लेखन चौर्य आणि पॉझिटीव्ह थिंकींग म्हणजे रे काय……भाऊ?

April 3, 2008 at 4:30 pm (चर्चा)

ग्लासातलं अर्ध पाणी पाहून कुणी म्हणतो ग्लास अर्ध भरलेलं आहे किंवा तेच ग्लास अर्घ रिकामं असं म्हणारे लोकही असतात. पहिल्याचं “पॉझिटीव्ह आणि दुसऱ्याचं निगेटेव्ह थिंकींग”अस सगळे ह्या थिंकींगवर उदाहरण देतात.आणि हे जगजाहिर उदाहरण आहे.

आता हेच बघा.एका सदगृहस्थांनी माझ्या ब्लॉगवर जावून त्यांनी माझे बरेचसे पोस्ट वाचले वाचून त्याना खूप आवडले.
मला लिहीतात,
“मी तुमचा ब्लॉग पाहिला आणि काही पोस्ट वाचले.मी समजून चालतो की ती सर्व आरटीकल्स तुमचीच आहेत.तुम्ही चांगले लिहीता.मला काही आरटीकल्स आवडली. उदा.योगायोग हा तुमचा पोस्ट.
मी सिनीयर सिटीझन आहे आणि ह्या ब्लॉगच्या-जगाशी परिचीत नाही.पण बहूदा तुमची आरटीकल्स पहात (वाचत) राहीन.”

आता बघा,ह्यानी लिहीलेलं एकच वाक्य मला वाचताना खटकलं.
” मी समजून चालतो की ती सर्व आरटीकल्स तुमचीच आहेत.” हे त्यांच म्हणणं.
म्हणजे एखादी आई आपल्या मुलांच्या घोळक्यात बसली आहे आणि एका नव्यानेच पाहाणाऱ्या माणसाने तिला म्हणावं,
“किती सुंदर आहेत तुमची मुलं,मला खूप आवडली पण काय हो ही तुमचीच मुलं आहेत नां?”
सकृतदर्शनी कसं वाटेल त्या आईला?

 ब्लॉगवरून हल्ली लेखन चोरीची काही चर्चा मी अलिकडेच “मराठी ब्लॉग विश्वावर” वाचली.माझ्या मनात पाल चुकचुकली.हे त्या वाचकाचं खटकणारं वाक्य वाचून मनात आलं,
“काय रे बाबा?आता माझ्यावर कुणी शुक्लकाष्ट दाखवतो की काय?”
पण म्हटलं,
“कर नाही त्याला डर कसली?”

अलिकडे पोस्ट वरच्या तारखावरून पण “मराठी ब्लॉग विश्वावर”  चर्चा झाली. मला वाटलं होतं पुर्वीच्या तारखेचा ब्लॉगवरच्या पोस्ट पाहून, नंतरच्या तारखेच्या कुणा दुसऱ्याच्या ब्लॉगवरच्या पोस्टची कॉपी (चोरी) केली जाते असं होवूं शकत नाही आणि हे उघड आहे.त्यामुळे नंतरच्या तारखेचा पोस्ट लिहीणारी व्यक्तिच आपला पोस्ट असं दाखवायला पुर्वीच्या कुणा पोस्ट्ची कॉपी करू शकते.
पण गम्म्त म्हणजे माझ्या वाचनात आलं की ह्या तारखांची पण अदलाबदल करता येते.असं कुणी उदाहरण देवूनही दाखवलं.
ह्या सगळ्या प्रकाराचा विचार करून मी ठरवंल होईल ते होईल आपण त्या गृहस्थाना
 ”तुम्ही असं का लिहीलत?”
असं विचारावं-मात्र पॉझिटीव्ह थिंकींग करून-आणि मी तसं त्याना विचारलंपण,
 ” मी समजून चालतो की ती सर्व आरटीकल्स तुमचीच आहेत.”
असं आपण विचारलंत ते वाचून मी जरा खट्टु झालो.आपलं हे विचारणं पण जरा स्पष्टच वाटलं.पण माझं मन सांगतं की तुमच्या मनात माझ्या  ह्या लिखाणा बद्दल किंतू नसावा. कदाचीत तुम्हाला ते मला कळवताना नीट मांडता आलं नसावं असा माझा समज आहे.”
पुढे मी त्यांना लिहीलं,
“कविता किंवा लेख लिहीण्याची कला ही कुठल्याही वयांवर माणसाला लिहायला उद्दयुक्त करते. तसंच आणखी मला वाटतं ही कला एखाद्दया व्यक्तिला एक दैवीक किंवा नैसर्गिक देणगी म्हणून मिळत असावी अशी माझी समजूत आहे.  मी ज्या काही “अनुवादित” कविता लिहीतो त्या मी मला समजणाऱ्या कुठल्याही भाषेतून मराठीत भाषांतरीत करून लिहीतो. आणि तसं करताना कवितेचा आशय घेवून लिहावं लागतं. शब्दानुशब्द तसंच लिहीलं तर ते कॉपी केल्यासारखं होईल.आणि जी अनुवादित कविता होते ती “अनुवादित” ह्या कॅट्यागरीत टाकतो.आणि जी माझीच कविता असते ती मी “कविता”ह्या कॅट्यागरीत टाकतो. कविता सोडून ज्या गोष्टी, म्हणजे लेख,चर्चा वगैरे असतात त्या अजिबात अनुवादित वगैरे नसतात.अशा लेखात एखादं वाक्य, जे माझं नाही, ते मी ज्या व्यक्तिचं असेल त्याचं नांव देवून उदघोषित करतो,आणि नांव न आठवल्यास,
 ”कुणी तरी म्हटल्याचं आठवतं”
असं लिहून ते माझं नाही हे दर्शवितो. आणि असं लिहायला मला अभिमान पण वाटतो.

पुढे त्याना मी लिहीलं,
“कुणीही व्यक्तिने काही ही लिहीलं,तरी शब्दानुशब्द त्याच्याच डोक्यातून आलेले आहेत आणि ते  त्याचंच लिहीणं आहे असं अपवादानेच होईल.बऱ्याच व्यक्तिचं लिहीणं पुर्वीच्या झालेल्या घटेनेशी संबंधीत असतं. वाचून,संशोधन करून,कधी कधी चर्चा करून नंतर त्यावर आपल्या डोक्यातून आलेले विचार घेवून त्या विषयात सुधारणा करून किंवा बदल करून मग नव्यात रूपांतर झाल्यावर ते नंतर त्याचं प्रॉडक्ट होतं.
ज्ञानेश्वर,तुकाराम आणि अलिकडचे पु.ल. किंवा ना.धों.मनोहर,शिरवाडकर यांचं सभोवतालचं वातावरण,त्यांची आत्मबुद्धि, आत्मज्ञान, आत्मग्रहणाची क्षमता(ऑबझरवेशन) शिवाय त्यांच दांडगं वाचन,मग ते संस्कृतमधे असो वा फारशी भाषेत असो वा इंग्रजीत असो, हे सर्व असल्याशिवाय त्यांच्या प्रतिभेची चुणुक येवू शकत नाही.

संगीत चोरी काही लोक करतात.उदा.अन्नु मलिक ह्यात प्रसिद्ध आहे असं म्हणतात.पण संगीत चोरी मधे लयीची चोरी होते, चालीची चोरी होते,पण शब्द निराळे ठेवून  चालीची चोरी केलेलं गाणं, ऐकायला मजा येत नाही असं नाही.आणि चाल चोरी झाली ह्याच ते गाणं ऐकणाऱ्याला विषेश काही वाटतही नाही.तो गाणं एन्ज्यॉय करतो.मात्र लेखन चोरी आणि कविता चोरी केल्याचं लक्षात आल्यावर त्या चोरी करणाऱ्या व्यक्तिची घृणा येते.दुसऱ्याच्या मुरंब्याच्या बरणीतून बोट घालून,चोरून मुरंबा चाटताना तेव्हड्या पुरतं त्या व्यक्तिला बरं वाटतं पण जर का कुणी चोरी उघडकीस आणली तर ती किती शरमेची बाब होईल.? “
मी त्या सदगृहस्थाना पुढे म्हणालो,
“माझंच लिखाण कुणी माझ्या नकळत copy (जशास तसं) केलं असल्यास माझा नाईलाज आहे.पण लिखाण केव्हांचं आहे हे वेळकाळावरून कुणी कुणाला copy केलं ते सहजच कळू शकतं. मात्र तारखेची अदलाबदल न केल्यास.
लहानपणी कुणी विचारलं
“कुणाचं हे चोरलंस रे?”-ती कुठलीही गोष्ट असो.- त्यावर आपण म्हणतो ना
 ”आईची शप्पथ ते माझं आहे”
अगदी तस्संच,
 ”आईची शप्पथ ते सर्व माझं लिखाण आहे.”
असं मी त्यांना म्हणालो.ह्या पलिकडे माझ्याकडे काही प्रुफ नाही. आणि इतकही करून माझ्या कोणत्याही पोस्ट सारखं copy to copy दुसऱ्या कुणाच्या पोस्टमधे वाचल्याचं आपल्या आढळात आलं, तर मला अवश्य कळविण्याची तसदी घ्यावी ही विनंती”

हे सर्व वाचल्यावर,त्यानंतर मला त्या गृहस्थानी कळवलं,
“आपण निरनीराळ्या विषयावर आपल्या ब्लॉग मधे लिहीलेले पोस्ट पाहून मी तुम्हाला तसं विचारलं  हे तुमचं compliment करण्याचा इराद्याने  होतं. तसं लिहील्याने आपल्याला वाईट वाटल्यास,क्षमस्व.”
आता सांगा,सुरवाती पासून मी “ग्लास फूल” ची वृत्ती ठेवल्याने हा प्रश्न समाधानाने सोडवता आला.त्यांच्या त्या एका वाक्यावर मी “हाफ एम्टी” (निगेटीव्ह थिंकींग) वृत्ती ठेवली असती तर कदाचीत त्या सदगृहस्थांकडून निराळी रियाकशन आली असती.
 
पण कधी कधी टू मच “पॉझीटीव्ह थिंकींग” करून आपल्याला त्रास ही होतो.ते कसं ते मी माझ्या एका पोस्टवर लिहीलं आहे.शिर्षक आहे “मला वाटतं…. 3Feb 08″  तो अवश्य वाचावा.
तुर्तास एव्हडं पुरे.

श्रीकृष्ण सामंत (स्यान होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

Permalink No Comments

इट मेक्स सम सेन्स…….आठवण.

March 19, 2008 at 4:35 am (चर्चा)

शिला मला म्हणाली,
“मला वाटतं स्मरण शक्ति आणि आठवण यात फरक असावा.कारण स्मरण शक्तिचा मेंदूशी संबंध असावा,आणि आठवणीचा मनाशी संबंध असावा.”
असं काही तरी विरोधाभास होईल असं स्टॆटमेंट करून शिला माझ्याकडून कसा प्रतीसाद येतो त्याची वाटच पाहत होती.
मी म्हणालो,
“शिला तुला खरंच काय म्हणायचं आहे ते जरा मला कळू दे.”
शिला म्हणाली,
“चव्वेचाळीस वर्षावर माझ्या नवऱ्याचं काही खरं नाही हे मला आमच्या डॉक्टरांकडून कळलं.रमेश जास्त दिवस काढणार नाही असं ते मला म्हणाले.त्याची दोन्ही फुफुसे कॅन्सरने भरली होती.
 ”बाळं ” म्हणतात ते माझ्या वृद्ध आईला झालं होतं ज्याला, आता आपण अल्झायमर म्हणतो. तिला आता माजघर आणि स्वयंपाकघर कुठे आहे ते आठवत नव्हतं.सकाळी जेवली कि नाही, ते संध्याकाळी आठवत नव्हतं.घरातली कोण कोण वारले, माझे वडील धरून, तिला आठवत नव्हतं .
मी पण मनात घाबरायला लागले की कदाचीत एकदिवस माझ्या नवऱ्याला मी आठवूच शकणार नाही, अल्झायमरमुळे नव्हे तर माझी आठवण पुस्स्ट होईल म्हणून.”
मी शिलाचं एव्हडं ऐकून तिला विचारलं,
“मग तू काय करायचं ठरवलंस?”
मला म्हणाली,
“शरदच्या त्या दिवसाच्या डायग्नोसीस नंतर एक वर्ष मी, तो गेल्यानंतर त्याची आठवण काढीत राहिले.त्याचं ते मिष्कील हंसणं, माझा हात हातात घेवून माझ्याशी मान खाली घालून बोलणं,त्याचं ते खाकरणं आणि त्याच्या इतर चांगल्या गुणांची, हळूवार बोलण्याची, गम्मती करण्याची मी माझ्या मनात उजळणी करायची. जमेल तेव्हडं मी त्याचा चेहरा जणू दैवीक शक्ति आणून माझ्या मनात ठेवीत होते.आणि ते शेवटी तो सोडून जाई पर्यंत.”
मी मग शिलाला विचारलं,
“ह्यात तू यशस्वी झालीस का?”
त्यावर ती म्हणाली,
“त्यावेळी मला वाटायचं की जबरदस्तीने,लक्षात ठेवण्याची,परत परत उजळणी करण्याची,माहितीत राहण्याची, जणू एक प्रोसेस आहे.जसं आपण पाढे म्हणा,गाणे म्हणा,चावी ठेवण्याची जागा म्हणा, लक्षात ठेवतो तसं.शरदला कॅन्सर पासून वाचवू न शकल्याने, मनात घट्ट ठरवलं होतं की त्याच्या मरण्याच्या घटने पेक्षा त्याला विसरून जाण्याची घटनाच वाचवून ठेवू पाहिन.”
“हे तू कसं आचरणात आणू शकलीस?”
असं मी तिला विचारलं
त्यावर ती म्हणते कशी,
” अरे,नंतर माझ्या एक ध्यानात आलं,की आठवणीला सुद्धा एक प्रकारची स्वतःची ओढ असते.ती तू काबूत आणू शकत नाहीस. क्षणभर का होईना ती ओढ,  गमवलेली प्रेमळ व्यक्ति मिळण्यासाठी एक प्रकारची उचल खाते. एकदा मी माजघरात देव्हाऱ्या जवळ शांत बसली असताना,माझ्या जवळ शरद बसल्याचा मला भास झाला.
आम्ही दोघं नेहमी जवळ बसलेलो असताना माझं शरिर जे एक प्रकारे मऊ पडायचं अगदी तसं,वाटलं.मला त्याचा चेहरा आठवत नव्हता,त्याची चालण्याची ढब आठवत नव्हती,त्याच्या ज्या सर्व खाणाखूणा मी लक्षात ठेवल्या होत्या त्याचा त्या क्षणाशी काहीही काडीचा संबंध आला नाही.देवाजवळच्या आरशात ज्यावेळी माझं लक्ष गेलं, त्यावेळी माझ्या स्वतःच्या चेहऱ्यात माझ्या आईच्या चेहऱ्यातली नजर,मी तिला शेवटी हॉस्पीटलात पाहीली होती तशी दिसली.
मला आठवतं,मी तिला त्यावेळी माझ्या वडीलांविषयी प्रश्न केला होता,आणि तिची त्यांची आठवण पुस्सट झालेली दिसली होती,परंतु त्यावेळी सुद्धा ती मला तरतरीत आणि तेजी दिसली होती.तिचा मेंदू तिला सहाय्य करीत नव्हता , पण ते इतकं महत्वाचं नव्हतं,जितकं की मला त्यावेळी वाटलं होतं. माझे वडील अंधूक का होईना तिच्या मनात दिसले असतील. तो अल्झायमरचा मेंदू पण तिची आठवण पुस्स्ट करू शकला नव्हता.”
मी म्हणालो,
“शिला,म्हणजे मेंदू आणि आठवण ह्यात नक्कीच फरक आहे असं तुला नाही का वाटत.?”
ती लगेचच म्हणाली,
“अगदी बरोबर, बाहेर जाण्यापुर्वी घरातले सर्व दिवे काढले की नाही हे लक्षात ठेवण मेदुचं काम,पण आठवण ही भावनेत डुंबलेली असावी. आणि खोल विहीरीतून उचल घ्यावी तशी काळवेळाची पर्वा न करतां उचंबळून वर यावी.अशी माझी खात्री झाली आहे.”
हे शिलाचं सर्व ऐकून मला वाटलं तिच्या म्हणण्यात कांही तरी अर्थ असावा.
जसं आपण म्हणतो It makes some sense.
श्रीकृष्ण सामंत (स्यान होझे कॅलिफोरनीया)
    shrikrishnas@gmail.com

Permalink No Comments

“भेजा म्हणजे रे काय?…. भाऊ!”

February 18, 2008 at 5:47 pm (चर्चा)

“भेजा म्हणजे रे काय?…. भाऊ!”

त्या दिवशी मी सहज म्हणून टी.आय.एफ.आर मधे( टाटा इनस्टीट्युट ऑफ फंडामेन्टल रिसर्च मधे) सकाळीच गेलो होतो.जुने मित्र भेटतील गप्पा सप्पा होतील आणि वेळ थोडा मजेत जाईल ही एक ईच्छा ठेवून गेलो होतो.
तसे बरेच लोक भेटले म्हणा.”हाय,हलो” बऱ्याच लोकांशी झालं आणि सह्ज म्हणून लायब्ररीत डोकावून पाहिलं. बरेच लोक वाचनात दंग होते.एक तरूण चेहरा ओळखीचा दिसला.पण मग डोकं खाजवावं असं वाटलं.हा चेहरा अजून इतका तरूण कसा राहिला.का वयोमानामुळे माझ्या मेंदुत फरक तर झाला नाही ना?.मी तरूण असताना हा अगदी असाच दिसायचा.

विनायक मोकाशी आणि मी एकाच वेळेला T.I.F.R मधे लागलो होतो.मोकाशी अजूनही असाच कसा राहिल?असा एक क्रेझी विचार मनात आला.
अर्थात हा सगळा माझा भ्रम आहे हे मला लगेच कळलं म्हणा.जरा धारीष्ट करून त्याच्या जवळ गेलो,आणि त्याला विचारलं,
“तू विनायक मोकाशीचा मुलगा तर नाहीस नां?”
माझ्या वयाकडे बघून तो चटकन उभा राहिला आणि मला म्हणाला
“हो मी त्यांचा मोठा मुलगा. मी संजय.तुम्ही माझ्या वडलाना ओळखता?”
आणि मग सर्व जुन्या आठवणिची माझ्या कडून देवाण झाली.(घेवाण कशी होणार तो विनायक नव्हता विनायकचा मुलगा होता नां?)
मला म्हणाला,
“काका,आपण कॅन्टीनमधे जावून मोकळेपणाने बोलूया.”
संजय आपल्या वडीलांसारखाच प्रेमळ आणि माणूसप्रेमी वाटला. हातातलं पुस्तक तसंच घेवून तो आणि मी कॅन्टीन मधे गेलो. त्याच्या कडून कळलं विनायक दोन वर्षापुर्वी वारला.त्याला शेवटी शेवटी ’अलझायमर’ झाला होता. संजय तो पर्यंत एमएस्सी झाला होता.आणि आता tifrच्या मोलेक्युलर बायालॉजीमधे पीएचडी करत होता. त्याच्या हातातल्या पुस्तकाच्या मथळ्यावरून तो मेंदूवर संशोधन करीत असावा असं मला वाटलं.
“पीएचडी” साठी तुझा कसला विषय आहे रे?”
असं मी त्याला वडीलकीच्या नात्यानेच विचारलं.
मला म्हणाला,
“तसं अनेक विषयावर मला इंटरेस्ट होतं,पण बाबांच्या अलझायमर ह्या व्याधीकडे गेले सतत दोन वर्ष expose झाल्याने ’मेंदु हा आहे तरी काय’ह्याची उत्सुकता वाढून मग त्यांच्या पश्चात त्यांची आठवण म्हणून हा विषय घेवून मी पीएचडी करायचं ठरवलं.”
स्वतः उठून त्याने लाईनीत उभं राहून, दोन कप एस्प्रेसो कॉफी आणि चटणी स्यॅन्डवीच एका मोठ्या डीश मधे तो घेवून आला.
मला म्हणाला,
“बाबांना असा ब्रेकफास्ट बराच आवडायचा”
मला ते दिवस आठवले.आम्ही सर्व मिळून कामावर आल्यावर प्रथम काम सुरू करण्यापुर्वी कॅन्टीनमधे येवूनरोज हाच ब्रेकफास्ट घ्यायचो.
गम्मत म्हण्जे डॉ.भाभा पण सर्वांबरोबर असेच लाईनमधे उभे राहून आपला ब्रेकफास्ट घ्यायचे.कुणीही केव्हडाही उच्च पदावर असे ना का सर्वांना नियम सारखा असायचा.वेटर आणून काही देत नसायचा. आणि दुसरं म्हणजे ’सोल्जर कॉन्ट्रीबुशन’, डॉ.भाभा पण स्वतःच्या खिशात हात घालून स्वतःचे पैसे द्दयायचे.

 संजय आग्रह करीत मला म्हणाला,
” आणखी काय काका?”
तो रांगेत उभा असताना मी त्याचं पुस्तक सहज म्हणून चाळलं. ’मेंदुच्या’ विषयावर ते क्लासिक पुस्तक होतं.
मी त्याच विषयावर त्याच्याकडून माहिती घेण्याचा विचार केला होता.
मी म्हणालो,
“मला तुझ्याकडून थोडक्यात मेंदु म्हणजे काय चीज आहे ही माहीती हवीयं.मला माहित आहे की तो गंभीर विषय आहे आणि पांच दहा मिनीटात सांगता येणार नाही,पण तुला सांगता येईल तेव्हडं ऐकायचं आहे.”
संजय मला म्हणाला,
“तुमचं म्हणणं बरोबर आहे,पण अगदी बेसीक गोष्टी मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो.सबंध मेंदु बद्दल नसांगता मेमरी म्हणजेच ज्याला स्मरणशक्ति म्हणतात ती काय ते सांगतो.
स्मरणशक्ति ही एक संभ्रमात टाकणारी गोष्ट आहे.माहिती आणि विचार जसे एखाद्दया एनसायक्लोपिडीयामधे असते त्याच्यापेक्षाही शंभरपटीने जास्त माहिती ह्या तिन पौंडाच्या गोळ्यामधे भरलेली असते.
स्वतःची डिसीझन घेणं,विचार करणं,आणि आपल्याला ह्व्या त्या गोष्टी करणं, हालचाल करणं ही सर्व कामं मेंदु करतो.”
नंतर संजय मला म्हणाला,
“काका आपण माझ्या रुममधे जावूं या.आपण दोघे तिकडे आरामात बसून बोलूं.”
मी म्हटलं,
“अरे तुझा वेळ मी घेत नाही ना?”
त्यावर तो मला म्हणाला,
“tifr ची खासीयत मी तुम्हाला काय सांगू?तुम्हाला सर्व माहित आहे.डॉ.भाभांच्या शिस्तित हे बसत नाही.त्यांच म्हणणं रिसर्च करणाऱ्यावर कसलीच बंधन असता कामा नयेत. जो तो त्याची जबाबदारी जाणतो.
कांमाचा अपव्यय न होवू देण्याची त्याला ह्यामुळे संवय लागते.मझ्या संशोधनाच्याच संबंधाने आपण बोलत असल्याने मी माझ्या कामाचा अपव्यय करीत नाही असं माझं मन सांगतं.आणि तुम्हाला ही ह्या विषयात इंटरेस्ट असल्याने मला तुम्हाला हवी असलेली माहिती सांगायला पण बरं वाटतं.”
नंतर आम्ही वर जावून त्याच्या रुममधे बसलो.
संजय सांगू लागला,
“शॉर्टटर्म,लॉन्गटर्म,आणि ऍनसेसटरल असे मेमरीचे तिन प्रकार आहेत.माहिती लिहून ठेवणं, राखून ठेवणं(store करणं) आणि काढून त्याचा उपयोग करणं ही एक मेमरीची प्रोसेस आहे. काही वेळेला ही माहिती कायमची राखून ठेवणं आणि नंतर कधी तरी उपयोगात आणण्यासाठी काढून घेणं हे त्या त्या जरुरी प्रमाणे ठरवलं जातं.ही माहिती किती वेळ राखून ठेवणं हे पण प्रोसेस ठरवते.”
मी म्हणालो,
“म्हणजे आता आपण दोघे कॅन्टीनमधे असताना जे काय बोललो,पाहिलं हे सर्व जरुरी प्रमाणे राखलं जाणार,आणि काढून घेतलं जाणार. खरं ना?”
“अगदी बरोबर ” संजय म्हणाला.
” ही माहिती ’चंक्स’ मधे राखली जाते.आणि ती ’टेम्परोल लोब’ मधे,किंवा मधल्या मेंदूत किंवा ’मेडीयल टेम्परोल लोब’ मधे किंवा आणखी अनेक ठेकाणी राखली जाते.अगदी आत राखली जाते.हे ’चंक्स’ नंतर वापरले जातात.

’रिकॉल,रिकलेक्शन,रिकगनिशन,आणि रिलर्नींग’असे चार प्रकार मेमरी प्रोसेसचे आहेत.
रिकॉल म्हणजे भूतकाळातली माहिती आठवणं.
रिकलेक्शन म्हणजे माहितीची ’रिकन्स्ट्रकशन करून मग आठवण करणं.
रिकगनिशन म्हणजे पुर्वीची झालेली घटना आठवणीत ठेवून नंतर तिची उजळणी करून लक्षात आणणं.
रिलर्नींग म्हणजे घटना परत परत आठवणं.म्हणजेच त्याच, त्याच घटनेची पुनावृत्ती करणं.
मी म्हणालो,
“म्हणजे संजय,तुला मी विनायक समजून पाहिलं ते ’रिकलेक्शन नाही काय?”
“अगदी बरोबर ” संजय म्हणाला.
नंतर सांगू लागला,
” मघाशी मी म्हटलं त्याप्रमाणे, ’रिकॉल,रिकलेक्शन,रिकगनिशन,आणि रिलर्नींग’हे प्रकार ’शॉर्टम’ मेमरीत मुळीच नसतात. ’शॉर्टम’ मेमरी ही काही सेकंडस ते मिनीट किंवा एक तास पर्यंतची आठवण असते.ह्या मेमरीला चंक्स ठेवायला अगदी थोड्याच प्रमाणात मेंदुत जागा असते.फोन नंबर डायल करताना,नंबर वाचून मग फोन केला जातो.नंतर तो नंबर विसरला जातो.थोड्या वेळा पुर्ती मेमरी ’इन युझ’असते.आणि ’लॉंग टर्म’ साठी राखली जात नाही.
शॉर्टटर्म मेमरी नसती तर आपल्याकडॆ येणाऱ्या सर्व माहितीचा ओघ सांभाळताना आपल्या सर्व actions, हळू झाल्या असत्या.
मेमरी प्रोसेस मधली ही शक्यता शब्द,चित्रं,आवाज,वगैरे पाहून किंवा ऐकून त्याना पटकन ’रिकॉल’ करून थोडा वेळ आठवून आणि ती माहिती कायम राखून न ठेवता विसरून जाण्याने मेंदुतुन फुसून टाकली जाते.
’लॉंग टर्म ’ मेमरीला अगणीत जागा मेंदुत असते.त्यातली माहिती ’वापरा नाहीतर विसरा ’ (use it or lose it) ह्या प्रकारात तेव्हा जाते, जेव्हा त्याचे मेमरीतले ’चंक्स’ न वापरल्यामुळे ढकलून दिले जातात, आणि ती जागा थोड्या वेळा पुर्ती दुसऱ्या ’चंक्स ’ नी भरली जाते.
उत्तम ऊदाहरण म्हणजे आपण चावी कुठे ठेवली ती विसरतो,किंवा भेटायला जायला विसरतो वगैरे.
जेव्हा मेमरी खूप overload होते,तेव्हा क्षुल्लक गोष्टी आठवत नाहीत.अशावेळी काही तरी शारिरीक activity करावी.त्यामुळे मेंदुला माहितीचे ’ चंक्स’ rearrange करायला वेळ मिळतो.”
घड्याळाकडे पहात संजय मला म्हणाला,
“काका lunch hour संपत येणार.बोलता बोलता कधी वेळ गेला ते कळलंच नाही.”
असं म्हणत आम्ही कॅन्टीनच्या दिशेने जायला निघालो. बरेच लोक जेवून गेल्यामुळे लाईन मोठी नव्हती.
self service असल्याने गरम गरम स्टरलाईझड डिशीस हातात घेवून तेव्हडंच गरम जेवण घेत होतो.
’मुलगतवानी सुप,ब्रेडचेस्लाईसीस,फ्राईडचिकन,सलाड, फ्राईड राईस आणि राईस पुडींग’ मी घेतलं,आणि टेबलाकडे गेलो.संजयने पैसे अगोदरच देवून टाकले होते.जेवायला सुरवात करण्यापुर्वी माझ्या सुपकडे बघून मला संजय म्हणाला,
“काका हे मुलगतवानी सुप माझ्या बाबांना खूप आवडायचं.मी एक दोन वेळां त्यांच्या बरोबर इकडे जेवायला आल्यावर मला आग्रहाने हे सूप घ्यायला सांगायचे.मला पण हे सुप खूप आवडतं,पण बाबा गेल्यापासून मी त्यांची आठवण म्हणून मी ह्या सुपाचा त्याग केला,वर्ज केलं.”
त्याची ही पितृभक्ति पाहून मला पण खूप गहिंवरून आलं.संवयी प्रमाणे ते प्रेम बघून मला एका गाण्याच्या दोन ओळी आठवल्या त्या ओठात पुटपुटताना पाहून,
संजयने विचारलं,
“काका त्या ज्यु लोकांसारखे जेवणापुर्वी तुम्ही काही प्रार्थना म्हणता की काय?”
आता मला राहवंलच नाही.मी म्हणालो तुला हे गाणं लागू होत नाही.
“पण म्हणून तर दाखवा.मला पण कविता आवडतात”
असं त्याने म्ह्टल्यावर,मी म्हणालो ऐक,
“नजरेला दावी पाप
त्याला नेत्र म्हणू नये
विसरला आईबाप
त्याला पूत्र म्हणू नये”
तो हंसल्यावर त्याच्या गालावरची खळी पाहून मला परत विनायकची आठवण आली.जेवण आटोपल्यावर संजय म्हणाला,
“वरती जावू या थोडी उरलेली मेमरी बद्दलची माहिती सांगतो.”
असं म्हणत आम्ही परत त्याच्या रुममधे गेलो.
संजय आता पुढचं सांगू लागला,
“एपीसोडीक मेमरी”हा एक मेमरीचा पोटप्रकार आहे.ह्याची प्रोसेस अशी आहे, ही आठवण खूप वर्षानी सुद्धा सहजच आणता येते.जितकं जास्त feeling असेल तेव्हडी ही आठवण चांगली राखली जाते आणि चांगली आठवली जाते.
लॉंन्गटर्म मेमरी आठवायला त्रास होवू लागला की त्याचं कारण वय होत जातं, तसं लोब्स बाद होतात.तसंच बालपणातल्या आठवणी आठवतात पण वर्षापुर्वीच्या आठवणी आठवत नाहीत, ह्याचंही कारण वंय होणं आहे.”
मधेच संजयला इंटरप्ट करून मी म्ह्टलं,
“विसरून जाईन तुला सांगायचं म्हणून आत्ताच सांगतो,तुला जेवताना आणि सकाळ पासून आपण बोलत असताना मी तुझ्या विषयी एक बारकाईनं पाहिलं तुझे बोलतानाचे हातवारे,ते मधेच बोलायचं थांबल्यावरचं ओठावर ओठ काही वेळ दाबून ठेवण्याची संवय, हंसताना तुझ्या उजव्या गालावर पडणारी खळी पाहून मला तुझ्या बाबाची,विनायकची आठवण येते.”
“आता बोल”
हे ऐकून परत हंसत हंसत गालावरची खळी दाखवत म्हणाला,
“काका,जणू तुम्ही मला ऍन्सेसट्रल मेमरीची माहिती द्दयायची आठवणच केलीत.ह्याच प्रकारच्या मेमरीबद्दल मला शेवटचं सांगायचं होतं.नकळत पण इनबिल्ट राखून राहिलीली ही मेमरी प्रत्यकाच्या genes मधे असते.ते instinct वागणं त्याच्यामुळेच दिसतं.वरचं माझ्या बद्दलचं तुमचं observation हे त्याच ऍन्सेसट्रल मेमरीमधे मोडतं. आणखी एक उदाहरण म्हणजे लहान मुल आंगठा कसं चोखतं,भूक लागल्यावर कसं रडतं,आपण एकमेकाला कसं अलिंगन देतो,दरवाजा कसा उघडतो हे सर्व प्रकार त्यातच येतात.
काका बोलता बोलता चार वाजले.मी तुम्हाला अगदी basic ते सर्व मेमरी बद्दल सांगितलं.आता आपण कॅन्टीन मधे गरम गरम चहा घ्यायला जावूया.”
कॅन्टीन मधे जाता जाता मी त्याला म्हणालो,
“तुला विनायकने संजय हे नांव अगदी योग्य ठेवलंय.
महाभारतातला संजय जो आंधळ्या धृतराष्ट्राला त्याच्या महालात बसून कुरुक्षेत्रातली युद्धाची माहिती देत होता.
ती त्याच्या मेमरीच्याच जोरावर नाही काय?
आणखी एक गम्मत सांगतो.हिंदीत मेंदुला “भेजा” म्हणतात,तसंच “भेजा”म्हणजे हिंदीत दुसरा अर्थ पाठवलं,किंबा पाठवणे.
एका मुंबईतल्या पोस्ट्मनची आणि एका उत्तर भारतीयाची पत्रावरून “तुमकु भेजा नही” ह्या वाक्यावर जुगलबंदी कशी झाली हा विनोदी post माझ्या ’कृष्ण उवाच ’ website वर जरूर वाच.”

चहा घ्यायला बसल्यावर संजयने दोन कप गरम गरम चहा आणि दोन ’अकुरी on टोस्ट ’आणले.
एका ब्रेड्स्लाईसवर उडदाची आणि चणाडाळीची कुटून केलेली तिखट चटणी फासून त्यावर चण्याच्या पिठाची जाड पेस्ट लावून मग ऑव्हन मधे toast बनवतात.
हा toast चहा बरोबर खायला खूपच मजा येते.
संजय मला म्हणाला,
“काका हा अकुरी on टोस्ट माझ्या बाबांना खूपच आवडायचा.त्यांची आठवण काढून मी न चुकता हा टोस्ट खातो.”
चहा घेवून झाल्यावर संजयचा निरोप घेताना खूपच वाईट वाटलं.ह्याच्या रुपाने विनायक मोकाशाने माझ्या मेमरीत ही रेकॉर्ड केलीली आठवण निश्चीतच episodic memory असावी.

       श्रीकृष्ण सामंत (स्यान होझे कॅलिफोरनीया)
         shrikrishnas@gmail.com

Permalink No Comments

अमेरिकन आई बाप

May 18, 2007 at 2:39 am (चर्चा)

आज प्रो.देसाई जरा खूष दिसले.त्यांच्या धाकट्या मुलीला मुलगी झाली होती.
दोन एक महिने झाले असतील.मला ती बातमी त्यानी या पुर्वीच सांगीतली होती म्हणा.
पण आज काही विषेश त्याना सांगायचं होतं असे त्यांच्या चेहऱ्यावरून मी अनमान काढलं.
“काय भाऊसाहेब आज विषेश काय?” असे मी म्हटल्यावर ते जरा खूसखूसून हसले.
मला त्याना काही तरी सांगायचं होतं.मला ते म्हणाले”सामंत , काय हो तुम्हाला आठवतं का,
ज्यावेळेला तुम्हाला पहिलं मुल झालं तेव्हा तुम्ही कधी त्याला कौतूकाने घेऊन फिरवत होता
त्याचे कपडे बदलणं त्याचे आपण पुर्वी लंगोट म्हणायचो त्याला इकडे आता डायपर म्हणतात
तसं काही तुम्ही बदलायचा का त्याला कधी मांडीवर घेऊन झोपवलं आहेत का तुम्ही?बहूतेक
नसणार कारण तुमच्यावर ती पाळीच कदाचीत आली नसणार.पण इकडे बघा आमचे जांवई हे सर्व करतात.
त्याना म्हणे इकडे ट्रेनींग देतात.ही मुलांची सर्व कामं इकडे आई बाबानां मूल होण्यापुर्वी शिकून घ्यावी लागतात.
त्याना ही सर्व कामं करताना पाहून कौतुक वाटतं बघा.मुलाच्या बाबाला दुधाची बाटली पण द्यायचं शिकवतात.
म्हणजे बघा बापाला जवळ जवळ आईची कामं शिकवतात.आणि हे बाबा पण ही सर्व कामं अगदी आनंदाने आणि अगत्याने करतात.
आता आजी आजोबा झाल्यावर नातवंडाची हीच कामं आपल्याला करायला किती आनंद होतो.
सामंत,तुमचं म्हणण काय आहे याच्यावर ते जरा विस्तारने मला सांगा बघू.”
हे त्यांचं म्हणणं ऐकून “मी थोडा विचार करून मला काय म्हणायचं आहे ते मी तुम्हाला उद्या
आपण भेटू तेव्हा चर्चा करूं.”असं सांगितलं
दुसऱ्या दिवशी जेव्हां आम्ही भेटलो तेव्हा ह्या विषयावर उहापोह केला.तो असा.
मी म्हणालो “भाऊसाहेब,ह्याला मुख्य कारण इकडची कुटुंब संस्था आणि इकडची
(म्हणजे अमेरिकेतली) परिस्थीती मुख्यता कारण असावी.
अहो,त्यावेळी भारतात आपल्या एकत्र कुटुंब संस्थेमूळे किती माणसे जवळ असायची बघा.
त्यामुळे मुलाची ही कामं करायची पाळी कशी येणार.आणि इतकं असून तसं करायला जरी
जायचं तरी एक म्हणजे त्या वयात थोडी लाज वाटाची आणि बायको पण कामं करू द्यायची
नाही कारण तिला पण नवऱ्याने असली कामं करावीत म्हणजे गैरशिस्तीचं वाटायचं आणि मोठी
माणसं पण आपली टिंगल करायची.त्यामुळे आपण त्यावेळी ह्या सर्व गोष्टी पासून परावृतच असायचो.
उलट इथे आईबाबा आणि मूल ह्या शिवाय घरात कोणच नसतं आणि ही कामं एकट्याची नसून दोघांची
असतात हे पटवलं गेल्याने विशेष करून पुरुष्याला, त्यामुळे असली दृश्य आपल्याला दिसतात.
आणि दुसरं म्हणजे मदतीला आजी आजोबा जरी भरतातून आले तरे त्यांचा सहा महिन्याचा व्हिसा
असतो मग सहा महिन्यानी ते गेल्यावर ही कामं कुणी करायची सांगा?

आपण आजोबा म्हणून जेव्हां इकडे नातवंडाचे कौतुकाने लाड करत असतोना,
त्याच पण कारण एका अनुभवी व्यक्तीने मला समजावून सांगीतलं बघा.त्याच म्हणणं असं
की तरुण बाप असताना सुप्त राहिलेली आपली मुलांच्या असल्या सेवेची इछ्या आपण अजोबा झाल्यावर वसूल करतो.
कारण आपली टिंगल करायला कुणी नसतं आणि आजीला पण वयोमनाप्रमाणे जमत नसल्याने
आजोबाला पण काही असली कामं वाटून मिळतात.हे त्या अनुभवी माणसाचे तत्वज्ञान
मला पटतं भाऊसाहेब ,तुम्हाला कसं वाटतं? तुम्ही मला उद्या विचार करून सांगा ह्यानंतर आम्ही हा विषय इथे संपवला.

श्रीकृष्ण सामंत (स्यान होझे कॅलिफोरनीया)

Permalink No Comments

कविता, कविता म्हणजे तरी काय

March 9, 2007 at 1:08 am (चर्चा)

कविता


कविता म्हणजे काय? असा प्रश्न खूप लोक विचारतात.कधी कधी काही लोक आपल्या कडून सुचना वजा उपदेश पण करतात.पण जो कविता लिहीतो त्याला ते ऐकून खूप मजा वाटते असेल कारण “असाच”विषय घेऊन तूं कविता लिही असे कोणी सांगितल्यास ते शक्य होणार नाही.आणि जे तसे लिहू शकतात त्यांचे खरोखरच कौतुक केले पाहिजे.

कविता करणे आणि “सुग्रास”जेवण करणे ह्या दोन गोष्टीची मी सांगड घातली तर अतिशयोक्ती होणार नाही.जेवणा साठी सामुग्री लागते.सामुग्री सर्वांकडे असू शकते पण म्हणून “गाजराचा हलवा”कर म्हणून कोणी सांगितल्यास सुग्रास चटकदार हलवा करायचा झाल्यास प्रथम तो करणाराल्या त्याची (करण्याची) आवड पाहिजे नसल्यास तो त्याचे “घोळ”करून ठेवील.

तसेच शब्दांची सामुग्री असली म्हणून कुठचेही शब्द वापरून  कविता लिहीता येणार नाही असे मला वाटते.लिहीणारयाला त्यावेळी आवड निर्माण झाली पाहिजे.खाण्याची डिश पुस्तक वाचून करता येते,पण उत्तम डिश बनवावयाची झाल्यास करणारयाला त्यामधे स्वत:ची “क्रियेटिविटी” दाखवावी लागते.त्याशिवाय ती डिश सुग्रास होणार नाही.कवितेचा विषय घेऊन सुधा “क्रियेटिविटी”नसेल तर कविता पण तितकी आवडली जाणार नाही.

थोडक्यांत आपल्या जवळ असलेल्या शब्दभांडारातून योग्य ते शब्द घेऊन विषयाला धरून त्यांची नीट जुळणी करता आली तर सुंदर कविता लिहीता येऊ शकेल.ह्या कलाक्रुतीत थोडा निसर्गाचा हात असावा असे पण मला वाटते.कारण स्व अनुभवातून मी सांगेन की कधी कधी डोक्यात विषय आला की शब्द आपोआप जुळून येतात आणि त्या दोन ओळी कागदार वर लिहील्या शिवाय चैन पडत नाही.कधी कधी ती शब्दाची जुळणी डोकयात कायम बसते आणि कागदावर लिहून काढता येते.

कुणाला आनन्द देणारी कविता आवडते तर कुणाला निसर्गावरच लिहीलेली कविता आवडते.पण खरं सामजायचे झाल्यास मला वाटते दु:खी मनातून कवितेची निर्मीती जास्त होते त्यामुळे ह्र्दयाला हलवणारया कविता जास्त वाचणारे लोक असतात.तसेच विनोदी कविता लिहीणारे कवी पण असातात पण बरेच वेळेला तुम्ही पहाल की त्या कविता वाचेपर्यंन्तच आवडतात नंतर विसरून जायला होतं. त्या उलट अखादी चटका देणारी कविता वाचल्या नंतर त्या कवितेचे शब्द आपल्या मनात घोळत असतात.जशी एखादी चटकदार डिश खाल्यावर त्याची चव तोंडात टिकून रहाते तशीच काही.

सर्व आनंद देणारया गोष्टी यातनेतून निर्माण होतात उदाहरणार्थ “जन्म”.बाळाची निर्मीती होत असताना आईला किती यातना होत असतात पण एकदा बाळ जन्माला आले की मग तिला किती आनंद होतो.घनदाट काळोखा नंतर प्रकाशाची थोडीशी पण तिरीप किती सुखदायक वाटते.आगितून पोळून काढलेले सोने किती चमकदार आणि पिवळे धमक दिसते.अशी किती तरी उदाहरणे देता येतील.

डोक्यात,निर्मीती होत असताना जशी होते तशी होवूं द्यावी. निर्मीती हा निसर्गाचा नियम आहे.त्याला कोणी काय ही करू शकणार नाही.

म्हणून म्हणतो मनातल्या भावना प्रदर्शीत करायल कविते सारखे दुसरे प्रभावी माध्यम नाही.कविता ह्रुदयातील कळा प्रदर्शीत करते.मग त्या आनंदाच्या असो दु:खाच्या असो वा विनोदाच्या असो.त्या तशाच येणार.त्यावर कुणाचा कंट्रोल नाही.
कविता एक दोन वेळा नीट वाचली की त्यामधला मतीतार्थ कळतो

                            श्रीकृष्ण सामंत (स्यान होझे कॅलिफोरनीया)

Permalink No Comments

आठवतं कां तुला?

March 8, 2007 at 3:02 pm (चर्चा)

वेड्या आठ्वणी

अक्का,
आपली माणसं चटका लाऊन जातात,तशी तूं गेलीस.आपली माणसं जातात पण त्यांच्या आठवणी येतात.”आठवणी येतात”,असे आपण म्हणतो कारण आठवणी कधी जात नाहीत.काही आठवणी वेड्या असतात म्हणून त्या सारख्या येत असतात.

तूं बारा एक वर्षाची होतीस.मी सहा वर्षाचा होतो.तुझ्या डाव्या हाताच्या मुठीत माझे बोट धरून तुझ्या बरोबर चालत असताना तिन वर्षाचा सुधाकर तुझ्या कमरेवर,माझ्या हातात फुलाची परडी,असे आपण तिघं मागच्या परड्यात जास्वंदीची फुलं काढायला जात असूं.ही आठवण जेव्हां तूं गम्भीर आजारी झालीस तेव्हां प्रकर्शाने आठवली. आठवत का तुला?

तूं पंधरा सोळा एक वर्षाची असावीस,आपण सर्व दादरला ईंदीरा निवास मधे रहात असूं.त्याच मजल्यावर दहा नंबरच्या फ़्ल्याट मधे प्रसीद्ध मराठी ऍक्टर चन्द्रकान्त रहात असे.तूं सुन्दर दिसायचीस तुझं अक्षर पण किती सुन्दर,चन्द्रकान्तने ईंदीर निवासच्या सार्वजनीक गणपतीच्या कार्यक्रमात,”शारदा” नाटक बसवले होते.त्यात तुला “शारदेची ” मुख्य भुमीका दिली होती.”मुर्तीमंत भिती उभी मज समोर राहीली”हे गाणे आणि “म्हातारा ईतुका न अवघे पाउणशे वयमान”हे सुन्दर गाणे सुरात गाऊन तूं टाळ्या घेतल्यास,आणि वन्समोअर पण घेतलेस
आठवतं का तुला?

म्याट्रीक पर्यंत तूं दादरच्या गर्ल्स स्कूल मधे शिकत होतीस.महात्मा गांधी एकदा मुंबईला आले होते,त्यांची जाहिर सभा शिवाजी पार्कवर झाली होती.त्यांच्या सन्मानासाठी देशाच्या गौरवासाठी आणि त्याना खूप आवडणारे गाणे “वैषव जन तो जेणे कही रे जो पिडपराई जाणे रे”हे गाणे गाण्यासाठी तुला तुझ्या शाळेमधून निवडले होते.स्टेज वरच्या तुम्हा सर्व मुलींची स्वत:हून महात्माजीनी पाठ थोपटली,
हे तूं आम्हाला अभिमानाने सांगायचीस.
आठवते का तुला?

अण्णा आजारी झाले तेव्हां आपण सर्व वेन्गुर्ल्याला रहायला गेलो.तिकडे तूं रेशनींग ऒफ़ीस मधे नोकरी करायचीस.सुट्टी दिवशी तूं,मी,सुधा आणि तुझ्या मैत्रीणी मिळून आपण सर्व वेंगुर्ल्याच्या “क्यांप”मधे फ़िरायला जात असूं.”बाब्ल्याच्या “कोळड्रीन्क हाउस “मधे तूं आम्हा सर्वाना दुध कोळ्ड्रीन्क मधे आईसक्रीम घालून मिळणारे रंगीबेरंगी द्रिन्क पोटभर देत असायचीस.
आठवते का तुला?

मला आठवते एकावन,बावनच्या दर्म्यान तुझं लग्नं झालं.मी कॊलेजला दुसरया वर्गात शिकत होतो.तुझं लग्न मुंबईत (गिरगावांत) झालं.अण्णा आजारी असल्याने अण्णा आणि आई दोघही तुझ्या लग्नाला येऊं शकली नाहीत.तुझ्या सासरी जाताना त्यांची आठवण काढून तूं खूप रडलीस.मी पण तुला जवळ घेऊन तुझे अश्रु पुसत म्हणालो”रडू नकोस हे ही दिवस जातील”त्यानंतर मला टि.आय.एफ़.आर. मधे नोकरी लागली,आपण आई अण्णाना “आराम नगर” मधे आणले.त्रेपन्न मधे तूला विरेन झाला.
आठवते का तुला?

थोडासा मध्यंतरचा काळ सोडल्यास प्रत्येक भाऊबिजे दिवशी तूं माझ्याकडे यायचीस,किती आनंद व्हायचा त्या दिवशी?बोट धरून फुलांची परडी घेऊन देवपुजेला फुले आणण्यासाठी संगत देणारी तूं संगत देत राहीलीस.
आठवतं का तुला असं आतां मी कसं म्हणूं?

परलोकीच्या प्रवासाल निघालेली तूं आता अण्णा,आईला भेटशील,आणि या ईहलोकात राहून तुझ्या फ़क्त वेड्या आठवणी देशील.

                                 श्रीकृष्ण सामंत (स्यान होझे कॅलिफोरनीया)

Permalink No Comments