मांडकुली एक खेडेगांव

दक्शिण कोकणांत मांडकुली म्हणून एक खेडेगांव आहे.ते बर्याच लोकानी पाहीले नसावे.मी पाहू शकलो कारण माझी मावशी तिथे रहाते.वेंगुर्ल्याहून ऊत्तरेकडे सावंतवाडीच्या दिशेने गेल्यास वाटेत छोटी छोटी गांवे लागतात.कुडाळला न जाता बिबवण्या गावाच्या पूर्वेला जात राहील्यास वाटेत करली नावाची नदी लागते.पावसाळ्यात ही नदी तुडूंब वाहत असेते.मात्र ऊन्हाळ्यात ह्या नदीत पाण्याचे दुर्भीक्श असते.प्रवासाच्या मार्गात एखाद दुसरे पाण्याचे डबके दिसते.

उन्हाळ्यात शेती करणारे काही शेतकरी ह्या असल्या डबक्यातून पाण्याचा उपसा करून शेताला पाणी द्यायचे.ईलेक्ट्रीक पंप येण्यापूर्वी कोळंब्याने पाण्याचा उपसा करायचे.एका लांबच लांब उंच झाडाच्या खोडाची कमान बनवून एका टोकाला जड दगडाची रास बांधून दुसर्या टोकाला उभी लांब बांबूची काठी बांधून त्या बांबूच्या दुसर्या टोकाला कोळंबे लटकत राहील असे बांधायचे किंवा चामड्याची पखाल बांधायची.

आणि ही सर्व योजना दुसर्या एका गोल लाकडाला आडवे ठेउन दोन बाजुला आधार दिल्यावर त्याच्या मध्यभागी बांधल्यावर कोळंब्यावर बळेच पायाने ढकलून पाण्याचा उपसा करता येत असे.

बाबू मांडकुलकर पाहाटे पासून दुपारची तीरीप येयी पर्यंत पाण्याचा उपसा करायचा.घरून निघताना मडके भरून उकड्या तांदळाची पेज आणि फणसाची भाजी घेउन यायचा आणि दुपारच्या वेळी फस्त करायचा.एव्हांना तो अख्या शेताला पाणी पुर्वावयाचा.ईलेक्ट्रीक पंप आल्यावर हे सर्व सोपे झाले.तर अशी ही नदी पार करून शेताच्या पायवाटेवरून चालत चालत गेल्यावर दोन एक मैलावर मांडकुली गांव लागतो.वाटेत उंच उंच आंब्याची झाडं,करवंदाची झुडपं,उभी सोट जांभळाची झाडं,काळ्याभोर जांभळांचा झाडाखाली पडलेला सडा.तो तुडवीत जाताना पुढे गांवकरी (मांडकुलकर) राम राम म्हणत भेटायचे. “वेंगुर्ल्याचे चाकरमानी मावशीकडे पाहुणचार घेउक ईलेले दिसतंत” असे पुढे गेल्यावर आपआपसांत पुटपुटायचे.

रानातून चालताना पायाखाली कुरकुर करणार्या पाल्यापाचोळ्याचा आवाजांत हे त्याचे संवाद ऐकू यायचे.वेंगुर्ल्याहून पहाटे पहाटे निघाले तर मावशीच्या घरी चालत चालत  यायला सकाळचे आठ वाजायचे. तोपर्यंत घरची सगळी मंडळी चहा पिण्याच्या तयारीत असायचे.”आम्ही वेंगुर्ल्याहून ईलो रे”असे मालवणीत ओरडून सांगीतल्यावर मावशीच्या कानांत बरोबर शब्द पडायचे.आणि बहिणीची मुलें आल्याचे पाहून अगदी खूष व्हायची.मग त्यांच्या बरोबर गरम गरम बटाटे पोहे खात गप्पा व्हायच्या.

आमची मावस भावंडपण खूष व्हायची.मग त्यांच्या बरोबर गाईला आणि तिला अलिकडेच झालेल्या पाडसाला घेऊन शेतातल्या कुंणग्यातून वाट काढीत नदी वर जायचो.थंडगार नदीच्या पाण्यात पोहायला खूप मजा यायची.कधी कधी नदीतले मासे पकडणार्या लोकांकडून मासे “गुंजुले,बुरायाटे.कोलंबी” विकत घेऊन दुपारच्या जेवणाला मावशीकडे आणून द्यायचो.बरेच वेळेला घरातली मोठी मंडळी कुडाळला बाजार करायला जायची.कुडाळ तीन मैल लांब होते.चालत जायला मजा यायची.भाताच्या शेतातून जमीन तुडवत जाताना,कोवळ्या तांदळाच्या रोपाच्या तुरावरच्या कणसाचा वास अजून नाकात घुमतो.

कुडाळचा बाजार सर्व द्रुष्टीने भरलेला.बटाटे,टोम्य़ाटो,मोठ्या ढबू मिरच्या आंणि जमल्यास मोठी मासळी “सरंगे,ईसवण,मोरी,बांगडे यापैकी काही आणायला मावशी सांगायची.भरपूर नारळाचा रस घालून आंबट,तीखट तीखले किंवा आमटी करण्यात मावशीचा हातखंडा.कुडाळहून चालत तीन मैल आल्यावर तसं दमायला व्हायचे.पण मावशीच्या हातचे सुग्रास जेवण जेवल्यावर अशी काय झोप यायची ती चहाला उठा म्हणून मावशीच्याच मोठ्या आवाजाने जाग यायची.

संध्याकाळचा काळोख पडल्यावर मिणमिणत्या दिव्यात रात्रीचे किती वाजले ते कळ्त नसत.दुसर्या दिवशी काका बरोबर कवडे मारण्याच्या मोहीम वर जायला मजा यायची.काकांची छेरे वाली डबल ब्यारलची बंदुक हे मोठे आकर्षण असायचे.रानात फिरता फिरता उंच उंच झाडावरचे पांच सहा कवडे काका अचूक टिपायचे.लहानपणी ह्या निरप्राध पक्शाना मारण्याच्या ह्या    क्रुर खेळाबद्दल दयेचा पाझर फुटत नव्ह्ता.त्यात गैर काय ते आता कळल्यावर वाईट वाटते.

कधी तरी रानात जाऊन करवंदे,जांभळे,बोंडू,कैर्या आणून त्याची करमट करून खायला मजा यायची.दुसर्या दिवशी चहा झाल्यावर दुपारी दहा वाजतां उकड्या तांदळाची पेज वालीची भाजी त्याबरोबर खोबर्याची कातळी असा दुसरा ब्रेकफास्ट असायचा.ऊकड्या तांदळाचा पेजेचा नीवळ गोड आणि पोषटीक असायचा.असा आठवडा कधीच निघून जायचा.परत वेंगुर्ल्याला जायचे दिवस आले की आम्हाला आणि मावशीला खूप वाईट वाटायचे.अगदी निघण्याच्या घटकेपर्यंत डोळे पुसत पुसत घराच्या मागे आम्ही दिसे न दिसे पर्यंत ती उभी असायची आम्ही पण तिला मागे वळून पहात हाताने घरात परत जा म्हणून डोळे पुसत खूणवत असूं.पुन्हा तेच भाताचे कुणगे तुडवत तुडवत परतीच्या वाटेला लागत असूं.अर्ध्या मार्गावर पोहोचल्यावर मावशीची आठवण पुसट पुसट व्हायची आणि आई आता लवकरच दिसणार म्हणून आई डोळ्या समोर यायची.दुपार पर्यंत वेंगुर्ल्याला पोहोचायचो.आठ दिवसाच्या विरहाने कष्टी झालेली आई आमचे गोड कौतुक करायची. त्याने आम्ही ही सुखावयाचो.रात्री शांत झोपल्यावर स्वपनात मांडकुली,ते घर आणि मावशी यायची.आणि खडबडून जाग आल्यावर ते स्वप्न होते याचे वाईट वाटायचे.

                                              श्रीकृष्ण सामंत (स्यान होझे कॅलिफोरनीया)

Advertisements

टिप्पणी नोंदवा

Required fields are marked *

*
*

%d bloggers like this: