प्रो.देसायांचा उद्वेग……

February 12, 2008 at 4:50 am (चिंतन)

प्रो.देसायांचा उद्वेग……

 काल प्रो.देसाई मला तळ्यावर भेटले.मला म्हणाले
“काय हा अत्याचार चालला आहे या जगात?आपण आपल्याला माणसं समजतो पण माणूसकी म्हणून काय राहिलीच नाही.”
मी म्हणालो
“भाऊसाहेब आज कसल्या विषयावर मला लेक्चर द्दयायचं
ठरवलंय? कळलं मला, पेपरातल्या बातम्या वाचून तुमचं मन उद्विग्न झालेलं दिसतंय.”
मला म्हणाले
” मला काय वाटतं ते मी तुम्हाला सांगतो.तुम्हाला माझा विचार कसा वाटतो ते सांगा”
मी मनात म्हटलं भाऊसाहेब आपल्या मुळ पदावर गेलेले दिसतात.प्रोफेसर नां!.
ते पुढे म्हणाले
” ज्यावेळी आपण जनावराना पाळीव करायला लागलो, त्याला आता दहा हजारच्या वरती वर्ष झाली असतील. त्यावेळ पासून आपण ईतर जगातले प्राणी  आणि आपण माणूस ह्यात एक प्रकारचा वेगळेपणा दाखवायला सुरवात केली.”
मी म्हणालो
“भाऊसाहेब तुम्ही आज मला बहुतेक प्राण्यावर लेक्चर देणार दिसतं.”
जरा विचारात पडले आणि मग म्हणाले
” प्राण्यांकडून आपण माणसानी काय शिकलं पाहिजे ते मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतोय.
माणसाने ह्या सर्व प्राण्यावर आपली सुप्रीमसी लादण्याचा प्रयत्न करीत, तो प्रयत्न अजून पर्यंत टिकून ठेवला आहे.
ह्या जनावरांवर आपण माणसाने त्यांच्या अंगात असलेल्या गुणांचा दुर्लक्ष केलाच आणि त्याउप्पर त्यांच्यावर अत्याचार पण करीत आहोत.आणि ते सुद्धा हजारो वर्षे असं करीत आहो.आणि एखाद्दया माणसाचा अपमान करताना त्याला आपण “तू जनावर आहेस ” अशी संबोधना करतो.”
आंवढा गिळून पुढे म्हणाले
” जनावरांचे विजेते आणि ईतिहासाचे लेखक आपण, जनावराना ’ कृर,दुष्ट आणि अत्याचारी’ संभोधतो.आणि स्वतःला ’कनवाळू,बुद्धिवान आणि सुसंकृत’ समजतो.
जनावरं जर बोलू लागली तर निराळीच गोष्ट ऐकायला मिळेल.माणासाने जर स्वतःला तोलून पाहिलं,आपण किती वर पर्यंत चढू शकतो,किती जोरात पळू शकतो, किती बारीक ऐकू शकतो,तर नक्कीच लक्षात येईल की आपण ह्या सर्व बाबतीत खूपच अपुरे पडतो.”
आणखी मनोरंजक माहिती देत प्रोफेसर पुढे म्हणाले
“  एखाद्दया जनावरांकडॆ तुम्ही बारकाईने बघीतलंत तर तुम्हाला कळेल,तुम्ही त्याच्या तोंडातला घांस काढून घ्यायला गेलात तरच ते तुमच्या अंगावर येईल,तुम्हाला चावायचा प्रयत्न करील.तुम्ही त्याच्या वाटेला गेला नाहीत तर तुमच्या भानगडीत पण पडणार नाही. ते अन्नाचा सांठा करून ठेवणार नाही.आपले पोट भरल्यावर कुणी का उरलेले अन्न खाईना त्याची कदर ते करणार नाही.एकदा पोटभरल्यावर तृप्त होवून निघून जाईल.
हे सर्व गुण जनावराला निसर्गानेच दिले आहेत ना?
मग माणसाने आपल्या वागणुकीकडे जरा डोकावून पाहिल्यास,कदाचित माणसालाच कुणी तरी जनावर म्हणण्याच्या लायकीचा माणूस नाही काय?”
प्रोफेसर बोलण्यात एव्ह्डे दंग झाले होते की क्लासात मी एकटाच आहे हे ते विसरून गेले असावेत.जरा फारमातच आले होते.
जरा खाकरून म्हणाले
“ह्या जनावरांची एखाद्दयाने जवळून पारख केली तर ज्यांच्या वर आपण अन्याय आणि अत्याचार केले त्यांची सभ्यता आणि उमदेपणा पाहून प्रभावीत होताना,गायीचा सौम्यपणा,कुत्र्याचा सामावून घेण्याचा गुण,बकरीचा साधेपणा, कुक्कुटाचा संभाळ करण्याचा गुण,गाढवाची सहनशिलता,शांतीने एकत्र राहण्याचा मेंढ्यांचा गुण, सश्याचा मैत्री ठेवण्याचा गुण,कुटुंबवत्सल बगळे, मांजराचासेल्फ कॉनफीडन्स,टर्कीचा जागृत रहाण्याचा गुण,तल्लखबुद्धि,स्नेह,आणि प्राणामिकपणा कुत्र्याचा आणि डुक्कराचा गुण पाहून छोटीशी लाज ठेवून राहिल्यास भला माणूस म्हणून घ्यायला काय अडचण आहे?”

एव्हडं बोलून झाल्यावर प्रोफेसर खूपच भावनावश झालेले पाहून
मी म्हणालो
“भाऊसाहेब,तुम्ही खूपच मनाला लावून घेता,अहो हे असंच चालायचंच.शंभर टक्के समाजात नऊव्वद टक्के असलेच लोक असले तरी दहा टक्के तुम्हाला हवे तसे नक्कीच असणार नाही तर हा जगन्नाथाचा रथ चालला नसता.”
माझा विचार प्रोफेसराना पटलेला भासला

       श्रीकृष्ण सामंत (स्यान होझे कॅलिफोरनीया)
           shrikrishnas@gmail.com
 
 
 
 

Permalink No Comments

दुःख मनातले जाईल वाया

February 10, 2008 at 4:56 am (अनुवादीत)

दुःख मनातले जाईल वाया

अंग तुझे चंदनासम
मन तुझे  दोलायम
कुणी नका देवू दोष मला
जर झालो मी हिचा दिवाना

तुझी देहयष्टी भावलेली
तुझे नयन काजळलेले
सिंदुरबिंब तुझ्या माथ्यावरी
लाल निखारे ओठावरती
जरी कुणावरी पडॆ छाया
दुःख मनातले जाईल वाया

तू सुंदर तनाची सुंदर मनाची
मुर्ती असे तुझी सुंदरतेची
जरुरी आहे आज मला तुझी
किती करू मी तुझी अपेक्षा
ना होई सहन यापुढे प्रतीक्षा

        श्रीकृष्ण सामंत (स्यान होझे कॅलिफोरनीया)
          shrikrishnas@gmail.com

Permalink No Comments

मासे पण शिकवतात

February 7, 2008 at 4:53 pm (गोष्ट)

मासे पण शिकवतात

“आयुष्यात येणाऱ्या अडचणीना सामोरं कसं जायचं हे  पाण्यातल्या प्रवाहाबरोबरच्या भोंवऱ्यात तरंगून आपला जीव कसा वाचवावा हे समजणाऱ्या  माश्याकडून मी शिकलो” हे दत्तुचे शब्द माझ्या चांगलेच लक्षात राहिले आहेत.

त्याचं असं झालं त्यावेळी आम्ही वरसोवाला राहत होतो.आमच्या घराजवळ “फिशरीज रिसर्च इंन्सटीट्युट”  आहे.एकदां मला त्यांच्या डिग्री समारंभाच्या कार्यक्रमाला आमंतत्रण होतं. त्या गर्दीत मला एक ओळखीचा चेहरा दिसला.त्याला ओळख विचारावी म्हणून त्याच्या जवळ जावून मी प्रश्न विचारण्याचं साहस केलं.
“काय रे तू घोडग्यांचा दत्तु का?”
तो म्हणाला
“होय. मी पण तुम्हाला त्यावेळीच ओळखलं, ज्यावेळी तुम्ही आमच्या डायरेक्टरशी गप्पा मारत होता.पण तुम्हाला विचारायचं धारीष्ट केलं नाही.बरं झालं तुम्हीच मला विचारलंत ते”
आणि ह्या नंतर आमचा सहवास वाढत गेला.आणि आम्ही एकमेकाला वरचेवर भेटत होतो.
दत्तु आणि मी वेंगुर्ल्याला एकाच शाळेत शिकत होतो. तसा दत्तु मला खूपच ज्युनीअर होता.पुढच्या शिक्षणासाठी जसा मी मुंबईला आलो तसा दत्तु आणि त्याचे आईवडील त्याच्याही शिक्षणासाठी मुंबईत शिफ्ट झाले.
एकदा दत्तु माझ्या घरी जेवायला आला असता आपली माहिती सांगू लागला.
“माझ्या वडीलानी मुंबईला गिरगांवला खोताच्या वाडीत एक घरगुती खानावळ काढली होती.आणि त्यावेळी मी प्रभुसेमीनरी मधे शिकत होतो.
त्यानंतर मी एलफिनस्टन कॉलेजनधे पुढचं शिक्षण घेवून एम.एससी झालो.आणि आता फिशरीज मधे पीएचडी केलं.”
चहाचा कप वर उचलून बशीत चहा ओतत दत्तू सांगत होता.
“आपल्या माणसाच्या घरी बशीतून चहा भुरकायला बरं वाटतं. तुमच्याकडे कसला शिष्टाचार? “
असं म्हणत हंसत हंसत पुढे सांगू लागला.
“मी आणि माझे वडील दर रविवारी ’भाऊच्या धक्क्यावर’ समुद्रातून मासे पकडण्याचा छंद म्हणून जात असायचो.  माझ्या गळाला पहिला मासा लागला त्यावेळी किती आनंद मला झाला म्हणून सांगू?”
मी त्याला विचारलं
“तुला फिशरीज रिसर्चचं बाळकडू ह्यामुळेच मिळालं का?”
 ”ऐका तर खरं ” असं म्हणत दत्तू पुढे सांगू लागला.
” पाण्याचा सागर दिसला की माझं मन निरनिराळ्या माशांसाठी वेडं होतं.त्याचं जास्त श्रेय माझ्या वडीलांचच आहे.”

दत्तू  तसा कोळी ज्ञातीतला.त्यामुळे गावाला सुद्धा ते कोळीवाड्यातच राहायचे.मोठ मोठे खपाटे घेवून दत्तूचे आजोबा आणि वाडवडील मांडवीवर मासे मारी साठी जायचे.
“माझी आयुष्यातली महत्वाची वेळ माझ्या वडीलांबरोबर मासे गळाने पकडण्यात गेली.पण माझ्या वडीलांच्या स्वभावाला दुसरा कांगोरा होता.ते चटकन रागवायचे.कधी कधी एकदम रागावून मला मारायचे.रागच्याभरात त्याना फक्त त्यांचीच बाजू खरी वाटायची. माझी बाजू ऐकून घ्यायची त्यांची तयारीच नसायची.पण त्यामुळे मी खचलो नाही,जरा कोडगा झालो,हतबल झालो,आणि थोडा कडवटपणा आला,पण दुसरा रविवार आल्यावर पुर्वीच्या आठवड्याचे सर्व विसरून परत दोघेही गळ घेवून जायचो.”
दत्तु पुढे सांगत होता.
” काही वर्षानंतर माशां वरची माझी आवड जागृत ठेवूनमी ग्रॅज्युएट झालो. मी नेहमीच चांगला विद्दयार्थी म्हणून राहिलो.पण नेहमीच मी असुरक्षतेचा बळी राहिलो.मला कसलाच भरंवसा राहिला नाही.जणू माझ्यातून भरंवसा उचकून काढला गेला.माझा मार्ग मी शोधत राहिलो पण चक्कर घेतच राहिल्यानं सर्व शक्तिचे निराकरण झालं.”
 नंतर अगदी आनंदात येवून तो पुढे म्हणाला
” एका रात्री जणू ’नवलची घडले’,मी मासा खवळत्या पाण्यात कसा पोहतो यावर संशोधन करत असता, असं दिसून आलं की माशांना खवळत्या प्रवाहात सुद्धा पाण्याच्या भोंवऱ्यात स्नायुंचा कमीत कमी वापर करून तरंगण्याची क्षमता असते. माझ्या एकाएकी एक लक्षात आलं की अडचणी पण एखद्दयाला कमी धडपड करायला मदत करतात.आणि ह्याचेच आकलन होण्याची जरूरी मला फार दिवसापासून होती.”
अगदी अभिमानाने दत्तु पुढे म्हणाला.
” माझ्या संशोधनावर मी खूप मेहनत घेवून मग मी पीएचडीसाठी युनिव्हर्सीटीमधे माझा थीसीस सादर  केला.तो डिग्री देण्याचा समारंभ होता.
त्या ढगाळ संध्याकाळी माझे आईवडील वेळात वेळ काढून आले आणि माझ्या बाजूला उभे राहून माझा हात आपल्या हातात घेवून मी डिग्री घेताना मला जणू आशिर्वाद देत होते.”

आपले डोळे पुसत दत्तु पुढे म्हणाला
” मला वाटतं,माझ्या आयुष्यातल्या अडचणीना मी सामोरे जाण्यासाठी मला त्यांच्याशी दोन हात न करता,त्याना वाट देवून बाजूला होणं जमू शकलं.प्रवाहाबरोबर जाण्याचं आणि भोंवऱ्यात मिळाल्यावर तरंगून घेणं, मी माशाकडून शिकलो. दुसऱ्या बद्दल कटुता न ठेवता मी जगायला शिकलो.एखाद्दयाला माफ करण्याच्या प्रकारापासून हे निराळं आहे. आयुष्यातल्या होणाऱ्या घटनांची व्याख्या मी अशा पद्धतीत करतो,आणि सामोरा जातो.”
तो क्षणभर गप्प झाल्यावर,मी त्याला जवळ घेतलं,आणि म्हणालो
“पीएचडी होण्याच्या लायकीचाच आहेस.”

         श्रीकृष्ण सामंत (स्यान होझे कॅलिफोरनीया)
            shrikrishnas@gmail.com
   

Permalink No Comments

सुखाचा शोध

February 5, 2008 at 4:05 am (चिंतन)

सुखाचा शोध

“सुखी राहण्याच्या परिस्थितीची नुसती ईच्छा करून चालत नाही ,किंवा ती परिस्थिती एक नशिबाने घडणारी गोष्ट म्हणून तिच्याकडे मनाची एकाग्रता करून चालत नाही.”

मला वाटतं,आपल्या सुखाची परिस्थिती निर्माण करण्याची आपल्याच अंगात ताकद असते.ही जादू जगात मनुष्य करू शकतो.सर्व साधारण जीवन हे पण एक असाधारण असतं.

एकदा,मी माझ्या घरातल्या खिडकीत बसून बाहेर बघत बसलो होतो.
“जीवनात ही घडी अशीच राहू दे.
प्रीतीच्या फुलावरी वसंत नाचू दे”

हे आशाचं गाणं रेडिओवर लागलं होतं.ते गाणे ऐकण्यात तल्लीन असताना मनात विचार आला की आपण किती सुखी आहो. एव्हड्यात बाहेरच्या बसस्टॉप वरती एक गरीब जोडपं भर पावसात एकमेकाला खेटून उभं राहून ओलं होवू नये म्हणून खटाटोप करीत होतं त्यांच्यावर माझी नजर गेली.थंडीची त्यांना हुडहुडी भरली होती. बरीचशी ती दोघं  बेचैन वाटत होती.
अंगावर त्यांच्या फुटपाथवर विकत घेतलेले कपडे दिसत होते. “पाणेरी” किंवा तत्सम दुकानातून घेतलेले नव्हते. मला ठाऊक आहे कारण मी त्याच्यातून गेलो होतो.
ते जोडपं पावसाच्या पाण्यापासून ओलं न होण्यासाठी एकमेकाला खेटून राहून प्रयत्नांची पराकाष्टा करीत होतं.
पण नंतर मी त्यांच्याकडे निरखून पाहिलं तेव्हा ते एकमेकात खुषीने हंसत असताना दिसले.कदाचित एकमेकात विनोद करून हंसत होते.हे बघून मी एकाएकी त्यांच्या बद्दलची आलेली किंव सोडून देवून त्यांचा हेवा करू लागलो.

मनात म्हणालो काय गंम्मत आहे त्यांना पावसाचा त्रास होत नव्हता,त्यांच्या त्या तसल्या कपड्यांबद्दल त्यांना कसलाच त्रागा नव्हता,मी घरात आरामात बसलोय याचा पण त्यांना हेवा वाटत नव्हता.क्षणभर वाटलं त्यांच्या सारखं सुखी व्हावं.
तो एक क्षण मला एक घटके सारखा वाटला.त्या क्षणात मला दिसून आलं की माझ्या सहानभुतीची त्यांना जरुरी भासली नाही,मला वाटलं होतं की त्यांना खूप कष्ट होत असतील पण तसं नव्हतं.
आणि नंतर माझ्या चांगलच लक्षात आलं,आपल्याला आपल्या आयुष्यात सुखाचे क्षण निर्माण करण्याची प्रचंड ताकद आहे.
मला वाटतं,आपण सगळे हे करू शकतो.जीवन जगतानाच आयुष्याच्या संदर्भाने सुखी राहता येतं.
सुखी राहण्याच्या परिस्थितीची नुसती ईच्छा करून चालत नाही,किंवा ती परिस्थिती एक नशिबाने घडणारी गोष्ट म्हणून तिच्याकडे मनाची एकाग्रता करून चालत नाही.आपल्याच मनाच्या ताकदीने आपलीच आपल्याला मदत होवू शकते.सुखाचा शोध करू शकतो.

         श्रीकृष्ण सामंत (स्यान होझे कॅलिफोरनीया)
             shrikrishnas@gmail.com
 

Permalink No Comments

मला वाटतं…………

February 3, 2008 at 5:58 pm (चिंतन)

मला वाटतं……

बरेच लोक आग्रह करतात की प्रत्येकाने दुसऱ्याकडे चांगल्या दृष्टीने (पॉझीटीव्ह ऍटीट्युडने) पहावं,जरी संबंध वाकडे येऊ लागले तरी ही.
हाच मार्ग प्रत्येकाला सुखी,समृद्ध आणि सौष्टव करतो.पण मुद्दा असा आहे की अशा परिस्थितीला सामोरं जाता आलं नाही की मनाला जरा धक्का बसतो.
प्रथम, पाडाव होत असल्याने थोडं वाईट वाटतंच,शिवाय हंसतमुख राहून जणू काहीच झालं नाही असा दृष्टीकोन ठेवायला जरा जड जातं किंवा मन कष्टी होतं.कदाचीत प्रत्येक वेळी काहीच झालं नाही असं होतही नसेल.
मला वाटतं, एकच मार्ग बरोबर असतो, असं पत्करून ह्या जीवनातले कष्टी समस्या सोडवता येणार नाहीत. प्रत्येकाची विचारपातळी वेगळी वेगळी असते,आणि आप-आपल्या पद्धतीनं वागण्याचा प्रयत्नास अटकाव आल्यास मग ते चांगल्या दृष्टीने अथवा वाईट दृष्टीने पाहीलं तरी योग्य होईल असं नाही.
बरेच वेळा अशा दुर्धर परिस्थितीत प्रत्येकाला थोडं दुःखी कष्टी वाटतं. पण असं वाटणं म्हणजे काही मानसिक आजार नव्हे. जीवनात अडचणी येतात आणि प्रत्येक वेळी सुखी होता आलं नाही तरी ठिक आहे.
असंच एकदा एकाला ह्याचा पडतळा झाला.एकदा त्याला  फ्लु झाला. डोकं खूपच दुखूं लागलं,बरेच आठवडे ते राहिलं.एका न्युरॉलाजीस्टने त्याला सांगितलं की त्या थंडीच्या दिवसात ह्या रोगाचा प्रादुर्भाव बऱ्याच लोकाना मेंदुच्या रोगात झाला.पण त्याला त्याने विश्वासात घेऊन सांगितलं की,
“त्यातून तू बचणार आहेस”.
परंतु त्या रुग्णाला बरेच आठवडे ह्यामुळे मानसिक कष्ट झाले.त्याला वाटलं की त्याला ब्रेन ट्युमर किंवा सिझोफ्रेनीया झाला. समजुतदार व्यक्ति असून सुद्धा त्याला जमलं नाही.तो भावनाभ्रष्ट झाला होता.

नशिबानं,त्याने एका सायक्याट्रीस्ट मित्राला विचारलं,की तो खराच सिझोफ्रेनीक आहे का?.
 तो म्हणाला
 ”नाही,तू फक्त गोंधळला आहेस,पण कसला मानसिक रुग्ण नाहीस. तू घाबरला आहेस एव्हडंच”
तो सायक्याट्रीस्टला म्हणाला
 ” माझे दोन मित्र मला आनंदी राहण्याचा आग्रह करतात.मी एक आठवडा तसा राहण्याचा प्रयत्न केला.पण त्याने उलट मी जास्त दुःखी झालो.”
तो त्यावर म्हणाला
“तू तुझ्या मित्रांना सांग,मी जास्त आनंदी राहावं असं मला वाटतं, पण सध्या आनंदी राहायलाच मी घाबरलो आहे.माझं हे घाबरणं नाहीसं झालं की मी तुम्हाला सांगीन.”

  
 असा निरोप दिल्यावर त्याला जरा बरं वाटलं.त्याने त्याचाच मार्ग पत्करल्याने त्याला बरं वाटू लागलं.त्याचा गोंधळ त्याने त्याच्याच मार्गाने सोडवत गेल्याने त्याला असं दिसून आलं की नेहमीच माणसाने चांगला दृष्टीकोन ठेवून राहिलं पाहीजे, ह्या कल्पनेनेच तो घाबरला होता.
तात्पर्य काय तर ज्याने त्याने ज्याच्या त्याच्या सारखं असावं.

    श्रीकृष्ण सामंत (स्यान होझे कॅलिफोरनीया)
      shrikrishnas@gmail.com
 

Permalink 1 Comment

तुजसम नाही पाहिली दुसरी

February 2, 2008 at 5:11 pm (कविता)

तुजसम नाही पाहिली दुसरी

पाहिल्या मी अनेक सुंदरी
परी
तुजसम नाही पाहिली दुसरी
हा देखणा चेहरा
हा नजरेतून बहाणा
हा मेघा सम केशभार
ही नयनातली विज
दे शिक्षा तू  सत्वरी
तुज सम नाही पाहिली दुसरी

तू ही सुंदर सुंदरही ऋतु
मन माझे नसे काबू
मार्ग मोकळे
धडके अंतर सगळे
मदिरेविण नशा अंतरी
तुजसम नाही पाहिली दुसरी

जरी रोखीशी तुझे भाषण
येवो ना मला कधीही मरण
असशी तू परी अथवा सुंदर
का होशी एव्हडी मगरूर
ऐक कुणाचे थोडे तरी
पाहिल्या मी अनेक सुंदरी
परी
तुजसम नाही पाहिली दुसरी
    श्रीकृष्ण सामंत (स्यान होझे कॅलिफोरनीया)
    shrikrishnas@gmail.com
 

Permalink No Comments

Next entries »