मला कविता होते

मला एक जुनं गाणं आठवतं.
“आम्ही दैवाचे दैवाचे
शेतकरी रे
करूं काम,स्मरूं नाम
मुखी नाम हरी रे”
त्याच कल्पनेने
“आम्ही काव्याचे काव्याचे
काव्यकरी रे
लिहूं काव्य,स्मरूं शब्द
मनी प्रेम प्रेम रे”
हे असं सांगताना कवी काय किंवा शेतकरी काय दोन्ही बिचारे स्वतःला कामात व्यग्र ठेऊन समाजाची सेवाच करत असतात म्हणाना.अर्थात एक पोट पुजेची सोय करतो तर दुसरा मनाच्या पुजेची सेवा करतो असं म्हणायला हरकत नाही.
अलिकडची तुलना विचारात घेतली तर कवी आणि computer programmer हे पण जवळ जवळ सारखेच.दोघेही निर्मीती करीत असतात.कवितेची कल्पना सारखी असली अथवा कवितेचा विषय सारखाच असला तरी दोन कवी तेच शब्द वापरून काव्य करतील असं नाही किंबहूना शेतकऱ्या सारखं “जशी मेहनत तसे फळ” तसंच ज्याच्या त्याच्या कल्पना चातुर्यावर final product होईल असं मला वाटतं.
computer programmer चं पण असंच.ती त्याची, त्याची निर्मीती असते.त्याने लिहीलेला program,दुसरा तसाच लिहील असं होऊच शकणार नाही.final product तेच असेल.
तर माझ्या बाबतीत काय आहे,की विषय डोक्यात घोळू लागला की,शब्द सरसावून पुढे येतात.आणि शब्द सुचायला लागले की मग राहवत नाही,ते उतरून काढल्याशिवाय चैनच पडत नाही.नऊ महिने संपल्यावर जशी एखादी बाई बाळंत होतेच,दोन चार दिवसइकडे तिकडे म्हणा,तसंच काहीसं कवितेच होतं.मग वाटतं की ही एक नैसर्गीक प्रक्रीया तर नसेल ना? एक मात्र नक्की.गद्यातून  सांगण्याएवजी पद्यातून म्हणजे कवितेतून सांगणं जास्त परिणाम कारक होऊन थोडक्यात सांगता येतं असं मला वाटतं.उदा.प्रे.बुशला तुझे राजकारण विषेश करून तुझे हे इराक war मला मुळीच आवडलेल नाही.हे सांगण्यासाठी मी रकानेच्या रकाने भरून लिहीले तरी माझी तृप्ती होणार नाही.तेच मी कवितेत असं लिहीलं.२००३ च्या मार्च मधे त्याने इराक वर युद्ध लाद्लं.

त्या वर्षाच्या December मधे X’mas ची वेळ होती त्यावेळी  मला ही कविता सुचली.

हे जॉर्ज डब्ल्यू बूश
मी तर आहे तुझ्यावर नाखूष
केलास तूं यवनांनच्या “ब्यागद्यादवर” हल्ला
आता ते सदैव म्हणू लागले “अल्ला अल्ला”

डब्ल्यू एम डी आणि ऍलिमिनीयम ट्यूब्स
हा सर्व होता तूझा बकवास
तुझ्या वडीलांच्या सूडाचा तूं ठेवलास
सूडबुद्धीचा अट्टाहास

क्लिन्ट्नने जाता जाता
दिले डॉलर्स  ट्रिलीयन
कपाळकरंट्या तुझ्या कारकीर्दीत
झाले ते नाईन ईलेवन
तिन ते चार हजार निरपरार्धी
जेथे गेले
त्याला तूं म्हणतोस हेवन

युद्ध करून प्रश्न कधीच नव्हते मिटले
व्हियेटनामच्या युध्दावरून तुला
ते कसे नाही पटले?

सोडून दे आता ही धुसफुस
आण तूं त्याठीकाणी पीस
ज्याला तूं म्हणतोस मिडिल ईस्ट

आज आहे जन्म त्याचा
ज्याला म्हणतात ख्रिस्ताचा जिसुस
स्मरून त्या देव दुताला
म्हणू आपण सर्व जगाला
मेरी ख्रिस्मस

ही कविता वाचणाऱ्याला माझ्या मनातला आशय कळायला वेळ लागणार नाही.त्याअगोदर ९/११ झाले.ते twin towers चे द्रुश्य पाहून मला एक कविता सुचली.ह्यांचे राजकारण चुकीचे झाल्याने जगाच्या विशेषकरून आतंकवाद्याच्या मनात खुपच खुन्नस निर्माण होऊन त्यानी हे कृत्य केलं.माझ्या दृष्टीने अमेरिका ही एक हत्ती समान असून हे एकोणीस मुंगळे ,आतंकवादी ,त्याच्या कानात शिरून त्याला हैराण करून त्याचे दोन सुळे ,twin towers . त्यानी मोडून टाकले अशी कल्पना करून ही कविता मला सुचली.

हत्तीची उतरली मस्ती.

एक होता गलेलठ्ठ हत्ती
त्याला झाली होती
आंसूरी मस्ती

समजायचा तो स्व्त:ला
अख्या जंगलाचा आपण राजा
छोटे मोठे शत्रु गेले रसातळाला
कुणी नाही मला आता
आव्हान द्यायला

राहीला तो अशा भ्रमांत
विश्वास होता त्याला
त्याच्या श्रमांत
बोलावीत राहीलाइ
 इतर प्राण्याना

गाफील राहीला तो
अशा घमेंडीत
उत्तर दक्शिण माझी
पूर्व पश्चिम माझी
गाफील मी रहाणार
माझे काय कोण करणार?

लहान लहान प्राणी आणि पक्षी
बसती त्याच्या लठ्ठ देहावर
करु लागले कट कारस्थान
मारुन तिथेच बस्थान

होते त्यात सफेद बगळे
आणि काळे कभीन्न कावळे
नवलाईची गोष्ट अशी की
होते त्यात एकोणीस
 हिरवे मुंगळे

असेच एकदा ह्त्तीने
फिरता फिरता जंगलात
तुडविले एक हिरव्या
मुंगळ्याचे वारुळ
सर्व मुंगळ्या बाहेर येऊन
करु लागले काहूर

त्यातल्या एकोणीस मुंगळ्यानी
केला एक कट
म्हणाले माजलेल्या हत्तीची
ऊधळूया सारी वठ

गाफिल हत्तीचा घेतला
त्यानी फायदा
त्याच्याच अंगावर
स्वैरपणे फिरुन
मोडला त्याचा कायदा

एकोणीस  हिरवे   मुंगळे
गेले कानाजवळ  सगळे
शिरताना त्याच्या कानात
मुद्दाम झाले वेगळे

कानात गेल्यावर
ते कडाडून चावले
संतापलेला ह्त्ती
झाला सैरभैर

झाडे तोडू लागला
फांद्या मोडू लागला
मुंगळ्याना माहीत होते
असल्या वागण्यामुळे
तुटणार आहेत
त्याचे दोन
दिमाखी सुळे(ट्वीन टॉवर्स)

अगदी तसेच झाले
तुटले त्याचे दोनही सुळे
मुंग्याना वाटत होते
काही नसे त्यात आगळे
न जाता कुणाच्या वाटेला
शांती येऊ दे पूरया जंगलाला

कवी पाडगांवकरनी आपल्या एका कवितेत म्हटलं आहे,त्यात जरा फरक करून मी म्हणेन
“आपली कविता अशी असली पाहीजे
असं आपल्यावर कुणाचं बंधन नसतं
आपली कविता तशी असली पाहीजे
असंही आपल्यावर कुणाचं बंधन नसतं”
“तुमचं आणि आमचं जेव्हा मत जुळतं
तेव्हा आपल्या कवितेचं मर्म आपल्याला कळतं”

विषय कुठलाही एकदा डोक्यात आल्यावर शब्द जुळत जातात.कविता लिहून झाल्यावर असं वाटतं एव्हड्या मराठीच्या शब्दभांडारामधून मोजकेच आणि अर्थाला धरून हे शब्द कसे जुळून जातात.
सकाळ,दुपार,संध्याकाळ,दिवस,रात्र,सूर्य,पृथ्वी,काळ,वेळ ह्या गोष्टी आपल्य रोजच्या परिचयात येतात पण त्या एकमेकाशी बोलून कसा संवाद निर्मीती करतात ह्याच एक वानगी दाखल उदाहरण म्हणून खालील कविता मला एकदा सुचली ते पहा.

कालाय तस्मै नम:

सकाळ म्हणाली दुपारला
ही संध्याकाळ,
रोज कुजबुजत असते काळोखाशी
हे एकून,
दुपार सांगे तिला (सकाळला)
घेऊन तूं पण जाशी की
पहाटेला, रोज फिरायला
अन,
देई निरोप तुला ती (पहाट)
लगेच,पाहुनी सुर्याला

ऐकुनी त्यांचा संवाद
दिवस म्हणे रात्रीला
दोष असे हा सुर्याचा
करी तो
उदय अन अस्थ दिवसाचा

ऐकून हे,
रात्र सांगे दिवसाला
दोष नको देऊं तूं सुर्याला
दोष असे हा पृथ्वीचा
गर,गर फिरुनी सुर्याभोवती
जन्म दिला तिने ह्या सर्वांना

पाणावल्या डोळ्याने
म्हणे प्रुथ्वी सुर्याला
भलेपणाचे “दिवस”संपले
जन्म देऊनी ह्या सर्वांना
अन
मिळे दोष आपल्या दोघांना

स्तिथप्रद्न्य तो सुर्यनारायण
समजावी त्या माउलीला (प्रुथ्वीला)
आठवशी त्या सुभाषीताला
कालाय तस्मै नम:

कूणी दुःखी होऊन कविता लिहीतात,तर कुणी आनंदी मनाने कविता लिहीतात,कुणी निसर्गावर कविता लिहीतात तर कुणी आपले विचार प्रकट करण्यासाठी कविता लिहीतात.आणि असे असंख्य विषय घेऊन कविता लिहीली जाते.मी ही खालील कविता आमच्या बागेत फिरताना वनस्रृष्टी आणि जीवसृष्टी यांच्या मधे निसर्गाने(किंवा देवाने म्हणा वाटलंतर) जो फरक केला आहे तो जणू वनसृष्टीला आपल्यावर अन्यायच झाला आहे असं वाटून त्याच्याकडे जाब विचारला आहे असं समजून कवितेच्या माध्यमातून लिहीण्याचा प्रयत्न केला आहे.कवितेचे शिर्षक आहे “ईश्वराचे कोडे”

ईश्वराचे कोडे

म्हणे “वनस्रुष्टी” ईश्वराला
केलास तूं दुजा भाव
देवूनी वाचा अन
चाल “जीवस्रुष्टीला”

हंसला ईश्वर मनांत अपुल्या
म्हणे तो “वनस्रुष्टीला”
पस्तावलो मी वाटते मला
देऊन ते “जीवस्रुष्टीला”

एका बिजा पोटी तरुं कोटी
जन्म घेती सुमनें फळें
परी
वाचाळ होवूनी
केली “मानवानें”
सदैव भांडणे
दूर जाऊनी विसरला
हा “मानव” अपुली मुळे

निसर्ग, वेदनेतूनच निर्मीती करत असतो.त्याचप्रमाणे दुःखाच्या वेदना होऊन कविता सुचतात.त्या जास्त परिणामकारक असतात असं मला वाटतं.त्याचा अर्थ इतर कवितापरिणामकारक नसतात असं मुळीच नाही.काही विनोदी कवितापण हुदयाला चटका देऊन जातात.कधी कधी रोजच्या व्यवहारात होणाऱ्या गोष्टी संवादाच्या रूपाने परिणामकारक करता येतात.ही माझी एक कविता पहा
शिर्षक आहे “दातांची व्यथा”

दातांची व्यथा

एकदां जिभली बोले दातांस
मी अशी (बिचारी) एकटी
तुम्ही मात्र आहांत पुरे बत्तीस

मला नाही हाड न काड
मी आहे स्नायुचा गोळा
चुकून फिरले ईकडे तिकडे
तुम्ही करता माझा चोळामोळा
करिती ते (लोक) तुमचा उपयोग
म्हणती बोललो आम्ही जिभ “चाऊन”

ऐकून हे जिभलीचे संभाषण
दातं म्हणती तिला
वाईट सवंय आहे तुला
घेतली जिभ लावली टाळ्याला

बडबड करिशी तूं भारी
निस्तरावे लागे आम्हांपरी
वटवट तुझी ऐकून
म्हणती ते (लोक) वैतागून
गप्प रहाण्या काय घेशी
कां पाडू ती बत्तिशी?
(बिचारे दांत)

कधी कधी असं पण होतं की वाटतं आता संपलं सारं,सर्व विषय आपल्या कवितेत येऊन गेले आहेत.आता आपल्याला कविता सुचणं कठीण.आणि असे बरेच दिवस जातात,आणि खरंच खात्री होते,कविता लिहीण्याचा अंत आला.पण निर्मीतीला अंत नसतो,नाहीपेक्षा निसर्गाचापण अंत झाला असता नाही काय?त्यामुळे कविता ही पण अशीच निर्मीती मानल्यास,त्याचा अंत कसा होणार? ठीक आहे काही दिवस असेच जातील.आणि खरंच एक दिवस का कुणाष्टाऊक एकदम एखादा विषय डोक्यात शिरतोआणि एखादी कविता निर्माण होते.
आकडे मोड करीत असताना १ ते ९ आकडे, किंमतीचे वाटले आणि शुन्य नाहीतरी शुन्यच त्याला कसली आली आहे किंमत?पण नाही कुणाला असं अव्हेरून चालत नाही प्रत्येकाला वेळ आली की त्याची किंमत दाखवता येते.आणि शून्य त्याला अपवाद कसा होईल.हे लक्षात आल्यावर शून्याची महती कळली.(zero is also hero) असं वाटून “शून्याची महती “शिर्षकाने खालील कविता सुचली.

शून्याची महती

एकदां “दोन” म्हणे “एकाला”
आहेच मी तुझ्या पेक्षा मोठाला
ऐकून हे वाटे “तीनाला”
माहीत नाही का “एक” आणि “दोनाला”
मीच आहे त्यांच्या पेक्षा मोठाला

दोन शिंगी “चार” होता आपल्या घरात
हे संभाषण गेले त्याच्या कानात
ओरडून तो म्हणाला वरच्या आवाजात
ऐकल कारे “एक” “दोन” आणि “तिना”
“पांच” “सहा” “सात” “आठ”आणि मीना
कबूल झालो आहे “नऊना”
तेच आहेत आमच्या पेक्षा मोठे

“शून्य” बिचारा कोपऱ्यात होता बसून
ऐकून सारे आले त्याला भरभरून
स्वतःशीच म्हणाला
ठाऊक नाही त्यांना माझी किंमत
घेऊन मला शेजारी,जेव्हां
एखादा दाखवील हिम्मत
व्रुद्धी होईल त्याची कळत नकळत

सूर्य,चन्द्र,ताऱ्यांचा आहे
माझ्या सारखा आकार
पण सांगतात का ते कधी
आमचाच आहे सर्वांवर अधीकार

नको स्वतःची शेखी मिरवूं
चढावर वरचढ असतो छपून
करा बेरीज अथवा गुणाकार सगळे मिळून
त्यामूळे
घ्याल तुम्ही तुमची किंमत वाढवून
लागू नका भागाकार वा
वजाबाकीच्या नादाला
लागेल ग्रहण तुमच्या किंमतीला

“एकाने” केली तक्रार “शून्याकडे”
नाही उपयोग माझा
करताना गुणाकार वा भागाकार
त्यावर
“शून्य”म्हणाला त्याला
करशील तूं व्रुद्धी बेरीज करताना
नंतर
“शून्य”पुसतो “एकाला”
आहे का माझा उपयोग
बेरीज करताना
खोड मात्र मोडतो मी
गुणाकार करताना

तात्पर्य काय?
म्हणे “शून्य”ईतर आकड्याना
“कमी लेखू नका कुणा
वेळ आली असताना
“शून्यसम”आकडाही
होत्याचे नव्हते
करतो सर्वाना

केव्हा तरी एखाद्या लहान मुलाकडे पाहून सुद्धा कविता लिहायला स्फुर्ती येते.म्हणजे लहान एव्हडे की त्याला बोलतापण येत नसावे.परंतु त्याच्या डोळ्यामधून ते नकळत बोलत असते.ती त्याची भाषा आपण त्याच्या जागी जाऊन कल्पीत केली तर कदाचित कवितेच्या रूपाने आपल्याला लिहीता येतं.हेच बघाना, आई आपल्याला आजीआजोबाकडे सोडून कामावर जाते,याचे त्या तान्ह्या मुलाच्या मनात कसे येते हे माझ्या खालील कवितेतून स्पष्ट होईल.शिर्षक आहे “अळकुळी तनुली”

weekend दिवशी
चिमुकली तनुली
आईला म्हणाली
weekdys दिवशी
असता मी सकाळी उठलेली
पाहुन तुला घरात नसलेली
होई मी किंचीत अळकुळी

मग
घेई मज आज्जी जवळी
पाहुनी माझ्या डोळी
म्हणे मला ती
“नको होवू तू अळकुळी
तुजसम तुझी आई असता
अशीच घेही मी पण
जवळी तिला त्यावेळी
पण जवळी असे मी
तिच्या वेळी अवेळी”

“पक्षिण उडे आकाशी
परी लक्ष असे पिल्लाशी
आहे ना मी तुझ्या जवळी
मग का होतेस तू  अळकुळी
येइल तुझी आई संध्याकाळी”

मधूनच कधी तरी एखादे जूने गाणे आणि त्या गाण्यामधल्या काही ओळी आपल्याला एखादी दुसऱ्या विषयावर कविता लिहायला जणूं सुचवीते.बहिणाबाईच्या “अरे संसार संसार”ह्या कवितेवरून “अरे संस्कार संस्कार” ही कविता लिहायला सुचले.विषय अगदी आधूनीक, पण आशय जवळ जवळ तसाच.

अरे संस्कार संस्कार
अमेरिकेत आल्यावर
हातात पडती डॉलर
करा त्याचा नीट वापर !!१!!

अरे संस्कार संस्कार
हॉटडॉग बरा म्हणू नये
मेगडॉनल्ड मधे जाऊन
बरगर स्यान्डवीच खाऊ नये !!२!!

अरे संस्कार संस्कार
शिस्त स्वच्छ्ता ईथे पाहून
तिकडे भारतात करा
त्याचे डिट्टो अनुकरण !!३!!

अरे संस्कार संस्कार
खोटा कधी म्हणू नये
रीत अन रिवाजाला
छोटा कधी म्हणू नये !!४!!

अरे संस्कार संस्कार
घेता कर्ज क्रेडीट कार्डावर
त्याच महिन्या अखेर
टाका फेडून सर्व उदार !!५!!

अरे संस्कार संस्कार
आहे मोठा जादूगार
असे जीवनाचा मंतर
ठेवा त्यावर मदार !!६!!

वय झालं तरी काही लोक आपल्याला वाढदिवसाचे कौतुक करीत असतात.मनात येतं आता दिवस कसले वाढणार?आता उतरणीचे दिवस.असेच एका ७० वर्ष ओलांडून जाणाऱ्या व्यक्तीच्या “वाढदिवशी” गेलो असता,तो सोहळा बघून कविता सुचली ती अशी शिर्षक आहे “काढ दिवस”.

वंय झाले आता सत्तर
कसे म्हणू आता
झाले तरी बेहत्तर
आता कसले वाढदिवस
राहीले ते फक्त काढदिवस

पर्वताच्या उतरणीवर
दिसू लागले आभाळ
चढणीच्या वाटेवर
स्वैर पक्षांचा थवा हेरण्याचा
गेला तो काळ

अपेक्षा लोपून गेली
उमेदीने पाठ फिरविली
नैराशाने गांठ बांधली

भुतकाळातील यातनां
भविष्यकाळातील स्वपनें
मिसळती एकच वेळी
चेहऱ्यावरी दिसती
दुःख अन कष्ट
राहूं कसा मी संतुष्ट?

म्हणावे त्याला जाणकार
कल्पनेने जाणतो भविष्यकाळ
झाले आता वंय फार
आता कसले वाढदिवस
राहिले ते आता काढदिवस

“आई” हा माझा कवितेसाठी week point आहे.आई विषयी काहिही लिहायचं झाल्यास मला डोळ्यातून पाझर फुटतात.माझ्याच आई विषयी असं नाही,समस्त जगातल्या “आया” (आई ह्या शब्दाचे plural) आणि त्यांचा कोणताही विषय माझे मन अळकुळ करतं.”माझी सुंदर कमलमुखी आई” पासून “आईविना भिकारी”,”आईचे रूदन”,”आईची आठवण”,”चिमुकली गादी”,”सातवा महिना” अशा बऱ्याच कविता आई ह्या विषयावर खूप भाऊक होऊन मी लिहील्या आहेत.पैकी वानगी दाखल एक कविता अशी आहे. शिर्षक आहे “मॉं (उली) ”

मॉं (ऊली)

पाहीले नसेल मी त्या “देवाला”जरी
तरी त्याला पहाण्याची मला
असे काय जरूरी?
अगे,आई
कमलमुखी तूं संदर असतां
रुप “देवाचे “कसे वेगळे?

मानव कुठले?देव देवताही
फुलती तुझ्याच पदरी
दुनियेत ह्या स्वर्ग असे
पायतळी तुझ्याच तो वसे

ममतेने भरती नयन जिचे
देवमुर्ती पहाण्याची काय जरुरी?
अगे,आई
कमलमुखी तूं संदर असतां
रुप “देवाचे “कसे वेगळे?

कधी दुःखाचे ऊन असे
कधी नैराशाचे मेघ बरसे
हे कमल हस्त तुझ्या दुवांचे
सर्सावती मम माथ्यावरती
अगे,आई
कमलमुखी तूं संदर असतां
रुप “देवाचे “कसे वेगळे?

तूं असतां, असे अंधार जरी
तरी सूर्य नारायणाची काय जरुरी
अगे,आई
कमलमुखी तूं संदर असतां
रुप “देवाचे “कसे वेगळे?

तुझ्या स्तुतीसुमनांनाच्या शब्दापुढे
कुठल्याही शब्द थोर नसे
देवा जवळी सर्व माया
तुझ्या ममतेला मोल नसे
अगे,आई
कमलमुखी तूं संदर असतां
रुप “देवाचे “कसे वेगळे?

असता जवळी दुनियेतली दौलत जरी
तरी तुझ्या पुढे आम्हां त्याची काय जरुरी
अगे,आई
कमलमुखी तूं संदर असतां
रुप “देवाचे “कसे वेगळे?

Father’s Day दिवशी मला वडीलांची आठवण नक्कीच येते.एक दिवस मला माझ्या वडीलांची माझ्या लहानपणीची आठवण येऊन मी ही कविता लिहीली

फादरस डे

वाटेत एका अनोळख्याला
जवळ जवळ आपटलो
“माफ करा”असे म्हणून मी
त्याच्या पासून सटकलो

“करा माफ”मला पण
म्हणत थांबला तो क्षणभर
औचित्याच्या वागण्याने
सुखावलो आम्ही दोघे वरवर

आपल्या घरी
स्थिती  असते निराळी
लाहान थोरासी चटकन
आपण वागतो फटकून

झाली त्यादिवशी गम्मत
होतो कामात मी दंग
चिमुकल्या माझ्या मुलाने
केला माझ्या  एकाग्रतेचा भंग

“हो बाजूला”
म्हणालो मी वैतागून
गेला तो निघून
हिरमुसला होऊन

रात्री पडलो
असता बिछान्यात
आला विचार
माझ्या मनात
औचित्याच्या भारा खाली
अमुची रदबदली झाली
वागलो चांगले अनोळख्याशी
अशी समजूत करून
मी घेतली मनाशी

पाहता फुलांच्या पाकळ्या
पडल्या होत्या दाराशी
लाल, पिवळी अन निळी
खुडली होती
फूले त्याने सकाळी

आला होता घेवून ती हातात
टाकण्या मला आश्चर्यात
आठवून तो प्रसंग पून्हा
वाटे मजकडून झाला गून्हा
जावून त्याच्या बिछान्याशी
जवळ घेतले मी त्या उराशी

पुसता  फूलांच्या पाकळ्या विषयी
हसला तो मला बिलगूनी
बोले तो मज भारावूनी
“घेऊनी ती सर्व फूले
आलो होतो तुमच्याकडे
कारण

आजच आहे “फादर्स डे”

मागूनी त्याची माफी
पुटपुटलो मी त्याच्या कानाशी
चूक केली मी सकाळी तुझ्याशी

पुसून अश्रू माझे त्याने
हसून बोलला तो पून्हा एकदा
करतो प्रेम मी
तुमच्यावर सदासर्वदा

रहावे ना मला ते ऐकून
म्हणालो मी ही भारावून
आवडशी तू मला
आणि तुझी सर्व फूले
विशेषतः  तुझे ते फूल निळे

लोकं आपली कविता वाचतात पण कधी त्याची “दाद” मिळ्त नाही.पण दाद कशी मिळणार? लोक कविता वाचतात,मनात दाद देतात.बरी वाटली नसल्यास मनात म्हणतात “ठीक आहे” आहे “so so”. सर्वेच लहान मुलं गुडगुडीत कुठे असतात?एखादं किडकिडीत पण असतं.पण त्या मुलाच्या आईला आपली मुलं सुंदरच वाटतात.कसं असलं तरी ती त्याचे प्रेमाने मुके घेतेच नां?तसंच काहीसं कवीला आपल्या कविते विषयी वाटतं.म्हणून की काय काही कवीनी काव्यवाचन करण्याची प्रथा सुरू केली.तसं करताना त्याना समोरच मिळाली तर दाद मिळते.आणि त्याना मनस्वी बरं वाटतं.पण ती झाली मोठमोठया कवींची गोष्ट,आमच्या सारख्यांना असा chance कुठे मिळायचा?पण ही मनातली व्यथा मी कवितेच्याच रूपाने एकदा express केली ती अशी.

तरी हरकत नाही.

माझ्या कविता
कुणिही गात नाही
कुणिही वाचत नाही
वाचली तरी ऐकत नाही
परंतु
कविता लिहील्याविना
मला राहवत नाही

लिहूया कविता म्हणून
लिहीली जात नाही
विचारांच्या वेलीची
शब्दरुपी फुलें जेव्हा
मनाच्या पाण्यात
एकत्र तरंगतात
तेव्हा कविता लिहील्या
वाचून रहावत नाही

दुःखा मागून
आनंद डोकावतो
यातना मागून
निर्मीती होते
कवितेचे असेच आहे
अशावेळी
कविता लिहील्यावाचून
रहावत नाही

अन तुम्ही
गायिलीत नाही
वाचलीत नाही
आणि वाचून
ऐकलीत नाहीत
तरी हरकत नाही

कविता लिहील्या शिवाय
मी सोडणार नाही.

                    श्रीक्रुष्ण सामंत (स्यान होझे कॅलिफोरनीया)

shrikrishnas@gmail.com
 

Advertisements

टिप्पणी नोंदवा

Required fields are marked *

*
*

%d bloggers like this: