सबनीसांचा वसंता
आम्ही त्याला वसंता कधीच म्हटलं नाही.त्याला आम्ही सबनीस म्हणूनच ओळखत होतो.त्यालापण सबनीस म्हणूनच हांक ऐकण्याची संवय झाली होती.
हा सबनीस मडुऱ्याचा.हे एक सावंतवाडी तालुक्यातलं लहानसं खेडं. दहा पांच घरं सबनीसांची होती.लहानपणी जवळच्या मराठी शाळेत शिकून झाल्यावर सबनीस सावंतवाडीला ईग्रजी शिकायला आपल्या एका नातेवाईकाच्या घरी राहात होता.त्याचे वडील त्याच्या खर्चाचे पैसे नियमीत पाठवीत असत.
सबनीसाचं शिक्षणात जास्त मन रमलं नाही.जेमतेम मॅट्रीक झाल्यावर तो वडीलांची परवानगी घेऊन मुंबईला गेला.ग्रॅन्टरोड परीसरात कुडाळदेशकर निवासातल्या एका चाळीत वडीलांच्या ओळीखीने त्याची सोय झाली होती.
सोय कसली त्यांच्या खोलीच्या समोरच्या व्हरांड्यात एक माणूस झोपेल एव्हडी जागा त्याला झोपायला मिळाली होती.
पहाट झाल्यावर लोकांची व्हरांड्यात जाययायची वर्दळ चालू झाल्यावर सबसनीसला झक्कत उठावं लागायचं.
बिछान्याची वळकटी करून घरातल्या आतल्या खोलीतल्या पोटमाळयावर ठेवून द्दयावी लागायची.बिछाना कसला एका मोठ्या गोणपाटाच्या कपडयावर एक सोलापुरची चादर पसरून उशाला अशीच एक गुंडाळलेली जुन्या चादरीची वळकटी आणि पांघरायला एक पातळशी चादर हाच बिछाना असायचा.
उठल्यावर लगेचच खाली जायच्या जिन्याच्या लगत असणाऱ्या सामुदायीक संडास बाथरूमच्या जागेकडे धांव घ्यावी लागायची. कारण सकाळच्या घाईत तिकडे कोण गर्दी असायची,लाईन लावण्याला पर्याय नसायचा.न विसरता तंबाखूची “मशेरी” डाव्या हातावर घेऊन उजव्या हाताचं निर्देशक बोट त्यावर लावून दांतावर चोळता चोळता उरलेल्या उजव्या हातांच्या बोटांच्या आधाराचा उपयोग करून “टंबलेर” उचलून, बगलेत चटयापटयाची अंडरवेअर घेऊन रांगेत उभं राहाण्याच्या सहजगत्या होणाऱ्या त्याच्या क्रियेत कधीच खंड पडला नाही.
आंघोळीसकट सर्व नैसर्गिक क्रिया संपल्यावर खोलीकडे धांव घेऊन खाटेखालची ट्रंक ओढून त्यातला परीटघडीचा शर्ट आणी प्यॅन्ट काढून केसावर सुगंधी तेल चोपडून केसाचा कोंबडा काढून, झाल्यावर कांता सेंट मानेवर फासून,इंन्स्युरन्स एजंट घेतो तशी ब्रीफकेस उजव्या हातात घेउन (असल्या ब्यॅगेला तो “डुक्कर ” म्हणायचा) स्वारी ग्रॅन्टरोड,चर्नीरोडच्या नाक्यावरच्या ईराण्याच्या हॉटेलात जाऊन “ब्रुनमस्का पाव आणि पाणी कम चहा” ढोसून खाडिलकर रोड वरच्या मधेच उभ्या असलेल्या बिल्डींगच्या पहिल्या मजल्यावरच्या “बहिऱ्या मुक्याच्या” शाळेत चालत जायचा.ही शाळा मेढेकर नावाच्या सदगृह्स्थानी स्थापन केलेली होती.ते स्वतः असल्या मुलांना खुणेच्या भाषेत शिक्षण देत असत.जवळपासच्या लोकांची मुलं ह्या शाळेत येत असत.
मधू सामंताच्या ओळखीने सबनीसला ह्या शाळेत कारकून-वजा पैसे कलेक्ट करण्याची नोकरी मिळाली होती.शाळेला मुलांच्या आईवडीलांकडून मासीक फी मिळायचीच पण त्याशिवाय सबनीसला श्रीमंताकडून देणगी आणण्याचं काम दिलं होतं.वार्षीक देणग्या वसूल करण्याचं काम होतंच,त्याशिवाय नविन देणग्याची पण वाढ करण्याचं काम सबनीसला करावं लागायचं.ह्या असल्या कामामुळे पुढे सबसनीसला ” व्हेनीशन ब्लाइंडसची “ ऑर्डर घेऊन विकण्याचा आणखी एक धंदा करण्याचं काम माझ्या ओळखीच्या माणसाकडून मी त्याला दिलं होतं,त्याचा उपयोग पुढं संसार सांभाळताना त्याला झाला.
फोर्टविभागात हिंडून फिरून शाळेचं काम करीत असताना मोठमोठया कंपनींच्या ऑफिसच्या खिडक्यांना व्हेनीशन ब्लाइंडस (त्याला सबनीस “पडदे” म्हणायचा) विकण्याच्या ऑर्डरी घ्यायचाच पण दुपारची जेवणाची वेळ झाल्यावर, कुठेही असला तरी खोताच्या वाडीतल्या “अनंताश्रमात ” जेवायला यायला चुकत नसे.रात्रीच्या वेळी सुद्धा तिथंच जेवायला जायचा “बाबारे,दोन वेळच्या अन्नात चालढकल करणं योग्य नाही आधी प्रकृती मग सगळी सोंग”असं मला म्हणायचा.खाणावळीत जेवताना सुद्धा त्याची जेवणात काटकसर नसायची.चार मुद भात,दोन वाटया माशाची आमटी दोन तळलेली माशाची कापं,दोन चपात्या आणि लाल भडक कोकमाचं सार ( तो सोल कढी म्हणायचा) हा त्याचा सकाळचा आहार आणि रात्री परत माशाच्या डीश, फक्त फरक मग तिसऱ्याची आमटी पापलेटची तळलेली कापं , किंवा कुर्ल्याचे सुकं त्याला चालायचं.
दिवस निघून गेले. सडेफटींग रहाणं किती दिवस चालणार. नाडकर्ण्याच्या मुलीची लग्नाची ऑफर आली तेव्हां कसलेच चोचले न करता सबनीस लग्नाला तयार झाला.आता जागेची पंचाईत आली.”सद्दयाच्या जागेत दिवस असला तरी बत्ती लावावी लागायची एव्हडा घरात काळोख,लाईट गेल्यावर दिवसा सुद्धा माणसाला माणूस दिसत नाही, चुकून हात उचलला तर कुणाच्या थोबाडात बसायची. तरूणपणात एव्हडा आजार येत नाही पण आता जरा “नज” आलं तर कुठे लेटणार ? ” म्हणून सबनीस आता गोरेगावात जागा शोधायला दर शनवारी आणि रविवारी तिकडे जायचा.
एव्हडी पगडी द्दयाला कोणाकडे पैसे आहेत.शाळे कडून कितीसे लोन मिळणार ह्या विचारात त्याने तीन महिन्याच्या डिपॉझीटवर एका भय्याच्या चाळीत जागा घेण्याचे अगदी नक्की केलं आणि मला दाखवायला एकदा घेऊन गेला.” सबनीस आपण पांढरपेशे लोक उद्दया तुम्ही नाडकर्ण्याच्या मुलीशी लग्न करणार,दिवसभर तुम्ही कामासाठी सकाळी निघून रात्री घरी येणार,पड्द्दयाच्या ऑरडरी घेता घेता घरी आल्यावर बायको तुम्हाला म्हणणार
“पडदेमे रहने दो
पडदा न उठावो
पडदा जो उठजायेगा
तो
वंसता मेरी तोबा
वंसता मेरी तोबा “
ह्यावर सबसनीस एव्हडा हंसला की विचारू नका.खरं तर सबनीसचं हंसणं अगदी सात मजली असायचं.”हो,हो,हो ” म्हणून सुरवात झाल्यावर शेवटी ” खो, खो ,खो ” करून खोकला संपल्यावर त्यांच हंसणं बंद झालं अस समजायचं.
माझ्या वरील विनोदी उक्तीचा अर्थ न कळण्या इतका सबनीस बुद्दु नव्हता.नंतर गोरेगावातच पांडुरंगवाडीत त्याना एका पांढरपेशे रहात असलेल्या बिल्डींग मधे थोडे जास्त पैसे देऊन दोन खोल्यांची जागा मिळाली. सबनीसाने तिथं आपला संसार थाटला.त्याना एक मुलगी पण झाली.रोजची आठ बाराची गोरेगाव लोकल पकडून जाणं आणि संध्याकाळी पाच दहाची गोरेगाव स्पेशल पकडून घरी येणं हा नियमीत कार्यक्रम झाला.
बायकोने त्याला सिगरेट ओढण्याची संवय बंद करायला लावली. ह्यापुढं सात मजली फक्त हंसणं, नंतरचे खोकणं नाही.
अलिकडे बरीच वर्षे झाली.इकडे आल्यावर सबनीसची खबर नाही. “सबनीसच्या मुलीचं लग्न झालं सबनीस आता आजोबापण झाला.आता सबनीस “डुक्कर” हातात घेऊन लोकल पकडायला जात नाही.त्याच्या मुलीनेच त्याला निवृत्त व्हायला लावलं.”असं कुणीतरी मला सांगितलं.
हल्लीच एका कॉमन मित्राची आणि माझी भेट झाली.तो म्हणाला “सबनीस आता खूप थकला आहे.ही वामन मुर्ती हातात काठी घेऊन, डोक्यावर कानटोपी घालून, अंगात एक मिलट्रीचा खाकी स्वेटर,दांत सर्व काढलेले पण तोंडात कवळी न घालता, संध्याकाळच्या थंड हवेचा अविर्भाव आणून आल्या गेल्याकडे रसत्यात उभं राहून बोलण्यात वेळ घालवत असतो.माझी भेट झाल्यावर मला म्हणाला “सामंताना कधीतरी इकडे या म्हणावं डोळे भरून बघीन असं झालं आहे. “
हे ऐकून मला पण खूप गहिवरून आलं.पण खरं सांगू का,ऐन तारुण्यात शिकार करणाऱ्या आयाळलेल्या सिंव्हाला पाहिलेल्या मला आता आयाळ विरहीत आणि दात पडलेल्या सिंव्हाला पाहायला कसंसंच वाटतं.
श्रीकृष्ण सामंत (स्यान होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com
Permalink
1 Comment
हे कष्टी प्रेम मला निस्तरू दे
होतील तुझे उपकार असे
बोलू दे मला हवे तसे
मन माझे तुझ्यावर जडले
तुझ्या नेत्रपल्लवी ते दडले
हंसे कसे ते तूच दाविलेस
रुदन हवे तर रडीन तसे
आंसवांचे दुःख कशाला
वाहू दे त्यांना हवे तसे
घडू दे अथवा मिटू दे
मरणांती माझा दूवा घे
कण्ह कण्हूनी सांगे मन तुला
हे कष्टी प्रेम मला निस्तरू दे
श्रीकृष्ण सामंत (स्यान होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com
Permalink
No Comments
भेट होईल जेव्हा पुढल्या क्षणी
प्रीत तुझ्यावर करिते मी
क्षणो क्षणी तुझे
मी ध्यान करी
होई कशी ही बेचैनी
समजाविन मी तुला
भेट होईल जेव्हा पुढल्या क्षणी
गीत माझे असे
तुझ्याच कल्पनेचे
तुजविण जगणे असे
विचारा पलिकडचे
हव्यास असे तुझा
कुडीत असे प्राण जर माझा
कुशीत सागराच्या असे
मौज जेव्हडी
प्रीत माझी असे
तुजवर तेव्हडी
होऊदे ही बेचैनी
जवा परी कमी
श्रीकृष्ण सामंत (स्यान होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com
Permalink
1 Comment
तारिफ करू का त्याची
हा चंद्रमुखी चेहरा
केसाचा रंग सुनेहरा
हे नीळसर नीळसर डोळे
हे लक्षण असे वेगळे
तारिफ करू का त्याची
कलाकृती ही ज्याची
कथा पुराणी तुझी
जाते ऐकवीली सदाची
तुला पाहूनी मानिले
योग्य असे जे ऐकले
ते मुरडत मुरडत चालणे
ते जादू टोणा करणे
शतःदा मी संभाळणे
मन काबूत नसणे
तारिफ करू का त्याची
कलाकृती ही ज्याची
लाली सकाळच्या किरणाची
रंगीत शोभा गालावरची
संध्याकालीन अंधाराची
जणू छाया केसाची
तू तूडूंब नदी पाण्याची
दुधाळलेल्या फेसाची
मजा असे डुबण्याची
तारिफ करू का त्याची
कलाकृती ही ज्याची
मी शोधीत असे मंदीर
मंदीर माझ्या समोर
दूर कर हा पडदा
निघू दे हा अंधार
हे लाडीक लाडीक वागणे
करिते पुरे दिवाणे
भरून पाहूदे मला
तो मस्त तुझा चेहरा
तारिफ करू का त्याची
कलाकृती ही ज्याची
श्रीकृष्ण सामंत (स्यान होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com
Permalink
No Comments
जीवन असे एक अथांग सागर
जीवन असे एक प्रेमगीत
मना तुझे ते आहे एक संगीत
जीवन असे एक अथांग सागर
मना हंसता हंसता करीशी पार
जीवनी असू देत बेभरंवसा
अपुल्यानाच करू देत घूस्सा
हात आपल्या नसू देत हातात
मिळमिळुनी साथ असे नशिबात
जीवन असे एक चेहरा हंसरा
दुःखी मना तुझा तो एक आसरा
जीवन असे एक वनवास खडतर
म्हणता म्हणता पार करीशी सत्वर
दूर दूर असू दे मंझिल
मार्ग असू दे मुश्किल
तारांकित नसेल जर रात्र
उजळेल दीपक दुःखाचा मात्र
श्रीकृष्ण सामंत (स्यान होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com
Permalink
No Comments
भाली
खरं म्हणजे आम्ही त्यांना भाली म्हणत असलो तरी त्यांच खरं नांव भालचंद्र रेडकर.भाली तसे दिसायला स्मार्ट होते.तरतरीत नाक,गोल चेहरा, गुबगुबीत शरिरयष्टी अणि अतिशय लाघवी स्वभाव त्यांचा.आयुष्यभर भाली ब्रम्हचारी राहीले. आणि त्याला एक कारण होतं.गावात जेव्हा देवीची लागण होती तेव्हा भालीच्या नशिबी आजारपण आलं.सर्व आंगावर देवीचे व्रण उठले आणि त्यांचा चेहरा त्या व्रणानी भरला.त्यामुळे एखाद्दया पितळीच्या अथवा तांब्याच्या कळशीवर जशी ठोकणे दिसतात अगदी तशीच ठोकणे त्यांच्या चेहऱ्यावर आली होती.आणि ” ह्या विद्रुप चेहऱ्याच्या मला कोण मुलगी देणार? आणि माझ्याशी कोण मुलगी लग्न करणार?” असा प्रामाणिक प्रश्न मनात आल्याने “मी लग्नाचा विषयच मनातून काढून टाकला” असं ते मला म्हणत.
भरपुर घोळ असलेला शुभ्र सफेद लेंगा, त्यावर लांबसडक कुठल्याही रंगाचा उभ्या लाईन्स असलेला शर्ट,पायात चप्पल आणि आता ह्या वयात डोक्यावर टक्क्ल,स्थुल शरिर घेऊन गिरगांवातल्या फुटपाथवर सामोरा आलेल्या ओळखीच्या व्यक्तिला “अरे तू असतोस कुठे?बरा आहेस ना?” असे एका श्वासात विचारलेले वाक्य कानावर ऐकू आल्यास खचितच मागे वळून पहाण्याची जरूरी न भासता हा भालीच असणार ह्याची खात्री व्हायची.
शिक्षण मॅट्रिक पुरते,इंग्रजी लिखाणावर हातखंडा, आणि मेक्यानिकल गोष्टीकडे जास्त कल असल्याने माझगाव डॉकमधे कारकूनाची नोकरी मिळणे त्यांना कठिण झालं नाही.ऑफिसात तोच ड्रेस तोच गावभर कुणाकडेही जायला तोच ड्रेस असायचा.त्यामुळे “उच्च विचारसरणी आणि साधी रहाणी “ह्या उक्तीचा समर्पक अर्थ भालीकडे पाहून मनात यायचा.हा मराठी लोकांची बाणा आहे असे त्यांना वाटत असायचे.
कुठेही सगीत क्लासची वर्गणी भरून क्लासिकल गाणे शिकल्याचे ऐकीवात नसता,कुठल्याही शास्त्रोक्त गाण्याच्या संगीत मेळाव्यात किंवा रेडियोवर चाललेल्या गाण्याचा कुठचा राग आहे ते भाली बिनचूक सांगायचे,आणि त्यामुळे ह्या गृहस्थाला संगीताची उपजतच देणगी असावी अशी खात्री व्हायची.भालीचा दुसरा छंद ड्राईव्हिंग करण्याचा.ग.म.लाडांच्या ऑफिसने दिलेल्या गाडीतून लाडाना गावोगावी टूरवर नेण्यासाठी कोण उत्सुक्तता असायची.अशावेळी लाडांच्या ऑफिसने दिलेल्या ड्रायव्हरला बाजुला बसायला सांगून गाडीचे चक्र आपल्या हातात घेण्यात कोण अभिमान त्यांना वाटायचा.अशा संवयीमुळे जवळ जवळ सर्व महाराष्ट्र त्यानी पालथा घातला होता.
संध्याकाळी चारच्या सुमारास डॉकयार्ड सुटल्यावर “F” रूटने भाली पांच मिनीटात घरी लगबगीने गिरगावात यायचे.म्हाताऱ्या आईने झाकून ठेवलेला कपभर चहा आणि बाजूला एका बशीत ठेवलेले कधी कधी कांदे पोहे तर कधी तिखट शिरा तर कधी थालीपीठ घशाखाली घालून “आई येतो गं! ” असं म्हणत तिन मजले उतरून गिरगावच्या फुटपाथवर चालू पडायचे ते थेट करंड्यांच्या ताईला भेटायला किंवा कामथांच्या काकाशी चार गोष्टी करायला किंवा शिरश्वेकरांच्या आजींची चौकशी करायला म्हणून निघायचे ते थेट संध्याकाळी लाडांच्या दादरच्या हिदूकॉलनीतल्या “GIP” रेल्वेसमोरच्या ब्लॉकवर रात्रीच्या मुक्कामाला जायचे.संध्याकाळचं जेवण बहुदा लाडांकडेच असायचं.
जस जसं वय होत गेलं तस तसं भालीच्या रोजच्या रिवाजात खंड पडत गेला. आणि रिटायर्ड झाल्यावर आठ तास ऑफीसात जात असलेला वेळ कसा घालवायचा हा प्रश्न पडू लागला.घरी बसण्याची संवय नसल्याने उगाच कुणाच्याही घरी जावून बसणं कठीण होवू लागलं. “बाबारे, म्हातरपण कुणालाही नको.आणि असलंच तर उत्तम प्रक्रृती आणि भरपूर पैसा असेल तर म्हातारपणा सारखी मजा नाही” असं मला कधीतरी म्हणायचे.”रोज सकाळी उठ्ल्यावर प्रकृतीच्या काही ना काही तरी कटकटी असतात बघ” असं म्हणून झाल्यावर पु.लं चा जोक सांगायला विसरायचे नाहीत.”सकाळी उठल्यावर जर का आपले गुड्घे दुखले नाहीत की समजावं की आपण मेलो” असं म्हणून मनसोक्त हंसायचे. हा जोक सांगायचा नसल्यास दुसरा एक जोक सांगायचे “हे बघ, आपला कोणही सल्ला घेत नाही हे लक्षात आल्यावर आपण समजावं की आपण आता खरंच म्हातारे झालो,आणि हा सल्ला आपल्याकडून मिळाला असता तर बरं झालं असतं असं जर त्यांच्या मनांत आलं तर समजावं की आपण खरंच मेलो .”
मी ईकडे आल्यानंतर भालीचा आणि माझा संपर्क जवळ जवळ तुटला म्हणायला हरकत नाही.नाही म्हटलं तर अलिकडे माझ्या एका मित्राने ईमेलवर बातमी दिली की भाली निर्वतले.रात्री झोपी गेल्यावर सकाळी अंथरूणातून उठेनात. हे पाहून कळायला कठीण झालं नाही की भाली झोपेतच गेले.
माणसाला झोपेची आवश्क्यता नसती तर भाली सतत असेच पायाला चक्र लागल्यासारखे ईकडून तिकडे फिरतच राहिले असते.कदाचित ईश्वराला त्यांची दया आली असावी म्हणूनच की काय त्यांना त्याने “चीर नीद्रेत “पाठवले तर नाही ना?
भालचंद्र रेडकर जाण्यासमयी ऐंशी वर्षाचे होते.
श्रीकृष्ण सामंत ( स्यान होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com
Permalink
1 Comment