ती गोड गाणी कशी मी गाऊ?

(अनुवाद)

प्रीतिची वचने कशी बरे मी पाळू?
आसपासच्या ज्वाळांना कशी मी सांभाळू?
प्रीतिला रोखणारी भिंत कशी मी उचकटू?

असतील अगणीत गोड गाणी
दाखवी वेदना नेत्रामधले पाणी
अंतराची तार तुटलेली असताना
ती गोड गाणी कशी मी गाऊ?

भार व्यथेचा अंतरात असताना
शोधूनी सांभाळीन मार्ग सुलभतेचा
परि असतो जेव्हा भार जीवनाचा
ती व्यथा कशी मी संभाळू?
श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)

Advertisements

निसर्गवेडा सुधाकर

“निसर्गाने मला एव्हडं प्रबळ केलंय,आणि त्यातूनच मी आणखी एक शिकलो की,माझ्या अंतरात मी डोकावून पहावं आणि त्यातूनच मी सौंदर्य शोधून पहावं.”
….सुधाकर
तसं पाहिलत तर,सुधाकराच्या घरचे सर्वच निसर्गप्रेमी आहेत.आणि त्यामधे सुधाकर निसर्गवेडा आहे असं म्हटलं तर चुक होणार नाही.सुधाकर मला नेहमीच निसर्गाबद्दल चार गोष्टी सांगत असतो.आणि बरेचवेळा तो कोकणातला निसर्ग कसा वाटतो ते तोंड भरून सांगत असतो.
असंच एकदा सुधाकर आपल्या मनात आलेले विचार मला सांगत असताना मला म्हणाला,
“स्वतःचं मुल्यांकन केल्यावर अंगात विश्वास येतो.परंतु,स्वतःचं मुल्यांकन करण्यासाठी आपल्या भोवती असलेल्या गोष्टींचंसुद्धा मुल्यांकन करण्याची जरूरी असते,असं मला वाटतं.
समजा एखाद्या सतत व्यस्थ असलेल्या शहराचं अचंभा वाटण्यासारखं कौतुक करावंसं वाटल्यास त्या मागे काहितरी कुतूहल लपलेलं असतं.पण असं असताही हे ही शक्य आहे की त्यातला एखादाच पैलू पाहून त्यावर चित्त एकत्रीत केल्यास त्या शहराची खरी सुंदरता हुडकून काढणं शक्य आहे.काही अंशी मी मुंबई शहराबद्दल बोलेन.

असा विचार करीत असताना मला कोकणातल्या कुठल्याही गावाची हटकून आठवण येते.कोकणात एकापेक्षा एक सुंदर गावं आहेत.आणि अशा परिस्थितीत माझ्या एक लक्षात आलं की,ही सुंदरता जशी गावात असते तशी ती स्वतःतपण असते.कोकणातलं एखादं गाव घेऊन त्या गावातल्या विस्मय वाटण्यासारख्या गोष्टी पहाता पहाता हेच तत्वज्ञान मी मला लागू करण्याचा प्रयत्न करीत असतो. जेव्हा एखादी गोष्ट सहजासहजी उकलून सांगण्यास कठीण होतं,म्हणजेच बर्‍याच जणानी अगदी एखादं मिनीटही घेऊन ह्या सुंदर घटनेबद्दल स्पष्टकारण दिलेलं नसतं, अशा ह्या घटनेबद्दल मी बोलत आहे.मला जी गोष्ट भावते ती का भावते हे सांगण्यासाठी माझ्या अनुभवातून मला मदत झाली आहे.अगदीच स्पष्ट सांगायचं झाल्यास,निसर्गाच्या सानिध्यात जाऊन माझ्या अंतरात शांती आणण्याची कला मी आत्मसात करण्याच्या प्रयत्नात असतो.

ते शाळेत जाण्याचे दिवस होते.ह्याचवेळी मला निसर्गाची आठवण आली.आई वडीलांची सतत अभ्यासाबद्दल बोलणी खाण्यातून मुक्तता मिळण्यासाठी अशा ठिकाणी जावंसं वाटायचं जिथे काहीच ऐकलं जाऊ नये.अगदी स्मशान शांतता असावी अशा ठिकाणी.अगदी उंचच-उंच ठिकाणी जिथे ढग हाताला लागतील अशा ठिकाणी. किंवा अशा ठिकाणी की तिथे बसल्यावर माझ्या घराची कौलं मला दिसावीत.

अशा उंच ठिकाणी की मी खरोखरच माझ्या मलाच हुडकलेलं असावं.मी तिथे बसलो होतो,ते पिंपळाचं झाड होतं.माझ्या डोक्यावर पिंपळाची पानं सळसळत होती.पावसाला घेऊन येणारा मानसूनचा जोरदार वारा त्या पानांतून मार्ग काढीत होता,त्यामुळेच होणारा तो आवाज होता,निसर्गाचं संगीत होतं.मी माझे डोळे मिटले,आणि स्वर्ग सूख घेत होतो.तो वारा,ते उजाड आकाश मला साथ देत होती.

माझ्या अवतिभोवतीचं वातावरण एव्हडं मोहक होतं की,असं कधीच पाहिलं नव्ह्तं आणि त्याचं कारण बहुदा असावं की,ह्यावेळी मी वेळात वेळ काढून वातावरणाला कान दिला होता आणि डोळे दिले होते.आजुबाजूचे झाडावर बसलेले लहान मोठे पक्षी गात होते,आणि वरती आभाळात ढग जमून वातावरणाला आणखी मोहक करीत होते हीच गोष्ट माझ्या स्वैर कल्पानाचं स्वर्ग सत्यात आणण्यात कारणीभूत होत होती.माझ्या लक्षात त्याचवेळी आलं की,माझ्या अवतिभोवती मोहक वातावरण होतच,माझ्या जीवनात कितीका अन्धकार असेना का!

जरी शहर आणि त्यातला गोंगाट प्रत्येक दिवसाच्या जीवनात धरतीच्या खर्‍या सौंदर्यावर मात करीत असला तरी नेहमीच शांती आणि स्थिरचित्तता शोधण्यासाठी मी वेळ काढून पाहिल्यास मला मिळते.अशा प्रकारचं सौंदर्य की ज्याच्या मुखवट्या खाली अशी एक तीव्र इच्छा असते की आपल्याला इतरांपेक्षा सतत जास्त चांगलं दिसावं.

मला असं वाटतं की,बरेचसे लोक आपल्या जीवनाशी एव्हडे व्यस्त असतात की त्यांना त्यांच्या अवतिभोवती असलेलं सौंदर्य दिसत नाही.पण माझ्या बाबतीत म्हणाल तर मी आणखी श्वासोश्वास घेऊन आणि थोडा उश्वासही घेऊन मीआजुबाजूला पहात असतो.मला माहित आहे, ह्यातून मार्ग काढायचा झाल्यास,अगदी कठीण परिस्थितीतून वाट काढायची झाल्यास, माझा माझ्यावर विश्वास हवा.आता मी मला निसर्गाचाच एक भाग आहे असं समजतो.त्यामुळे निसर्गाच्या सौंदर्‍याची प्रशंसा करायची असल्यास माझ्यातल्या सौंदर्याची प्रशंसा करणे क्र्म प्रात्प आहे.
ह्यावरून माझ्या एक लक्षत आलं की,निसर्गाने मला एव्हडं प्रबळ केलंय,आणि त्यातूनच मी आणखी एक शिकलो की,माझ्या अंतरात मी डोकावून पहावं आणि त्यातूनच मी सौंदर्य शोधून पहावं.”
श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)

हे आयुष्या!

(अनुवाद)

हे आयुष्या! करशील जरा मजला खुळा
मीच स्वत: घाबरलेला आहे वेंधळा

कुठुन कुठे घेऊन आली
ही लोभस अभिलाषा
पुजीले मी जिला
तिच जहाली एक छाया
अंतरातल्या चुकीने लज्जीत केले मला
हे आयुष्या! करशील जरा मजला खुळा
मीच स्वत: घाबरलेला आहे वेंधळा

विचीत्र आनंदाच्या स्वप्नात हरवून गेलो
अनोख्या चीर निद्रेत झोपून गेलो
नयन खुलताच मी अचंबूनी थरारलो
हे आयुष्या! करशील जरा मजला खुळा
मीच स्वत: घाबरलेला आहे वेंधळा

श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)

सुगंधाचा परिमळ तूच पुरविशी आसमंताला

(अनुवाद)
काय सांगू काय अंतरी फलित
होईल तुझ्या येण्याचे
माझ्या मनावर माझ्या स्वत:वर
कसा लगाम ठेवण्याचे

चारही दिशामधे तूच येतेस नजरेला
सुगंधाचा परिमळ तूच पुरविशी आसमंताला

तुझ्या मोहकतेचे दृश्य दीपविते चारही दिशेला
असे भासे जणू स्पर्श जाहला चंद्र्माला

तुझ्या मनोहर दृष्टीक्षेपाचा दिलासा मिळाला
माझ्या पापणीवर काजवे लागले चमकायाला

श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)

डोलणारे आकाश

(अनुवाद)

डोल डोलणार्‍या पाहूनी गगनाकडे
ऊगवेल शशिकांत असे वाटते
झिलमीलणारे पाहूनी तारे
अंबरही डोलू लागले

कुणी न पाहतो नभाकडे
पाहतो ऊगवलेल्या चंद्राकडे
पहातील सारे ऊगवत्या चंद्राकडे
कुणी न पाहतो गगनाकडे

फुलें फुलली नसता
बाग कशी बहरावी
वात तेवत नसतां
दूर होईल कशी काळोखी
तू दिसतेस मोहक चंद्रापुढे
निकट येशील जरा माझ्यापुढे
रजनीनाथ अस्ताला जाई जोवरी
समीप माझ्या तू रहा तोवरी

श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)

संसार

(अनुवाद)

संसार भासे जणू एक सरिता
दु:ख सुख भासे जणू दोन किनारे
कोण जाणे कसला हा प्रवास
आहोत फक्त आपण वाहते झरे

आक्रमत्या जीवनाच्या वेगामधे
असे एक लय
रागामधे सूरामधे संसार
असे एक शय

तारकांच्या समुहामधे असतो
सराव चंद्रमा आणि चांदण्याचा
धरती वरती अंबराच्या नेत्रातूनी
कोसळती धारा श्रावणाच्या

एके दिनी थेंब पावसाचे
बनतील मेघ पुन्हा
बनणे घडणे ह्याच सार्‍या
असती संसाराच्या प्रथा

कुणी कुणाचा कधी नसतो
परक्या जवळच्या नात्यात
नात्यांच्या ऊजेडात प्रत्येक
असतो सावलीच्या रुपात

दैवाचे हे खेळ असती
अगदी जुने पुराणे
असेल का ज्याने कुणी
धैर्य केले पाप करणे

न बोचता काटा
गुलाब कुणी खुडले
कोण आहे निष्पाप अद्यापी
सर्वच आहेत इथे पापी
श्रीकृष्ण सामंत(सॅन होझे कॅलिफोरनीया)

विनायक आणि मी.

“मानवतेवर प्रेम करणारे लोक मानवतेत बदल आणू पहात नसावेत.ते लोक स्वतःमधे बदल आणू पहात असतात.”…मी विनायकाला म्हणालो.

विनायक आणि माझ्यात नेहमीच वाद,अर्थात प्रेमळ,वाद होत असतात.आणि त्यासाठी एखादा विषय शोधून काढावा लागत नाही.ते उस्फुर्तपणे होतं.काल असंच झालं.मला विनायक म्हणाला,
“आपल्याला काय वाटतं आणि आपण कसला विचार करतो ह्यामधे फरक करणं खरोखर जरा कठीण आहे.माझा असा समज आहे की,मला जे काही वाटतं त्यामधे माझी श्रध्दा एव्हडी प्रचंड असते की त्या श्रध्देशी मी प्रतारणा करूच शकत नाही.मग कोणतीही परिस्थिती येवो अथवा कोणताही प्रसंग येवो.
अशी एक उक्ति आहे की,
“प्रत्येकाला दिवसभरात दुःख आणि वेदनांनचं आणि वाईट गोष्टींच भरपूर ओझं वाहून न्यावं लागत असतं परंतु,निर्विवाद नैतिकता हिच आहे की त्यात आपण आणखी भर घालू नये”

विनायकने दिलेलं उक्तिचं उदाहरण मला आवडलं.मी त्याला म्हणालो,
“मी जेव्हड्या म्हणून लोकांशी संबंधात असतो,जे सदैव असंतोषजनक असतात, म्हणजे ते स्वतःशीच असंतोषजनक असतात आणि इतरांशी ही असतात, असे लोक,ह्या लोकांना भूतकाळाबद्दल काहीच माहित नसतं ,भविष्यकाळाबद्दल ते अत्यंत आतुर असतात आणि वर्तमानकाळाशी सामोरं जाणं ते पूर्णतः टाळतात. माझ्या एक लक्षात येतंय की,ह्या क्षणाला नक्कीच काय घडत आहे हे मला माहित असावं.जगात दुसरीकडे म्हणजे जगात काय राजकारण चाललं आहे किंवा समाजात काय चालंय हे समजण्यासाठी मला वेळ दवडावावा असं वाटत नाही.माझं म्हणणं असं मुळीच नाही की त्या गोष्टीशी माझं काहिच देणं घेणं नाही. अर्थात मला देणं घेणं आहे.परंतु,हे सर्व मान्य असेल जेव्हा मला आत्ता काय होत आहे हे माहित करून घेऊन आणि ते नीटपणे समजून घेऊन त्याचं मुल्यांकन करून घेऊन मगच ज्या जगात मी आहे त्या जगात आणखी काही समजण्यासाठी मी प्रयत्नात रहावं.

हे अतिमहत्वाचं आहे की,आजच्या दिवसात तरी मी पूर्णपणे आणि जेव्हडं मला जमेल तेव्हडं रहाण्याच्या प्रयत्नात असलं पाहिजे.माणसाच्या अंगी असलेलं प्रयास करण्याचं सामर्थ्य भविष्यात काय घडणार त्याचं अनुमान करण्यात आणि योजना आखण्य़ात एव्हडं वाया जातं की ते विचाराच्या पलिकडचं झाल्यासारखं वाटतं.
खरोखरंच काही लोक नेहमीच स्वतःला ओलांडून भविष्यात जगत असतात आणि हे ही जरा काल्पनिक वाटतं.”

माझं हे ऐकून विनायक मला म्हणाला,
“मला असं वाटतं की,दुसर्‍या व्यक्तीवर प्रेम करण्यापलीकडे आपण काहीही करू शकत नाही.अर्थात हा ही प्रयत्नच असतो.एक महत्वाची गोष्ट अशी आहे की,दुसर्‍या व्यक्तीत जेव्हडा बदल व्हावासा वाटत असेल तेव्हडा त्या व्यक्तीचा तिरस्कार करायला हवा.माणसाच्या अंगात,म्हणजेच दुसर्‍या व्यक्तीच्या अंगात, असलेल्या न आवडणार्‍या गोष्टीबद्दल आपल्याला अगोदरच संकेत काढता येतो. पण मात्र कोणत्याही दुसर्‍या व्यक्तीला,जे नेहमी म्हणतात तसं, सुधारण्याचा मी प्रयत्न करणार नाही.कारण,पूर्वी मला दिसलेला जसा तो होता त्याने मी मोहित झालेलो होतो.त्यामुळे तसं करणं म्हणजे एक प्रकारचा भ्याड दांभिक असण्याचा प्रकार होईल म्हणजेच खर्‍या जबाबदारीपासून पळवाट काढल्यासारखं होईल.माणसाने दुसर्‍या व्यक्तीत बदल आणण्यासाठी नेहमीच प्रयत्न केले आहेत.आणि तसे तो करीतही रहाणार आहे.परंतु मला वाटतं, जरूरी
भासल्यास तसा प्रयत्न केलाही जावा.”
वादाची समाप्ती करताना मी विनायकला म्हणालो,
“आपण मोहित झालेल्या व्यक्तिचपण सुंदर होण्यासाठी बदल करण्य़ात प्रयत्न करीत असतो हे तुझं बोलणं ऐकून,ह्यावेळी मला त्या शास्त्रज्ञाची आठवण येते.त्याने एका सुंदर दिसणार्‍या फुलात आणखी सुंदर ते दिसावं म्हणून बदल करण्याचा प्रयत्न केला.त्यासाठी आपलं पुरं आयुष्य भरीस घातलं नाही.ते फुल अगोदरच सुंदर असल्याने थोडसं आणखी सुंदर दिसावं म्हणून थोडकाच प्रयत्न केला.कारण ते फुल मुळात सुंदर आहे हे त्याला भावलेलं होतं.मानवतेवर प्रेम करणारे लोक मानवतेत बदल आणू पहात नसावेत.ते लोक स्वतःमधे बदल आणू पहात असतात.त्यांना त्यांच्या शेजार्‍यांवर प्रेम करावं असं वाटत असतं ते जरी कठीण असलं तरी ते जरका स्वतःवर, दुसर्‍या कुणीतरी प्रेम करावं, असं वाटून घेत असल्यास दुसर्‍यावर प्रेम करणं सहाजीकच सोपं जात असावं.

प्रामाणिकता मला भावते.नैतिकतेच्या दृष्टीने ते चांगलं आहे म्हणून नव्हे तर प्रामाणिक असणं सोपं असतं. स्वतःचीच जागा एखाद्याला माहित नसल्यास सर्व जीवन गोंधळलेलं केलं जाऊ शकतं.आणि त्याचं मुख्य कारण म्हणजे एकमेकावरचा विश्वास आभादीत असणं.ह्यामुळे मला वाटतं, दुसरा प्रामाणिक आहे हे समजणं सोपं जातं.मग त्याबद्दल खात्री असो वा नसो.”

श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)

विझशिल का वा जळशिल का

(अनुवाद)

वसशिल का नयनी माझ्या
स्वप्न माझे होशिल का

रंगवशिल का चेहरा माझा
जखम जरी दिसे ना का

एक आरसा तुटूनि गेला
खंत त्याचा करशिल का

एकट्या मला राहूदे एकटी
त् न येवोनि फरक होईल का

गंध दरवळे भोवति माझ्या
महक त्याची विसरशिल का

पहाण्यासाठी नसता कुणीही
विझशिल का वा जळशिल का

श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)

पायताना शिवाय

“अनवाणी असणं आणि त्याचे शारिरीक दृष्टीने काय फायदे ह्या विषयावर मी बरंच वाचन केलं आहे”…मधूसुदन

काही लोक स्वभावाने हट्टी असतात.ते त्यांच्या मनात आणतात ते तसं करतात.मला मधुसूदनाबद्दल म्हणायचंआहे.मी त्याला त्याच्या ह्या स्वभावाबद्दल बरेचदा म्हटलं आहे.पण त्याचं म्हणणंही मला पटतं.तो म्हणतो की,मी जो हट्टीपणा दाखवतो त्याने मी माझ्या जीवाला कष्टप्रद करतो.दुसर्‍याला ते कष्ट बघून सहन होत नसेल तर तो त्यांचा प्रश्न आहे.आणि मधुसूदन पुढे म्हणतो,
“नाहितरी आपल्या लोकांत न विचारलेला उपदेश देण्याची वृत्ती भारीच आहे.त्यामुळे माझ्यासारख्याचे ह्या लोकांबरोबर वाद होतात.आता हेच बघा,असं म्हणून मला मधुसूदन सांगू लागला,

जितकं जमेल तेव्हडं अनवाणी (अन-वहाणी) चालायला मला आवडतं.ह्या माझ्या वागण्याकडे लोक बघतात आणि मला बराच ओरडा खावा लागतो किंवा शहाणपण शिकून घ्यावं लागतं.सर्व तर्‍हेचे विनोद माझ्या ह्या अनवाणी चालण्याच्या प्रथेवर मला ऐकायला मिळाले आहेत.माझी खात्री आहे की हे जे लोक माझ्यावर विनोद करीत असतात तेच माझ्याशी मत्सर ठेवून वागतात.कारण त्यांना एव्हडं धारिष्ट नाही की त्यांनी स्वतःला त्या पायबंधनापासून मुक्त करणं त्यांना जमावं.

माझा जन्म पायतानाविना झाला आणि मी पायतानाशिवाय चालत होतो.मी माझ्या आईकडूनच ऐकलं होतं की माझ्या आईला लोक सांगायचे आणि पायतनाशिवाय चालण्याचा धोका दाखवून द्यायचे.म्हणायचे की जेव्हा मी शुझ घालायला चालू करीन तेव्हा मला ते शूझ घालून कसं चालायचं ते शिकावं लागेल.पण तसं काहीही घडलं नाही.मी सतत चालत असायचो.

मला ज्यावेळी मुलगी झाली,तेव्हा तिच्या पायात शूझ आहेत की नाहीत याची मी कधीच फिकीर केली नाही.शिवाय येव्हड्या लहान वयात तिला शुझ घेऊन पैसे कशाला वाया घालवायचे? ज्या परिस्थितीत ती जमिनीला पायच टेकवणार नसावी आणि अल्प कालावधीत ती बरीच मोठी होणारच आहे ना!

कोकणात मी पहिली आठ वर्ष राहिलो.शुझ शिवाय रहाण्याचा काळ शुझ घालून रहाण्यापेक्षा जास्त होता. आमच्या घरापासून मुख्य रस्त्यावर यायला जी पायवाट होती,जीला कोकणात पाणंद म्हणतात ती बरीच लांब होती.पाला पाचोळा पायाखाली चूर चूर आवाज करायचा आणि रस्ता दगड मातीने आच्छादलेला होता.रस्ता संपता संपता एक छोटासा पूल लागायचा.त्यानंतर आणखी दगड माती असायची.ही सर्व पायवाट दोन्ही बाजूच्या मळ्याच्या मधून जायची.शेवटी मोठा रस्ता यायचा.

पावसाळ्यात मजा यायची.चिखलातून जाताना पायाला लागलेला चिखल तळव्यांना आच्छादन द्यायचा.पायाची बोटं हलवून मधला चिखल मी साफ करायचो.बोटांना एकप्रकारचा व्यायमच व्हायचा.उन्हाने गरम झालेली पायवाट आणि पायाखाली मधूनच येणारा चिखल यामुळे तळव्यांना एकप्रकारचा गरम थंड स्पर्शाचा संयोग यायचा.
मळ्यातून चालत जाताना उघड्या तळव्यांना निराळाच स्पर्श जाणवायचा.गवतावरून चाल्यावर मऊ गालिच्याचा भास व्यायचा.ह्या सर्व आठवणी आल्यावर ही आठवणीतली स्पर्शज्ञानं जागृत होतात.

पण कोकणातून शहरात राहायला आल्यावर,मी अजून तसाच अनवाणी फिरायचो.मात्र ह्यावेळी रस्त्याच्या कडेवरच्या पायवाटीवरून फिरायचो.शहरातल्या माझ्या सर्व मित्रांचे पायाचे तळवे मात्र नाजुक असायचे.बिना शुझने ज्यावेळी ते रस्त्याच्या कडेने चालायाचे त्यावेळी हाय हुय करीत ते चालायचे ते पाहून मला हसूं यायचं. मी त्या वाटेवरून धाव घेत चालायचो आणि त्यांना तसं करायला जवळ जवळ आव्हानच द्यायचो.

ह्या लगतच्या पायवाटेचं जेव्हा नव्याने डांबरीकरण झालं ती वेळ मला आठवते.उन्हात चमकणारं असं डांबर मी प्रथमच पाहात होतो. ते किती गरम असावं हे मला जाणवत होतं.ह्या डांबरी थरातून मी अनवाणी कसा जाऊ शकेन ह्या बद्दल मी बराच साशंक होतो.तो काही एव्हडा चत्माकार होता अशातला भाग नव्हता पण मी त्या डांबरी थरावरून चाललो.मला किती भाजलं होतं हे मी कुणालाच सांगीतलं नाही.आणि ही शक्कल मी पुन्हा कधीच प्रयत्नात आणली नाही.अनवाणी म्हणा किंवा पायतान घालून म्हणा.

आता मी जसा मोठा होत चाललो आहे तसा मी पहात आहे की मी तेव्हडा अनवाणी नाही आहे.तरीसुद्धा माझ्या कचेरीत मी अनवाणी ही दिसेन.हळुहळू मी पायाने(माझे तळवे) नाजुक बनत चाललो आहे.अनवाणी असणं आणि त्याचे शारिरीक दृष्टीने काय फायदे ह्या विषयावर मी बरंच वाचन केलं आहे.ही शरिराबद्दलचीचिकित्सा मनात बाळगून पुढला काही काळ मला अनवाणी असण्याच्या परमसुखात रहायचं आहे”.
मधुसूदनने हे सांग्ण्यापूर्वी अगोदरच त्याच्या हट्टी स्वभावाची प्रस्तावना केली असल्याने मी त्याच्याबरोबर जास्त हुज्जत घातली नाही.
श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)

आदर: दिल्या घेतल्याचा.

“मला माझ्या लहानपणीच माझ्या मनावर बिंबवलं गेलेलं होतं की,दुसर्‍याचा सन्मान तसाच करा जसा तुमचा दुसर्‍यानी करावा असं तुम्हाला वाटतं.”…माझा मित्र राजेश.

एखादा मनुष्य जेव्हा खरोखरंच हवालदिल होतो तेव्हा तो अगदी खरं बोलण्याचा प्रयत्न करीत असतो.माझ्या ह्या म्ह्णण्याची प्रचिती त्या दिवशी आली जेव्हा राजेश माझा एक मित्र, असेच आम्ही गप्पा मारीत असताना आवर्जून मला सांगत होता.

“खरं म्हणजे,मला हे म्हणायला अंमळ अवघडच वाटतं की,मला एखादी गोष्ट भावते,आवडते.मग ती काहीही असो.माझ्या रोजच्या जीवनात घडणार्‍या घटनावर अंकित करण्यासाठी त्यांची मुल्य किंवा त्यावरचा माझा भाव प्रदर्शित करण्यात मला विशेष रुचि नाही. पण ती एक गोष्ट जिच्यावर माझा विश्वास आहे ती म्हणजे जसं एखादा पेरतो तसं ते उगवतं.

त्यामुळे आपल्याला आदर ह्वा असेल तर आपण दुसर्‍याचा आदर केला पाहिजे.लोकांनी इतर लोकांना अशा तर्‍हेने वागवलं पाहिजे की,त्यांना इतरानी,ते इतरांना वागवतात तसं, आपल्याला वागवावं असं वाटतं तसं.

मला आठवतं मी सहा वर्षाचा असेन.माझा धाकटा भाऊ चार वर्षाचा होता.मी त्याला नेहमीच चिडवायचो, त्याची गंमत करायचो.बर्‍याच वेळा मी त्याला नावं ठेवून बोलायचो.
आणि तो मग एखाद्या लहान बेबीसारखा रडायचा.हे असं दहा-पंधरा मिनीटं चालायचं.आणि नंतर माझे आई-वडील मधे येऊन मला ओरडायचे आणि तो रडला म्हणून माझी खरडपट्टी करायचे.एकदा तर माझे वडील माझी  खरडपट्टी काढून मला ओरडून म्हणाले की,
“तूला काही बोलता येत नसेल तर ठीक आहे,मुळीच काही बोलू नकोस.”
त्यावेळी माझ्या वडीलांचे शब्द माझ्या एका कानातून दुसर्‍या कानात गेले आणि बाहेर पडले.मी माझ्या भावाला चिडवत होतो.आणि मग तो रडायचा आणि मग माझी खरडपट्टी निघायची.कधी न संपणारं ते चक्र होतं.जेव्हा माझा भाऊ पाच वर्षाचा झाला तेव्हा तो माझी गंमत मी करीत होतो तशीच करायचा.मी खूपच संतापी व्हायचो.नंतर माझ्या लक्षात आलं की मी त्याला चिडवत असताना त्याला कसं वाटत असावं.

दुसर्‍या एकावेळी,मी माझ्या मित्रांनबरोबर क्रिकेट खेळत होतो.माझा जो सर्वात जीवलग मित्र होता तो कॅच पकडण्यात थोडा “ढिला” होता.माझे इतर मित्र त्याला नेहमीच “फुलपाखरं पकडणारा” म्हणून चिडवायचे.हा माझा मित्र कॅच करायचा पण अगदी शेवटी चेंडू त्याच्या हातून खाली पडायचा.बरेचवेळा त्याची ही ढिलाई तसं होण्यात कारणीभूत व्हयची.तो फारच खजिल व्हायचा.
एकदा तर त्याने जिंकून येण्याच्या संधीचा कॅच सोडला.खेळ संपल्यानंतर माझ्या ह्या इष्ट मित्राच्या भावनेची पर्वा न करता मी त्यालाच हसत सुटलो.माझा मित्र पूर्णपणे अपमानित झालेला मला दिसला.असंच कधी एकदा माझ्या हातून कॅच सुटला.आता ही त्याच्याकडून हसवून घेण्याची माझी पाळी होती.ती वेळ मी विसरणार नाही. प्रथमच माझ्या चांगलंच लक्षात आलं की,विधिलिखीत गोष्ट अतिशय दारूण असू शकते. आपल्या अंगावर उडलेला चिखल तितकाच घट्ट असतो.
माझ्याकडून हसण्याची क्रिया झाली ती माझ्या मित्राच्या झालेल्या भंबेरीतून आणि ते मी तसं करणं हे मला शोभा देणारं नव्हतं.जेव्हा माझा इष्ट मित्र मला हसताना ऐक्त होता त्यावेळी त्याचा चेहरा टॉमॅटो सारखा लालबुंद झाला होता.

माझ्या दैवाने सुद्धा मला सुकं सोडलं नाही. आणि माझ्या मित्राविरूद्ध हसण्याचा जो मी खड्डा खणला होता त्याच खड्यात मला बडवून माझ्या तोंडाला माझ्या दैवाने चिखल फासला होता.ही करणी तितकीच माझी मानखंडना करणारी होती.आणि शिवाय मी माझ्या मित्राचा मान ठेवला नाही आणि त्याने पण तसंच केलं. कदाचित माझ्याकडून तसं झालं नसतं तर त्याच्याकडूनही शेंगट्यास मेंगटं झालं नसतं.आणि माझं दैव माझ्याशी थोडं सौम्य असतं.

मला माझ्या लहानपणीच माझ्या मनावर बिंबवलं गेलेलं होतं की,दुसर्‍याचा सन्मान तसाच करा जसा तुमचा दुसर्‍यानी करावा असं तुम्हाला वाटतं.सन्मान ठेवण्यासाठी आपला समाज स्वतः भोवती फिरत असतो. सन्मान नसेल तर सर्व फुकट आहे.असेल तर सर्व काही आहे.म्हणूनच म्हणतात,
“जग हे दिल्या घेतल्याचे.”

श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)