स्वतःचे उद्देश साध्य करणे.
हंसत राहणे
खूप प्रेम करणे
विद्वानाकडून आदर प्राप्त करणे
लहानांकडून प्रेम संपादन करणे
प्रामाणिक माणसाकडून शाबासकी घेणे.
खोट्या मैत्रीतून झालेला गैरविश्वास सहन करणे
सौंदऱ्याची स्तुती करणे.
इतरा मधले चांगले तेव्हडेच पहाणे.
“मीपणा” सोडून देणे
उत्साही राहून हंसणे,गाणे , खिदळणे
आणि
शेवटी आपल्यामुळे जगातला एक प्राणी सुखाने श्वास
घेऊ शकला याची जाणीव होणे
म्हणजेच माझ्या मते
यशस्वी होणे

        श्रीकृष्ण सामंत (स्यान होझे कॅलिफोरनीया)

Permalink No Comments

बालपण देगा देवा

June 17, 2007 at 2:31 am (टिका)

बालपण देगा देवा

“जेव्हा वृद्धाश्रमाला भेट दिली त्याची “याद”मी तुम्हाला सांगतो”,
असं प्रो.देसाई मला तळ्यावर एकदा भेटले त्यावेळी म्हणाले.मी निमूटपणे ऐकण्याचं ठरवलं.
प्रो.देसाई आज जरा रंगात आले होते.
ते पुढे म्हणाले,

त्या आश्रमाच्या उत्साही संचालकाने आम्हाला माहिती देण्यासाठी त्यांच्या बरोबर येण्याची विनंती केली.
एका मोठ्या हॉलमधे, वयाने  पंचाहत्तरीच्या आसपास   असलेले आजीआजोबा आम्हाला पाहून
   आमचे स्वागत करण्याच्या इराद्याने धडपडत उभे रहाण्याचे प्रयत्न करताने दिसले.
गोंधळलेल्या मनस्थीतीत असलेल्या त्या वयस्कर आजोबाना,”बसा,बसा”असे म्हणण्यापुर्वीच
  त्यांचे धडपडीचे हे चाललेले  द्रुश्य पाहून माझी मलाच अत्यंत लाज वाटली.

संचालकाने मला एका कोपऱ्यात नेऊन प्रत्येक चेहऱ्याच्या मागे दडलेली कथा माझ्या कानी घातली.
ते ऐकून  क्षणभर माझ्या मनात आलं की जर का हा वृद्धाश्रम नसता तर कदाचीत ह्यातले बरेचसे
  आजीआजोबा रस्त्यात भिक्षेंदाही करीत  असते.ही संस्था जणू एखाद्या मुलासारखी असून
  आजीआजोबांच्या त्या कापणाऱ्या  हाताना एखादं खोल रुतलेलं मूळ प्रेमाचा आधारच असावा.

एका आजीचा नवरा हयात नव्हता आणि तिला मुलगापण नव्हता.समवयस्क मित्र,मैत्रीणी
 बरोबर ती बिचारी “अन्ताक्षरी” खेळत होती.ती मजा करत होती.तिला जवळचे नातेवाईक पण नव्हते.
ह्या अशा संस्थेमधे तिला संगीताच्या सुरात मित्र गवसले होते.ह्या संस्थेतल्या संगीताच्या सूरानी
 तिला शेवटच्या श्वासापर्यंत उसंत दिली होती.

पण एका वृद्ध चेहऱ्याने माझ्या मनाला एव्हडी ओढ लावली होती, की  भग्न आणि सुरकुतल्यांचे
 जाळे असलेला तो चेहरा आठवून मन अचंबीत झालं.

ते संचालक म्हणाले “पंधरा दिवसापुर्वी एक उमदा, लाघवी तरूण, ह्या आजीला इथे घेऊन आला,
ती त्याची अनाश्रीत शेजारीण,तिला प्रेमाचे असं कोणी नाही.तिचा नवरा निर्वतल्या नंतर ती एकाकीच झाली.
शुल्लक पेन्शन्ची ती अपेक्शीत आहे,ती एकटी असल्याने , आजारी पडली तर तिची
  देखबाल कोण करणार?,आणि दुसरं काही झालं तर कोण बघणार?”म्हणून ह्या सुस्वभावी
उमद्या तरुणाने प्रेमाचा ओलावा ठेऊन तिला  एकडे आणून सोडली.

 ”धन्य,धन्य”, शेजारी असून सुद्धा शेजारधर्म पाळून आणि तिच्या भविष्याची
खंत ठेऊन त्याने तिला इकडे आणून सोडलीत्याचा गौरव करीत मी माझ्याशी पुटपुटलो.

संचालक पूर्ण शांत राहून म्हणाले” अगदी खरं,पण ह्या तरुणाचा खरा गौरव अजून बाकीच आहे.
हा मदतीचा हात पुढे करणारा उमदा तरूण तिचा सख्खा मुलगा आहे.” “काय?”असे म्हणताना,
 माझ्या हातातल्या चहाच्या कपातला चहा डुचमळला,पण मी काही थरथरलो नाही.

“होय,इथे आल्यावर पहिले दहा दिवस ती कधी हसलीच नाही,की काही बोलली नाही.
एखाद्या जीवंत मुडद्या सारखी ती अबोलच राहिली.अलिकडेच थोडा भराव वाटल्यावर म्हणाली
“माझ्या मांसाचा तो गोळा आहे,असं मूल कुणाचं असूं शकतं का?”आणखी माहिती देण्याच्या
उद्देशाने संचालक बोलून गेले.

“काय?” ह्या माझ्या निरपराधी प्रश्नाचे उत्तर, जीवंत मुडदा म्हणून भटकत होतं.
“वृद्धाश्रम म्हणजे काय कृतघ्ज्ञ आणि भांडकुदळ मुलांनी, घाण म्हणून आईवडिलांना
फेकून देण्याची गायरी आहे काय? कृतज्ञ असण्याचा गूणाचा लोप होत आहे
” संचालक तावातावाने सांगत होते.

जंगली जनावराना,  शाळेत न शिकता सुद्धा नैसर्गिक ओढ असते ती  ह्या सुशिक्षीत
 समजणाऱ्या मुलांकडे नाही.गौरवशील घराची व्याखा म्हणे फ्रिज,गाडी,टी.वी.,सेलफोन असतो ते,
 अशी केली जाते पण ज्या घरात आंतरीक जिव्हाळ्याचे धागेदोरे नाहीत ते घर
जरी बाहेरून “ताज महाल” वाटला तरी आतून एखादी “कबर” असते.

विभागलेल्या कुटुंबात आजीआजोबाना स्थान नसतं.आईवडिलानी आपल्या
मुलांना”ते आपल्या कुटुंबाचे भाग आहेत” हे दर्शविलं पाहिजे.एक संघ राहिलं पाहिजे.

वयोमानामुळे वृद्ध माणसे कधी कधी “सरफिरे” होतात,हट्टी बनतात.
घरी कधी कधी वाद होतात.जसे दिवस जातात तसे वाद कमी होतात,संपर्क वाढतात.
पैशाच्या आणि तारुण्याच्या प्राप्तीमुळे मुलानी कृतघ्ज्ञ होवू नये.त्यांच्या वार्धक्यामुळे
 आलेल्या त्यांच्या  अक्षमतेवर भाष्य करण्याचा चालून आलेला आपला अधिकार आहे असे ग्राह्य धरू नये.

घर हे एक जीवंत पुस्तक आहे.तरूण पिढी ते न बोलता वाचत असते
जेव्हा मुलगा यश मिळाल्यावर कृतज्ञ होवून,नतमस्तक होवून (वाकून) आईच्या आशिर्वादासाठी
 पाया पडतो ते पाहून पुढची पिढी आपल्या आजी आणि आईकडे पुनराव्रुतीस प्रव्रुत्त होते.
हे काही शाळेत शिकवलं जात नाही,मुलं ते पाहून आणि समजून तसं करतात.

“तुम्ही काही आमच्यावर उपकार केले नाहीत, तुम्ही तुमचं कर्तव्य केलंत”किंवा
“आम्हाला जन्म देण्याची आम्ही तुमच्याकडे याचना केली नव्हती” असले उदगार
 काढणाऱ्या काही व्यक्ती निवडून काढायला कठीण नाहीत.असे विचार किंवा अशा
विचाराची मुळधारणा असल्यावर तिकडेच सर्व संपतं.नमून वागण्यात जर कमीपणा
मानला तर त्या मुलाची वृद्धी कशी व्हायची?.

अलिकडे, वडिलमाणसं सांपत्तिक परिस्थिती चांगली असल्यावर स्वतःची
मंडळं स्थापून “आता आम्हाला आमचं जीवन जगायचं आहे,चांगली पुस्तकं वाचायची आहेत,
चांगली नाटकं पहायची आहेत,देशात आणि बाहेर जग फिरायचं आहे,घरातली कामं
 आणि कर्तव्यं करायची नाहीत.”असे म्हणणारे नवीन आजीआजोबा दिसतात.
पन्नास वर्षापुर्वीचे ते आजी आजोबा आता राहिले नाहीत.

स्वतःचं स्वातंत्र्य ठेवण्यासाठी जरी अशी व्रुती आणली आणि मुलांवर अवलंबून
न रहाण्याचे जरी मनात असलं  तरी तो संपर्क तो दुवा ठेवणं आवश्यक आहे,
कारण आयुष्याच्या उतरणीवर मुलांची मिळणारी प्रेमाची आस्था मुकून जाणं योग्य नाही.
ही एकमेकाची जरुरी असते.हट्टवादी राहून शेवटी एकमेकास असून नसल्यासारखे होणं
 ह्यातून काही साध्य होत नाही.

हजारो लोक आजुबाजुला असून सुद्धा आपल्या यशाची शिफारस अथवा पाठ
 थोपटण्यासाठी आपलं माणूस जवळ नसल्यास किंवा “जीवन असंच असतं काळजी करू नको सर्व
काही ठिक होईल पुढे जा मागे वळून बघू नको “असं सांगणारे आपले वडिलधारे जवळ नसतील तर
 त्या यशाचा काय उपयोग? 

                  श्रीकृष्ण सामंत (स्यान होझे कॅलिफोरनीया) 

Permalink No Comments

भावंडांची गुप्त भाषा

June 14, 2007 at 1:14 am (गम्मत)

भावंडांची गुप्त भाषा

अण्णा,आबा,दादा,आते आणि आप्पा ह्या चार भावंडांची एक गुप्त भाषा होती.
लहान असतानाच त्या सर्वानी तयार केली होती.जशी एक “चकारी” भाषा आहे
आणि बहुतेक सर्वांना ती माहित असावी.उदा.”तुला माहीत आहे का?”
 हे वरील “चकारी”भाषेत म्हटलं जाणार “चलातू चहीतमा चहेत का?”
अशाच प्रकारची थोडी वेगळी भाषा होती.आणि हे सर्व त्यानी त्यांच्या आईला आणि वडिल,
 नानांना कळू नये आणि आप आपसात बोलायला मिळावे, म्हणून तयार केली होती.

एकदा काय झालं अण्णा आणि दादा सावंतवाडीहून वेंगुर्ल्याला आप्पांच्याच
“सावंतवाडी ते बेळगांव ” ह्या बस सर्वीस मधून जात होते.अप्पा स्वतःच बस चालवत होते.
बस मधले दोन प्यासींजर एकमेकात बोलत होते.तिच गुप्त भाषा त्यांनाही येत होती.
त्या भाषेत एक दुसऱ्याला सांगत होता,”हे चार मुलगे नांनांचे”आणि पूढे तो सांगू लागला,

“माझा मोठा मुलगा एक्साईझ सुपरीन्टेंडन्ट,दुसरा स्टेशन मास्तर .
तिसरा ब्यांक म्यानेजर, आणि चवथा, जो बस चालवत आहे तो, स्वतःची सर्वीस चालवतो”
असे यांचे वडिल, नाना सर्वांना फूशार्कीने सांगत असतात.”

हे त्याचे गुप्त भाषेतले भाषण ऐकल्यावर अण्णानी त्याच भाषेत त्याला सांगीतले
“फूशारकी म्हणता काय ?थांबा घरी गेल्यावर मी नानानांच सांगतो तुम्ही अमुक अमुक ना?”
असे हंसत हंसत म्हणाले.खरं तर तो आतेचा  नवऱ्याकडचा नातेवाईक होता आणि नंतर कळलं
आतेनेच त्याला ही गुप्त भाषा शिकवली होती आणि त्याने त्या दुसऱ्या माणसाला शिकवली होती.
ते दोघेही खूप घाबरले त्यावर अण्णा म्हणाले” अरे, तुमची मी गम्मत केली नानांना
 आम्ही सांगणार नाही घाबरू नका”

ही गोष्ट अण्णानी आम्हाला सांगितली आणि ते पुढे म्हणायचे
 ”आमचे नाना खूप शिकलेले नव्हते,पण त्यांना आम्ही त्यांची
मुलं शिकलेली आहोत याचा खूप अभिमान होता.म्हणून ते आल्या गेलेल्या असं सांगायचे एव्हडंच.
 ”हे सांगताना अण्णांच्या डोळ्यात पाणी यायचं.

                 श्रीकृष्ण सामंत (स्यान होझे कॅलिफोरनीया)

Permalink No Comments

कॉर्नींगचे भांडे

June 6, 2007 at 4:04 am (कवितेतून विचार)

प्रो.देसाई मला म्हणाले “सामंत, आज मला तुमच्या बरोबर एका विषयावर चर्च्या करायची आहे”
मी म्हणालो “भाऊसाहेब, त्यानंतर मग तुम्ही मला नक्कीच एखादी कविता लिहायला सांगणार खरं ना?”
 ते फक्त हंसले.”बरं सांगा काय तुम्हाला सांगायचे आहे ते”मी म्हणालो.

“सामंत,काय झालं आता वयोमानामुळे पुर्वी सारखी आपल्याला कामं होत नाहीत.
तरी पण शरिराची हालचाल ही झालीच पाहिजे. नाही काय?.
डिश वॉशर लोड अनलोड करण्याचे काम मी घरात करतो.
कांचेची भांडी असतात कधी तरी  काढता ठेवताना ती फुटतात.
“कॉर्नींगचं” भांडं हा माझ्या मुलीचा “वीक पॉईंट”आहे अशी माझी समजूत आहे.

वॉलमार्ट मधे गेली की ती “कॉर्नींगच्या भांड्यांच्या  आईल मधे जावून
 निरनिराळी नवीन भांडी न्याहळल्याशिवाय तिचं शॉपींग पूरं होणार नाही.
आणि ती  एखाद नवीन भांड विकत घेणारच.
तर,त्याच काय झालं असलच एक भांड जुनं झालं होत ते फुटलं.
ते बघून तिला खूप वाईट वाटलं.मला तिच्या चेहऱ्यावरून दिसलं.
फुटण्याचे कारण बिरण सांगत बसलो ना तिला, तर मग त्यावर दोघांचा वाद होणार,
 म्हणून मी काही बोललोच नाही .पण मनांत वाटत होतं की तिला अश्यावेळी
 समजुतीने सांगायला हवं नाही काय? तुमची आठवण आली बघा,नाहीतरी तुम्ही सांगताना की,
 कवितेतून आपल्या भावना किंवा मनातले विचार जास्त परिणामकारक
प्रदर्शीत करता येतात असं काही तरी, मग म्हटलं तुम्हाला भेटल्यावर
ह्या विषयावर एखादी कविता लिहायला सांगावी.खरं ना?”
 मी म्हटलं “भाऊसाहेब मी सुरवातीला हे भाकीत केलं होतच .
ठिक आहे पुन्हा ज्यावेळी भेटूं त्यावेळी जमलं तर कविता घेवून येतो.”

 जाता जाता भाऊसाहेब म्हणाले “सामंत तुमची ती कविता मी माझ्या
मुलीच्या समोरच ठेवतो म्हणजे सर्व काही साध्य होईल.
त्यानंतर मला खालील कविता सुचली.
कविता अशी आहे.

इस्तमाल होना है तो
इन्तकाल होनाही है

कॉर्निगचे भांडे
हा तुझा “वीकपॉइंट” आहे
ते तुटल्यावर तुला
दुःख होणे सहाजीक आहे
तुझ्या दुःखात सहभागी न होणे
मला असंभव आहे

धगघगत्या वॉशर मधून
रखरखत्या ओव्हन मधून
खतखतत्या अन्ना मधून
ठेवून परत घेण्या मधून
घेवून परत ठेवण्या मधून
अपरिमीत शॉक मधून
“बचा तो सिकंदर
न बचा तो मुक्कद्दर”

सजीव असो वा निर्जीव
जनन मरणाचे तत्वज्ञान
एकच असते
इस्तमाल होजाय
तो इन्तकाल होनाई है
पण इथे आहे एक दिलासा
कॉर्नींगचे भांडे एकदीन
वालमार्टमे मिलनाही है

       श्रीकृष्ण सामंत (स्यान होझे कॅलिफोरनीया)
 

Permalink No Comments

सहज सूचलं म्हणून

June 5, 2007 at 4:16 am (विचार)

सहज सुचलं म्हणून
वाचता वाचता वाचनात आलं तेव्हां
“असं शिकून वागता आलं तर”?
निसर्गाकडून खूप काही शिकता येतं.
दुसऱ्याला काही देताना गर्वाने अथवा घमेंड करून देऊ नये.उलट आदराने व प्रेमाने द्यावं.
सूर्य सर्वांना प्रकाश आणि जीवन देतो.असं देताना कोलाहाल आणी गर्मी देतो.
चंद्र थंड प्रकाश देताना प्रेम आणि सद्भावनेची आठवण करून देतो.
हा फरक का आहे?
कारण सूर्याला अहंकार आहे ,घमेंड आहे की “मी सर्वांना जीवन देतो”
परन्तु चंद्र, प्रकाश विनम्रपणे आणि प्रेमाने देतो.कारण त्याला ठाऊक आहे की
 ”हा प्रकाश आपला नाही” हा प्रकाश त्याला सूर्याकडून मिळाल आहे.
हा विचार जर माणसाने स्विकारला तर? जे काही आपल्या जवळ आहे
 ते”त्याने” दिलेले आहे.म्हणून आज जे काही आपण दुसऱ्याला देऊ,
ते अहंकार आणि घमेंड ठेऊन न देता,चंद्रासारखे प्रेम आणि सद्भावनेने द्यावं.

                      श्रीकृष्ण सामंत (स्यान होजे कॅलिफोरनीया)

Permalink No Comments

फादरस डे

June 5, 2007 at 4:01 am (कविता)

 कवितेचा आशय असा आहे की आपण मोठी माणसं,मोठ्यांबरोबर औचित्य ठेवून वागत असतो,का तर एकमेकाच्या भावना सांभाळण्यासाठी आपली ही धडपड असते.पण तोच जर लहान मुलाबरोबर आपला संपर्क आला तर बहुदा आपण आपले “मूड” संभाळण्याचा प्रयत्न करतो.मुलांच्या भावनांची जास्त कदर करत नाही.ह्या कवितेत तिच मध्य कल्पना आहे.

फादरस डे

वाटेत एका अनोळख्याला
जवळ जवळ आपटलो
“माफ करा”असे म्हणून मी
त्याच्या पासून सटकलो

“करा माफ”मला पण
म्हणत थांबला तो क्षणभर
औचित्याच्या वागण्याने
सुखावलो आम्ही दोघे वरवर

आपल्या घरी 
स्थिती  असते निराळी
लाहान थोरासी चटकन
आपण वागतो फटकून

झाली त्यादिवशी गम्मत
होतो कामात मी दंग
चिमुकल्या माझ्या मुलाने
केला माझ्या  एकाग्रतेचा भंग

“हो बाजूला”
म्हणालो मी वैतागून
गेला तो निघून
हिरमुसला होऊन
रात्री पडलो
असता बिछान्यात
आला विचार
माझ्या मनात
औचित्याच्या भारा खाली
अमुची रदबदली झाली
वागलो चांगले अनोळख्याशी
अशी समजूत करून

मी घेतली मनाशी

पाहता फुलांच्या पाकळ्या
पडल्या होत्या दाराशी
लाल, पिवळी अन निळी
खुडली होती
फूले त्याने सकाळी
आला होता घेऊन ती हातात
टाकण्या मला आश्चर्यात
आठवून तो प्रसंग पून्हा
वाटे मजकडून झाला गून्हा
जाऊन त्याच्या बिछान्याशी
जवळ घेतले मी त्या उराशी

पुसता  फुलांच्या पाकळ्या विषयी
हसला तो मला बिलगूनी
बोले तो मज भारावूनी
“घेऊनी ती सर्व फूले
आलो होतो तुमच्याकडे
कारण आजच आहे “फादर्स डे”

मागूनी त्याची माफी
पुटपुटलो मी त्याच्या कानाशी
चूक केली मी सकाळी तुझ्याशी

पुसून अश्रू माझे त्याने
हसून बोलला तो पून्हा एकदा
करतो प्रेम मी
तुमच्यावर सदासर्वदा

रहावे ना मला ते ऐकून
म्हणालो मी ही भारावून

आवडशी तू मला अन
मुकलो मी तुझ्या
आच्छर्याच्या आनंदाला
दिसलास सुंदर तू फुलांमुळे
होते सुंदर तुझे ते फूल निळे
              श्रीकृष्ण सामंत (स्यान होझे कॅलिफोरनीया)

                  shrikrishnas@gmail.com

Permalink No Comments

वृध्द्त्व एक शाप केव्हा ठरते.

June 3, 2007 at 12:57 am (अनुवादीत)

वृध्दत्व शाप केव्हा ठरते.(अनुवादीत)

वाचता वाचता वाचनात आले म्हणून

वृध्द व्य्कतींचे सर्व साधारण दोन भाग पाडले जातात.
जे वृध्द ६० ते ७० वयोगटात असतात,त्याना तरुण वृध्द म्हणतात,
तर जे सत्तर पेक्षा अधीक वयाचे असतात त्याना जास्त वृध्द असे म्हणतात.
ही वृध्द मंडळी सर्वसाधारणपणे क्रियाशील नसतात.त्यांचे जास्त प्रमाणात वास्तव्य कुटुंबातच असते.
त्यांना आपले वृध्दत्व वरदान किंवा शाप वाटते.

ज्यांना आपले वृध्दत्व शाप वाटते त्याला काही कारणही असतात.
त्यांच्या सभोवताली अशी परिस्थिती निर्माण होते,की त्यांना आपल्या
वृध्दत्वाची चीड येते आणि त्यामुळेच त्याना आपले वृध्दत्व एक शाप
असल्याची जाणीव होते.ज्यावेळी ही मंडळी तरुण, वाढत्या वयाची
आणि कार्यव्रत असतात,तेव्हा ते कामावरून घरी परत आले की त्यांची विशेष काळजी घेतली जाते.
कधी त्यांची आई तर कधी त्यांची पत्नी आगतस्वागत करते.
घरात आल्या आल्या विचारपूस केली जाते.त्याना गरमागरम चहा किवा कॉफी करून दिली जाते.
त्यासोबत काही खायला दिले जाते.हे सगळे अगदी स्वाभाविकपणे होत असते.
कारण ते कमवणारे म्हणून घरच्यांसाठी महत्वाचे असतात.
त्यांचे मन सांभाळणे हे घरच्यांची जबाबदारी बनते.त्यांच्यासाठी प्रत्येकजण आपली
जबाबदारी मनापासून पार पाडण्याचा प्रयत्न करतो.ह्या परिस्थितीत वृध्दत्वातामुळे
स्वाभाविकपणे कळतनकळत बदल होत जातो.त्यांच्या निव्रुत्तीमुळे ही मंडळी अधिक काळ घरातच असतात.
बाहेर जाऊन आल्यानंतर त्यांच्या परत येण्याची फारशी दखल घेतली जात नाही,
असे काहींच्या बाबतीत घडते.काहींना तर पाण्याची किवा चहाचीदेखील घरच्यांकडे मागणी करावी लागते.
काहीना तर “इतक्या लवकर घरी कसे परत आला “अश्या प्रकारच्या अनपेक्षित प्रश्नाना सामोरे जावे लागते.
अशा वृध्द व्यक्तींनी जास्त वेळ घराबाहेर रहावे,आणि आपल्याला मोकळीक मिळू
द्यावी असे घरातील व्यकतीना मनातून वाटते.अशा परिस्थितीत आपले वृध्दत्व हा एक शाप आहे,
असे वाटले तर त्याना आपल्याला कसा दोष देता येईल?घरातील या बदललेल्या परिस्थितीशी
जुळवून घेणे त्याना अवघड जाते,व त्यामुळे मानसिक कोंडी होते.त्यांच्या तरुण सुनामुलांना
त्यांची सदासर्वकाळ घरातली हजेरी नकोशी किवा अडचणीची वाटु लागते.
तरुणपणात किवा वाढत्या वयात काही मंडळी काबाडकष्ट करून पैसा जमा करतात.
काटकसरीचे जीवन जगून पैसा साठवतात,या पैशाच्या आधारे घरदार उभे करतात.
सर्व भौतीक सुखसोयी घरात निर्माण करतात.हे सारे काही त्या व्यक्ती केवळ आपल्यासाठी
निर्माण करीत नाहीत.त्यात त्यांच्या कुटुंबातील व्यक्तींचेपण हित समावलेले असते.
कुटुंबियांच्या सुखासाठीच ते हे सर्व करीत असतात.त्यात त्यागापेक्षा करतव्याचीच भावना अधिक असते.
पण वृध्दापकाळात याच व्यक्ती पैशाचा होणारा अपवय आपल्या डोळ्यानी पाहू शकत नाहीत.
कुटुंबातील काही व्यक्ती बेजबाबदारपणे खर्च करीत असतात.मात्र,त्यावर ते नियंत्रण घालू शकत नाहीत.
त्यांना असा पैसा उडविणे सहन होत नाही.म्हणून त्याना जर समजावून सांगण्याचा प्रयत्न केला,
तर त्या व्यक्ती समजावून घेण्या ऐवजी उलट जेष्टांचा अपमान करतात.
त्यांनी केलेले काबाडकष्ट विसरले जातात.काटकसर नजरे आड केली जाते.
त्यागाची खिल्ली उडवली जाते.उलट त्याना कडवट शब्दात सुनावले जाते.
“कटकट करून नका,सहन होत नसेल तर डोळे बंद करून घ्या.
“घरात शांततेने रहा”अशा वृध्दाना “तोंड बांधून बुक्याचा मार” सहन करावा लागतो.
या वृध्द व्यक्ती वारंवार होणाऱ्या अपमानामुळे मनातून दुःखी होतात.
आणि त्याना”परमेश्वराने मला हे दिवस का दाखवले?” असे वाटते.
अशा व्यक्तीना आपले वृध्द्त्व शाप वाटले तर त्यांचा दोष किती?

काही कुटुंबात मुले एकेकाळी कर्तबगारी दाखवणाऱ्या आपल्या आईवडिलांची
रवानगी अडगळीच्या खोलीत करतात.आणि इतर सुसज्य खोलीत आपण राहतात.
अशा अडगळीच्या वा अडचणीच्या खोलीत राहताना आईवडिलांचे मन खूप दुःखी होते.
पण परिस्थिती मुळे ते शरणांगत होतात.आणि तशा परिस्थितीत दिवस व्यथीत करतात.
पण त्यापेक्षाही त्याना दुःख होते ते की आपली मुले आपल्या जवळ येत नाहीत,जवळ बसत नाहीत.
बातचीत करीत नाहीत.विचारपूस करीत नाहीत.आपल्या आवडीनिवडी जपत नाहीत.
याचे दुःख ते सहन करू शकत नाहीत.पण त्यांचा नाइलाज होतो.
म्हातारपणी त्याना आपल्या जवळच्या लोकांकडून प्रेमाची, व दोन गोड शब्दांची गरज भासते.
पण ते ही त्यांच्या नशिबी नसते.काही मुलाना तर आपले आईवडिल अडचणिचे वाटु लागतात.
अशा स्थितीत त्या आईवडिलाना आपले वृध्दत्व शाप वाटले नाही तर नवलच.
अशा कुटुंबातली मुलें आपल्या आईवडिलांची आजारपणात घ्यावी तशी काळजी घेऊ शकत नाहीत.
त्यांना आपला औषधोपचार स्वतःच करावा लागतो.हातपाय साथ देत नसले तरी
आणि डॉक्टरांकडे धड जाता येत नसले तरी मुले सोबत येत नाहीत.
आपली मुले आपल्या म्हातारपणी आपली काठी बनतील आणि आपल्याला सुखात
ठेवतील ही आशा फोल ठरते.काही व्यक्ती आपण काही दिवसानी आजी अजोबा होवू,
आपल्या नातवंडाना खेळवू त्यांच्याशी खेळू अशी स्वपने बघतात.
मात्र, ते आजीआजोबा झाल्यावर त्यांच्या नशिबी वेगळेच दुःख येते.
आजीअजोबा आपल्या नातवंडाना अर्थात आपल्या जमान्यातल्या गोष्टी सांगतात.
त्यांच्याशी खेळतात गप्पा मारतात.या त्यांच्या गोष्टी मुलाला किंवा सुनेला पसंत पडत नाहीत
त्यामुळे सून किंवा मुलगा मुलाला रागवतात,मारतात हे आजी आजोबाना आवडत नाही.
आजीआजोबाना ओरडतात तुमच्यामुळे तो असा वाइट वागतो.
तुम्ही त्याच्यावर वाइट संस्कार करता अशी कडवट भाषा वापरतात.
नातवंडाना त्यांच्या पासून दूर करतात अशातऱ्हेने आजीआजोबांची स्वपने धुळीला मिळतात.
आणि वरून अपमान सहन करावा लागतो.याचे त्याना दुःख होते.
स्वाभाविकपणे त्याना त्यांचे म्हातारपण शाप वाटू लागते.
अशा अनेक गोष्टी सांगता येतील.काही मुले त्याना खर्चाला पैसे देत नाहीत.
पण त्यांच्या देखत नको त्या गोष्टीवर मात्र नको तेव्हडा पैसा खर्च करतात.
हे पाहून त्या वृध्दाना आपण लाचार झाल्यासारखे वाटते.
काहींची मुले त्यांच्या गावात दूसरे घर घेऊन राहतात
आपल्या आईवडिलांशी तुटकपणे वागतात.याचे मरणप्राय दुःख झाल्याशिवाय कसे राहील.
तर काहीजण फारच अभागी ठरतात.त्यांची रवानगी त्यांच्याच मुलांकडून वृद्धाश्रमात होते,
ते मरण येत नाही म्हणून नशिबाला दोष देत जगतात.पन्नाशीत प्रवेश करणाऱ्या
प्रत्येक व्यक्तीने या सर्व गोष्टीचा गंभीरपणे विचार करायला हवा.
आपल्या भावी जीवनाची आखणी त्याप्रमाणे करायला हवी.
म्हणजे त्यांना वृध्दापकाळात अशा परिस्थितीला सामोरे जाणे शक्य होईल.
त्यांनी इतरांच्या अनुभवावरून शहाणे व्हावयाला हवे.
अर्थात ज्या वृध्दाना आपले वृध्दत्व वरदान वाटते त्यांच्या नशिबाचा हेवाच करायला हवा.

श्रीकृष्ण सामंत (स्यान होझे कॅलिफोरनीया)

Permalink No Comments