“होय म्हाराज्या !”

October 31, 2007 at 6:56 pm (गम्मत)

होय म्हाराज्या!

कोकणात देवाला गाऱ्हाणे घालण्याची रीत अजूनही प्रचलीत आहे.चांगल्या प्रसंगी देवाची आठवण काढून बरेच वेळा देवळात जाऊन पुजाऱ्याकडून (भटजीकडून) गाऱ्हाणे घालून देवाशी संपर्क ठेवण्याची प्रथा आहे.देवाच्या कानावर घालून झाल्यावर एक प्रकारची मानसीक तृप्ती प्राप्त झाल्याची समाधानी अगदी विरळीच असते. पुजाऱ्याच्या प्रत्येक statement पुढे “होय म्हाराज्या” असे म्हणून
स्वतःची समत्ती असल्याची जाहिर कबूली असते.

ह्या वर्षी आमच्या घरी गणपतिच्या दिवसात विसर्जनादिवशी बाप्पामोर्याला आम्ही खास गाऱ्हाणे घातले,आणि ते मालवणीतून.
आमची दोन नातवंडे या वर्षी कॉलेजात जाणार होती.त्यांना यश, समाधान,आणि चांगली बुद्धि दे हि बाप्पामोर्याला विशेष विनंती होती.

बाप्पा मोर्याला गाऱ्हाणे (मालवणीतून)
 हे श्रीगणेशा,हे गणराया,हे शंकर पार्वती पुत्रा,हे कार्तीकाच्या भावा,हे वक्रतुंडा,हे बाप्पा मोर्या तुका, आम्ही, आज, तुझ्या जन्मदिवशी, गाऱ्हाणा घालतो,तां एकून घे म्हाराज्या.

“होय म्हाराज्या”

हे देवा,तूं आमच्या ह्या, सगळ्या गोतावळ्याक, सुखी ठेव. तेंची, सर्वांची प्रकृती, चांगली ठेव.
तेंची सदैव, भरभराट होऊदे, असा आमचा तुका, हात जोडून सांगणा.

“होय म्हाराज्या”

हे देवा,आज, आमच्या जांवंयबापूचो, जन्मदिवस आसां.तेंका उदंड आयुष्य दी.

“होय म्हाराज्या”

हे गणनायका,लवकरच, आमची दोन नातवंडा, आमका सोडून, बाहेर गावाक, पुढचां, शिकुक जातहत,तेंच्यावर, तुझी चांगली नजर, असूं दे, तेंचो, अभ्यासात, नीट लक्ष लागू दे,तेंची, दिवसे दिवस, प्रगती होवूं दे.

“होय म्हाराज्या”

हे गौरीपति, पुढची सगळी, चार वर्षां, त्या दोघांक, सुखाची जावूं दे, असा  तुका आमचा सांगणा.

“होय म्हाराज्या”

शेवटी देवा,आमच्याकडून, काय चूक झाली असल्यास, किंवा, काय तुझो उपम्रर्द, झालो असल्यास , किंवा,  तुझो आमकां, विसर पडलो असल्य़ास, किंवा, वाडवडीलांचो, पुर्वजांचो ,किंवा, लहान मोठ्यांचो, आमच्या कोणाकडून, अपमान झालो असल्यास, चूक झाली असल्यास,  आमका सगळ्याक, क्षमा कर.

“होय म्हाराज्या”

पुढ्ल्या वर्षी सुद्धा, तुझ्या पायाकडे येंवक, अशीच ताकद, आणि बुद्धी दी,ह्या, पार्वतीपुत्रा तुका अखेरचा सांगणा.

“होय म्हाराज्या”

गणपती बाप्पा मोर्या.पुढ्च्या वर्षी लवकर या.

    श्रीकृष्ण सामंत (स्यान होझे कॅलिफोरनीया)
      shrikrishnas@gmail.com

Permalink No Comments

खूप खूप अश्रू ढाळले

October 28, 2007 at 5:46 pm (अनुवादीत)

खूप खूप अश्रू ढाळले

कधी मी माझ्यावर
कधी मी माझ्या दारुणतेवर
खूप खूप अश्रू ढाळले
का कसा हा विषय आला
अन आता त्या विषयावर
खूप खूप अश्रू ढाळले

घेतली समजूत करून
की सर्व सर्व विसरलो
झालं तरी काय आज
हे विसरणेच आठवून
खूप खूप अश्रू ढाळले

कशा साठी जगायंच
कुणा साठी जगायंच
हे सर्व प्रश्नच आठवून
खूप खूप अश्रू ढाळले

कोण कुणासाठी रडतो
ज्याला त्याला ज्याचे त्याचे
हा आप्पलपोटेपणा आठवून
खूप खूप अश्रू ढाळले

         श्रीकृष्ण सामंत (स्यान होझे कॅलिफोरनीया)
           shrikrishnas@gmail.com

Permalink No Comments

परतव माझ्या आठवणी

October 26, 2007 at 2:50 am (अनुवादीत)

परतव माझ्या आठवणी

यादे माझी आहेत तुझ्याजवळी
श्रावणमासी ओलेते दिवस मात्र
अन माझ्या कोऱ्या कागदावरची
लिपटलेली ती काळोखी रात्र
जा विसरून ती यादे या क्षणी
अन परतव माझ्या त्या आठवणी

ग्रिष्मातली पानांची पडझड
पडत्या पानांची ती सळसळ
वहात्या झऱ्याची ती खळखळ
कानी माझ्या अजूनी वाजती
यादे माझी आहेत तुझ्याजवळी
जा विसरून ती यादे या क्षणी
अन परतव माझ्या त्या आठवणी

पडझडणाऱ्या त्या पानांची
गदगदणारी ती फांदी
अजूनही करते गदगद
मोडून टाक ती आधी
यादे माझी आहेत तुझ्याजवळी
जा विसरून ती यादे या क्षणी
अन परतव माझ्या त्या आठवणी 

पडक्या एका छ्ताखाली
भिजत होतो आपण दोघे
अर्धे ओले अन अर्धे सुके
सुके होऊनी परतल्यावरही
होते माझे मन तरीही ओले
नको करू ते आता सुके
यादे माझी आहेत तुझ्याजवळी
जा विसरून ती यादे या क्षणी
अन परतव माझ्या त्या आठवणी

त्या पौर्णिमेच्या चांदण्या रात्री
अन गालावरची तुझी ती खळी
ती अळीमिळी आणि गुपचीळी
अन खोटी खोटी दांभिक बोलणी
यादे माझी आहेत तुझ्याजवळी
जा विसरून ती यादे या क्षणी
अन परतव माझ्या त्या आठवणी

दे मज एकच परवानगी
करण्या दफन ह्या आठवणींचे
घेईन मग मी चीरशांती
ह्या दफनामधे कायमचे

        श्रीकृष्ण सामंत (स्यान होझे कॅलिफोरनीया)
                           shrikrishnas@gmail.com
 

Permalink No Comments

“एकद्दयांचं कायते होओन ज्यावूद्दये”ईती,पिंग-पॉन्ग-चू

October 23, 2007 at 7:07 pm (लेख)

” एकद्दयांचं कायते होओन ज्यावूद्दये ” ईती, पिंग-पॉन्ग-चू

त्याचं काय झालं, मी अलिकडेच लिहीलेला एक लेख
” माणूस मुलतः शाकाहारीच आहे “
वाचून माझ्या एका स्नेह्यानी मला लिहीलं
” नमस्कार , काल तुमच्या ब्लॉगला भेट  दिली.  २-३ कविता आणि माणुस  शाकाहारी प्राणी कसा आहे ते वाचले. पण सर्व लोक शाकाहारी  झाले तर अन्न-धान्य  पुरेल का ?  अन्न-धान्य यांच्या  किंमती  किती  वाढतीले ? अशी  भीती  वाटते. “
असो.
त्यांचा प्रश्न फार चांगला होता.पण त्यांचा प्रश्नाचा आशय
पाहून असं दिसून आलं की जणू अन्नधान्य अगदी पुरण्या इतकं विपूल मिळूं लागलं, आणि अगदी खूप स्वस्तपण झालं तर ” आपण बुवा शाकाहारी व्हायला तयार आहो ” असंच त्याना म्हणायच आहे.
माणूस मुलतः शाकाहारी असावा हा प्रश्न निसर्गानेच हाताळला आहे.हे मी माझ्या त्या लेखांत काही उदाहरणे देऊन चर्चा केली आहे.इतकं करून अन्नधान्याचे भाव वाढतील म्हणून काही एखादा मांसाहारी होत नाही.धान्याचे भाव आणि धान्याच्या उत्पन्नाची पुर्तता,तसेच त्याच्या मधले राजकारण,मांस उत्पादन करणाऱ्या व्यापाऱ्याची ” लॉबी ” असे अनेक गहन प्रश्न आडवे येणारच.आणि ते प्रश्न सोडविण्यासाठी किंवा अति गहन करण्यासाठी राजकारणी जन्माला आले आहेतच.
माझा उद्देश एव्हडाच आहे की ” तुम्ही जन्माने शाकाहारी आहात मग मांसाहारी का होता? शाकाहारी असल्याने तुमच्या तब्यतीच्या समस्या कमी असतात कारण ते निसर्गाला मान्य आहे.
म्हणून ” मऱ्हाठा तितुका मिळवावा शाकाहारी धर्म पाळावा”  त्यासाठी असा एक प्रपंच.

मांसाआहार सोडून शाकाहारी होणं तिककं सोपं नाही हे मला पण माहित आहे.कारण मांसाहाराला माणूस एव्हडा ऍडिक्ट झाला आहे की त्याच परिवर्तन व्हायला अनेक उपाय योजावे लागतील.
सध्या जगात काहिही अशक्य नाही.शेती मधे इतकी सुधारणा झाली आहे की किडमुंग्या आणि टोळ(भैरव!)उभ्या उभ्या एव्हडं शेत फस्त करतात ते होऊ नये म्हणून बीजाचे जीन बदलून त्याला किड लागणारच नाही असा बंदोबस्त केला जातो.शेतीचे उत्पादन भरपूर वाढवण्यासाठी एव्हडे उपाय उपलब्ध आहेत की श्रीमंत देशात शेतमालाचा बाजारपेठेत भाव कमी होऊ नये म्हणून धान्य जाळून टाकतात.
तेव्हा माणसाने जर का ठरवलंच की शाकाहारी होणार तर
ते व्हायला अशक्य काही नाही.” ईच्छा आहे तिथे मार्ग आहे ” तेव्हा शाकाहारी अन्न कमी पडतं म्हणून मांस खावं लागतं अशातला प्रकार नसावा.
म्हणून म्हटलं माणूस मुलतः शाकाहारी असताना मांसाहारी कसा झाला.कारण माणसाला निसर्गाने (देवाने म्हणा हवं तर) बुद्धिचातुर्य दिलं आहे ना! हेच मी माझ्या त्या लेखात सांगण्याचा प्रयत्न केला आहे.
आता यांच्या प्रश्नाला उत्तरच द्दयायचे म्हटल्यास दुसरा उपाय करून पाहू या असा विचार केला.त्यासाठी थोडं संशोधन करावं लागलं.
“शेळी जाते जीवानीशी आणि खाणारा म्हणतो वातड” अशी एक म्हण आहे.मांसाहाऱ्यांसाठी प्राण्याना कुठ्ल्या दिव्यातून जावं लागतं ह्याचा जरा कानोसा घेतला.

आणि मग ठरवलं ” एकद्दयाचं कायते होओन ज्यावूद्दया ” (ईती दिलीप प्रभावळकर त्यांच्या चिनी माणसाच्या भुमिकेतलं एक वाक्य) असो.
प्रत्येक मांसाहारी माणसाने अर्ध्यानें मांस कमी खाल्लं तर अब्जानें प्राण्यांवरचे दुष्ट अत्याचार कमी होऊन त्यांचे मरण्यापासून प्राण वाचतील.
जरी तुम्हाला मांस खायाला आवडलं,तरी प्राण्यांवर होणारा दुष्ट अत्याचार वाचवुं शकता.पाश्चात देशातील खेड्यातल्या सुंदर शेतीवाडी वरच्या वर्णनांवरच्या आनंदायी कवितांचे रुपांतर आता दुर्गंधीयुक्त
कारखान्यातल्या प्राण्यांच्या शेतीत झाले आहे.दहा,दहा
हजार कोंबड्या एके ठिकाणी पिंजऱ्यात बघून मनस्वी धक्का बसतो.
अंडी देणाऱ्या कोंबडींना अतिशय गर्दी असलेल्या पिंजऱ्यात डांबले जाते,तसेच गरोदर डुक्करीना हलायला पण जागा नसलेल्या कोंडाण्यात जखडून ठेवतात.
पाश्चात्य देशात गेल्या अर्ध्या शतकानंतर प्राण्यांची शेती घरोघरी करण्या ऐवजी आता मोठमोठ्या कारखानावजा शेतात केली जाते.आणि प्राण्यांकडे दुःख आणि छळ सहनकरणारा जीव असे न पाहता एक वस्तु म्हणून पाहिले जाते.लोकाच्या नजरेपासून दुर ठेवून प्राण्यांच्या मोठमोठ्या शेतीच्या जागी त्यांचा होणारा छळ दुर्लक्षीत झाला जरी,तरी अलिकडे अधीक अधीक लोक अशा गोष्टीना विरोध करू लागले आहेत.
पृथ्वी वरचे वाढते तपमान,समुद्राची वाढती पाण्याची पातळी, धृवावरची बर्फाच्छादनाची वाढती वितळण्याची क्रिया , महासागराच्या प्रवाहामधे होणारे बदल, वातावरणात होणारे बदल,तपमानात होणारे बदल हे सर्व मनुष्यजातीला सामोरे जाणारे आव्हान आहे.
घरगुती प्राण्यांची मोठ्या प्रमाणातील शेतीचा, वरिल गोष्टीना कारणीभूत व्हायला १८% ग्रीनहाऊस गॅसCO2 च्या रुपात निर्माण करायला सहभाग आहे.आणि हा सहभाग दळणवळणापासून होणाऱ्या सहभागापेक्षा जास्त आहे.

माझ्या मते  मांसाहारी लोक जर का ह्या घरगुती प्राण्यांच्या मोठया शेतीकारखान्याला एकदा भेट देतील आणि पाहातील की ह्या ठिकाणी  ह्या प्राण्यांचे कशाप्रकारे उत्पादन होते आणि त्यांच्यावर कशाप्रकारे प्रकिया होते तर ते पाहून आच्शर्यचकीत होतील,आणि कदाचित अशी प्रतिज्ञापण करतील की पुन्हा मांस खाणार नाही.
म्हणून आधूनिक घरगुती प्राण्याचा शेतीव्यवसाय करणाऱ्या लोकाना वाटते की जितके म्हणून होईल तितके मांसाहारी व्यक्तिला त्याच्या आहाराच्या थाळीत प्रत्यक्ष मांस पडेपर्यंत काय घडत असेल त्याची वाच्यता न झालेली बरी.
आणि हे जर खरं असेल तर हे नितीमत्येच्या दृष्टीने योग्य होईल का? हे काय चालले आहे हे कळण्यास नकारात्मक राहील्याने मांसाहारी, शाकाहारी होतील ही आपली काळजी दूर होईल असं त्यांना वाटतं.

एकाच पिंजऱ्यात अनेक प्राणी ठेवल्याने आर्थिक दृष्ट्या सुलभ असते.प्रत्येक प्राण्यामागे लाभ कमी झाला तरी प्रत्येक पिंजऱ्यामागे लाभ वाढतो.एका पिंजऱ्यात गर्दी करून प्राण्याना ठेवल्याने त्यांची हालचाल कमी होते त्यामुळे अन्न खाऊन त्याचे वजन वाढते आणि त्यामुळे प्रत्येक प्राण्यामागे मांस जास्त मिळून मांसाचे ऊत्पादन वाढते आणि प्रत्येक प्राण्यापेक्षा पिंजऱ्याची किंमत जास्त असल्याने शेवटी कमी पिंजरे वापरून प्राणी चोंदून ठवल्याने जास्त फायदा होतो.म्हणजेच प्राणी स्वस्त असतो आणि त्यामानाने पिंजरा महाग असतो.

डुक्करांची कथा
शेतीवरच्या लोकांना उपदेश दिला जातो.” डुक्कर हा एक प्राणी आहे हे विसरा आणि त्याला एक कारखान्यातले यंत्र आहे असे समजा” सतत पिंजऱ्यात असल्याने ह्या प्राण्याला त्यांच्या अपुऱ्या आयुष्यात कधीही सूर्यदर्शन होत नाही.
सुकल्या गवतावर लोळायला मिळत नाही.चिखलात कुदायला मिळत नाही.गर्भवती डुक्करीणीला कधी पिंजऱ्यात जरा हलायला मिळत नाही.खाली लोखंडाच्या नळ्या असल्याने त्यावर झोपावं लागत.आणि त्यांची विष्टा त्या मधल्या फटीमधून खाली असलेल्या डबक्यांत पडते,आणि चोहिकडे दुर्गंधी सुटलेली असते.

खाटिकखान्याला जर का कांचेच्या भिंती असत्या तर हे दृश्य दिसलं असतं.प्राण्याना मारण्यापुर्वी त्यांना अर्धबेशुद्ध करण्याचा कायदा आहे,पण……
त्यांना अतिशय कृरतेने मारतात,त्याचे वर्णन करणे पण कठीण आहे.
म्हणून म्हणतो,
मनुष्यजातीला निसर्गाने उपजतच वैचारीक शक्ति आणि कल्पना करण्याचे सामर्थ्य दिले असताना, तिचा मुखोद्वारे किंवा लेखाद्वारे प्रचार करणेही शक्य असताना, युगानुयुगे जमलेल्या ज्ञानाचा, नितीमत्ता आणि बरे,वाईट यातला योग्य निर्णय घेण्याचेही सामर्थ्य असताना,त्यांचा स्वतःच्या खाजीसाठी विशेषेकरून भूक किंवा

अन्नआहारच्या दृष्टीने आवश्यक्यता नसताना, ज्या जीवाना भावना आणि अंतरज्ञान असते, त्यांचा केवळ चवीष्ट मांस म्हणून जीव घेण्याचा अधिकार मनुष्य म्हणून आपल्याला आहे काय?
प्रश्न ह्या प्राण्याना आपली बाजू मांडता येत नाही हा नाही,प्रश्न त्याना बोलता येत नाही हा पण नाही,तर प्रश्न हा आहे की त्यानी हालहाल होऊन मरावे काय?

अंदाजे २ लाख डुक्करे खाटिकखान्यात मृतावस्तेत आणली जातात.आणि त्यांच्या मृत्यूचे मुख्य कारण त्याना आणताना अपुरी हवा आणि अतिशय गरम वातावरणात आणले जाते हे आहे. ते खाटिकखान्यात येण्यापुर्वीच मरतात.सहजतेने हाताळले जावे म्हणून हे मांसासाठी वाढवलेले प्राणी विजेचा धक्का देऊन अर्धमेले केले जातात.परंतु,ही पद्धत त्यांना खरोखरच अर्धमेले करतात का? कधी
कधी त्या विजेच्या धक्क्याच्या गुंगीत ते अतिशय निघृण दुखापतीत जीवंत राहून, हे सर्व प्राणी अशा परिस्थितित जेव्हा उकळत्या पाण्याच्या टाकीत टाकले जातात तेव्हा ते पाण्यात उकळून तरी मरतात किंवा त्या पाण्यात बुडून मरतात.गुप्त व्हिडीयो टेपने  सर्व रेकॉर्ड करून हे उजेडात आणले आहे.

कोंबड्या ह्या प्राण्याबद्दल सर्वसाधारण समजूत आहे ते खरं नाही.त्या अगदीच बावळट नसतात.उलट त्यांची वागणूकबरीच गुंतागुंतीची असते.शिकण्यात बऱ्याच तत्पर असतात मिळून मिसळून रहाण्यात फार उत्सुक असतात.आणि निरनिराळ्या आवाजाला साद देण्यात फार तल्लख असतात. तसेच त्यांच्या समुहात प्रत्येकाची स्वतःची ओळख असते.

पाश्चात्य देशात घरातल्या पाळीव प्राण्याचा (कुत्रा,मांजर,ससा वगैर) छळ होऊ नये म्हणून जे कडक कायदे आहेत ते जर ह्या मांसोद्पानासाठी शेती होत असलेल्या प्राण्याना लागू केले तर बेकायदा वागणुकीसाठी जबर शिक्षा होईल.कुत्रा,मांजरे,ससा वगैरे प्राण्यांचा समुह आणि कोंबडी,डुक्कर,गाई,म्हशी ह्यांचा समुह ह्या दोन समुहात पहिल्या समुहाला कायद्दयाचे संरक्षण असावे हा पंक्तिप्रपंच का असावा?
ही दुर्लक्षीत वागणूक तशीच चालू राहाण्याचे कारण खूप कमी लोकाना त्या प्राण्यांना मिळणाऱ्या वाईट वागणुकीची माहिती असते.आणि त्यापेक्षाही कमी लोकांना त्यांच्यावर होणाऱ्या अत्याचाराची माहिती असते.पण जर का याची जागृती झाली तर बऱ्याच लोकांना मानसिक धक्का बसेल,आणि त्याचे कारण प्राण्यांच्या सुलभतेने जगण्याच्या ह्क्कावरून नसून,त्यांचा विश्वास बसेल की प्राण्याना पण ईजा होते आणि दुखते सुद्धा.त्याशिवाय माणूस सुद्धा माणुसकीच्या दृष्टीने आणि नितीमत्तेच्या दृष्टीने कुणालाही असे दुःख देण्यापासून परावृत्त होईल.

गाईला बछडा(बछडी नव्हे) झाल्यावर भविष्यात त्याचा दुध उत्पन्नासाठी काहीच उपयोग नसल्याने त्याचा जन्म होताच एक दोन दिवसानंतर आई पासून दूर करून त्या बछड्यासाठी निराळ्या प्रकारचे दुधवजा अन्न दिले जाते.आणि गाईचे दुध उद्पातीत करतात.नंतर हा बछडा १८,२० आठवड्यानंतर कोवळे गुलाबी मांस (tender pale  coloured meat) म्हणून खाण्यासाठी कत्तलखान्यात नेतात.

ऐतिहासीक दृष्टीने मनुष्य जेव्हा नितीमत्तेची गरज खूप विकसीत करीत जात होता तेव्हा अज्ञान आणि मुळगरजा कमी करीत गेला, प्रथम कुटुंब आणि जमातीच्या पलिकडे जाऊन, नंतर धर्म ,जात,आणि देशाच्या पलिकडे जाऊन.  ही त्याच्या नितीमत्तेची विकसीत होण्याची मर्यादा वाढवून ईतर प्राण्यांनापण सामाऊन घेण्याच्या निर्णयासाठी, सध्यातरी तो अशी टोकाची भुमिका घेईल हे कल्पनेपलिकडचे वाटते.पण एक दिवस,म्हणजे दशके गेल्यानंतर किंवा शतके गेल्यानंतर कदाचित त्याला “सुसंकृतीच्या” नांवाखाली ह्या प्राण्यांना सामाऊन घेण्याचा विचार करावा लागेल.

माणसाचे आणि प्राण्यांचे एकमेकाचे नातेसंबध असे विचीत्र आहेत की एकाच वेळी माणसाचे प्राण्याविषयी भावनीक प्रेम आणि क्रुरपणा शेजारी शेजारी वास्तव्य करत असतात.एकदा मझ्या वाचनात आलं ” अमेरिकेत नाताळच्या उत्सवात कुत्र्या मांजराना बक्शीशी दिली जाते,अन त्याच वेळेला डुक्कराच्या दुरदैवी आयुष्याची कुणालाही चुकून सुद्धा आठवण येत नाही,कुत्र्या मांजरा एव्हडे त्याला सुद्धा तेव्हडीच बुद्धिमत्ता असून संध्याकाळच्या जेवणात “खिस्मस हॅम “(डुक्कराचे मांस) ही चवदार “डिश” मेजवानी म्हणून फस्त केली जाते.

शाकाहारी व्यक्तिची प्रकृती ठिकठाक असते.रक्तदाब कमी असतो, वजन कमी असतं,कोलेस्टेरोल कमी असते,टाईप टू डायाबीटीस, हृदय रोग,प्रोस्टेट कॅन्सर आणि कोलन कॅन्सर हे रोग कमी असतात. असे असण्याच्या अनेक कारणापैकी मांसाहार न घेणे हे पण एक कारण असावे असे ज्ञानी लोकाना वाटू लागले आहे.

एक निरपराधी मुल एका पाणकोंबडीवर ह्ळुवारपणे हात फिरवीत म्हणते कसं ” If I knew you, I wouldn’t eat you”
काही दृष्टीने हे खरंच तितकं सोपं आहे.

    श्रीकृष्ण सामंत (स्यान होझे कॅलिफोरनीया)
      shrikrishnas@gmail.com

Permalink 1 Comment

तूं जगूं नाही दिलंस

October 20, 2007 at 7:19 pm (अनुवादीत)

तूं जगूं नाही दिलंस

शांतीने जगावं तर
तूं जगूं नाही दिलंस
विष प्राशन करावं तर
तूं पिऊ नाही दिलंस

रात्र होऊन नववधू जेव्हां
जाई शुभ्र चंद्ररथातूनी
येऊन तुला माझी याद
मन तुझे जाईल सतावूनी
कुणी नाही दिलं दुःख ईतकं
तूं होतास देत ते जितकं

रात्रंदिनी ठेवूनी माझ्या मनात
तूं दिलेल्या शल्याचा विचार
करीतो मला तो सदा बेजार
वाटे कसा करू माझा गुजार

नसतो झालो आपण विलग
मरणांती झालो असतो अलग
असो बहाणा असो भ्रांती
नसती का मिळाली आत्मशांती

शांतीने जगावं तर
तूं जगूं नाही दिलंस
विष प्राशन करावं तर
तूं पिऊ नाही दिलंस

श्रीकृष्ण सामंत (स्यान होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

Permalink No Comments

चुकून करीन अलक्षणीय घोटाळा

October 18, 2007 at 4:15 am (अनुवादीत)

चुकून करीन अलक्षणीय घोटाळा

इतकी शक्ति देऊ नको रे देवा मला
जणू होईल माझा मनोविश्वास दुबळा
सन्मार्गाने जाणारा मी पामर
चुकन करीन  अलक्षणीय घोटाळा

असे चोहिकडॆ अन्याय अन लाचारी
काळजीच्या ओझ्याखाली आहेत बिचारी
पापांचा डोंगर वाढतच आहे
कोण जाणे ही धरती
भार कसा सांभाळत आहे
भार ममतेचा घे तूं उचलून डोक्यावर
न होवो तुझ्या कलाकृतीचा
अंत असे केल्यावर

येवो न विचार काय आम्ही कमवीले
येऊ दे विचार काय आम्ही अर्पीले
फुले खुशीची वाटुया जगभर
होवो सर्वांचे जीवन मधुबन
तुझ्या करुणेचा झरा वाहु दे निरंतर
होवो पावन प्रत्येकाचे अंतर

असता आम्ही अंधारात
तू प्रकाश दे
हरवून न जावे दुश्मनीत
तू बुद्धि दे
कुकर्माची फळे आम्हा भोगू दे
मरणापरि सुख आनंदू दे
गेला दिवस पुन्हा न येऊ दे
येणारा दिवसही असा न होवू दे

इतकी शक्ति देऊ नको रे देवा मला
जणू होईल माझा मनोविश्वास दुबळा
सन्मार्गाने जाणारा मी पामर
चुकून करीन  अलक्षणीय घोटाळा

         श्रीकृष्ण सामंत (स्यान होझे कॅलिफोरनीया)
                   shrikrishnas@gmail.com

Permalink No Comments

पडूं आजारी मौज हिच वाटे भारी

October 14, 2007 at 5:34 pm (कविता)

निरोगी मौज

पडूं आजारी
मौज हिच वाटे भारी
सेवा करणाऱ्या व्यक्तीचे
कष्ट मात्र वाढतात भारी
स्वतःची कामे ऊरकून
रुग्ण सेवा नशिबी सारी

मौजच असेल करायची
जरी सर्वांनी मिळूनी
आहे एक गुरुकिल्ली
घ्यावी सर्वांनी समजूनी

खाणे,पिणे अन जेवण्याची
असावी हेल्धी स्टाईल
व्यायामाची संवय ठेवून
म्हणावे असाच दिवस जाईल
विश्रांतीची आवशक्यता
विसरून कसे चालेल

करून हे एव्हडे सारे
कुणी पडे आजारी
सेवेचे कर्तव्य वाटे न्यारे

       श्रीकृष्ण सामंत (स्यान होझे कॅलिफोरनीया)
           shrikrishnas@gmail.com                  

Permalink No Comments

नको बागेत येऊस.

October 12, 2007 at 2:06 am (अनुवादीत)

नको बागेत येऊस

केशभार असा सोडून
नको बागेत येऊस
फुलांच्या सावल्याना
नको लज्जीत करूस

प्रेमाचे गुणगान
नको तू ही गाऊस
गीताचे भ्रमराकडून
नको हंसे करून घेऊस

प्रेमाचे भ्रमराला
कसले आले ज्ञान
मी काय सांगू?
कळ्यानांच विचार

लफंगा असे हा भूंगा
शिकवील तुला तो मग
त्याचीच नकली कला
अन घेशील नंतर
तूं माझाच पंगा

शोभे न तुला
हे असे बोलणे
पावित्र्य प्रेमाचे
असे विटवीणे

देशी का मज
तू साथ तिथे
हे क्षीतज जिथे
पुरे पुर्ण झुकते

येईन मी ही
तुझ्या संगती
नको वाटेत होऊस
तू कधी वेगळा
प्रेम आपुले पाही
हा जमाना सगळा

         श्रीकृष्ण सामंत (स्यान होझे कॅलिफोरनीया)
                              shrikrishnas@gmail.com
 

Permalink No Comments

मनुष्य हा मुलतः शाकाहारीच आहे.

October 9, 2007 at 3:21 am (लेख)

मनुष्यप्राणी हा मुलतः शाकाहारीच आहे.

मनुष्याच्या शरीराकडे नीट लक्ष देऊन पाहील्यावर,एक गोष्ट निश्चीत लक्षात येईल
की मांसाहारी होण्यास मनुष्य परिस्थितिनुसार उद्युक्त झाला असावा.कारण मनुष्य शाकाहारीच आहे.माझ्या पुढील चर्चेतून मला वाटतं, तसे मी माझे विचार मांडण्याचा प्रयत्न केला आहे हे तुमच्या लक्षात येईल.तसंच माणसाला निसर्गाने (किंवा वाटल्यास देवाने म्हणा) अविरत बुद्धिचातुर्य दिल्याने,गरजेनुसार तो आपल्या खाण्याच्या संवयीत बदल करीत गेला असावा.
मनुष्याचे बुद्धिचातुर्य आणि त्याचा वापर हे “शाप की वरदान”ह्यावर चर्चा करायला निराळा विषय घेऊन लिहावं लागेल,पण तुर्तास एव्हडंच म्हणता येईल की ज्या ज्या वेळी माणसाने आपलं बुद्धिचातुर्य निसर्गाशी दोन हात करण्यासाठी वापरलं त्यावेळी कालांतराने त्याचे परिणाम त्याच्या अधोगतीच झाला आहे.ह्याची खूप उदाहरणं देता येतील.
मांसाहारी(मासेहारी नव्हे) होण्यास त्याने असाच निसर्गाशी आपल्या शरीराचा आणि त्याच्या क्षमतेचा विचार न करता घेतलेला निर्णय असावा असं मला वाटतं.मांस खाण्यास उद्युक्त होण्याची कारणे काही असोत तसे करण्याने पुढे होणारा अनर्थ काय असावा याचे ध्यान त्याला राहीलं नसावं नाहीपेक्षा कॅन्सर, विषेशतः कोलन कॅन्सर,आंतड्याचे रोग,ओबीसीटी,पोटाचे रोग आणि असले अन्य बरेच प्रकारचे रोग आज पाश्चिमात्य देशात उद्भभवत असल्याचे पाहून माणसाने काय खावे आणि काय खाऊ नये यावर गंभीर चर्चा जी होत आहे,त्यावरून असं दिसून येईल की आता बरेचसे so called expert सांगू लागले आहेत की “बाबानो,शाकाहार घ्या.”
निसर्गाने निर्माण केलेल्या सृष्टी मधे वनसृष्टी आणि जीवसृष्टी असे दोन ठोबळ group दिसून येतील.वनसृष्टीलापण जीव असतो.तिचं बीज असतं,ते उगवतं,वाढतं,त्याला वाढताना ऊन,पाऊस,हवेची जरुरी लागते.झाड लहानाचं मोठं होतं.त्याला फळं लागतात,त्यातून परत बीजं तयार होतात, झाड वाढतं,म्हातारं होतं,सुकतं,रोगही होतात आणि मरतं पण.
अगदी असंच जीव सृष्टीचं होतं.फरक एव्हडाच की जीवसृष्टीत जीवाला(काही अपवाद सोडल्यास)आवाज काढता येतो.म्हणजेच त्या जीवाला वाचा असते.माणसाला तर बोलतापण येतं.आणि दुसरा फरक म्हणजे जीवाला (काही अपवाद सोडल्यास )चालतापण येतं.ह्याचे फायदे तोटे परी परीने आहेत.ह्यावर मी एक गमतीदार कवितापण लिहीली आहे.ती अशी.

ईश्वराचे कोडे

म्हणे “वनसृष्टी” ईश्वराला
केलास तूं दुजा भाव
देवूनी वाचा अन
चाल “जीवसृष्टीला”

हंसला ईश्वर मनांत अपुल्या
म्हणे तो “वनसृष्टीला”
पस्तावलो मी वाटते मला
देऊन ते “जीवसृष्टीला”

एका बिजा पोटी तरुं कोटी
जन्म घेती सुमनें फळें
परी
वाचाळ होवूनी
केली “मानवानें”
सदैव भांडणे
दूर जावूनी विसरला
हा “मानव” अपुली मुळे

आता मुख्य मुद्याकडे वळल्यावर असं दिसून येईल की,ह्या जीवसृष्टीतपण निसर्गाने दोन group केले आहेत १) शाकाहारी आणि २) मांसाहारी (ह्या जीवसृष्टीतले सरपटते जीव,तसेच किटक,आणि मासे ह्याना वगळून) वरील दोन groups चा विचार केल्यास असं दिसून येईल की,हे चारपायाचे(गाई,म्हशी,कुत्रे,कोल्हे,वाघ,सिंह,बकऱ्या,डुकरं आणि माणूस(?)) माणसापुढे प्रश्न चिन्ह एव्हड्यासाठीच केलं की,असं म्हणतात माणूस ही माकडांची “अवलाद” आहे.तो पुढ्चे दोन हात आणि मागचे दोन पाय याचा वापर करून जमीनवरच चालायचा.(माकडा सारखा), पुढे काही कारणास्तव ,झाडावर कोण चढून वरची फळं काढणार? जमिनीवरूनच पुढचे दोन हात वर करून मागच्या दोन पायावर उभं राहून जी काही फळं हाताला लागतील ती काढून खावी, (आळशीपणा?) असं करता,करता कणा सरळ करून उभा राहू लागला तो मग उभाच राहू लागला.आणि उभा होऊन चालू पण लागला. गम्मतीचा भाग सोडल्यास सांगायचं म्हणजे  बुद्धिचातुर्याने गरजेनुसार तो उभा राहू लागला.
तर दोन पायाच्या”माणसाचा” अपवाद सोडल्यास, दोन पायाचे सर्व जीव निसर्गाने “पक्षी ” म्हणून तयार केले.पक्षांच्या मांसाला पाढरं मांस (white meat) म्हणून संभोततात,आणि चार पायाच्या जीवांचे मांस लाल मांस (Red meat) असं संभोततात.तर मुख्य सांगण्याचा मुद्दा असा की,शाकाहारी आणि मांसाहारी ह्या चार पायांच्या जीवांचा (माणूस धरून) विचार केल्यास आणि निरखून न्याहळल्यास लक्षात येईल की,
 १)  शाकाहारी जीव आपल्या ओठाने पाणी पितात.(गाय,म्हैस,घोडे,बकरी,हरण,ऊंदीर,घूशी,हत्ती(सोंडेने म्हणजेच जीभेने नव्हे) आणि (मा-णू-स -प-ण-पि-तो) आणि मांसाहारी जीव आपल्या जीभेने पाणी पितात.(वाघ,सिंह,कुत्रा,मांजर,कोल्हे,वगैरे,वगैरे)
२) शाकाहारी जीवांचं आंतडं बरंच लांबीने मोठं असतं.(माणसाचे लहान आंतडं जवळ जवळ ३२ फूट असतं) म्हशीला तर दोन पोटे असतात.
असे करण्यात निसर्गाचा उद्देश असा असावा, पालापाचोळा खाणारा शाकाहारी जीव बराच वेळ ते अन्न आंतड्यात ठेवू शकावा,(आंतड्याच्या लांबीमुळे)आणि शरिराच्या बाहेर पडे पर्यंत त्यातून   पुरंपुर ज्यूस काढून शरिराच्या पोषणाला वापरला जावा.पालापाचोळा मांसा एव्हडा कुजून घाण होत नाही. आंतड्याविषयीच्या    अनेक कारणातील हे एक कारण असावं.
आणि गम्मत पहा, माणूस सोडून ईतर कोणत्याही शाकाहारी जीवाच्या समोर,मांसाहार ठेवला तर तो हूंगून मान दुसरीकडे करतो. कारण ते न खाण्याची बुद्धि त्याला निसर्गाने दिली आहे किंवा असं म्हणा ते खाण्याची बुद्धि निसर्गाने त्याला दिली नाही.माणूस मात्र जे समोर दिसेल ते खातो.गाय ही देवता मानून गाईची पूजा करणारे लोक जेव्हा पाश्चात्य देशात येतात आणि शाकाहारी असोत किंवा
मांसाहारी असोत (गाय,म्हैस,डुकराचे मांस) कसलाही विचार न करता,तावमारून खातात.  (काही अपवाद असतील ही)
३)या उलट मांसाहारी जीवांचं आंतडं फारसं लांब नसतं.जेमतेम चार पाच फूट असतं.मांस पोटात जास्त वेळ राहिल्यास त्याची कुजण्याची   प्रतीक्रिया चालूं होऊन नंतर  त्याचा शरीराला धोका उत्पन्न होऊ नये म्हणून निसर्गाचा हा उद्देश मांसाहारी जीवाना मोठं आंतडं न देण्याचा असावा.हे पण अनेक कारणातील एक कारण असावं.इथं पण ह्या मांसाहारी जीवा समोर पालापाचोळा आणून ठेवला तर तोही मान फिरवून दुर्लक्ष  करतो. कारण ते न खाण्याची बुद्धि त्याला निसर्गाने दिली आहे किंवा असं म्हणा ते खाण्याची बुद्धि निसर्गाने त्याला दिली नाही.
हा झाला आंतड्यातील फरक.
४)आता दांतांचा विचार केल्यास असं दिसून येईल,मांसाहारी आणि शाकाहारी जीवांच्या दांताची रचना,ठेवण,आणि प्रकार,हे मांस आणि पाला चावण्याच्या अनुशंगाने दातांची निर्मीती झाली असावी.मोठ्मोठाले सुळे,कटर्स,दाढा आणि त्यांची ठेवण आणि आकार,तसेच जबडयाचा आकार हे निरखून पाहिल्यास खूप विचार करून निसर्गाने दातांचे डिझाईन केले आहे असं दिसून येईल.
या दृष्टीकोनातून माणसाचे दांत, आंतडे,जबडा आणि ओठाने पाणी पिण्याचं त्याचंहे कार्य पाहून तो शाकाहारी गटात (group मधे) असण्याच्या संभवाची चांगलीच साक्ष देतो.
तेव्हा थोडक्यात सांगायचे झाल्यास,
अ)लांब आंतड(वीस पंचवीस फुटाच्या वर)असलेले जीव
ब)ओठाने(ओठ पाण्यात बुडवून)पाणी पिणारे जीव
क)दातांची ठेवण,जबडा, उपयुक्तता, पालापाचोळा खाण्याच्या दातांची क्षमता असलेले हे दांत वापरणारे जीव हे शाकाहारीच असावेत.
आणि
ड)छोटंसच आंतड(जेमतेम चार पांच फूट) असलेले जीव
ई) जीभेने (जीभ बाहेर काढून) पाणी पिणारे जीव
फ) दातांची ठेवण,जबडा,उपयुक्तता, मांस खाण्याच्या दातांची क्षमता असलेले हे दांत वापरणारे जीव हे मांसाहारीच असावेत. मनुष्यजातीला निसर्गाने उपजतच वैचारीक शक्ति आणि कल्पना करण्याचे सामर्थ्य दिले असताना, तिचा मुखोद्वारे किंवा लेखाद्वारे प्रचार करणेही शक्य असताना, युगानयुगे जमलेल्या ज्ञानाचा, नितीमत्ता आणि बरे,वाईट यातला योग्य निर्णय घेण्याचेही  सामर्थ्य असताना, त्यांचा स्वतःच्या खाजीसाठी विशेषेकरून भूक किंवा अन्नआहारच्या दृष्टीने आवश्यक्यता नसताना, ज्या जीवाना भावना आणि अंतरज्ञान असते त्यांचा केवळ चवीष्ट मांस म्हणून जीव घेण्याचा अधिकार मनुष्य म्हणून आपल्याला आहे काय?
 
तेव्हां हे माणसा! विचार कर.केवळ बुद्धि आहे म्हणून निसर्गाविरूद्ध वाटेल ते प्रयोग करू नकोस बाबा,पुढच्या पिढीसाठी आणि आत्ता जगताना संभाळून जग.

      श्रीकृष्ण सामंत (स्यान होझे कॅलिफोरनीया)
                              shrikrishnas@gmail.com

Permalink No Comments

जा तूं मला विसरून

October 5, 2007 at 5:20 am (अनुवादीत)

जा तूं मला विसरून

माझी याद करून
नको ढाळू तूं तुझे अश्रू
मला सतत मनी आणून
नको जीवन तुझे जाळू
जा मला तूं विसरून

होते ते एकच सुखस्वप्न
घे अशी समजूत करून
गेला तो जमाना
असे तुझ्या मनात आणून
नको ढाळू तूं तुझे अश्रू
मला सतत मनी आणून

माझे लक्ष निराळे
तुझा मार्ग निराळा
नच भेटेल डोळ्याला डोळा
होऊ दे मला तुझ्या
दुनियातून वेगळा
नको ढाळू तूं तुझे अश्रू
मला सतत मनी आणून
हे भंगलेले हदय माझे
सांगे अश्रू ढाळून
नसे मी तुझ्या
प्रेमाचा हवालदिल
नको उच्चारू नांव माझे
तुझ्या ओठातून
माझी याद करून
नको जीवन तुझे जाळू
जा तूं मला विसरून

                      श्रीकृष्ण सामंत (स्यान होझे कॅलिफोरनीया)
                              shrikrishnas@gmail.com

Permalink No Comments

« Previous entries