माझं आजोळ आजगांव

माझं आजोळ आजगांव

माझं आजोळ आजगांवचं.वेंगुर्ल्यापासून आजगांव साधारण दहा मैलांच्या आंत.आम्ही उन्हाळ्याच्या सुट्टीत नेहमी आजोळी जात असू.पहाटे उठून आई वाटेत खाण्यासाठी डब्बा द्यायची.उकडलेल्या बटाट्याची भाजी,पुऱ्या,लसणीची खोबरं घालून चटणी,थोडी वेलची पिवळी केळी.आणि फिर्कीच्या तांब्यात विहीरीचे थंडगार पाणी,असा थाट असायचा.
पहाटे पहाटे निघताना हवा थंड असायची.त्यामुळे सुरवातीचा प्रवास झपाट्याने व्हायचा.
वेंगुर्ल्याच्या बाजारातून वाट काढत निघताना जरा अड्चण यायची,कारण इतक्या पहाटे आजूबाजूच्या गांवातून बरेचशी मंडळी विक्रीसाठी माल घेऊन येत असल्याने चांगली जागा मिळण्य़ासाठी चूरशीत असायची.
बाजारातली चहाची दूकाने अगोदरच उघडलेली असायची.साजूक शिऱ्याची,चवळीच्या खमंगदार उसळीची,कोवळे ओले काजूगर घालून केलेली मसालेदार भाजीची आणि गाईचे दूध घालून dust पावडरीचा उकळण्याऱ्या चहाचा भपकारा अजून नाकातून वांस विसरत नाही.
काळोख संपून सुर्योदय होण्यापुर्वी आमची वाट तेरेखोलच्या घाटीची चढण चालू होण्यापर्यंत मजल गाठायची. तेरेखोलच्या घाटीची महती अशी की गोवामुक्ती संग्रामाच्या वेळी ह्याच घाटीतून गोव्याच्या पणजी गावात स्वातंत्र्य सैनीकांच्या एका तुकडीने मजल मारली होती.ही घाटी तिनएक मैलाची असावी.घाटीच्या माथ्यावर पोहचल्यावर थंड हवेची झोत अंगावरून गेल्यावर घाटी चढण्याचे सर्व श्रम पार निघून जायचे.घाटीच्या माथ्यावर काही धोरणी लोकानी विश्रांतीसाठी बैठकवजा एक चवथरा बांधलाहोता.त्याच्या वर उभं राहून लांब नजर लावून पाहिल्यास खाली खोल तेरेखोल नदीचे पात्र दिसायचं.काळ्या निळ्याभोर पाण्यात काही होड्या,काही खपाटे,आणि काही मालवाहू गलबते दिसायची.नाराळाच्या झाडांची खच्चून लागलेली नदी किनाऱ्यावरची  बाग वरून पाहून पृथ्वी वर जणूं स्वर्गच पहातो काय असा अत्यंत सुदंर देखावा दिसायचा. घाटी उतरून खाली आल्यावर तेरेखोल नदीच्या अल्याड कडून पल्याड कडे जायला होड्या असायच्या.पलीकडे तेरेखोल ते शिरोडयाला जायला मोटार सर्विस उभीअसयची.ते पांच सात मैल चालून जायला जरा कठीण होत असल्याने आणि मोटारने गेल्यामुळे आजोळी दुपारच्या जेवण्याच्या बेताने जायचे असल्याने तसं करणं जास्त संयुक्तीक वाटायचं.

होड्या नदी पार करायला माणशी चार आणे त्यावेळी घ्यायच्या.आठ दहा मंडळी आणि त्यांचे बोजेवजा सामान घेऊन होडी नदी पार करायची.कधी होडीत बसल्यावर मध्यनदीत होडीतून बाहेर हात काढून पाण्यात सोडल्यास छोटे,छोटे मासे हाताला चावा घ्यायचे त्याची खूप गम्मत यायची.

शिरोड्या गांवात सर्व्हीस पोहोचायला दुपारचे अकरा वाजायचे.गाडीतून उतरल्यावर आजगावात जायला आणखी दीड एक मैलाची पायी रपेट असायची.शिरोड्याच्या बाजारातून जाताना वालीच्या पेंड्या, न चूकता नेल्याने मामी दुसऱ्या दिवशी पेजे वरोबर भाजी करायला विसरत नसे. तो पर्यंत मामा मासळी बाजारातून आमच्यासाठी सुरमई,सरंगा आणि कर्ली घेऊन यायचा. मामी थोडे मासे दूपारच्या जेवणासाठी आणि थोडे रात्रीच्या जेवणासाठी ठेवायची.
शिरोड्या गावाची महती अशी की प्रसिद्ध लेखक आणि ज्ञानपीठ award चे मानकरी वि.स.खांडेकर यांचं हे जन्मस्थळ. आजोळी आजगांवला जाण्याच्या वाटेवर त्यांच घर दिसतं.त्याची आठवण काडून ह्या घ्रराला भेट देणारे बरेच लोक नेहमीच इकडे दिसतात.
क्षणभर उभं राहून त्यांच स्मरण करणारे लोक पाहून खूप बरं वाटतं.

आम्हाला बघून मामेभावंड खूप खूश व्हायची.आजी,आजोबा सर्वांची चवकशी करायची.या सर्वांना वाकून नमस्कार केल्याने धन्य वाटायचं.रात्री मिणंमिणत्या दिव्यात बाहेरच्या ओटीवर बसून डोळ्यात झोप पेंगे पर्यंत गप्पा चालायच्या.वरती माडीवर अंथरूणं घातलेली असायची. हारोहार एका मागून एक भावंड एकमेकाला लागून झोपायची.

पहिल्या दिवशी थोडा पायी आणि थोडा गाडीतून झालेल्या प्रवासाने शीण आलेला असल्याने झोप पटकन यायची.पहाटे पहाटे आजी किंवा आजोवा येऊन अंगावरचे पांघरूण सरळ करायचे,किती प्रेम किती आस्था त्याची आता आठवण येऊन त्यांच्या बद्दलचा आदर द्विगुणीत होतो.

सकाळी उठून चहा पाणी झाल्यावर आजी दगडू म्हारा वरोबर खालच्या माडाच्या बनात जाऊन आमच्यासाठी कोवळी शहाळी काढून आम्हाला द्यायला सांगायची.”या महार वाड्यात असलेलं बन नाही तरी तिकडची स्थाईक वस्ती एकही फळ आमच्या तोंडाला लावू देत नाहीत” असे आजी तक्रार करायची. “त्यामुळे शहाळी काढून तरी त्याचा उपयोग करून घेऊया.नाहीपेक्षा नारळाला बाजारात खूप किंमत येते.”असे पूढे म्हणायची.शहाळं म्हणजे नारळाच कोवळं फळ.पुर्ण नारळ होण्यापूर्वी काढण्यातनुकसानी होते हे मला नंतर कळलं.

सकाळी दहाच्या सुमारास पेज आणि फणसाची भाजी,आणि त्याबरोबर मधूनच खोबऱ्याची कातळी.फणसाची भाजी ही अर्ध्या पिकलेल्या आणि अर्ध्या कच्या फळाची करायची असते.नाहीतर त्याच्या पुर्वी केल्यास अगदी कोवळ्या फणसाची भाजीकरतात.त्याला फणसाच्या कुवऱ्याची भाजी म्हणतात.ती पण चवदार लागते.
फणसाची भाजी,खोबऱ्याची कातळी,आणि पेज हे combination अप्रतीम लागतं.नाहीतर दुसरं म्हणजे पेज आणि वालीची  भाजी.ह्याच्यात पण खाताना मजा येते.

आजोळच्या वाड्याच्या भोंवती फेरफटका मारल्यावर निसर्गाच्या  निर्मीतीची अशी मजा चाखता येते कि विचारूं नका.सभोंवती मोठ्या मोठ्या फणसाची झाडं,आजूबाजूला हापूस आंब्याची कलमं,करवंदाच्या झाडांची झुडपं,जांभळांच्या झाडांची उंच उंच रानं,त्यावर टोपोरी गडद जांभळी जांभळं एक दगड मारून टोपलीभर फळं खाली पडायची ती तिथेच उचलून खायाला मजा यायची.पुर्ण पिकलेलं जांभूळ खाली पड्ल्यावर नक्कीच थोडी माती चिकटून घ्यायचं पण ती माती हाताने वेगळी करून खाण्याचा हव्यासापुढे पुस्तकी स्वच्छ्तेचे धडे अपुरे पडायचे.जांभळे म्हणे diabetes असणाऱ्या प्रक्रुतीला  बरी हे आत्ता आमच्या वाचनांत आलं.

फुलांचा विषयच नको. कारण फुलांविषयी किती म्हणून लिहाल? किती तऱ्हेची फुलं कोकणांत असतात म्हणून सांगू?साध्या चाफ्याच्या तरी किती जाती. पांढरा चाफा,सोन चाफा,हिरवा चाफा,पिवळा चाफा,कवटी चाफा,नाग चाफा,नाग चाफयाला तर एव्हडा सुगंधी वास की नको त्या ठिकाणाहून माश्या गोळा होवून फुला भोंवती भूंग्या सारख्या गुजन करीत रहायच्या.खरं म्हणजे त्यांच्या फुलाभोंवतीच फिरण्याने त्यांच्या पंखाचा आवाज गुंजन कसं वाटायचं.त्यानंतरआणखीफूलंम्हणजेओवळं,सुरंगी,लालआबोली,

मोगरा वगैरे.ओवळ्याची फूलं वेली वरून जमिनीवर पडतात आणि ती वेचावी लागतात.ओंजळभर फूलं हातात घेऊन वास घेतल्यास Elizabeth perfume सुद्धा मागे पडेल. केवड्याच्या फूलाची तर एव्हडी मह्ती आहे की म्हणतात ह्या फूलाच्या झुडपात सापाचे वास्तव्य असतं.ते त्या फुलाच्या वासामुळे की अन्य काही कारण आहे हे मात्र कळलं नाही.

रोज संध्याकाळी मग जवळ्च्या डोंगरात फिरायला जायचा कार्यक्र्म असायचा.डोंगर चढून वर गेल्यावर करवंदाच्या झुडपातून करवंदं जमवून खाणं किंवा काजूच्या झुडपातून रंगीबेरंगी बोंडू काढून खाणं आणि काजूच्या बिया जमवून मग कधीतरी आगीच्या धगीत भाजून आतला काजू काडून खाण्याच्या प्रयत्नात बोटं काळी करून घेणं असे कार्यक्रम असायचे.करवंद खाताना एक एक करवंद उष्टं करून तसं करण्यापुर्वी कोंबडा की कोंबडी असा game खेळायचो.लालबूंद असेल तर कोंबडा नाहीतर कोंबडी असा खेळ असायचा.जो हरेल त्याने, आपल्याकडचं करवंद जिंकणाऱ्याला द्यायचं.

करता,करता वेळ आणि दिवस निघून जायचे,आणि आजोळ सोडून परत घरी जायला अगदी जीवावर यायचं.आजी आजोबांच्या डोळ्यात पाणी आलेले पाहून खूप वाईट वाटायचं.जाता जाता ते म्हणायचे ” यारे परत पुढ्च्या वर्षी.आम्ही काय आता पिकलीपानं” आणि त्याचं पुढ्चं वाक्य ऐकण्या पुर्वी आम्ही कानावर हात ठेवून पळत सुटायचो.

                        श्रीकृष्ण सामंत (स्यान होझे कॅलिफोरनीया)

shrikrishnas@gmail.com
 

Advertisements

टिप्पणी नोंदवा

Required fields are marked *

*
*

%d bloggers like this: