दिवस उजाडूनी होतो सुरू
होतात अवहेलना अन तक्रारी
त्याही पेक्षा ती रात्र बरी
उजळणी होते रात्रीची
स्मरूनी बाचाबाची सकाळची
तू तू अन मी मी ची
अन खऱ्या खोट्याची
उद्धवा! अजब तुझे सरकार
जनार्धनाची हीच तक्रार
तुझ्याच दारी न्यायमंदिरी
खोटे बोलणे झाले असुनी
खरे मानण्याची कसली जबरी
सत्तेची ही कसली खूमखूमी
श्रीकृष्ण सामंत (स्यान ओझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com
Permalink
1 Comment
आज खूप दिवसानी प्रो.देसाई तळ्यावर भेटले.बरेच दिवस मी एकटाच तळ्यावर फिरायला जायचो.भाऊसाहेब आपल्या मुलाकडे काही दिवस राहयाला गेले होते ते मला त्यांच्या मुलीकडून कळलं होतं.
मला म्हणाले,
“संध्याकाळची मी तुमची खूप आठवण काढायचो.मुलाच्या घरी सुद्धा फिरायला खूप जागा आहे,पार्क्स आहेत पण असं तळं नाही.”
मी म्हणालो,
“भाऊसाहेब,तुमच्या गैरहजेरीत मी काही कविता केल्या आहेत.पुढल्या खेपेला मी तुम्हाला वाचून दाखवीन.”
भाऊसाहेब म्हणाले,
“आज मला तुम्हाला माझ्या लहानपणाची एक गमतीदार गोष्ट सांगायची आहे.
ज्याची मी तुम्हाला गोष्ट सांगणार आहे तो गृहस्थ अलिकडेच मला एका दुकानात भेटला होता.प्रथम मी त्याला ओळखलं नाही.सहाजीकच खूप वर्षानी मी त्याला पाहिलं होतं.
कोकणात आम्ही जिथे राहत होतो,त्यापासून दोन तीन वाड्या पुढे हा राहायचा.ह्याच्या लहान पणीच ह्याचे वडील निर्वतले होते आणि ह्याच्या आईच्या डोक्यावर परिणाम झाला होता.त्यामुळे ह्याच्या हंसण्याखेळण्याच्या दिवसात ह्याची खूप हेळसांड झाली होती.मित्र सवंगडी चांगले न मिळाल्याने हा बराचसा उनाड आणि बेजबाबदार झाला होता.
लहान वयात खेळण्या बागडण्याच्या दिवसात,अशा मुलांचा खेळात किवा तसल्या काही activities मधे वेळ गेला तर त्या समाजविघातक संवयी पासून ही मुलं बचावली जातात.
आणि अगदी हेच ह्या मुलाच्या बाबतीत झालं.माझा एक भाऊ मुंबईला श्रीमंत लोकांच्या मुलांच्या शाळेत फिझीकल ट्रेनींगचा शिक्षक होता. त्याला त्या शाळेने इंग्लंडला पाठवून प्ले थेरपीस्टचं पुर्ण ट्रेनींग देवून मग इकडे त्यांच्या मुलांच्या शाळेतल्या खेळाच्या विभागाचा मुख्य केलं होतं.
तो असाच एकदा कोकणात काही दिवसासाठी घरी आला होता.त्याचं ह्या मुलावर लक्ष गेलं.माझ्याकडे त्याने त्या मुलाबद्दल चौकशी केली.
ते ऐकून मला म्हणाला,
“हा मुलगा जात्याच असा उनाड दिसत नाही.त्याच्यावर काही मानसिक आगाध झाले असावेत.दिसायला हा जरी आडदांड,रागीट आणि हट्टी दिसला तरी हे वय त्याचं हंसण्या खेळण्याचं आहे.त्याच्या ह्या असल्या संवयी त्याच्या आईच्या आजाराने आणि आईला सोडून म्हाताऱ्या आजीकडे पोरका म्हणून राहिल्याने त्याच्या ह्या संवयीत नकळत भर पडली आहे. माझ्या ह्या मुक्कामात मी त्याला सुधारण्याचा प्रयत्न करतो.”
भाऊसाहेब पुढे म्हणाले,
“रोज हा माझा भाऊ त्याच्या घरी जायचा.त्यानेच मला सांगतलं,”
“ह्या मुलाला प्रथम मी प्ले थेरपीच्या नियमानुसार काही मर्यादा मला त्याला घालाव्या लागल्या.प्रथम त्याला मी म्हणालो, कुठल्या गोष्टींची जरूरी असते आणि कुठल्यांची नसते हे समजावून घे.मी चित्रकलेसाठी नाही,मला चित्रकला येत नाही. खेळणी तोडण्यासाठी नसतात. पुस्तकं खिडकीच्या बाहेर फेकून देण्यासाठी नसतात.माझ्या प्रत्येक सुचना त्याने आदरपुर्वक मानल्या पण एकदा म्हणाला,
“खिडकीतून फेकून देण्यासाठी काय असतं?”
मी त्याच्या बरोबर कागदाचे छोटे,छोटे तुकडे करून एक एक खिडकीच्या बाहेर टाकून देत
म्हणालो आपण दोघानी मिळून हे ठरवलंय तसं करतोय.
हे त्याल सांगून काय मिळालं याचा मी विचार करीत होतो.तो पर्यंत तो एका अडगळीच्या जागी जावून लपला.मी त्याला बाहेर यायला सांगितलं.
त्यावेळी तो मला ओरडून म्हणाला
“मी शोधून काढण्यासाठी नाही.”
कोणत्या गोष्टीच्या काय मर्यादा असतात हे त्याला कमीत कमी कळलं,हे पाहून मला बरं वाटलं.
दोन दिवसानंतर हळू हळू तो माझं ऐकून लक्षात घेत होता हे माझ्या लक्षात आलं.त्याला माझा आधार वाटत होता आणि म्हणून तो माझ्याशी काहीतरी संबध जुळवायला पहात होता. त्यानंतर आणखी काही दिवसानी असल्या त्याच्या माझ्या लहान लहान खेळामुळे तो स्वतःहून निर्णय घेवून स्वतःला आणि दुसऱ्याला आदर देवून वागायला लागला.मी त्याची किती कदर करतो आणि तो जे काय म्हणतो ते पण कसं समजावून घेतो हे शिकायला लागला.
द्दयायला आणि घ्यायला तो शिकला आणि स्वतःवर प्रेम करू लागला.त्याला समजलं की दुस्रऱ्यानी त्याच्यावर प्रेम करायच्या लायकीचा तो आहे आणि हे ज्ञान मनात ठेवून स्वतःत बदल करू शकला,वाढू लागला आणि नवीन प्रकारचं वागणं शिकू लागला.”
नंतर माझा भाऊ मला पुढे म्हणाल्याचं आठवतं,
“मला त्या शाळेने ह्या शिक्षणासाठी परदेशी पाठवलं,त्यातून मी एक गोष्ट चागली शिकलो की ही लहान मूलं खेळणी वापरून आणि खेळ खेळत असताना त्याचा उपयोग एकमेकाशी दुवा वाढवण्यासाठी नकळत ही कला वापरत असतात.हे पण मला ठावूक झालं की काही तरी जादू होत असावी की ही मूलं आपलं अंतरमन वापरून काही तरी नजरेत येईल असं खेळ खेळताना दाखवतात.
तसं पाहिलं तर खेळ हा एक चालू पास टाईम आहे.खेळता खेळता पोक्तपणा येतो आणि शिकायला मिळतं,खेळत असताना स्वतः हजर असल्याने आपल्या अस्थित्वाची जाणीव होते.
त्या मुलाला काय किंवा आपल्या सर्वांना काय हा एक चान्स आहे की मनाच्या आतून काय हवंय आणि माणुसकीला धरून आपण ते किती आनंदाने घेतो.”
हे सर्व सांगून प्रो.देसाई जरा स्तब्ध झाले.
आणि मला पुढे म्हणाले,
“हा अलिकडेच दुकानात भेटलेला गृहस्थ हा तोच मुलगा होता हे आठवून मी क्षणभर अचंबीत झालो.माझ्या भावाची त्यावेळेला त्याला झालेली मदत,त्याच्या आयुष्यात एक परिवर्तन होण्यात झालं.तो लहानपणापासून त्याच्या आईला समजावून घेवू लागला.तिचा काहीच दोष नाही हे त्याला त्यानंतर लक्षात आलं असावं.एकदा माझा भाऊ मला भेटला होता,ह्याचा विषय आमच्या दोघांच्या बोलण्यात आला होता.मोठ्या विश्वासाने भाऊ सांगत होता की ती केस यशस्वी होणार याची त्याला खात्री होती.”
मी भाऊसाहेबाना उठता उठता म्हणालो,
“तुम्ही जर मला ही गोष्ट सांगितली नसती तर खेळणी आणि खेळ हे मी सर्वसाधारण पास टाईमच समजलो असतो.त्याचं मला महत्व कळलं.भाऊसाहेब मला एक गाणं आठवतं,
“जगताचे हे सुरेख अंगण
खेळ खेळूया सारे आपण
मुलां संगती छान
खेळूया मुलां संगती छान
याला जीवन ऐसे नांव
दोन घडीचा डाव
याला जीवन ऐसे नांव”
श्रीकृष्ण सामंत (स्यान होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com
Permalink
No Comments
प्रीत तरी मी कां केली
करूनी मनाला उदास
वाट पाहिली सांज प्रभाती
करूनी प्रतिक्षा दीन रात्री
नयनी घालून काजळ
माथ्यावरती बिंदी
अशा वेळी तुझी प्रतिक्षा
करून होईन मी छंदी
नकळत माझ्या चेहऱ्यावरती
येई लज्जेची छटाई
पाहूनी कुणी म्हणेल काही
होईल ना अपुर्वाई
शृंगार तरी मी का केला
करूनी मला उदास
वाट पाहिली सांज प्रभाती
करूनी प्रतिक्षा दीन रात्री
प्रीत तरी मी कां केली
ज्या दिवसाची वाट पाहूनी
झाले मी राधा
आज मनाची बेचैनी
वाढत जाई जादा
प्रीतिमद्धे खावूनी धोका
सोडून जाई मर्यादा
न होवो आजतरी
खोटा मिलनाचा वादा
भरंवसा तरी मी का केला
करूनी मला उदास
वाट पाहिली सांज प्रभाती
करूनी प्रतिक्षा दीन रात्री
प्रीत तरी मी कां केली
श्रीकृष्ण सामंत (स्यान होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com
Permalink
No Comments
“पण अलिकडे मला वाटू लागलं की देवाची जरूरी आहे.मी मानतो की सायन्समुळे विश्वकर्त्याची जरूरी भासत नाही पण हे एक त्याचे रूप असावं.”
आज जरा गम्मतच झाली.आज प्रो.देसाई आपल्या नातवाबरोबर तळ्यावर फिरायला आले होते.रोजच्या ठिकाणी मी भाऊसाहेबांची वाट पहात बसलो होतो.
गम्मत झाली हे म्हणण्याचे कारण, आजोबा आणि नातू तावातावाने बोलत येत होते.दोघांचा कोणत्या विषयावर वाद चालला होता,ह्याचं मला जरा कुतुहल होतं.ते जवळ आल्यावर त्या दोघानां उद्देशून मी म्हणालो,
“भाऊसाहेब,तुमचा नातू आपल्या दोघांनाही वादात हरवणार ह्याची मला खात्री आहे.अहो,पुढची पिढी नक्कीच जास्त इंटिलीजंट असते असं मी कुठेतरी वाचलंय.हा तर आपला नातू म्हणजे तो आणखी एक पिढी पुढे गेलेला,मग काय विचारता.”
हे ऐकून प्रोफेसर मला म्हणाले,
“अहो,तो वाद घालत नाही काय,तो त्याचं तत्वज्ञान सांगतोय आणि तेही देवाच्या अस्थित्वा बाबत.”
मी म्हणालो,
“भाऊसाहेब,तुमचा नातू आहे.तेव्हां तो लेक्चर देत असेल तर तसं करणं त्याचा हक्कच आहे”
माझा सपोर्ट बघून भाऊसाहेबांचा नातू मिष्किल हंसू लागला.
मी त्याला म्हणालो,
“ऐकूया तर खरं तुझं चिंतन”
हे ऐकून खूषीत येवून तो बोलू लागला,
“मला वाटतं ईश्वराला भविष्य माहित नसावं,कसं ते सांगतो.मी ह्या निर्णयाला यायला मला खूप लांबचा आणि कठिण प्रवास करावा लागला.आणि तो सुद्धा जी श्रद्धा मी वाढत असताना माझ्या मनाशी जोपासून ठेवली होती ती ठेवून.अगदी लहानपणी मला खूप लोक सांगायचे की ’देवाला सर्व माहित असतं’ बराच काळ मी माझा हा विश्वास ह्या समजुतीवर जखडून ठेवला होता.पण शेवटी मी माझ्या स्वतःच्याच विश्वासाला घेवून एक मोठी झेप घेण्याचा प्रयत्न केला.मी असा विचार केला की ईश्वराला रुढीमुळे असलेल्या विश्वासापेक्षा एखाद्दयाचा प्रामाणिकपणा जास्त आवडत असावा.माझं चैतन्य जिथे मला नेईल तिथे मी जायचं ठरवलं.
मला वाटतं जगाचं भवितव्य धर्माच्या पुस्तकात लिहील्याप्रमाणे नसून निसर्गाच्या नियमानुसार असणार. बऱ्याच लोकाना वाटतं,की सूर्योदय,सूर्यास्थ,जीवन,मरण,भूकंप आणि पूर वगैरे हे दैविक असतात.
पण मी शास्त्रज्ञ काय म्हणतात त्याच्यावर विश्वास ठेवतो.या पृथ्वीवरचे होणारे बदल,हवामान वगैरे गोष्टी ह्या निसर्गाच्या ठरलेल्या नियमानुसार होत असतात.हे माहित झाल्यामुळे मला वाईट गोष्टी देव कसा करू देतो असल्या म्हणण्यावर काहीच त्रास होत नाही.त्यामुळे क्रिकेट मॅच जिंकायला देवाची मदत हवी असते हे मुळीच पटत नाही.खरं म्हणजे कोण जिंकणार हे कुणालाच अगोदर माहित नसतं देवाला सुद्धा.
मी सायन्स आणि इंजिनीयरींग शिकायला लागल्या पासून मला खूप लोकांना भेटल्यावर कळलं की देवावर कुणीच विश्वास ठेवू मागत नाहीत.ते म्हणतात जर का सायन्स सर्व काही समजावून सांगू शकतं इलेक्ट्रॉन्स पासून गॅल्याक्सीस पर्यंत,तर मग देवाची कुणाला जरूरी आहे.
पण अलिकडे मला वाटू लागलं की देवाची जरूरी आहे.मी मानतो की सायन्समुळे विश्वकर्त्याची जरूरी भासत नाही पण हे एक त्याचे रूप असावं.पदार्थविज्ञानाचे गणीताचे नियम जरी अगदी नेमके आणि व्यक्तिसादृश्य नसतात,तरी जगात आणखी अनेक अशा गोष्टी आहेत जसे की आपल्या सारखे प्राणीमात्र आहेत त्यांना वगळून चालणार नाही.आणि त्याचं कारण त्यांच्या अस्थित्वाला काहीनाकाही उद्देश आणि अर्थ असतो.चंद्र तारे आणि गुरुत्वाकर्षणाशी त्याचा काडीचाही संबंध नाही.
विज्ञानाला आवाजाच्या लहरी आणि संगीत यातला फरक कळत नाही.प्रेम आणि दुःख हयातलाही फरक कळत नाही.
विज्ञानाला माझ्या शरिराबद्दल सांगता येईल पण माझ्या आत्म्याचं काही सांगता येत नाही हाच खरा फरक आहे.
मला वाटतं माझा आत्मा मला चैतन्य देवून दुखापतीचं दुखणं कमी कसं करावं ही क्षमता देतो.कुणाला स्पर्श करून त्याच्या बद्दल प्रेमाची भावना जागृत करतो.प्रयत्न करूनही कधी यश मिळतं कधी अपयश. एखाद्दया चांगल्या दिवशी सर्व दिवस आनंदात जातो.
मात्र हे पाहून देव आनंदाने आश्चर्य चकित होतो,असं मला वाटतं”
हे त्याचं सर्व चिंतन ऐकून मी त्याला म्हणालो,
“म्हणजे ह्याचा अर्थ प्रत्येकाने बॅलन्स ठेवून राहिलं पाहिजे.कुठचीही टोकाची भुमिका घेवून चालणार नाही.असंच तुला म्हणायचं आहे नां?”
“काका,तुम्ही अगदी माझ्या मनातलं बोललात”असं म्हणत आम्ही सर्व घरी जायला उठलो.
श्रीकृष्ण सामंत (स्यान होझे कॅलिफोरनीया)
sharikrishnas@gmail.com
Permalink
No Comments
पाहूनी तुझे नयन गुलाबी
मन माझे झाले शराबी
सांभाळा हो! मला कुणीतरी
माझेच सांभाळणे मला
झाले आता अशक्यपरी
असते एकच जशी प्रतिमा
भिंतीवरच्या तस्वीरी
आहे तशी तुझी प्रतिमा
सदैव माझ्या अंतरी
का झालो तुझ्यावर फिदा
कळेल का एकदा
विचार करूनी कळे ना मला
संताप येई माझ्याच प्रीतिवरी
ऐकून माझ्या मना
गेलो मी पस्तावूनी
माझाच मी नाही आता
काय करू मी साजणी
जादू तुझ्या नयनातली पाहून
झालो मी तिचा दुष्मन
वाटे सदैव मला रहावे जपून
अनेक सुंदरी पासून
शपथ तुझी सांगतो तुला
वाचवी स्वपनातुनही मला
अरेरे! मिळाले नयनासी नयन
जरासे हास्य तुझे पाहून
तसाच झालो मी घायाळ
श्रीकृष्ण सामंत(स्यान होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com
Permalink
2 Comments
अलिकडेच माझ्या एका मित्राचा मुलगा त्याच्या वडिलांबरोबर माझ्या घरी आला होता.माझा मित्र डॉक्टर आहे आणि हा मुलगा सायकॉलॉजीस्ट आहे.
गप्पा मारता मारता मुलगा म्हाणाला,
“आलेल्या संकटाला तोंड देवून पुनरप्रस्थापीत होण्याची निसर्गाने मनुष्याला दिलीली शक्ति”
ह्या विषयावर आपण थोडी चर्चा करूंया.
मला ह्या विषयावर अगदीच तुटपुंजं ज्ञान असल्याने मी ऐकून घेण्याचीच जास्त भुमीका घेतली.
सुनील देवधर,हा माझा मित्र कारगीलच्या युद्धात जखमी जवानाना ट्रिटमेंट देवून त्यांना बरं करण्याच्या सेवेत होता.
मुलगा म्हणाला,
काका,मला लोकांच ऐकून घेण्यासाठी पैसे मिळतात.मी अमेरिकेत आल्यावर युद्धावरून परत आलेल्या सैनिकांच्या सुख दुःखाच्या परिस्थितीतून त्यांचा संभाळ करण्य़ाच्या आणि त्यांच्या सोयी पाहून त्यांना आयुष्यात स्थैर्य आणण्यासाठी योजना पाहाण्याच्या संस्थेमधे कामाला लागलो होतो.ते व्हेटरनस हॉस्पिटल होतं.
ह्या सैनिकांकडून मला, मनुष्याला असंभवनीय परिस्थितीला तोंड देण्याच्या प्रयत्नाना सामोरं जाताना कसल्या कसल्या प्रसंगातून जावं लागतं,त्याचा त्यांनी पाहिलेला आखोंदेखा हाल त्यांच्याकडून ऐकायला मिळाला.
प्रत्यक्ष एकेकाने अतिगंभिर परिस्थितीत समोरासमोर हातापायी करून त्यातून सही सलामत सुटल्याबद्दलच्या त्यांच्या गोष्टी ऐकून घेण्याची पाळी माझ्या वर आली होती.
वैद्दयकीय विभागातल्या आणि तोफगोळ्या विभागातल्या सैनिकाना आलेल्या अनुभवातून समजलेल्या गोष्टी ऐकून, तसंच इथे आल्यावर जगू न शकलेल्या सैनिकाना त्यांच्याच आईवडलाना आपल्या मुलांच्या शेवटच्या क्रियेला प्रत्यक्ष हजर रहाण्याचे आलेले प्रसंग पाहून, आणि हे सर्व आश्चर्य वाटण्या इतके अनुभव पाहून, मनुष्याची आलेल्या प्रसंगाला तोंड देण्याची शक्ति आणि क्षमता किती टोकापर्यंत जावू शकते ह्याचा विचार मनात आल्यावर ह्या सर्वांचं खरंच कौतुक करावं असं वाटतं.
हे सैनिक, जखमी भावनेत असूनही, स्वतःला सावरून परत मानसिक धक्का घेवून कल्पने पलिकडचे प्रसंग सांभाळून पुढे मार्ग काटत जायचा त्यांचा निर्धार पाहून सतत एक प्रकारची स्फुर्ती माझ्या अंगात यायची.
इराकच्या लढाईतून परत आलेले सैनिक त्यांच्यावर होणाऱ्या असंभवनीय आय-ई-डीचे हल्ले,अदृश्यपणे होणारे बंदुकीच्या गोळ्यांचे वर्षाव कसे होत, याचं वर्णन करून सांगतात.
घरी परत आल्यावर त्यांना रस्त्यावर साधी गाडी चालवणं पण अशक्य होतं.जुन्या मित्रां बरोबर एका खोलीत राहायला जमत नाही.एक तर सैनिक सांगत होता की मानसिक सुन्नता आणि रागाची खून्नस, ह्यांच्या कचाट्यात अडकून घेतल्या सारखं त्याला सतत वाटतं.
असल्या भयंकर आघातातून बाहेर पडून हया बऱ्याचश्या इराकहून परत आलेल्या सैनिकांची पुनरप्रस्थापीत होण्याची इर्षा आणि ज्याचा अंदाज ही नाही अशा मार्गाने जावून आपल्या आयुष्याला काही अर्थ यावा असं करण्याची त्यांची धडपड पाहून त्यांचं आश्चर्य न वाटल्यास नवल म्हटलं पाहिजे.
उदाहरणार्थ,एक सैनिक होता त्याचा ह्या आजारावर जालीम इलाज म्हणजे आपल्या आजीच्या लहानश्या हॉटेलच्या धंद्दयामधे तिला मदत करण्याची त्याची इच्छा. ह्या मदतीच्या कारणाने त्याला आपल्या आजीशी भावनात्मक संबंध ठेवून सकाळी उठून तिला मदत करण्याचं एक सुंदर कारण मिळत होतं.
हे कदाचीत साधसुधं कारण वाटत असेल पण प्रत्यक्षात लांबवत जाणारी ही ट्रिटमेंट तशी कठीणही असते आणि प्रत्येक इलाजाचा शेवट गोड होईल असं नाही.
काही काही दिवशी मी ज्यावेळी घरी जातो,त्यावेळेला माझं डोकं खूप दुखत असतं.कधी मी मनातून दुःखी होवून, माझ्यावरच मी रागवून अपसेट व्हायचो.ह्या दिवशी माझं मलाच संभाळावं लागायचं. आणि पुढचा मार्ग चालू ठेवावा लागायचा. ज्या लोकांबरोबर मी त्यांना बरं करण्यासाठी आयुष्य घालवतो तेच लोक मला मी स्वतःला कसं संभाळून घ्यायचं तेच शिकवीत होते.त्या लोकांच्या निरनीराळ्या प्रकारच्या व्याधीवर असलेली यादी माझ्या डोक्यांत ठेवून ही यादी माझी मार्गदर्शिका म्हणून वापरून पुनरप्रस्थापनेसाठी मनुष्य काही गोष्टी कसा आत्मसात करू शकतो ह्याची आठवण म्हणून मनात ठेवतो.
परंतु हे लोक माझ्या ह्या विचाराचं किती कौतुक करीत असतील देवजाणे.पण मी त्यांच्याशी संबंध ठेवून माझ्या भविष्यातल्या अडचणीना तोंड द्दयायला शक्ति मिळवण्याचा प्रयत्न करतो.
अशी ही आशा, मला एक चांगली देणगी म्हणून मिळाली आहे असं समजून मी अगदी अदबीने इच्छा करतो की ती आशा मी माझ्या जवळ दुसरी कोणतीही व्यक्ति बसेल तिच्या बरोबर वाटून घेण्याचा प्रयत्न करीन.”
माझ्या ह्या मित्राच्या सायकॉलॉजीस्ट मुलाचे विचार ऐकून माझ्या मनात आलं की कारगिल वरून असेच किती तरी सैनिक अशा तर्हेच्या व्याधी घेवून आले असतील परंतु असले सायकॉलॉजीस्ट आणि असले डॉक्टर त्यांना उपाय करायला मिळाले असतील का?
आपल्याकडे सुद्धा अशा तर्हेच्या संस्था असतील का की जिथे ह्या सैनिकांची इतक्या निगेने काळजी घेतली जाते.
श्रीकृष्ण सामंत (स्यान होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com
Permalink
2 Comments
मन लागेना तुजवीण
मन शमेना तुजवीण
तुच सांगशी ग साजणी
मी काय करावे तरी
तडपूनी मनाला दाह देणे
न शोभे तुला
नजर चुकवूनी छपून जाणे
न शोभे तुला
उमेदीचा बहर तुडवीणे
न शोभे तुला
करमेना आता तुजवीण
मन लागेना तुजवीण
मी काय करावे तरी
करीन मी तुजवर प्रीती
परी लाभेल का मला ती
अगणीत दुःखे असती दुनियेत
काही अपुली काही परकी
दुःखी होई ही प्रीति एकांती
मन विचलीत करीशी तू
सांग काय करावे तरी
दे विझवून आग मनाची
वा
येऊ दे झुळुक थंड हवेची
दे वचन तुझ्या निष्टेचे
जो
देईल तुला मोल त्याचे
मन विचलीत करीशी तू
सांग काय करावे तरी
श्रीकृष्ण सामंत (स्यान होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com
Permalink
No Comments
“अजाबात पडून घेवचंय नायं.असात तो पाटील गांवचो.म्हणून काय भर नाटकांत, अर्जूनान हार खांवूक होयी? आणि पडान घेवूंक होयां?महाभारत असो नायतर रामायण असो,पायलीक पांच शेर लेखक मियां पण बघीतलेत.”
आता पर्यंत अगणीत लेखक महाभारतकारावर आणि रामायणकारावर टीका करीत आले आहेत.Copy Right चा हक्क तेव्हा अस्थीतवात नसल्याने,अद्दयाप पर्यंत कोर्ट कचऱ्यात खेचण्यापासून हे लेखक बचावले गेले आहेत.
उदा.
रामाने सीतेला मात्र आपल्याबरोबर वनवासात नेलं,
“निरोप कसला घेतां आता
जेथे राघव तेथे सीता”
ह्या गीत रामायणातल्या दोन ओळी कश्या विसरता येतील.हे सीतेचे रामाला उद्देशून म्हटलेलं लक्षात घेवून,
“उर्वशीवर झालेला अन्याय”
असा विषय घेवून बऱ्याच लेखकानी त्यावर खर्डे घासलेत ते काय कमी आहेत? काही कविनी पण उर्वशीवर झालेल्या अन्यायावर काव्ये पण केली आहेत.
उर्वशीची बाजू घेवून कुणीसं म्हटलंय,
“पण म्हणून लक्षमणाने आपल्या- बायकोला उर्वशीला- कां नेलं नाही आपल्याबरोबर वनवासात? .हा तिच्यावर अन्याय नाही काय?.
रावणाने सीतेला उचलून नेई पर्यंत रामाला वनवासात पत्नी सूख मिळत होतं मग लक्षमणाने काय गुन्हा केला होता.?”
आणखी कुणीसं रामायणावर टीका करताना आपल्या लेखात म्हटलंय,
“उर्वशी म्हणते,मला सोडून लक्ष्मण वनवासात निघून गेला.जाताना माझ्यासाठी लक्ष्मणरेषा आखून गेला. सासू-सासऱयांची, कर्तव्याची, अपेक्षांची”वाट बघ माझी ” अशी शिक्षा मला देऊन गेला अनेकदा वाटल, सगळ सोडून वनवासात निघून याव. पती नसलेल्या संसाराला त्यागून जाव,वनवास मीही भोगलाय हया राजमहालातपण माझा संयम कोणी जाणलाच नाही”
असल्या काहीशा कपोलकल्पीत टीका डोक्यांत आणून बऱ्याच लेखकानी महाभारतकारावर आणि रामायणकारावर रकानेच्यारकाने कागदावर ओढले आहेत.पुर्वी internet आणि blog वर लिहीण्याची आता सारखी सोय नसल्याने काही लेखक आपले लेख मासिकात फूकट publish करीत असत. आणि काही मासिके पण असल्या लेखावर जगत असत.
हे सगळं सांगण्याचा मतितार्थ असा की कोकणात “धयकालो” नावाने उस्फूर्त नाटकं व्हायची.
“धारणकाराचो धयकालो ईलो हा रे!”
असं गावातला एक माणूस दुसऱ्याला सांगायचा.आणि बातमी अख्या गावात पसरायची. लहानपणी आम्ही हटकून ह्या धयकाल्याला जायचो.नाटक-पार्टीने कुठे तंबू ठोकले आहेत ते आमच्यापैकी एक शोधून काढायचा.नाटक पाहून झाल्यावर दुसऱ्या दिवशी परत त्या तबूं जवळ घुटमळत रहाण्यात आम्हाला मजा यायची.
त्यावेळी पुरूष, स्त्रीपार्ट करायचे. द्रौपदी,कुंती,गांधारी हे स्त्रीपार्ट करणारे पुरूष सकाळी उठल्यावर दाढीमिशी करताना पाहून जरा गम्मत वाटायची.
” रे मन्या,तो बघ द्रौपदी दाढी करतां!”
असं म्हटल्यावर आम्ही त्या न्हाव्याला कौतुकाने नटाच्या गम्मती विचारायचो.पुरूष असून स्त्रीपार्ट करण्याची जबाबदारी असल्याने डोळ्यात काजळ घालून,लांब लांब केस ठेवून स्टेजवरची चाल बायकी राहण्याची संवय म्हणून दिवसा पण तसेच चालताना ह्या नटाना पाहून जरा कुतुहल वाटायचं.
नेहमीच्या व्यवहारात बोलताना सुद्धा ते बायकांसारखे लाडिक हावभाव करून बोलायचे हे पाहून सुद्धा हसूं आवरंत नसायचं.
कधी कधी एखादा नट आयत्यावेळी हजर नसायचा.कधी कधी दारू झोकून तर्र असायचा अशावेळी त्याच्या कडून ऐनवेळी काम करून कसं घ्यायचं हे नाटकाच्या मालकाला संकट व्हायचं.
“मेल्या ही काय वेळ दारू पिवची?.अरे,तुझो पार्ट येवची वेळ आयली मरे.”
असं दिगंबर गुरुजी - नाटकाचे डायरेक्टर -वैतागून म्हणायचे.पण दुसरा काही उपाय नसल्याने कोण जवळपास दिसेल त्याल तो पार्ट करावा लागायचा.
तेच तेच नाटक बरेच वेळां पाहिल्याने डायलॉग सर्व पाठ झालेले प्रेक्षक कमी नसायचे.असंच एकदा दुर्योधन दारू पिवून आयत्यावेळी तर्र झाला होता.दिगंबर गुरूजीने गावातल्या पाटलाला दुर्योधनाची भुमिका करायला विनंती केली,नव्हे तर ते त्यांच्या गळीच पडले.
धयकाल्याची आयत्यावेळी लाज राखावी म्हणून बाबलो पाटील - गावातला प्रतिष्टीत आसामी- कुरकुरून का होईना तयार होतो.गुरुजी,त्याचा पार्ट येण्यापुर्वी थोडेसे संवाद बाबल्या पाटलाला येतात याची खात्री करून घेवून त्याला दुरयोधनाचे कपडे चढवायला सांगतात.
अर्जून दिगसकर दिसायला स्मार्ट, तरतरीत नाक,आणि नाटकाचे संवाद स्पष्ट बोलायला तत्पर असल्याने त्याला गुरुजी अर्जूनाची भुमिका देतात. अर्जून दिगसकर गावातली एक सर्वसाधारण व्यक्ति असते. तसंच दुर्योधनाची भुमिका करणारा बाबल्या पाटील दुर्योधनाला शोभेल असा दंडकट, राबस-रोबस्ट-आणि काळसावळा दिसायला असतो.
अर्जूनाचा आणि दुर्योधनाचा वाद होवून लढाई होते असा सीन असतो.दोघांच्या वादसंवादाच्या ओळी बोलून झाल्यावर घनघोर युद्ध व्हायचं असतं.म्यानातून तरवारी काढून दोघे ही एकमेका वर तरवारीने वार करण्याचा पार्ट करतात. सीनच्या शेवटी दुर्योधनाने पडायचं, असा सीन असतो.आणि मग अर्जून त्याच्यावर शेवटचा वार करण्यापुर्वीत्याला लाथेने ढकलतो. आणि ठार मारण्या ऐवजी माफ करून सोडून देतो.
अर्जून हा पांडवातला एक पांडव अज्ञातवासात असल्याने दुर्योधनाला हा अर्जून आहे हे खऱ्या गोष्टीत माहित नाही असं समजायचं असतं.काही झालं तरी दुर्योधन खाली स्टेजवर पडण्याचा सीन करत नाही हे पाहून गुरुजी आतून प्रॉम्ट करतात आणि दुर्योधनाला-म्हणजे बाबल्याला- सांगतात,
“लढाई खूप झाली आता तू जमिनीवर पड.”
पण ते कसं शक्य आहे.बाबल्या पाटलाला जमिनीवर पडून अर्जूनाची लाथ खावून वर,
” जा,तुला जीवदान दिले “
असं म्हणून घ्यायची तयारी नसते.कारण प्रेक्षकात गावातल्या बायका आणि त्याची सुद्धा बायको बसलेली असते. ईतर लोकही बसलेले असतात, त्यांच्या पुढे लाज जाईल असं कसं करायचं.असं दुर्योधनाला म्हणजे बाबल्या पाटलाला वाटतं.
अर्जूनाला डोळे करून दुर्योधन सांगतो की तू पड मी पडणार नाही.अर्जूनही त्याला डोळ्याने खुणावतो की सीन मधे तू पडायचं असतं मी नाही.बराच वेळ हा सीन जरूरी पेक्षा जास्त वेळ चाललेला असतो.प्रेक्षकाना सुद्धा स्टोरी माहित असल्याने त्यांचे पण पेशंस संपत येतात.
शेवटी बाबल्या पाटील म्हणजेच दुर्योधन उस्फूर्त गाणे म्हणून गाण्यातून त्याला संदेश देवून चिडून सांगतो,
“अर्जूनग्या माय++ या पडान घे
रे पडान घे.
मी आसंय पाटील गावचो
माकां अपमान नाय करून घेवचो
(प्रेक्षकांत)
चेहरो दिसतां माझ्या बायलेचो
अर्जूनग्या माय++ या पडान घे
रे पडान घे.”
( टीप. कर्म धर्म संयोगाने नाटकातल्या अर्जून ह्या भुमिकेचं आणि खऱ्या नटाचं नाव अर्जून (दिगसकर) असणं हा योगायोगच म्हटला पाहिजे)
गाणं ऐकून प्रेक्षक हंसायला लागतात.दिगंबर गुरुजीनां हे सर्व कळल्यावर नाटकाचा पडदा पाडल्याशिवाय त्यांना गत्यंतरच उरत नाही. पडदा पडल्यावर अर्जून दिगसकर गुरुजीना सांगतो,
”अजाबात पडून घेवचंय नायं.असात तो पाटील गांवचो.म्हणून काय भर नाटकांत, अर्जूनान हार खांवूक होयी? आणि पडान घेवूंक होयां?महाभारत असो नायतर रामायण असो,पायलीक पांच शेर लेखक मियां पण बघीतलेत.”
तात्पर्य अ़सं की अनादिकालापुर्वी लिहीलेल्या रामायण आणि महाभारत ह्या दोन असामान्य ग्रंथावर प्रत्येकाने आपाआपले विचार सांगून भरपूर तोंडसूख घेतलं आहे.
कोकणातला धयकाला हा त्यातला अलिकडचा एक प्रकार.
श्रीकृष्ण सामंत (स्यान होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com
Permalink
No Comments
दोन शब्दांची असे ही कहाणी
एक तर असेल प्रीत नाही तर जवानी
नका विचारू अर्थ मनातील शंकेचा
नका विचारू अर्थ आता कसल्याही प्रकारचा
जिच्या साठी असे ही दुनिया दीवानी
एक तर असेल प्रीत नाही तर जवानी
किती तोटके असे आयुरमान जीवनाचे
दिवस किती सुखाचे किती दुःखाचे
ये मिठीत माझ्या वसंत आला बहरूनी
एक तर असेल प्रीत नाही तर जवानी
गात असे कसले गीत हा नावाडी
आठवूनी त्याची प्रिया असे जी पैलतडी
जिच्या साठी असे ही दुनिया दीवानी
एक तर असेल प्रीत नाही तर जवानी
दोन शब्दांची असे ही कहाणी
एक तर असेल प्रीत नाही तर जवानी
श्रीकृष्ण सामंत (स्यान होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com
Permalink
No Comments
“मला वाटतं, आपण आपल्या आतल्याआवाजाच्या पलिकडे जावून शोध घेत मनुष्याच्या स्वभावगुणधर्माच्या लयीमधे आणि कंपनामधे आपली जागा कुठे आहे हे शोधावं.”
“मला वाटतं मी मनुष्याच्या अंगातल्या अगणीत प्रकारच्या स्वभावगुणधर्मावर जास्त केंद्रीत असतो.”
“असं का तू म्हणतोस?” असं मी मला संगीतात मदत करणाऱ्या सहकाऱ्याला विचारल्यावर तो मला म्हणाला,
“मी देशाच्या तिन निरनीराळ्या प्रांततल्या रीतिरिवाजात वाढलो आहे.हे माझ्या म्हणण्याचं कारण आहे.माझे आईवडिल कलकत्याचे,मी गुजराथ मधे जन्मलो,आणि महाराष्ट्रात, मुंबई मधे वाढलो.
मी ज्यावेळी तरूण होतो,त्यावेळी हे सगळं मला जरा गोंधळात टाकायचं.प्रत्येक प्रांतातले लोक त्यांचे रीतिरिवाज उच्च आहेत असं म्हणायचे.पण माझी खात्री होती की त्यांचं म्हणणं सर्वच काही बरोबर नव्हतं.
मला वाटत होतं जो तो समजायचा की मी बंगाली,गुजराथी किंवा मराठी असावा.बरीच वर्ष मी तिन्हीतही स्वारस्य घ्यायचो.प्रत्येका सारखं व्हायचा प्रयत्न करायचो परंतु एकातही समाधान वाटत नव्हत.मला वाटतं मी माझी निवड कुणा एकात करण्याची जरूरी नव्हती,आणि निवड ते काय याचा अर्थही मला कळत नव्हता आणि निवड न करणं म्हणजे काय हे ही मला समजत नव्हतं.
तरीपण प्रत्येकाचे रीतिरिवाज समजून घेताना मी बरंच काही शिकत होतो.प्रत्येकात सामावून घेण्याच्या माझ्या धडपडीत मला दिसून आलं की प्रत्येकजण आपआपल्यापरीने विशेष आहेत.
असं करताना माझी खात्री झाली की एकाच्या रीतिरिवाजाची निवड करताना दुसऱ्याचा दुरावा करण्याची जरुरी नाही.उलटपक्षी तिन्ही मधून निवड करणं मला जास्त उचीत वाटत होतं. आणि एका पेक्षां दुसरं चांगलं म्हणण्याची जरूरीही नव्हती.
बंगाली संस्कारातून मी त्यांच्या साहित्यीक प्रगतीचा,आणि टागोरांच्या रविंद्र संगीतातल्या सरशीचा सन्मान करतो,गुजराथी संस्कारातल्या त्यांच्या बिझीनेस बद्दलची वेडी चुरस करण्याचे गुण आणि कुणालाही प्रेमाने आणि आदराने “भाय किंवा भेन “म्हणून संभोदण्याच्या रिवाजाचा सन्मान करतो,तसंच मराठी संस्कारातील शिवाजीमहाराजांच्या मर्दुमकीची परंपरा,आणि लोकांचे संगीत नाटकाचे वेड ह्याचाही सन्मान करतो.
ह्यामुळे एकाच संस्कारात जखडून घेण्यापेक्षा मी आता सरमिसळ तिन्ही रीतिरिवाजातून मिळणाऱ्या मौल्यावर प्रेम करू लागलो.प्रत्येक दिवशी मला जे कळत नाही ते कळण्यासाठी ते जवळून न्याहाळतो आणि ही अशी भटकंती करीत असताना अपघाताने मला कांही नवीन शिकायला मिळतं. त्याशिवाय माझ्या आयुष्याला एक आकार पण येतो.
संगीत क्षेत्रात काम करत असताना,हीच कल्पना अंगीकारतो.जे संगीत मी करतो ते माझ्या सारखंच आहे ते काही एकाच रिवाजाचं नसतं, अलिकडे मी संगीतातले पण खूप रिवाज पडताळून पाहिले आहेत.असं करीत असताना माझी अनेक संगीतकारांची ओळख झाली आणि ते पण मानतात की संगीत निर्मीतीच्या क्षमतेचा उगम हा अशाच संस्कारांच्या सरमिसळतेतच असतो.हे संगीतकार आदरार्थी ह्या रिवाजांचे माझे गुरूंच झाले आहेत.किती आभार मानू त्यांचे आणि त्यांच्या संगीताचे,कारण माझ्याच संगीतामधे मला हा एक नवीन अर्थ गवसला.
खरोखर हे किती चम्तकारीक आहे की हे लोक ,आणि त्यांचं संगीत आणि त्यांचे रिवाज ह्यांत कसे आपसूप सुधारणा करीत आहेत.जो अनुभव मिळतो आणि जो मार्ग ते स्विकारतात ते खरं तर असंभवनीयअसतात.आपलं कुटुंब, शेजार, रीतिरिवाज,आणि प्रांत ह्याने याला आकार मिळतो,आपण प्रत्येकजण शेवटी ह्या पद्धतीतून जात असताना कोणा कडून किती शिकत असतो आणि शेवटी आपलं पण कशात परिवर्तन करून घेतो हे लक्षात ठेवण्या सारखं आहे.
मला वाटतं, आपण आपल्या आतल्याआवाजाच्या पलिकडे जावून शोध घेत मनुष्याच्या स्वभावगुणधर्माच्या लयीमधे आणि कंपनामधे आपली जागा कुठे आहे हे शोधावं.”
श्रीकृष्ण सामंत (स्यान होझे कॅलिफोरनीया)
shrikrishans@gmail.com
Permalink
No Comments