भास्करभाऊ

भास्करभाऊ
शिवराम सखाराम प्रभू (आजगांवकर) ऊर्फ भाऊ आजगांवकर हे माझ्या आईचे लांबचे भाऊ.आईच्या माहेरी त्यांच्या राहात्या घराच्या आजूबाजूला पण बरीच घरे होती त्यातपण अनेक आजगांवकर राहात.त्यापैकी हे एक आणि त्यांचेच नातेवाईक समजले जाते एव्हडेच.
आईच्या वडिलानी तिला त्यावेळी(१९३०) तिन हजार रुपये वेंगुर्ल्यात घर घेण्यासाठी दिले होते त्यात भर म्हणून आपले हजार रुपये घालून एका सोनाराचे “गहाणवट”घर घेऊन दुरुस्थी करून घेऊन ती ते वापरत होती.पण ज्यावेळी मुंबईला जाऊन राहाण्याची जरूरी भासली तेव्हा हे घर तिने ह्या भास्करभाऊ जवळ भाड्याने दिले होते,रिकामे ठेवण्यापेक्षा कुणी तरी वापरात ठेवलेले बरे हा तिचा उद्देश होता.
हे भास्करभाऊ त्यावेळी वेंगुर्ल्याला “गुंडू नारायण जोशी आणि कंपनी घाऊक व्यापारी ” यांच्या कंपनीत कारकून म्हणून काम करीत होते.ही पेढी मारुतीच्या मंदिरा जवळ होती आणि त्यांच्या राहात्या घ्ररापासून पांच मिनीटाच्या पायी जाण्याच्या मार्गारावर होती.
भास्करभाऊ सकाळचा दिनक्रम आटोपून आठच्या दर्म्यान कामावर जात ते रात्री दिवेलागण्याच्या वेळी घरी परत येत. मध्यंतरी दुपारी जेवण्यासाठी येत ते दुपारचा चहा वगैरे घेऊन, वामकुक्षी घेऊन परत जात.
खाली पांढरे धोतर(सुरवातीला नवे असताना ते पांढरे शुभ्र असायचे पण नंतर वेंगुर्ल्याच्या लाल मातीच्या रस्त्यावर हे धोतर पुर्वी पांढरे होते हे सांगण्यासारखे व्ह्यायचे.) पायांत समोरच्याच चांभारवाड्यातून स्वतःसाठी माप देऊन करून घेतलेले चांबड्याचे चप्पल (पायतान म्हणायचे) वर एक पांढरा खादीचा सदरा,त्यावर एक कोट वजा ज्याकेट आणि वर एक पांढरी”गांधी”टोपी.टोपीच्या रंगाची कथापण धोतरासारखीच.
 गुंडू जोश्य़ांची पेढी राहात्या घ्रराच्या पुढल्या पडवीत स्थापलेली होती.पेढीच्या मागे जोश्यांची पत्नी ,मुलगी सुशिला( तिला बायजा पण म्हणत)आणि स्वतः मालक जोशी राहात.पेढीच्या सजावटीत जोश्यांची स्वतःची गादीवरची बैठक,पांढऱ्या शुभ्र गाद्या त्यासमोर लिहीण्याजोगे खणाचे चार खुराचे बैठकीचे टेबल,खणात शाईची दऊत,एकदोन लिहायला टांक, टेबलावर एका डबीत समुद्रावरची काळी वाळू, जीचा उपयोग लिहून झालेल्या अक्षरावर चिमूटभर काळी वाळू पेरल्यावर फुंकून टाकायची. चिकटलेल्या अक्षरावरची वाळू ते अक्षर सुकू द्यायचे.असे टेबल, गादीचे आणखी तिन सेट असायचे पैकी एक सेट भास्करभाऊंसाठी,दुसरा हरिपंत साळगांवकरांसाठी, हे गृहस्थ भास्करभाऊना senior होते,आणि कारकूनवजा मॅनेजर होते,आणि तिसरे टेबल spare म्हणून होते.
पेढी जमिनी पासून चार पाच फुट उंच होती. आणि खाली जमिनीवर पेढीवर चढण्यासाठी मध्यभागी चार पाच पायऱ्या होत्या आणि पायऱयाच्या दोन्हीबाजूलाशेंगदाण्याची,तोरीची गोण्यांची रास असायची.त्याशिवाय उरलेल्या जागेत गुळाच्या ढेपी रचून ठेवलेल्या असायच्या,आणि दुसऱ्या बाजूला गाई,म्हशीचे खुराक महणून ऊसाच्या चिपाटाबरोबर कढ्धान्यांचे तूस मिसळून तयार केलेल्या पेंढी असायच्या.हा सगळा माल विकण्यासाठी असायचा,रचून ठेवलेल्या गोण्यावर गडी माणसं कामाची वाट बघत बसून असायची. सतत उकाडा असल्याने हे गडी सदाचे उघडेच असायचे आणि खाली गुंडाळलेल्या धोतरावर कंबरेच्या भागावर “किंतान”गच्च बांधलेले असायचे,वजनदार गोण्या पाठीवर उचलून गिऱ्हाईकाच्या गाडीत टाकायला कंबर दुखू नये म्हणून जणूं belt सारखा उपयोग व्हायचा.  शिवाय घराच्या समोर रसत्याच्या पलिकडॆ दुकानाची वखार होती त्यात बेळगांवहून किंवा इतर घाटावरच्या गांवाहून मागवलेला असलाच माल सांठवून ठेवलेला असायचा.
भास्करभाऊ सकाळी घरून निघण्यापूर्वी नाष्टा म्हणून शिरा,पोहे,अथवा पाव चहात बुडवून खायचे.त्या साठी लिफ्टनचा चहा(चहाची पुड म्हणतात) आपल्यासाठी विकत आणायचे.बाकी घरातल्या मंडळीसाठी चहा नाही, “साखरपाणी”म्हणजे चहाची पावडर                                                                                                                                                                     उकळत्यापाण्यातन न टाकता साखरेचे उकळलेले पाणी चहाची तहान भागवण्यासाठी इतरानी प्यायचे.दाजी,गुरु,लिलू,शशी,आणि प्रभा अशी चार मुलं, आणि त्यांच्या पत्नीला आम्ही दाजीची आई असं म्हणायचो.
जी चहाची गोष्ट तिच आंघोळ करण्याबाबतची.भास्करभाऊ आघोळीला स्वतःचा वासाचा साबण वापरीत.हमाम,रेक्सोना,वा लक्स. ईतरानी मात्र साबू न लावता आंघोळ केली तर त्याना आवडेल.आणि लागल्यास लाईफबॉय त्या सर्वांनी वापरला तरी चालेल.

भास्करभाऊंची एक सायकल होती.तिच्यावर ते कमीच बसत.परंतु ती हातात धरून चालवल्या शिवाय त्यांना करमत नसे.पुढचा आणि मागचा मड्गार्ड लाल धुळीने माखलेला,दोन्ही चाकांचे स्पोक्स लाल झालेले आणि सीट सोडल्यास सायकलचा मुळचा रंग काळा होता हे आर्जवून सांगावे लागेल.चढावावर आणि उतारावर ते सायकलवरून उतरून हातात घेऊन चालवीत.कारण मागच्या आणि पुढच्या ब्रेकचा पत्ता नव्हता.घंटीचा तर पत्ताच नव्हता.कुणा एखाद्या दुकानासमोर त्याची सायकल कलंडून ठेवलेली असली तर भास्करभाऊ आत दुकानात आहेत हे निश्चीत समजा.विषेशकरून, दाजी आणि गुरूला, त्यांच्या दोन मुलाना, अवश्य कळायचे.वेंगुर्ल्याच्या बंदरावर जाताना मात्र ते सायकल अधून मधून वर बसून चालवीत असत.कारण ते बंदर त्यांच्या कर्मभुमी पासून चार पाच मैलावर होते.कंपनीचा ऑर्डर केलेला माल बोटीने बंदरावर अथवा गलबताने मांडवीवर आला असताना त्याना तिकडे जावे लागायचे.गुंडू जोश्यानी ते काम त्याच्यावर टाकले होते.
माझी आई त्याना महिन्याला तिन रुपये घरभाडे आकारायची.वर्षाचा हिशोब घेताना भास्करभाऊनी आईला छत्तीस रुपये कधीच दिले नाहीत.उलट आईने त्याना मागल्या पोरसातल्या चार माडाची नीगा ठेवण्यासाठी माडाचे ऊत्पन्न त्यानीच घ्यावे असे भाडेकरारात लिहून दिले होते.माडाची झावळी (चूड्त) घ्रराच्या कौलावर पडून कौले तुटूनयेत म्हणून तिला माडाच्या बुंध्याला बांधण्यासाठी लागणारी मोलमजुरी ते हिशोबात लावीत.कधी तरी वानरांचे टोळके घराघरावरून उड्या मारीत कौलावरून जाताना एक दोन कौले तुटली तरी त्याचे पैसे हिशोबात लावीत.पावसाळ्यात पन्हळ्या  गळ्त असल्यास तांबटा कडून सायडर (सॉल्डर) करून घेण्याची मजुरी पण हिशोबात लावीत.असे करता करता शेवटी वर्ष अखेर आईलाच त्यांना चार पाच रुपये द्यावे लागत.आम्ही गम्मतीत आईला म्हणायचो “आई भाडेकरूने मालकाला भाडे देण्याऐवजी मालकच भाडेकरूला पैसे देतो हा अजब न्याय आहे” त्यावर ती म्हणायची “जाऊं दे रे,घर संभाळतो हे खूप झालं.”

भास्करभाऊ जेव्हा खरोखरच थकले त्या अगोदर दोन तिन घटना झाल्या.एका वर्षी गुंडू जोशी खूप आजारी झाले.त्यांचा ताप एक दिवशी १०६फॅ.झाला.आमच्या शेजारीच असलेल्या कोटणीस हाऊस मधे (“डॉ. कोटणीस की अमर कहाणी” हे व्ही.शांताराम यानी काढलेल्या सिनेमाचे हिरो, डॉ.कोटणीसांचे हे घर.) डॉ.पंडीत  L.C.P.S म्हणून राहात.त्यांच्या सल्ल्याने गुंडू जोश्याना ताप खाली यावा म्हणून चक्क थंड पाण्याची आंघोळ घालण्याचा सल्ला दिला.ताप तर खाली उतरलाच पण नंतर जोश्याना डबल निमोनीया होवून ते वर गेले. त्यांची मुलगी बायजा ही व्हर्न्याक्युलर फायनल(व्ह.फा.) म्हणजे मराठी सातवी झाल्यावर, तिचे लग्न  श्री.तेंडुलकर M.Sc. यांच्या बरोबर झाले.एकुलती एक मुलगी असल्याने जांवयालाच सर्व मिळकत मिळणार म्हणून त्यानी बायजाशी लग्न केलं असं लोक म्हणत.पण दुर्दैवाने बायजा पण वडिल गेल्यानंतर एक वर्षाने गेल्री. कंपनीचा सर्व कारभार तेंडुलकरांकडे आला.

हरीपंत साळगांवकर त्याच दर्म्यान वृद्धपकालाने गेले.भास्करभाऊकडे सर्व जबाबदारी आली असे होता होता तेंडुलकरानी त्याना स्पष्ट्च सांगितले की”भास्करा, मला”सिस्टीमेटीक” काम हवंय,”म्हणजे काय ? म्हणून त्यानी विचारल्यावर “म्हणजे आठ ते पाच काम करायचे,मस्टर रोलवर सही करायची,अर्धा तास लंच,रवीवारी सुट्टी,बंदरावर गेल्यावर सर्व खर्चाचा मला हिशोब द्यायचा,वगैरे,वगैरे.” हे ऐकून भास्करभाऊना धक्काच बसला.त्यांना त्यांच्या भूतकाळाची आठवण झाली.वेळ नाही काळ नाही, हा वार नाही तो वार नाही, सकाळ नाही संध्याकाळ नाही, ईतके दिवस आपण झटून काम केले ते आता संपुष्टात आले आहे.उत्तम म्हणजे  निवृत्त व्हावे.आणि त्यादृष्टीने त्यानी निर्णय घेतला.

अधून मधून ते आपल्या गावी आजगांवला जाऊन घर बांधण्यात गुंतलेले होते.ते काम त्यानी हिरीरीने हाती घेतले.वेंगुर्ल्याला त्यानी रामराम ठोकून ते आजगावी  आपले सर्व बिऱ्हाड घेऊन गेले.
दाजी, त्यांचा मोठा मुलगा, जेमतेम शिकला,त्याला माझ्या आईने मुंबईला आणला आणि तो मुंबईच्या पोस्टात लागला.गुरु, त्यांचा दुसरा मुलगा, त्याला फोंड्याची मुलगी सांगून आली तो तिकडे RTO office मधे दलालाचे  काम करू लागला. लिलू वेडी झाली आणि एक दिवस वारली ,शशीचे लग्न झाले पण थोड्याच दिवसानी तिला नवऱ्याने टाकले, ती माहेरी आली आणि गावात भटकत राहिली आणि शेवटी तिचे काय झाले ते कळ्लेच नाही आणि धाकटी प्रभा लग्नाशिवायच राहिली.
भास्करभाऊ आणि दाजीची आई वार्धक्याने वारली.दाजी आता निवृत्त होवून आजगांवला येऊन राहिला आहे.जीवन चालले आहे.

जरासे चिंतन,
भास्करभाऊंसारखी बरीच कुटूंबे त्यावेळी जवळपास अशा प्रकारच्या जीवन शैलीत जगत राहिले.गरीबी,शिक्षणाची कमतरता,आहे त्यात समाधाने राहाण्याच्या प्रवृत्तीमुळे जीवनाच्या प्रवासात,संमीश्र दुःखानंदात जगले.पण स्वतःशी प्रामाणिक राहून ईतरांशी मिळून मिसळून जगले.

आता वेगुर्ल्याला तांबडे धुळीचे रस्ते जाऊन काळे डांबरी रस्ते दिसतात.बैलगाड्यांचा ताफा बंद होऊन ट्रकच्या रांगा दिसतात.शिक्षणाचा प्रसार झाल्याने गरीबी उताराला लागली आहे.रसत्यात तेलाचे जाऊन विजेचे उंच दिवे आले.
आणि
“गुंडू नारायण जोशी आणि कंपनी,घाऊक मालाचे व्यापारी”ही पाटी इंग्रजीत लिहीलेली दिसते.तसेच तेंडूलकरांच्या देखरेखीखाली, धोतर, गांधी टोपीचे कारकून जाऊन सुटाबुटाचे कारकून दुकानात दिसतात.बदल हा जीवनाचा स्थायीभाव आहे हेच खरे.

                   श्रीकृष्ण सामंत (स्यान होझे कॅलिफोरनीया)

shrikrishnas@gmail.com

Advertisements

टिप्पणी नोंदवा

Required fields are marked *

*
*

%d bloggers like this: