“ठेविले अनंते तैसेचि रहावे!”

May 5, 2008 at 9:32 am (गोष्ट)

अनंताचा निरोप घेताना मला खूप वाईट वाटलं.त्याला त्याचं काहीच वाटल्याचं दिसलं नाही. कदाचित,
 ”ठेविले अनंते तैसेचि रहावे.”
असं त्याला वाटत असावं, असं मी मनात आणून त्याचा निरोप घेतला.

अनंत नाडकर्णी आमच्या समोरच्या कॉलनीत रहायचा.त्याची आमच्याशी ओळख वसंत सबनीसमुळे झाली.वसंत सबनीसचा हा मेहुणा.
अनंता एम.कॉम होता.त्याला एका बॅंकेत सिनीयर मॅनेजरची नोकरी होती.त्याचं लग्न झालं होत आणि त्याला एक लहान मुलगा होता.
अनंताला दोन तीन बहिणी होत्या. सर्वांची लग्न पण झाली होती.अनंताचे वडिल मुळ कोकणातले.जेमतेम शेतीभाती होती,संसार चालतच होता.पण त्यांना दारूचं व्यसन होतं.आणि त्या व्यसनामुळे त्यांची परिस्थिती खूपच खालावली होती.अनंता आणि त्याच्या बहिणी यातून चांगल्याच होरपळून गेल्या होत्या.
आपल्याला असं व्यसन कदापी लावून घेणार नाही असं अनंत नेहमी छातीठोकपणे सांगायचा.नव्हेतर वडिलांची ती परिस्थिती पाहून त्याला दारूची पुरी घृणा होती.
खूप वर्षानी मी आमच्या जुन्या कॉलनीला भेट देण्यासाठी अंधेरी स्टेशनच्या समोर सातबंगल्याला जाणाऱ्या बसस्टॉपवर उभा होतो.
“मला ओळखलं नाहीत,मी अनंत नाडकर्णी.”
असं म्हणणारी एक व्यक्ति माझ्या समोर उभी होती.गटारात लोळून खराब झालेले दिसतात तसे अंगात कपडे,ते पण काही ठिकाणी फाटलेले,एखाददोन दिवस न जेवलेला भिकारी कसा दिसावा असा पेहराव असलेल्या ह्या व्यक्तिला पाहून हा अनंत नाडकर्णी आहे ह्याचावर माझा विश्वासच बसे ना.
“मला एक पाव आणि चहा घेण्यासाठी पैसे द्दयाल का “
असं आवर्जून सांगणाऱ्या ह्या अनंत नाडकरण्याला पाहून मी खरोखरच संभ्रमात पडलो.इकडे तिकडे आजुबाजुला बघून थोडासा लाजतच मी त्याला हाताने खुणावून माझ्याबरोबर चल असं दाखवलं.आणि स्टशनसमोरच्या इराण्याच्या हॉटेलमधे शिरून तडक फॅमिली रूम मधे त्याला घेवून गेलो.
“अरे! अनंता काय हे तुझी दशा करून घेतलीस?झालं तरी काय तुला?तू बॅंकेत होतास ना? तुझी बायको आणि मुलगा बरी आहेत ना?तू दारूला न शिवणारा ह्या परिस्थितीत कसा आलास?”
असे एक ना दोन एकामागून एक मी त्याला प्रश्न विचारत राहिलो हे पाहून अनंत गालातल्या गालात हसत वेटरने आणून दिलेल्या पाण्याच्या ग्लासातलं पाणी रिकामं करीत म्हणाला,
“माझी कर्म दशा.आणखी काय? “
मी त्याच्यासाठी चार पावाची एक लादीच मागवली आणि तीन कप चहा त्याच्यासाठी आणि एक कप चहा माझ्यासाठी मागवून वेटरला पिटाळून लावलं. त्याच्याकडून हावऱ्या सारखं ऐकून घ्यायला मी उत्सुक्त होतो.
अनंत आता सांगू लागला,
“उच्च श्रेणीतली नोकरी करत असताना आपल्या श्रद्धा ढळू न देता सभोवतालच्या परिस्थितीत चळू न जाता आपले संस्कार लक्षात ठेवून, न राहिल्याने मला ही किंमत मोजावी लागली.पण आता इतराना दोष देवून काय उपयोग.म्हणून मी मघाशी म्हणालो, माझी कर्म दशा.”

अनंत आता अगदी गंभिर होवून सांगू लागला
“व्यसन हे माझ्या आयुष्याच्या प्रवासाचा  मैलाचा दगड झाला आहे.मी व्यसना शिवाय कधीच नसतो.प्रेमी युगुले येतात आणि जातात,युद्ध हरली जातात आणि जिंकली जातात.हरणं आणि जिंकणं सारखच होत असतं.पाऊस पडतो,बर्फ पडतं,तारे आकाशातून कोसळतात.हे होत असताना माझं व्यसन माझ्या बरोबरच असतं.मी ते वापरो न वापरो ते नेहमीच माझ्या बरोबर असतंच.
मी सर्व व्यसनी लोकांच्या घोळक्यात राहून प्रत्येकाची हकिकत ऐकत असतो.कनवाळू असणं,स्विकार करणं,प्रामाणिक असणं, अवहेलना करून घेणं,आणि शरण येणं ह्याचा वापर आपण जीवनात करीत असतो.मी स्वतः ह्या गोष्टीना सामोरा जावू शकत नाही.
व्यसनी म्हणून मी निष्टुर,तोंडफटकळ,आणि दबाव ठेवण्यात प्रवीण आहे.मी कावेबाजीत दर्दी आहे.घाबरल्याने मी खोटं बोलायला प्रवृत होतो.प्रामाणिक राहवसं मला जमत नाही.मला कुणी समजून घ्यावं असं वाटत नाही.माझ्या व्यसनाला मी खतपाणी द्दयावं असं वाटतं. बहुदा मला हे सर्व असंच असावं असं वाटतं.
सिनेमा नाटकातल्या कहाण्या पाहून व्यसनातून बाहेर पडणं  खूप दुःखदायी आणि भडक असतं हे कळून येतं आणि सरतेशेवटी त्यापासून सुटका झाल्यावर ते लाभदायी होतं असं दाखवलं जातं.खरं म्हणजे कुठल्याही गोष्टीतून सुटका होणं म्हणजे महाकष्टदायी असतं.त्याच, त्याच चुका मी परत, परत करतो.मला समजून कसं राहावं हे कळतच नाही.सत्य कसं ओळखावं हे कळतच नाही मग सत्य बोलायला कसं येणार?.कबूल व्हायला मला आवडत नाही,माझा त्याच्यावर जोरच नाही. उरलेलं आयुष्य अशा तऱ्हेने कसं राहायचं हे मला उमजतंच नाही.असं हे हताश,असं यकःश्चित, असं सदा हतबल राहून कसं जीवन जाणार हे कळत नाही.
पण एक नक्की,मला प्रयत्न सोडू नये असं वाटतं.चांगल करावसं वाटतं.मला वाटतं की मी अनेक वेळा अपयशी झालो,अनेक वेळा पडलो तरी पुन्हा माझा मला सावरून पुढे जावं असं वाटतं.माहित नाही ह्यात मी यशस्वी होईन की नाही.
माझ्या आयुष्याचे जमतील असे छोटे छोटे क्षण पाडून पहातो.मला समजलंय की एखाद्दया क्षणातून मी विनासायास सुटतो. आता मला असुरक्षित वाटलं तर ते तेव्हड्या पुरतं.दुसऱ्या क्षणाला ते बदलेलही.माझं व्यसन माझ्या कानात ह्या क्षणाला फुसफुसतंय ” बाबारे!वाटेल चांगलं तुला. कसं ते तुला माहित पण आहे.”  आणि मला खरंच पुढच्या क्षणाला बरं ही वाटेल.
तेव्हा तो क्षण यायची मी वाट बघतोय.
मला वाटतं अशाच तऱ्हेने मी एक एक क्षण करून चांगल जीवन जगत राहिन.आताच मला मी चांगली निवड करू शकेन. आताच मी मला काय हवं ते करू शकेन.हेच मी खरं बोलून जाईन.ह्याच क्षणाला जे काय माझ्याकडे आहे त्याबद्दल मी उपकृत राहिन.सर्व विसरून जाण्याची मी पराकाष्टा करीन.आणखी पाच मिनीटानी काही तरी मुर्खासारखं मी करून जाईन.पण अगदी ह्या क्षणाला मी माझं जीवन बदलायचा प्रयत्न करू शकेन.
शेवटी मला वाटतं,जे काय आहे ते हे सगळं माझ्याजवळ आहे.अगदी ह्या क्षणाला.आणि मला वाटतं ते पुरं आहे.फरक व्हायला ते पुरं आहे.चांगली व्यक्ति व्हायला ते पुरं आहे.मला ह्यातून सुटकेसाठी हवं आहे तो मी ह्या क्षणी आहे …अगदी ह्या क्षणी आहे.”

हे सर्व त्याचं भाषण मी निमूट ऐकत होतो.एम.कॉम होवून बॅंकेत मॅनेजर म्हणून राहिलाला हा माणूस मी वेडा समजू की शहाणा हेच त्या क्षणी मला समजत नव्हतं.पण म्हणतात ना दारूच्या नशेत माणूस खरं तेच बोलतो तेव्हा तो काय जे बोलत होता ते त्याला मी त्याची वाफ जावू द्दयायला-स्टिम आऊट- करायला देत होतो.

अनंताची नोकरी केव्हांच गेली होती.दारुच्या व्यसनाने तो वेळेवर ब्यॉंकेत जात नसायचा. त्याची पुर्वीची सेवा पाहून त्याला समजून घेण्याचा प्रयत्न झाला.पण नंतर नंतर अति व्हायला लागल्यावर त्याला नोकरीवर नको येवू म्हणून सांगितलं गेलं.
त्याचं व्यसन जसं वाढत गेलं तसं त्याची पत्नी त्याला सोडून मुलाला घेवून माहेरी गेली.ती येईचना.अनंताला हाऊसिंग बोर्डची जागा सोडावी लागली.तो बेघर झाला.हे केवळ दारुच्या व्यसनामुळे झालं.

माणसाच्या मेंदुमधली रक्ताच्या सरक्युलेशन मधून सततच्या अलकोहलच्या प्रादुर्भावामुळे एक जागा इतकी प्रभावित होते की नंतर त्याची त्या अलकोहलसाठी कोलाहल होते.ह्यालाच इंग्रजीत addict -व्यसनी- म्हणतात.आणि तेच अनंताचं झालं.त्याशिवाय मला वाटतं हे काही प्रमाणात आनुवंशिक पण असावं.दारुच्या व्यसनात एखाद्दयाला मुलं झाली तर त्या मुलांच्या जिनम मधे ते व्यसन उतरत असावं. असं मी कुठे तरी वाचल्याचं आठवतं.हे व्यसन त्याला त्याच्या वडिलांकडून आलं असावं. आणि माझ्या माहितीतली पण अशीच काही उदाहरणं आहेत.ज्याठिकाणी वडिलांच्या पावलावर पाऊल टाकून चालणाऱ्या व्यक्ति प्राप्त परिस्थितीत एखादं लटकं कारण दाखवून असं व्यसनी व्हायला उद्दयुक्त झालेली.

अनंताचा निरोप घेताना मला खूप वाईट वाटलं.त्याला त्याचं काहीच वाटल्याचं दिसलं नाही.

कदाचित,
 ”ठेविले अनंते तैसेचि रहावे.”
असं त्याला वाटत असावं, असं मी मनात आणून त्याचा निरोप घेतला.

श्रीकृष्ण सामंत (स्यान होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com    

Permalink No Comments

आगे बढो!

May 1, 2008 at 9:33 am (गोष्ट)

खरंच,पाटी पुर्ण पुसून टाकल्यास जगात गुन्ह्यापासून झालेली होरपळ,आपण केलेली बदल्याची होरपळ, उघड उघड विसरून जावून जर का “आगे बढो” म्ह्टलं तर किती बरं होईल.

हल्ली त्यामानाने खूपच लोकांचे प्राण जातात.काहींचे अपघातात तर काहींचे मारामारीत,कांही मरतात आतंगवाद्दयाकडून वगैरे.
हे शहरात जास्त होत असतं. त्यामानाने खेड्यात असले प्रकार फारच कमी होतात.एकवेळा मुंबई अशी होती की येव्हड्या मोठ्या शहरातपण त्यामानाने खून खराबे कमीच होत.मग शहराच्या बाहेर आणि खेड्यात तर कधीतरी एखादा खून व्हायचा.आणि वर्तमानपत्रात खेड्यात रकानेचे रकाने भरून येत.
माझे वडिल तेव्हा रत्नागिरी जिल्हयात पोलिस खात्यात चांगल्या हुद्दयावर होते.त्यांच्या मित्राचा एक मुलगा त्यांच्या हाताखाली पोलिस इन्स्पेक्टरचे काम करायचा.गावात कुठेही दरोडा पडला तर ह्या मंडाळीना दरोडखोराच्या मागावर जावं लागायचं.
एका  अशाच दरोडेखोराच्या हातापायीत गोळी लागून त्या इन्स्पेकटरचा खून झाला.त्यावळी अकरा वर्षाचा असलेला त्यांचा मुलगा अलिकडेच मी रत्नागिरीत गेलो असताना मला भेटला.मला पाहून त्याला तो काळ आठवला.
मला तो सांगू लागला,
“मध्य रात्री आमच्या दरवाज्यावर कोणी तरी थाप मारली.माझ्या आईने दरवाजा उघडला. माझ्या आईला तो माणूस म्हणाला,
“तुमचे पति दरोडेखोराची गोळी लागून गेले.”
आणि आमच्या घरात भुकंप झाल्या सारखं झालं.
त्यानंतर त्या दरोडेखोराला पकडलं गेलं,आणि त्याला फांशीची शिक्षा झाली.नंतर वरच्या कोर्टात त्याला जन्मठेपीची शिक्षा झाली.आणि अजून तो तुरंगातच आहे.
मी त्या खून्याबद्दल जमेल तेव्हडा विसर पाडून घ्यायचा प्रयत्न करीत राहिलो.एक तर असं राहणं किंवा त्या खून्याचा द्वेष करीत राहून बळी पडावं हे दोनच उपाय होते.
त्याऐवजी हळू हळू मी माझ्या स्मरणातून त्याचं नांवच काढून टाकण्याचा प्रयत्न करीत होतो. कदाचित इकडे तिकडे काही तरी घटना घडून कुठे तरी वर्तमानपत्रात बातमी येवून त्या खून्याला पॅरोलवर सोडला हे समजलं जायचं किंवा एखादा माझा मित्र “अमक्या अमक्याचं असं असं झालं” असं सांगून आठवण करून द्दयायचा.आणि नंतर मला परत त्याचा विसर पाडायला भाग पडायचं.
हे काही सर्व सोपं नव्हतं.सर्वसाधारण ज्याच्या त्याच्या मनात,अशा परिस्थितीत,
 ”मुलाने आपल्या बापाच्या खूनाचा वचपा घ्यायला हवा”असले विचार येत असत.
“हरामखोराचा घे वचपा” असं म्हणणारे काही असत.
तुम्हाला आता पटणार नाही पण मला ते त्यावेळी वेगळंच दिसत होतं. माझ्या वडीलांसारखा दुसरा कोणी ऑफिसर असाच मारला गेला हे मला कळल्यावर, किंवा कॅलेंडरवर  फादर्सडेचा दिवस बघितल्यावर, मला माझ्या वडलांचं स्मरण व्हायचं.
त्यांच्या मृत्यूचा माझ्या मनात विचार यायचा.आणि त्या खून्याचं अस्थित्वच मी माझ्या मनात नाकारत होतो.
आता सुद्धा हे मी तुम्हाला सांगत असताना,त्याचं नाव माझ्या मनात उचल खातं आणि ज्या जागी माझ्या मनात गाडलंय तिथून मला ते नांव मोकळं करण्याचा प्रयत्न करतं. ह्याचाच अर्थ सतत डोक्यात राग ठेवून मला जगण्याची जरूरी नव्हती.

ह्याचाच दुसरा अर्थ इतिहासाच्या त्या घटनेत मला जखडून राहण्याची जरूरी नव्हती.ह्याचाच अर्थ मी माझं जीवन जगत राहून,माझ्या वडलांवर असलेल्या माझ्या प्रेमाचा, मी कधीच विसर पडू देवू नये,किंवा त्याना आपल्या प्राणाची आहूती देताना काय वाटलं असेल ह्याचाही विसर पडू देवू नये, आणि बदला घेण्याच्या विचारही मनात येऊ नये.

विसरून जाण्याचं अंगी असलेल्या क्षमतेवर माझा विश्वास आहे.जगात कितीतरी जूनी किलमीशं जुलूम करण्याच्या मनसेने बदला घेण्याच्या इर्षेने आगीचा डोंब अजून उठवतात.
झालेल्या घटना विचारात घेवून बदला घेवून किती लोकाना प्राण गमवावे लागत आहेत.
खरंच,पाटी पुर्ण पुसून टाकल्यास जगात गुन्ह्यापासून झालेली होरपळ,आपण केलेली बदल्याची होरपळ, उघड उघड विसरून जावून जर का “आगे बढो” म्ह्टलं तर किती बरं होईल.”

श्रीकृष्ण सामंत (स्यान होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

 

Permalink 2 Comments

ह्याव ए नाईस डे

April 24, 2008 at 8:55 am (गोष्ट)

“मला खरंच उभं आयुष्य खर्चून सुद्धा फक्त एखादा दिवस इतका चांगला असू शकतो हे शिकायला मिळालं”

असं विरेन मला ज्यावेळेला मी त्याच्या घरी तो एकाएकी आजारी झाल्याचे कळल्यावर भेटायला गेलो तेंव्हा सांगत होता.
विरेन माझ्या मित्राचा मोठा मुलगा.त्याचे वडिल माझा मित्र,तो संगीततज्ञ माणूस.
तो मराठी सिनेमात खूपदा पार्श्वसंगीत द्दयायचा.त्याचा वाद्दयवृंद पण होता. निरनिराळ्या महाराष्ट्रातल्या मोठ्या मोठ्या शहरात निमंत्रण मिळाल्यावर हा वाद्दयवृंद घेवून जायचा.
अलीकडे प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांने हा सर्व कामाचा भार विरेन वर- आपल्या मुलांवर- टाकला होता.
नेहमीच गावोगाव फिरून, नाही म्हटलं तरी खाण्या पिण्याची आणि विश्रांती आणि झोपेची नकळत आबाळ होत असतेच.
विरेनला असंच कुठेतरी इंनफेक्शन झाल्याने त्याला अचानक हॉस्पिटलात जावं लागलं. आठदहा दिवसांनी त्याच्या आजाराला उतार मिळाल्याने डॉक्टरनी त्याला घरी पाठवलं होतं.आणखी थोडी विश्रांती पण घेण्याची सुचना केली होती.
विरेन मला म्हणाला,
” आठ दिवसापुर्वी मला हॉस्पिटल मधून डिस्चार्ज मिळाला.मला छातीत खूप कळा येवून भयंकर श्वास लागला होता.स्कॅन केल्यावर माझ्या फुफ्फुसात ब्लडक्लॉट आला होता असं समजलं.
मी वाचलो हे पाहून सर्वजण मला तक्दीरवान म्हणत होते.रोगाचं इंग्लीश नांव मला माहित असलं नसलं तरी,ते दुखणं,ती भिती आणि त्यातून आलेले ते डिप्रेशन ह्याची मला मुळीच कल्पना नव्हती.”
मी त्याला म्हटलं,
“सतत कामात व्यग्र असलेल्या तुला एव्हडे दिवस काढायला मोठं संकटच वाटलं असणार.”
त्यावर म्हणतो कसा,
“सांगतो काय! रोजच्या डॉक्टरच्या व्हिझीट्स,नर्सीसचे तासा तासाने औषध आणि इतर उपाय,ते हॉस्पिटलातलं वरचेवर येणारं खाणं,याने वेळ जात होता.पण आता घरी आल्यावर ही नकळत मला मिळणारी विश्रांतीची भेट अगदी जीवावर आली आहे.एखादं पुस्तक वाचायला घेतलं तर लक्ष केंद्रीत होत नाही.रेडिओ चालू करून नकोसा होवून परत बंद करावासा वाटतो.साठलेल्या कामाचे काळे ढग माझ्या डोक्यावर जमा होतात,पण एखादी औषधाची गोळी घेवून,किंवा एखादा व्हिडीयो पाहून काळजी दूर जात नाहीत.
हा अनपेक्षित मिळालेला विरंगुळा नकोसा होतो,जणू शाप कसा वाटतो.बरेच दिवस न भेटलेल्या एखाद्दया मित्राचा फोन आला तर जरा वेळ जातो.”

मग मी त्याला विचारलं,
“मग तू तुझा वेळ कसा घालवतोस?”
त्यावर त्याने मला एक गम्मतीदार किस्सा सांगितला.

तो म्हणाला,
” एखाद्दया अनोळख्याचं गोड स्मित पुन्हां आयुष्याची दोरी पकडून धरायला उद्दुक्त करतं.माझीच एक विद्दयार्थीनी मला त्यादिवशी भेटायला आली.आणि नंतर जाताना मला

 ”ह्याव ए नाईस डे” म्हणाली.

तिच्या नजरेत मला सच्चायी दिसली.ती निघून गेल्यावर माझ्या मनात आलं,की आजचा माझा हा दिवस,नव्हे तर उद्दयाचा दिवस, कदाचित येणारे पुढचे दिवस मी सदिच्छेने संभाळले पाहिजेत.
माझ्या डॉक्टरला विचारून सुद्धा, तो माझा जीवघेणा दिवस माझ्या आयुष्यात का आला ह्याचं समर्पक उत्तर मिळालं नाही.आणि त्या माझ्या विद्दयार्थीनीने मला तो दिवस चागला जाण्याची दिलेली सदिच्छा ही मला करून दिलेली एक भरवंशाची आठवण असावी.”
हे विरेनचे उद्गार ऐकून मी त्याला विचारलं.
” मग आज मी तुला भेटायला आलेला दिवस तुला कसा वाटला?”
मला म्हणाला,
“काका,त्यानंतर मी एव्हड्या झपाट्याने बरा होत आहे,की रोज मी माझ्या आई बाबाना नतमस्तक होवून अस्थाला जाणाऱ्या सूर्याचे दर्शन घेवून विश्रांतीसाठी सध्यातरी लवकर झोपायला जातो.
मला खरंच उभं आयुष्य खर्चून सुद्धा फक्त एखादा दिवस इतका चांगला असू शकतो हे शिकायला मिळालं”

श्रीकृष्ण सामंत (स्यान होझे कॅलिफोरनीया )
shrikrishnas@gmail.com
 

Permalink No Comments

“काय करूं मी बोला,घरी बाळ ना पुन्हां” ललिताचं जीवशास्त्र

April 2, 2008 at 3:25 am (गोष्ट)

“ते इवलंस मृत- शरिर माझ्या हातावर होतं,आणि माझ्या हाताच्या बोटांच्या टोकांवर त्याचं डोकं संभाळलं होतं आणि त्याचे इव्हलेशे कुल्हे माझ्या हाताच्या तळव्यावर सामावून गेले होते.मला त्यावेळी रडूं पण आवरंत नव्हतं.पण काय करणार?”

गडकऱ्याना तिन मुली.त्यांची धाकटी मुलगी त्यामानाने हुषार होती.तिला पहिल्यापासून वैद्दयकीय शास्त्राची आवड,आणि तिच्या मनासारखे परिक्षेत मार्कस मिळून ती कॉलेज मधून पहिली आली होती.गडकरी तिच्या बद्दल नेहमीच मोठ्या विश्वासाने बोलत असायचे. ती आयुष्यात विषेश काही करून दाखवणार असा त्यांचा होरा होता.तिला मलेशियात एका हॉस्पिटल मधे रिसर्च करण्याची संधी मिळाली म्हणून ती तिकडे जाणार होती.तिने लग्न करून जावं असं गडकऱ्यांच मत होतं.

तिने वडलाना कसतरी समजावलं की मी एक दोन वर्षात पुन्हा येईन तेव्हा नक्कीच तुम्ही म्हणता तसं लग्न करीन.असं म्हणून ती मलेशियाच्या ट्रिपवर निघाली.योगायोग पहा, त्याच विमानात एक उमदा तरूण वसंत केळकर,हा त्याच हॉस्पिटलात मलेशियात मॅनेजरच्या नोकरी साठी जात होता.तिची आणि त्याची विमानातली ओळख पुढे त्यांच्या लग्नात परिवर्तन होण्यात झाली.वसंत आणि ललिता यांच्या सलगी बद्दल ललिता, गडकऱ्याना वरचेवर कळवित होती.त्यानीच तिला त्याच्याशी लग्न करून मोकळी हो असा सल्ला दिला.पाच सहा वर्ष तिकडे राहून हे केळकर जोडपं मुंबईत कायमचं रहाण्यासाठी परत आलं.त्यांना एक सुंदर बाहुली जशी मुलगी होती.ललिता तिची खूप काळजी घ्यायची.

एकदां मी त्यांच्या घरी गेलो होतो.तिने आपल्या वडलांना गडकऱ्याना-  पण बोलावलं होतं.इकडतिकडच्या गप्पा झाल्यावर, कुतुहल म्हणून मी ललिताला विचारलं,
“तू तुझ्या ह्या मुलीची खूपच काळजी घेतेस, असं मी मघापासून पहातोय. मला ती प्रकृतीने सुद्दृड दिसते.तिला बरं आहे नां?”
हुषार डॉक्टरच ती.माझ्या ह्या प्रश्नाने ती जरा उद्दयुक्त झाली.मला म्हणाली,
“जे दिसायला अगदी साधं आणि सोपं दिसतं त्याच्याकडे अगदी क्षुल्लक गोष्ट म्हणून पहाणं आणि त्याचावर गैरविश्वास दाखवणं ह्यात पुर्वी स्वतःला मी विषेश समजत होते.नंतर मागल्या फ्रेब्रुवारीत मला पहिली मुलगी झाली.ती जन्मतःच मृतावस्थेत होती.तशी ती मला पाचव्याच महिन्यावर झाली. कारण ते माझ्या शरिराचं अपयश होतं,असं मला वाटतं.ती इवलीशी माझी मुलगी इतकी लहान होती की तिला स्वतःलाच श्वास घ्यायला त्राण नव्हता.तिची फूफ्फूसं मजबूत करायला दिल्या जाणाऱ्या औषधाला पचवायला पण ती लहान होती. व्हेन्टीलेटर्स लावून घ्यायला पण ती कमजोर होती.थोडक्यात ती जगायलाच कमकूवत होती.कशावर तरी विश्वास ठेवण्याची पाळी यायला ही मला चालून आलेली वेळ होती.देवावर विश्वास ठेवून आमची श्रद्धा ज्यांच्यावर आहे त्या आमच्या गांवच्या मंदिरातल्या पुजाऱ्याचे शब्द माझ्या कानात घोळवायला ही वेळ मदत करीत होती.त्या मुलीच्या जन्मामुळे पुनर्जन्माच्या गहन विचारावर विश्वास ठेवण्याची ती वेळ होती.किंवा माझ्या पुर्वकर्मामुळे हताश होण्याची पाळी माझ्यावर  आली असावी असं समजण्याची ही वेळ आली होती.

पुढलं पुर्ण वर्ष मी आशेवर घालवलं.गणपतिच्या मंगल दिवसात मला परत दिवस गेल्याचं लक्षांत आलं.आणि आशेचे हे दोर मी पुन्हां बाळंत होईतो मजबूत ठेवून होते.अत्यंत आनंदलेली मी, आशेच्या पलिकडे नजर टाकू लागली. नशिबावर माझा विश्वास वाढू लागला.ही मुलगी मला होणं ही माझी योग्यता आहे असं वाटूं लागलं.
आई होण्याच्या आणि आपल्या मुलावर प्रेम करण्य़ाच्या सुखाला मी वंचित झाले नाही याचंमला समाधान वाटत होतं.नशिबात येतं आणि जातं, कुठच्याही गोष्टीला लायक असणं ही तत्कालीक संबंधाची बाब असू शकते असं वाटत होतं. असं सर्व वाटत असताना परत मला दिवस गेले.पुन्हा तोच प्रसंग उद्भवला.जगायला समर्थ नसलेला नाजूक जीव जन्माला आला.
आशा,नशिब,दैव ह्या सर्व गोष्टी पुन्हा अर्थहीन वाटू लागल्या. उघड,उघड वाटला तो फक्त जीवशास्त्राचा अर्थ.माझ्या नवबालकाचं जगणं न जगणं हे एक माझ्या शरिराचं अपयश असावं असं वाटू लागलं. कारण शरिर जीवशास्त्राच्या धर्मानुसार वागत होतं.
ह्या मुलीचं शरीर  जणू मला जीवशास्त्राचा अभ्यासाचा धडाच होता.लक्षात ठेवण्या सारखी त्यात एक सुंदरता होती.शरिर विज्ञानाचं चिमुकलं पुस्तकहोतं. सचित्र स्नायुचं,हाडांचं, शुद्ध-अशुद्ध रक्त वाहिन्यांचं जाळं होतं.असं मृत शरिर हातात घेवून त्याचा स्पर्श कधी यापुर्वी जाणवला नव्हता.तिच्या जवळ राहून माझ्या स्वतःच्या चालत्या बोलत्या सळसळणाऱ्या रक्ताच्या आणि हवा आत बाहेर करणाऱ्या शरिराचा अचंबा वाटत होता.ते इवलंस मृत शरिर माझ्या हातावर होतं,आणि माझ्या हाताच्या बोटांच्या टोकांवर त्याचं डोकं संभाळलं होतं आणि त्याचे इव्हलेशे कुल्हे माझ्या हाताच्या तळव्यावर सामावून गेले होते. मला त्यावेळी रडूं पण आवरंत नव्हतं.पण काय करणार?

मृत्यू ही कुणाची योजना नसते.मृत्यू कुणाच्या कमनशिबाने येत नसतो.किंवा तो दुरघटना म्हणून होत नसतो.मृत्यू होणं हे फक्त शरिराच्या काम करण्याच्या पद्धतीतलं एक स्थित्यंतर असतं एव्हडंच.कुठच्याही गोष्टीवर विश्वास सहजासहजी येत नाही. पण माझ्या आणि माझ्या मुलीच्या शरिराने मला जागं केलं.आता माझा जीवशास्त्राच्या आणि आपल्या शरिराच्या गुंतागुंतीचा प्रकार पाहून विश्वास वाढला.हा गुंता सुटत जातो आणि सर्व काही मजबूत होतं. अगदी आवश्यक बाबी कधी कोडमळतात तर कधी कोडमळत नाहीत. शरिराच्या सहजगत्या  न कळणाऱ्या बाबी आणि त्या घडण्यात बिनभरंवसा मधे असतो ह्याचा विचार येवून डोकं सुन्न होतं.
 
तिन मुलीमधे वाचलेली ही माझी मुलगी,तिचं जीतं जागतं शरिर पाहून आणि दर वेळेला मी तिला जवळ घेते तेव्हा, आणि तिला स्पर्श करते तेव्हा, मला तिची निराळ्याच प्रकारची जगण्याची ताकद पाहून माझा जीवशास्त्रावरचा विश्वास आणखी बळावतो.”
मी मधेच तिला थांबवीत म्हणालो,
“ललिता मी उगाचच तुला प्रश्न केला.तुझी ही बॅकग्राउंड थोडी तरी मला माहित असती तर मी तुला असं ट्रिगर केलं नसतं.”
ललिता म्हणाली,
“तुम्ही काहीच चूक केली नाहित.माझ्या मनांत  हे केव्हां पासून होतं,की माझ्या बाबांना सांगावं म्हणून. आणि माझ्या बाबांना एकटं पाहून सांगायला जरा जड झालं असतं. तुम्हा दोघांना एकाच वेळी बसून सांगताना माझा डोक्यावरचा भार हलका झाला.”
ही तिची सर्व गोष्ट ऐकून माझ्या मनात त्या एका जुन्या गाण्याच्या दोन ओळी घोळायला लागल्या,
“काय करूं मी बोला
घरी बाळ ना पुन्हा
नवनवतीचा बाळ माझा
येईल का हो पुन्हां “

श्रीकृष्ण सामंत (स्यान होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

Permalink No Comments

पालीचं शेपूट

March 29, 2008 at 2:35 am (गोष्ट)

“मी कोकणात जन्मले आणि वाढले त्यामुळे पाली,उंदीर,घूशी,साप असले प्राणी माझ्या रोजच्या जीवनात परिचीत नसायला काही कारण नव्हतं.”

“पाल आपलं शेपूट वेगळं करून अक्षरशः आपल्या शरिराचा तो अवयव मागे टाकून स्वतःचं आयुष्य जगते.”
“अंतरज्ञान म्हणजे”व्यवहारी विचारसरणी बाजूला करून मिळालेले ज्ञान.” कदाचीत ही व्याख्या किती बरोबर असेल कुणास ठावूक. पण एव्हडंच म्हणता येईल की अंतरज्ञान अव्यवहारी असलं पाहिजे.”
असं म्हणत शामली मला आपला अनुभव सांगू लागली.

“मी कोकणात जन्मले आणि वाढले त्यामुळे पाली,उंदीर,घूशी,साप असले प्राणी माझ्या रोजच्या जीवनात परिचीत नसायला काही कारण नव्हतं.आजी, आजोबा, मामा, मामी ही नाती आणि त्यांच्याबरोबर त्यांचे संस्कार घेवून वाढणं हे अगदीच अंगवळणी झालं होतं. आजीच्या बटव्यातली औषधं,आणि त्याचा घरगुती वापर हा सहजगत्या चालणारा प्रकार होता.खोबऱ्याचं तेल घालून रात्री झोपल्यावर झोप चांगली लागते,कारण मेंदु थंड करण्याची त्या तेलात क्षमता असते,आठवड्यातून एकदा एरंडेल तेल घेतल्यास पचन शक्ति शाबूत रहाते,कारण त्या तेलामुळे सर्व रक्तातलं पाणी आंतड्यात आल्यानं आतडं धुवून साफ होतं असं सांगणारी, हीच मंडळी आमची रात्रीची स्वप्न दुसऱ्या दिवशी ऐकून त्याचे संभाव्य परिणाम किंवा दुष्परिणाम काय ह्याचा पडताळा घ्यायची. घरातलं जवळचं माणूस गेलं त्याचं आश्चर्य, रात्री पडलेल्या स्वप्नात कबुतरं आल्याने कमी वाटायचं.

अलिकडे मी परत अंतरज्ञानावर विश्वास करायला सुरवात केली आहे.दहा वर्षापुर्वी मी एमबीये मधे शिकून माझ्या व्यवहारी ज्ञानात अभ्यासू भर घातली होती.व्यवहारी विचारसरणी ठेवून कसं वागायचं ते आचारणात आणलं होतं.जशी माझी कारकीर्द वाढत जात होती, तशी मी व्यवहारपटू जास्त बनत चालली होती. बजेटस,मापमान,संशोधन,आकडेमोड वगैरेमुळे माझं बोलणं, चालणं आकडेवारीत रुपांतरीत झालं होतं.
मी त्या कंपनीची सीईओ होईपर्यंत ही विचारसरणी सर्व मला सहाय्य देत होती.पण जेंव्हा मी “कोकण वस्तुसंग्रह नवनिर्माण संस्थेची कार्यकारी अध्यक्षा झाले,तेव्हा माझ्या नजरेतून एक गोष्ट सुटेना ती ही की ज्या प्रॉडक्टवर पालीचा सिंबॉल होता त्या प्रॉडक्टची जास्त उचल होत होती.स्थानीक बुजुर्गांचं मत असं होतं की त्यांच अतरज्ञान सांगतं की पाल ही एक शुभलाभी गोष्ट आहे. 
कारण पाल आपलं शेपूट वेगळं करून अक्षरशः आपल्या शरिराचा तो अवयव मागे टाकून स्वतःचं आयुष्य जगते,तसंच पालीचा शुभ सिंबॉल असलेल्या वस्तूची जास्त उचल होते.हे ऐकून मला कोकणातल्या माझ्या आजी, आजोबा,मामा,मामीची आठवण झाली. त्यांच अंतरज्ञान,त्यांची स्वप्न काय सांगत त्यावर जसा माझा त्यावेळी विश्वास असायचा त्यातलाच हा प्रकार होता.
आता ह्या लोकाना पण असंच वाटतं की ज्याच्यावर विश्वास ठेवून ते आपला असा निर्णय घेत, त्यावर ते समाधान असत. त्यामुळे मला पण त्यांच्याबरोबर, आपल्या अंतरज्ञानावर पुर्वी सारखा विश्वास ठेवायला सोप झालं.
पाल आपलं शेपूट वेगळं करून अक्षरशः आपल्या शरिराचा तो अवयव मागे टाकून स्वतःचं आयुष्य जगते.तसंच मला आता माझं एमबीयेचं कलचर पालीच्या शेपटी सारखं सोडून देवून माझं आयुष्य जगावं असं वाटूं लागलं.”

श्रीकृष्ण सामंत (स्यान होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

Permalink No Comments

“अत्तराचा फाया तुम्ही मला आणा राया”

March 25, 2008 at 2:58 am (गोष्ट)

“अत्तरातल्या सुगंधापेक्षाही त्या मागे एक उदात्त मेसेज होता तो मला कळाला.”

“करून हे एव्हडे सारे
कुणी जरी पडे आजारी
सेवेच्या कर्तव्या सारखे
कर्तव्य वाटे फारच न्यारे”

मी अंधरीहून हुतात्माचौकाला जाणारी बस घेवून सकाळीच काही कामासाठी जात होतो.शिवाजी पार्कला स्नेहा चढताना पाहिली.मला पाहिल्यावर माझ्या जवऴच्या सिटवर येवून बसली.बऱ्याच वर्षानी आमची भेट झाली होती.माझा मित्र शरद गडकरीची ही एकुलती एक मुलगी.अरूण कामत बरोबर लग्न झाल्यावर ती अमेरिकेला गेली. खूप वर्षानी ती पण शरदला बघायला म्हणून  आली आहे असं तिच्या कडून कळलं.
” काय कांताकाका तुम्ही कुठे चालला?तुम्हाला वेळ असेल तर आपण खोदादसर्कलला उतरून एखाद्दया रेस्टॉरंटमधे बसून जरा गप्पा मारुया येता कां?”
असं म्हटल्यावर मी तिच्या बरोबर उतरलो.

चहा घेत असताना मी तिला म्हणालो,
“स्नेहा अजून तू मला कांताकाकाच म्हणतेस हे नांव तू विसरली नाहिस?”
स्नेहा मला म्हणाली,
“कसं विसरीन?तुम्हीच आम्हाला कांता अत्तराची ओळख करून दिलीत. त्यावेळी घरी तुमचा विषय निघाल्यावर तुमची ओळख कांताकाकानेच आम्ही करत असायचो.
मला आठवतं,तुम्ही ज्यावेळी पहिल्यांदा घरी आला होता,त्यावेळी घरात कांतासेंटचा घमघमाट आमच्या सर्वांच्या नाकातून चुकला नव्हता.कानात आतून वरती तुम्ही त्या सेंटचा छोटासा कापूस लावला होता.त्याला तुम्ही अत्तराचा “फाया” म्हणायचा.मधेच त्या फायाला हात लावून तुम्ही बोटाचा वास घ्यायचा.आणि तुमचा हात तुम्ही बसलेल्या खूर्चीला लागला की त्या खूर्चीच्या हाताला अत्तराचा वास दरवळायचा.तुम्ही येवून गेला आणि माझे वडिल नंतर घरी आल्यावर नचुकता विचारायचे,

“स्नेहल, तुझा कांताकाका येवून गेला का?”
माझ्या आईलासुद्धा परफ्युमचं वेड होतं.माझे बाबा तिला नचुकता परफ्युमची बाटली आणून द्दयायचे.
ह्यावेळच्या ट्रिपमधे मला अत्तराचं महत्व विषेश गोष्ट म्हणून मनाला लागली.आणि तेच तुम्हाला केव्हा एकदा सांगते असं झालं होतं.
बरं झालं योगयोगाने आपण भेटलो.
 मला वाटतं सुहासीक अत्तरामधेसुद्धा एक प्रकारची नकळत ओढ असते. अत्तरातल्या सुवासाला  आपल्या जवळ येणाऱ्या व्यक्तिला नकळत एखाद्दया सुंदर सुहासीक फुलाच्या सुगंधाची आठवण करून देवून जवळच्या वातावरणात प्रसन्नता आणण्याची ताकद असते.
आमच्या घरातल्या बाथरूममधे ठेवलेल्या माझ्या आईच्या पसंतीचं अत्तर पाहून सुद्धा मला एकंदरीत सर्वच प्रकारच्या अत्तराविषयी तशीच समजूत झाली होती.आणि मला आठवतं मी त्यावेळी पंधरा सोळा वयाची होती.त्या तरूण वयात कुणालाही इतर छानछोक्या लाईफ स्टाईल बरोबर अत्तराच आकर्षण विरळंच असतं.परंतु माझ्या आईच्या अत्तराची महती त्यावेळच्या माझ्या तोटक्या समजुतीशी तेव्हडीच तोटकी होती हे मला त्यानंतर खूप वर्षानी मी माहेरी आले तेव्हां लक्षात आलं.अत्तरातल्या सुगंधापेक्षाही त्या मागे एक उदात्त मेसेज होता तो मला कळाला.”
“असा काय मेसेज मिळाला सांग पाहू “असं मी तिला म्हणालो.
“तेच सांगते”
असं म्हणून स्नेहल सांगू लागली,
“त्याचं असं झालं, ह्यावेळी मी जेव्हां बरेच वर्षानी आले त्यावेळी आईच्या बाथरूममधे अशीच एक नवी करकरीत सुहासीक अत्तराची बाटली पाहिली.हे अत्तर माझ्या वडलानी नेहमीप्रमाणे बक्षीस म्हणून माझ्या आईला  दिलं होतं.आई त्यांना आपणहून कधीच अत्तर आणायला सांगत नव्हती.ही अत्तराची बाटली बाथरूममधे पाहून त्यठिकाणी असलेल्या अनेक गोष्टीमधे, जश्या साबू,तेलं,श्यांपू, तसेच मनाला वैताग देणाऱ्या औषधाच्या बाटल्या, गोळ्या ह्यामधे ती जणू भर समुद्रातून संदेश देणाऱ्या लाईटहाऊस मधून येणाऱ्या बिकनसारखी मला वाटत होती.
ह्या औषधाच्या बाटल्या पाहून नक्कीच वाटत होतं,की माझी आई दिवसे दिवस वाढत जाणाऱ्या तिला झालेल्या व्याधिविरूद्ध होणारी लढाई हळू हळू हरते आहे.  गेल्या पंधरा,अठरा वर्षापासून तिच्या सानिध्यात असलेला हा व्याधि आणि त्याच्या विरूद्ध दिवस रात्र बंड करणाऱ्या तिला तिच्या उपजत असलेल्या दोन गुणाना, एक म्हणजे तिचा तो सतत सतर्क रहाण्याची कला आणि दुसरा म्हणजे कधीही न थकणारा तिचा तो विनोदी स्वभाव ह्या दोन्ही गुणाना तिच्या शरिराने जणू जखडून ठेवून सहकार्य न देण्याचा विडाच उचललेला असावा.
तिचा हा व्याधि मी लहान होते त्यावेळी सुरू होवून हळू हळू पायांच्या लटपटणाऱ्या स्थिती पासून आता संपुर्ण पऱ्यालिसीसमधे रुपांतर व्हायला आणि ती अत्तराची बाटली घरात यायला एकच वेळ आली असावी.
माझ्या वडलानी आईसाठी इतकी वर्ष खूप खस्ता खाल्ला.ती इतकी वर्ष चालती बोलती राहिली त्यांत माझ्या वडलांच्या मेहनतीचा काही भाग निश्चीतच होता.आमच्या घरात तिचं आजारपण म्हणजे”सदा मरे त्याला कोण रडे” अशातला प्रकार होता.तिच्या आजारपणांत सुधारणा होण्याचं चिन्ह कमीच.माझे आईवडिल दोघे मिळून लांबच्या प्रवासाला कुठे जाण्याचाप्रसंग अशा परिस्थितीत कधी आलाच नाही.
ती आजारी होण्याच्या पुर्वी दोघं मिळून जावून खरेदी करताना आईच्या पसंतीची अत्तराची बाटली आणायला माझे वडिल कधी विसरत नसत.पण नंतर नंतर ते स्वतःच जावून सर्व खरेदी करीत आणि अर्थात अत्तर पण.
बाहेर जाताना माझी आई निटनीटकी रहात असे.आणि अत्तर न लावता ती कधीच गेली नाही.आणि आता तिला कुठेच जाता येत नसलं तरी माझे वडिल तिच्या साठी अत्तर न चूकता आणीत राहिले.माझे वडिल विचारी आणि शांत स्वभावाचे असल्याने त्याना तिच्या आजारपणात कराव्या लागलेल्या सेवेची अथवा पूर्वीच्या संवयीत होतं तसं जीवन जगायला आणि आता इतरांसारखं जीवन जगणं प्राप्त परिस्थिमुळे महा कठिण झालं आहे ह्याबद्दल त्यांच्याकडून कधीही भावनावश होवून कसलंच भाष्य केल्याचं आठवत नाही.”आलिया भोगासी असावे सादर” ही त्यांची सदाची वृती होती.
आता अगदीच लुळ्या परिस्थितीत असलेल्या माझ्या आईची माझे वडिल ज्या तत्परतेने सेवा करतात ते पाहून मला खूपच त्यांची किंव येते.मी आणि माझा नवरा अरूण फिलाडेल्फीया असताना त्यांना मी एकदा कळवलं होतं,की वाटलं तर, नव्हे नक्कीच तुम्ही एक नर्स किंवा आया ठेवून त्यांच्या कडून आईची सेवा करून घ्या तुम्ही खर्चाची मुळीच काळजी करू नका मी लागेल तेव्हडे पैसे इकडून पाठवित जाईन.त्यावर त्यांनी मला कळलवं होतं की,तू इकडची काळजी करूं नकोस.आणि खरं सांगू कांताकाका, तुमची ती मागे लिहीलेली कविता मला तुमचा रेफरन्स  देवून त्यानी पाठवली होती.आठवते का तुम्हाला ती कविता?.”
“तू मला त्या कवितेचं शिर्षक सांग, बघ तुला आठवतं तर.” असं मी तिला म्हणालो.
त्यावर म्हणाली,
” मला शिर्षक ह्या वेळी आठवत नाही पण कवितेचा आशय आठवतो. तो असा,की चांगली लाईफ स्टाईल ठेवली तर आजारी पडणं कमी होतं.आजारी पडणाऱ्या व्यक्तिला आपली सेवा करून घ्यायला मौज वाटत असेल पण त्या आजाऱ्याची जो सेवा करतो त्याचे खूपच हाल होतात.
स्वतःच्या जीवाचं करून परत तसंच सर्व आजाऱ्याचं करावं लागतं.आणि तो अशा सेवा करणाऱ्या  व्यक्तिला डबल व्याप होतो. तेव्हा आजारी न पडण्याची चांगल्या लाईफस्टाईलची तुम्ही त्या कवितेत एक गुरूकिल्ली पण दिली होती.
इतकही करून जर का कोण आजारी पडलाच तर मग मात्र सेवा करणाऱ्या व्यक्तिला तसं करताना मुळीच वाईट वाटत नाही,नव्हे तर तो आनंदाने त्याची सेवा करतो असं तुम्ही त्या कवितेत शेवटी म्हणता.हा आशय माझ्या चांगलाच लक्षात होता.
मी म्हणालो,
” आता  आठवलं मला त्या कवितेचं शिर्षक काय आहे ते, “निरोगी मौज” बरोबर नां?”
“होय अगदी बरोबर. असेल कविता लक्षात तर सांगा पाहूं.
मी म्हणालो कविता अशी होती,

निरोगी मौज

पडू आजारी
मौज हीच वाटे भारी
सेवा करणाऱ्या व्यक्तीचे
कष्ट मात्र वाढतात भारी
स्वतःची कामे ऊरकून
रुग्ण सेवा नशिबी सारी

मौजच असेल करायची
जरी सर्वांनी मिळूनी
आहे एक गुरुकिल्ली
घ्यावी सर्वांनी समजूनी

खाणे,पिणे अन जेवण्याची
असावी हेल्धी स्टाईल
व्यायामाची संवय ठेवून
म्हणावे असाच दिवस जाईल
आणि विश्रांतीची आवशक्यता
विसरून कसे बरे चालेल

करून हे एव्हडे सारे
कुणी जरी पडे आजारी
सेवेच्या कर्तव्या सारखे
कर्तव्य  वाटे फारच न्यारे

ही तुमची कविता पाठवून त्यावर माझ्या वडलानी एकच व्याक्य लिहीलं “सेवेचे कर्तव्य वाटे फारच न्यारे”
आणि हे वाचून मी काय समजायचं ते समजले.

ह्यावेळेला जेव्हां मी आले,तेव्हां माझ्या आईवडिलांच्या एकमेका बद्दलच्या असणाऱ्या समजूती बद्दल,आदरा बद्दल आणि

एकमेकावरच्या प्रेमाबद्दलचा सराव पाहून माझी मी खात्री करून घेतली की या वयावरही ही सेवा वगैरे त्यांना ह्यामुळेच जमतं.
माझे वडिल ज्यावेळेला माझ्या आईला बाथरूम मधे नेवून तिची साफसफाई आणि कपडे उतर चढव करण्याचं कामं करतात,त्यावेळेला त्यांना त्या अत्तराची हटकून आठवण होते.पण त्या अत्तराचा सुवास दुर्गंध लपवण्यासाठी नसतो.तो सुगंध त्यांच्या जून्या दिवसांची फिर-याद, आणि आत्ताची, याद देत असतो.तिच्या सर्वांगाला  अत्तर लावून जणू ते तिला सांगत असतात की त्यांची पत्नी त्यांना तिच्या शरिराहूनही प्रिय आहे,आणि  ती त्यांचीच पत्नी आहे.
अत्तर लावून हेच त्यांना तिला सांगायचं असणार.
स्नेहलचं हे सर्व बोलणं ऐकून मी तिला म्हणालो,
 ”खरंच तुझ्या आईवडिलांच कौतुक केलं पाहिजे आणि त्याच बरोबर तुझं पण. पंधरा सोळा वर्षावर अत्तराविषयी तू सांगितलेले तुला वाटणारे विचार आणि त्याच अत्तराची बाटलीला पाहून तुला ह्या वयावर आलेले विचार ह्यातला फरक फक्त तुझं वय आहे नाही काय?”
असं म्हणून आम्ही जायला निघालो.
वाटेत मला ते तिचे “अत्तर” “फाया” हे सांगताना वापरलेले शब्द आठवून ते जुनं गाणं आठवलं.

“सुगंधाने झाले धुंद
जीव झाला बेबंद
देहभान मी विसरावे
अशी करा माया
अत्तराचा फाया तुम्ही
मला आणा राया”
         श्रीकृष्ण सामंत (स्यान होझे कॅलिफोरनीया)
         shrikrishnas@gmail.com

      
                       

Permalink 5 Comments

प्रति(मा)भा उरी धरूनी,तू काव्य करीत रहावे!

March 16, 2008 at 2:41 am (गोष्ट)

“हो मी तुझी कविता ब्लॉगवर आली रे आली की प्रथम वाचतो.पण शरद ह्यावेळची तुझी कविता खूपच दुःखी होती.तुझ्या कवितेचा संग्रह पाहिला तर जास्त करून त्या दुःखी असतात.एखाद्दया कविला दुःखाशिवाय कविता लिहायला विषय़च नसतो का रे?”

काल शरद मला चौपाटीवर भेटला.थोडी दाढी वाढलेला चेहरा,खाली लेंगा,वरती झुळझुळीत पैरण,पायात चप्पल असा पेहराव करून सकाळीच समुद्राच्या दिशेने क्षितीजाकडे टक लावून उभा होता.माझी खात्री होई पर्यंत मी त्याचा जवळ गेलो आणि हा शरदच आहे असं पाहिल्यावर म्हणालो,
“अरे, काय तुझी ही दशा करून घेतली आहेस,मला तू शरद असशिल याची खात्रीच नव्हती.”
हंसायला पाहिजे म्हणून हंसल्याचा अविर्भाव करूनमला म्हणाला,
“अलिकडेच मी लिहीलेली कविता तू वाचलीस का?”
मी म्हणालो,
“हो मी तुझी कविता ब्लॉगवर आली रे आली की प्रथम वाचतो.पण शरद ह्यावेळची तुझी कविता खूपच दुःखी होती.तुझ्या कवितेचा संग्रह पाहिला तर जास्त करून त्या दुःखी असतात.एखाद्दया कविला दुःखाशिवाय कविता लिहायला विषय़च नसतो का रे?”
मला शरद म्हणाला,
“तुला वेळ आहे का मी तुला माझी हकीकत सांगतो.चल आपण त्या सुक्या झालेल्या वाळूच्या ढिगावर बसुया.”
मी म्हणालो,
“खूप वेळ नाही ना लागणार? घरी माझी पत्नी वाट बघत असणार आम्ही दोघं तिच्या एका मैत्रीणीच्या घरी जेवायला जाणार आहो. इकडे तिकडे जरा उशीर झाला म्हणून हरकत नाही म्हणा.तुला हा प्रश्न मी कधी ना कधी विचारणारच होतो,मनात माझ्या कुतुहल होतं.होवून जावूदे. कळेल काय ते तुझ्या कडून एकदाचं”
शरद सांगू लागला,
” मला वाटतं,कवितेच्या माध्यमामधून मनातल्या भावनांचा झालेला विचका,दैविक विचाराचा गोंधळ,आणि जीवनात आलेल्या गंभीर दुर्घटना सहन करीत असताना येत असणारे अनुभव प्रदर्शीत करण्याचं कविता हे एक साधन आहे.नव्हेतर तेच माझ्या जीवनातलं एक साध्य झालं आहे.

मी ज्यावेळी बारा वर्षाचा होतो,त्यावेळी मी माझ्या सख्या लहान भावाच्या अपघाती म्रृत्युला कारण झालो होतो.
त्याचं असं झालं,आम्ही सर्व मित्रमंडळी एकदारेडीला जाताना वाटेत एक छोटेशी घाटी लागते.ती चढून जात असताना घाटीच्या माथ्यावर आल्यावर खाली रेडी नदी दिसते डोंगरच्याकडेवर जावून नदीचं पात्र अगदी विलोभीनीय दिसतं.ते पहाण्यासाठी आम्ही सर्व एकदम गर्दी केली आणि असं करताना माझा धक्का लागून तोल गेल्यामुळे माझा धाकटा भाऊ सरळ खाली घरंगळत गेला.खूप खरचटून मार लागला त्याला.आणि हॉस्पीटलमधे जाईपर्यंत त्याचा अंत झाला.
 एका क्षणात माझं जग कायमचं बदलं. दुःख,जीवघेणी भिती,शरम आणि हताश होण्याची माझी जी मनःस्थिती झाली त्याची कल्पनासुद्धा मी कघी केली नव्हती.त्यानंतरच्या काळात छिन्नविछीन्न मनःस्थिती झालेल्या माझ्या कुटुंबातलं कुणीही माझ्या भावाच्या मरणाचा विषय माझ्याशी काढू शकलं नाही.ह्या स्मशानशांततेने मी माझ्या दुःखदायी भावना बरोबर घेवून एकाकी पडलो.आणखी भयानक गोष्ट म्हणजे,आयुष्य सहजगतीने जगण्याच्या माझ्या समजुतीला एकाएकी एक तडा आली,एकाएकी सर्व काही शब्दशः रसातळाला गेलं “

हे सर्व ऐकून त्या सकाळच्या प्रहरी मी पण खूप मायूस झालो.
मी त्याला म्हणालो,
“खरंच, मी तुला तुझ्या दुःख्खी कविता लिहीण्या विषयी विचारायला नको होतं.मी उगाचच तुला तुझ्या जुन्या आठवणी काढायला लावून दुःखी केलं”
हे ऐकून शरद मला म्हणाला,
“तसं तू तुझ्या मनाला मुळीच लावून घेवूं नकोस. तुझ्या सारखा अश्या आस्थेने विचारणारा मला कित्येक दिवसात कोण भेटला नाही.मला थोडा “स्टीम आउट”होवू दे.बरं वाटेल मला.
एकदांच तुझ्या प्रश्नाचं पुरं उत्तर मला देवू दे.वाटलं तर तू वहिनीनां मोबाईल वरून सांग की तुला थोडासा उशिर होईल म्हणून.”
मला त्याची खरंच किंव आली.माझ्या पत्नीला मी फोन केला त्यावेळी तिच मला म्हणाली की,
“तुम्ही लवकर नाही आलात तरी चालेल.माझ्या मैत्रीणीच्या नवऱ्याला काही अर्जंट काम आल्याने तिनेच मला फोन करून सांगितलं की परत कधी तरी आपण भेटूं”हे ऐकून मलापण जरा बरं वाटलं निदान शरदला आता सगळं काही सांगता येईल आणि माझा ही प्रश्न सुटेल.

मी त्याला म्हणालो,
” तू आता निवांत सांगू शकतोस.आम्ही बाहेर जाण्याचं रहीत केलं.”हे ऐकून शरदच्या चेहऱ्यावर हुरूप दिसला.
मला म्हणाला,
“अशा गंभीर दुर्घटनापासून एक स्थित्यंतर येतं की,ह्या दुर्घटनेला बळी पडणारे इतरापासून विलग होतात. इतर लोकांपासून दुरावल्यामुळे,त्यांच्या जीवनातल्या भावनांशी सुद्धा विलग व्हायला होतं,ते इतकी की अगदी आयुष्य सुन्न होतं,आणि जगण्याच्या क्रियेत जणू अर्ध जीवन जगल्यासारखं भासतं.त्यावेळी मी तरूण असल्याने ही जीवनातली  विलगता,आणि सुन्नपणा ओलांडून कविता लिहायला प्रारंभ केला.”
मी म्हणालो,
“शरद,पण तुला कविता लिहीण्याची प्रतिभा कशी उत्पन्न झाली?”
शरद म्हणाला,
“मी जेंव्हा कविता लिहीतो तेंव्हा, मी माझ्या अनुभवाचा आढावा घेतो,मी माझ्या अंतर मनात डोकावून पहातो,कच्च्या  संभ्रमाच्या मेंदुत राहीलेल्या आठवणी जागृत करतो.त्याचं मग शब्दांत रुपांतर करतो आणि शेवटी ते शब्द यमकात येतील असे मांडतो.ह्या पद्धतीने केलेली कविता मला एक प्रकारचा आसूरी आनंद देते.
पुर्वी मला मी माझ्या मनातल्या गोंधळाने शक्तिहीन आणि अचपल वाटून घ्यायचो.पण आता मी चपळता आणली.आणि माझ्या अनुभवाला एक प्रकारचा स्फुर्ती आलेला आकार देवून त्याचं रुपांतर सहजगत्या कुणाला कळेल अशा अर्थामधे आणतो.”
मी त्याला म्हणालो,
“म्हणजे तुझ्या मनातलं दुःख तू कवितेच्या रुपात प्रदर्शीत करतोस.”
मला म्हणाला,
“अगदी बरोबर.कविता म्हणजे भावनेचा अन्वार्थ. अगदी दुःखी कविता लिहून मी जणू मला पण जगायचं आहे हे सिद्ध करतो. आणि म्हणून कविता जीवनातील गुंतागुंती आणि विरोधाभास याच्या सत्यतेचं प्रतिनीधीत्व करते.  शिवाय माझ्या काव्याचा  आणखी चमत्कार म्हणजे माझ्या कविता आणि माझे वाचक या दोघांमधे मी सहभागी होतो.त्यामुळे माणसा माणसातल्या विलगतेवर विजय होतो.”
 हे शरदचं कवितेवरंच चिंतन ऐकून मला खूप गम्म्त वाटली.
मी म्हणालो,
” आणखी तुझे कवितेवरचे विचार काय आहेत ते सांगून टाक बाबा” मलाही आता घरी जायला उशीर होत होता.

शरद म्हणाला,
“एव्हडं सागून झाल्यावर आपण निघूया.उन पण खूप लागायला सुरवात झाली आहे. मी कुणाचीही कविता वाचली की मला उचंबळून येतं.मला माहित आहे की जगात मी एकटाच कविता लिहीत नाही.ज्या व्यक्तिची कविता मी वाचतो,ती व्यक्ति जणू माझ्याशी संबंध जोडते असं मला वाटतं.
मला असा भास होतो की ही व्यक्ति आणि मी एकाच बोटीतून प्रवास करत आहोत.त्यांच्या कविता मला धीर देतात.त्यांची कविता एकप्रकारची मला दिलेली गिफ्ट वाटते,आणि मला हे जीवन जगावंसं वाटतं.”

हे शरद्चे उद्गार ऐकून मी बराच सदद्बीत झालो.उठता उठता त्याला म्हणालो,
“शरद हे तुझं सगळं ऐकून मला एका कवितेच्या दोन ओळी आठवतात.त्यात थोडा फरक करून म्हणावसं वाटतं,

“प्रति(मा)भा उरी धरूनी
तू काव्य करीत रहावे
हे भाव स्वप्न अपुरे
साकार तू करावे”

  श्रीकृष्ण सामंत (स्यान होझे कॅलिफोरनीया)
  shrikrishnas@gmail.com

Permalink No Comments

मी शिकले माझ्या वडलांकडून

March 11, 2008 at 4:23 pm (गोष्ट)

“काही गोष्टी त्यानी मला नकळत शिकवल्या.जसं काम करून आल्यावर धडपडत जिना चढून वर येवून ते त्यांच शेवटचंच येणं  कसं झालं, ते पण.”
 
ज्यावेळी वृंदा मला बोलता बोलता असं म्हणाली त्यावेळेला मला निश्चीतच वाटलं तिला काहीतरी मेसेज मला द्दयायचा आहे.वृंदा माझ्या एका मित्राची मुलगी.दहा वर्षापुर्वी तिचे वडील निर्वतले. त्यावेळेला मी तिला भेटलो होतो.त्यानंतर पांच वर्षापुर्वी मी तिला तिच्या लग्नात भेटलो.सध्या ती न्युझरिपोर्टरचं काम करते.

मला म्हणाली,
“काका,तुम्ही तुमची तब्यत चांगली ठेवली आहे.तुम्ही सुरवातीपासून काम करण्य़ाची एक शिस्त ठेवली होती. मी तुमचे उदाहरण माझ्या वडलाना नेहमी सांगत असायची.मला आठवतं तुम्ही नेहमी म्हणायचा, शरिर हे ही एक यंत्र आहे.कंप्युटर मधे त्याच्या मेमीरीच्या एखाद्दया मेमरी लोकेशन मधे जर बिघाड झाला तर कंप्युटर स्वतःच ते लोकेशन शोधून काढून बायपास करतो.आणि अशा तऱ्हेने आपलं काम अखंड चालू ठेवतो.तसंच काहीसं आपलं शरिर आपल्या व्याधी दुरुस्थ करतो. तरीपण आपण यंत्रालाही विश्रांती देतो,तशी शरिरालापण दिली पाहिजे हे मी माझ्या वडलाना नेहमीच सांगायची.ते त्यानी कधीच ऐकलं नाही”

मी तिला म्हणालो,
“वृंदा, तू तरी आता तुझ्या प्रकृतीकडे लक्ष देतेस का?”
त्यावर ती म्हणाली,
“सध्या जे देशात वारे वाहत आहेत,ते सर्व पश्चिमेकडून येत आहेत. पाश्चिमात्य लोकांकडून ज्या अनेक गोष्टी शिकायला मिळत आहेत त्यात ज्याला “वर्क एथीक्स” म्हणतात त्याचा पगडा तरुणाबरोबर इतर सर्वांवर पडत आहे. एकदा सकाळी घरातून ऑफिसमधे गेल्यावर घरी परत येण्याची वेळ ठरलेली नसते.कारण काम संपतच नाही.पांच वाजता घड्याळ बघून ऑफिस सोडण्याचे दिवस आता गेले.तसं करणं अगदीच चमत्कारीक वाटतं. माझ्या वडिलानी मला मरमरेसो काम कसं करावं ते शिकवलं.तासनतास काम करणं आणि कामाला वाहून घेणं हे मी त्यांच्याकडून पाहिलं.पण काही गोष्टी त्यानी मला नकळत शिकवल्या.जसं काम करून आल्यावर धडपडत जिना चढून वर येवून ते त्यांच शेवटचंच येणं  कसं झालं ते पण. 

माझ्या वडलांचा स्वतःचा बिझीनेस होता.ते स्वतः कंपनीचे मार्केटींग करायचे.बऱ्याच ठिकाणी जावून त्यांच्या येणाऱ्या नव्या प्रॉडक्टबद्दल त्यांना लेक्चर द्दयावं लागायचं.बोलून बोलून खूप थकून जात असत.फिरतीचे काम बरंच असायचं. तशांत त्याना डायबेटीस होता. शिस्तीचे भोक्ते असल्याने शब्द दिल्यावर तो पाळण्याचा पराकाष्टा करायचे.या सर्व कारणानी त्यांना त्यांच्या या वागणूकीची किंमत शेवटी द्दयावी लागली.
ते अठ्ठावन्न वर्षावर निर्वतले.

आता त्याला दहा वर्षे होवून गेली,जेव्हा शेवटी माझे वडील त्या रात्री घरी आले होते.त्यानंतर मी त्यांच्या काम करण्याबद्दल खूप विचार केला.मी माझ्या मनात नक्की ठरवलं,मी धडपडत जिना चढणार नाही.माझा न्युझरिपोर्टरचा जॉब मला खूप आवडला असला तरी,मी मरमरेसो काम करणार नाही.

पण तसं करणं मला अगदीच सोपं झालं नाही.बोलून चालून मी माझ्याच वडीलांची मुलगी होते ना! कॉलेजमधे लायब्ररीचा दरवाजा उघडण्या पुर्वी मी दरवाज्यात उभी असायची.

माझे वडील मला एकदा म्हणाले,
“मला कधी कधी चौपाटीवर जावून सूर्यास्थ पहायची इच्छा येते पण कामा मुळे मला तसं अजिबात करता येत नाही.”
माझे वडील तसे सर्वपल्ली होते.वाचन,लिखाण,बुद्धिबळ खेळण्यात वाकबगार होते.संगीतातपण त्यांना दिलचस्पी होती. वसंतराव देशपांडे,सुधीर फडके,अरुण दाते यांची गाणी त्याना विशेषकरून आवडायची.म्हणजे ही झाली त्यांच्या आवडीनिवडीची प्रकाश टाकणारी यादी.पण ही यादी संपवून झाल्यावर सूर्यास्थ पहायला चौपाटीवर जायला त्यांना वेळ मिळत नव्हता.मला त्यांच्या ह्या “डेडलाईन” ची संवय लावून घ्यायची नाही.

मग ह्यातून एक प्रश्न उभा राहतो,मी जर पांच वाजता काम उरकून परत येऊन सूर्यास्थ बघायला चौपाटीवर गेले तर त्याचे पडसाद काय होतील.
माझ्या करीयरच्या हाईटवर न पोहचण्याचा मी धोका घेते काय? कदाचीत शक्य आहे.पण निदान लवकर गेल्याने,माझ्या मंडळी बरोबर संध्याकाळी जेवण घेता येईल.आणि चौपाटीवर जावून त्यांच्याच बरोबर लांबवणाऱ्या सावल्यातून जाताना भरपूर सूर्यास्थ पहाण्याचा आनंद लुटता येईल.आणि हे नक्कीच काहीतरी मिळाल्याच्या समाधानीला योग्य किंमत दिल्याचा आनंद होईल तो वेगळाच.

       श्रीकृष्ण सामंत (स्यान होझे कॅलिफोरनीया)
         shrikrishnas@gmail.com
 

Permalink No Comments

गोव्याची ज्यूली आणि तिची श्रद्धा

March 6, 2008 at 5:15 pm (गोष्ट)

” मी एक साधारण माणूस आहे.फक्त मी ज्याच्यावर विश्वास ठेवते,ज्यांच्यावर माझी श्रद्धा आहे त्यांवर मी लक्ष ठेवते.”
“ज्युली तू किती ग्रॆट आहेस ” असं मी तिला म्हणालो.

त्याचं असं झालं,
माझी मोठी वहिनी गोव्याची.पेडण्याला तिचे आईवडिल राहायचे.लहानपणी माझ्या वहिनी बरोबर मी उन्हाळ्याच्या सुट्टीत तिच्या माहेरी अनेक वेळा गेल्याचं आठवतं.
उन्हाळ्यात विशेष करून गोव्यात फळफळावळ,फुलं आणि मासे यांची लयलूट असायची.मांडकूर आंबा मला खूपच आवडायचा.तसं पाहिलं तर आंब्यांचा राजा हापूस आणि त्यात वाद नाही.हापूस आंबा नीट पिकल्यावर त्याचा जो गंध दरवळतो तो कुणाकडून लपून राहणार नाही.तसंच हा हापूस आंबा नीट पिकल्यावर कापला की त्याचा आतला गर जास्त आणि त्याची बिज्याला कोकणात कोयरी म्हणतात ती खूप लहान असते,आणि बाहेरची साल अतिशय पातळ असते.हापूस आंब्याचा स्वाद काय विचारता!,कितीही खाल्ला तरी कमीच वाटतो.
पण माडकूर आंब्यात जरी हापूसच्या आंब्याचे सर्व गूण नसले तरी ह्या पिकलेल्या आंब्याचा बाहेरून दिसणारा केशरी रंग, आणि त्याचा जास्त गोलट आकार,पाहून आकर्शीत व्हायला होतं.आणि चव विचाराल तर अगदी स्वर्गातलं अमृत मागे पडेल. ह्या मांडकूर आंब्यासाठी, बांगड्या माशासाठी आणि नागचाफ्याच्या सुगंधाची आठवण येवून मी नेहमी गोव्याला जायला उत्सुक्त असायचो.

माझ्या वहिनीचं माहेरचं घर चिरेबंदी आणि मंगळोरी कौलांच आणि टुमदार होतं.शेजारी एक प्रशस्त चर्च होतं.तसं गोवं सुंदर सुंदर चर्चच्या इमारती बाबत खूप प्रसिद्ध आहे.त्यावेऴच्या पोर्तुगीझ राज्यकर्त्यानी खूप अशी चर्चं बांधली होती.वहिनीच्या शेजारी प्रशस्त झोपडीवजा एक घर होतं.पावलू फर्नांडीस आणि त्याचं कुटूंब त्या घरात राहायचं.
पावलूं त्याची बायको मेरीयम,पावलूचे वडील फास्कू,आणि पावलूची दोन मुलं पास्कल आणि ज्युली असं छोटसं हे कुटूंब होतं.कोंबड्याची खूराडं आणि डूक्करांची पिलावळ त्यांच्या आवारात असायची.आम्ही वहिनी बरोबर उन्हाळ्याच्या सुट्टीत आलो की हे सर्व कुटूंब आमच्या सहवासात असायचं.
अलिकडे मी खूप दिवसानी गोव्याला गेलो होतो.फास्कू तर केव्हांच निर्वतला होता. पावलू आणि मेरियम बरीच थकली होती. पास्कल गोवा सोडून गेला तो इंग्लंडला स्थाईक झाला होता.ज्युली मात्र लग्न न करताच घरातच होती.ती आता “नन” झाली होती.
मला भेटल्यावर मी तिला सहज विचारलं,
“जुली तू एकदम नन व्हायचं का ठरवलंस?”
मला म्हणाली,
“बाजूच्या चर्चात मी आईवडिलांबरोबर नेहमीच जायची, पास्कल निघून गेल्यावर त्याचं परत येण्याचं चिन्हं काही दिसेना. आईवडिलांकडे कोण बघणार?”
मी ज्युलीला म्हणालो,
“तू लग्न वगैरे काही केलंस का नाही?”
ज्युली जरा हंसतच मला म्हणाली,
“लहानपणी तुला आठवतच असेल,तुम्ही सर्व इथे यायचा,त्यावेळी तू पण आमच्या बरोबर रविवारी चर्चातही यायचास.”
“मी हिंदू असलो तरी तुमच्या बरोबर चर्चात येवू शकतो का? म्हणून पावलूला विचारलं होतंस.आणि पावलू तुला म्हणाला होता की येशूला सर्व धर्म सारखेच वाटतात. आपण सगळी त्याचीच मुलं.हे ऐकून तुला किती आनंद झाला होता.चर्चात आल्यावर येशूच्या मुर्तीकडे बघून तू किती भावनावश झाला होतास. मला म्हणालास “
“ज्युली तू नन का होत नाहीस? “
“मला पण नंतर नन व्हावंस वाटलं.”
ज्युली पुढे सांगू लागली,
” विश्वास आणि श्रद्धा हे फक्त शब्दच नाहीत.मी मला ख्रिश्चन म्हणणं एक आणि त्यासाठी वाहून घेंणं दुसरी गोष्ट.नन होण्याने मला तसं जगायला मिळालं.’लव्ह दाय नेबर’ असं प्रत्यक्ष येशूने म्हटलंय आणि मी सुरवातीची नन होवून,आईवडील, शेजारी, मुलं पाहून सर्वांवर मनापासून प्रेम करू लागले.मुलान मी शिकवूं लागले.सुरवातीला हे माझं गोतावळ जरा लहान होतं.
नंतर मी पेडण्याच्या नेहमीच आरडाओरड,भांडणसांडण, आणि नेहमीच उपासमारीनें पछाडलेल्या झोपडपट्टी परिसरात जणू येशूच्या मनातल्या गहिऱ्या आव्हाहनास दोनहात करण्यासाठी जात राहीले.त्या लोकांची दारूण परिस्थितीत मी पण सामील होण्याचा प्रयत्न करू लागले.रात्रीचे भांडणाचे आवाज,मुलांना हांक मारून आक्रंद करणारे ते आयांचे रडणे,तो होणारा अन्याय पाहून काही तरी करावं असं माझ्या मनात आलं.”
मी म्हणालो,
” पावलू सांगत होता की आतां तू चर्चात कमी जातेस म्हणून”
“हो मी त्या चर्चातल्या, जगातल्या पिडीतांसाठी फक्त प्रार्थना करणाऱ्या  नन ऐवजी, मी ती प्रार्थना सोडून देवून माझ्या हाताच्या बाह्या वर सरसावून ह्या लोकांसाठी वेळ द्दयायला लागले.आणि आता तर मडगांवच्या फांसावर जाणाऱ्या कैद्दयांच्या सेवेत वाहून घेतलं आहे.”
मी म्हणालो,
“कमाल आहे ज्युली तुझी.लहानपणी आपण इकडे असताना असं कधीच विचारात आणलं नाही की कोण पुढल्या आयुष्यात काय करील.खरोखरच तुझं काम वाखाणण्या सारखं आहे.”
त्यावर हंसत हंसत ज्युली म्हणाली,
“माझी श्रद्धा आणि माझा ज्यावर विश्वास आहे त्याच गोष्टीवर मी आता माझं लक्ष केंद्रीत करते आहे.येशूचं मोठ्यात मोठ्ठं आव्हान म्हणजे ’शत्रूवरपण प्रेम कर’आणि ह्या