दाजी “पोष्टमन”

दाजी “पोष्टमन”

भास्करभाऊना दाजी धरून सहा मुलं.दोन मुलगे अणि चार मुली. दाजी सर्वांत मोठा.तशी दाजीला आणखी दोन भावंड होती,परंतु ती लहानपणीच निर्वतली.
भाऊ एकटे कमविणारे, गुंडू जोश्यांच्या दुकानात कारकूनाची नोकरी करून किती पगार मिळणार.एव्हडी मुलं झाल्यावर गरिबी ठाण मारूनच बसणार.

दाजी जेमतेम इंग्रजी ४ थी पर्यंत शिकला.मराठी ४ ईयत्ता आणि इंग्रजी ४ ईयत्ता.खूप झालं असे त्याला वाटलं.पण खरं कारण ते नव्हतं.इंग्रजी शाळेत दीड रुपया मासिक फी होती.आठ,आठ आण्यानी वाढून ४ थीत ती दीड रुपया झाली होती. जस जशी दाजीची भावंड वाढू लागली तस तशी भाऊंच्या खर्चाला मेळ बसणे कठीण होवू लागलं.
दाजी वेळेवर फी भरत नाही, म्हणून मास्तर त्याच्यावर रागवू  लागले. नंतर नंतर ते त्याला पुरा तास बाकावर उभे करून शिक्षा देवू लागले.पहिली बाकावर उभं राहाण्याची शिक्षा भोगताना, दाजीला खूप वाईट वाटलं होतं,कारण घोडग्यांची शालू आणि पुन्हाळेकरांची मालू त्याला बाकावर उभा राहिलेला बघून हंसली होती.
घरी आल्यावर तो आईच्या कुशीत जाऊन खूप रडला होता.वडील फीचे पैसे देऊ न शकल्याने त्याला शाळेत खूप शरमेने रहावं लागतं,  त्यामुळे त्याचं अभ्यासातपण लक्ष लागत नव्हतं.आई त्याला वडीलांची बाजू घेऊन समजावून सांगत होती.ते दाजीला कळत होतं पण वळत नव्हतं.

हळू हळू तो पुस्तकं घेऊन घरून निघाला तरी शाळेत जात नव्हता. थोडे दिवस तो ईकडे तिकडे वेळ घालवत राहीला.कुणाच्यातरी दुकानात जाऊन गप्पागोष्टी करीत राहिला.शाळा सुटण्याच्या वेळी घरी यायचा.परिक्षेत बऱ्याच अश्या विषयावर लाल लाईन्स आलेल्या पाहून भाऊनी त्याला विचारल्यावर त्याचा त्यांच्याशी वाद व्हायचा. भाऊना तोंड बंद बुक्याचा मार सहन करावा लागायचा.
एकदा त्याला इंगळ्यांचा चिंतामणी रस्त्यावर भेटला असता म्हणाला “हेड पोस्टात जाऊन गरीब अशिक्षीत लोकांच्या मनीऑर्डरी किंवा पत्र लिहून पैसे का कमवीत नाहीस? ईकडे तिकडे वेळ का घालवतोस.” दाजीला ही कल्पना नामी वाटली.तसे तो करू लागला. रोजाना चार पैसे खिशात पडू लागले.हे गुपित फक्त त्याने आपल्या आईला सागितलं. तिला पण घरखर्चाला त्याच्याकडून मिळू लागल्याने भाऊंच्या तुटपुंज्या कमाईत हाल करून घेण्यापेक्षा हा मार्ग तिला सुखकर वाटला.लहान वयात दाजीला शिक्षणाला दांडी देवून असं करावं लागतं त्याचं तिला वाईट पण वाटत होतं.

कधी कधी रविवारी ताटात सरंग्याची तळलेली कापं आणि सुंगटाच कालवण जेवताना भाऊना अचंबा वाटायचा पण कदाचित बायको दिलेल्या पैशातून काटकसर करीत असेल अशी भाबडी समजूत करून घेऊन जेवून झाल्यावर मुकाट्याने हात तोंड धुऊन उठून जायचे.नंतर काही दिवसानी कानावर कुणकुण आल्यावर त्यानी सर्व बाबतीत दुर्लक्षच केलं.अशा तऱ्हेने दिवस जात होते.

आम्ही काही दिवसासाठी उन्हाळ्याच्या सुटीत कोकणात आलो होतो. दाजीच्या आईने माझ्या आईकडे दाजीचा विषय काढून त्याला आमच्या बरोबर मुंबईल नेऊन नोकरी लावण्याची कल्पना दिली.आणि अश्या तऱ्हेने दाजी मुंबईला राहू लागला.असाच एकदा दाजी दादर पोस्टात नोकरी मिळेल का यासाठी गेला असता योगायोगाने त्याला चिंतामणी भेटला .चिंतामणी पोस्टात क्लार्क म्हणून काम करत होता.पोस्टमास्तराच्या ओळखिने त्याने दाजीला पोस्टात चिकटवलं.सुरवातीला पोस्टात शिपाई म्हणून त्याला नोकरी मिळाली.पोस्टमनांचेच कपडे घालायला फुकट मिळाले.महिना चाळिस रुपये पगार मिळू लागला.दाजीने आईला पहिल्या पगारात मनिऑर्डर करून खाली दोन ओळीत लिहीले की “तुझ्या आशिर्वादाने मी पोस्टात नोकरीला लागलो.दर महिन्याला मी तुला २० रुपये पाठवित जाईन.भाऊना नमस्कार सांगावास.” दाजीच्या आईचा आनंद गगनांत मावेना.ज्याला त्याला ती सांगू लागली की “आमचो दाजी पोष्ट्मन झालो. ”

त्यानंतर दोन वर्षात दाजीला खरोखरच पोस्टमनच्या जागेवर बढती मिळाली,दाजीच्या आईचे शब्द खरे ठरले.निवडीच्यावेळी दाजीला पत्रावरचे मराठीत,हिंदीत,आणि इंग्रजीमधे पत्ते वाचायला सांगितले होते,ते त्याने न चुकता वाचले तसेच दादर भागातील निरनिराळ्या रस्त्यांची नावं वाचायला दिली ती पण त्याने बिनचूक वाचली. दाजीला आता चार खाकी प्यान्ट्स,चार खाकी बुशशर्टस आणि चार पोस्टमनच्या खाकी टोप्या मिळाल्या.आठ्वड्याला ते कपडे धोब्याकडे धुवायला अलाउन्स मिळू लागलं.आमच्याकडे राहात असल्याने तो आईला खर्चाचे पैसे देऊ करीत चक्क आईला साष्टांग नमस्कार घालून बसला.आईने त्याला आशिर्वाद दिले पण त्याचे पैसे घेतले नाही.उलट पोस्टात स्वतःच्या नावावर सेव्हिंग खाते उघडून घेऊन पैसे जमा करण्याचा सल्ला दिला.
आता दाजी नोकरीत खूप रुळला होता.दादर एरिया त्याची पाठ झाली होती.प्रामाणिकपणा,साधा स्वभाव आणि मद्तीला पुढे धावणारी वृत्ती असल्याने दाजीची प्रगती होत गेली.आता त्याला सांताकृझला सरकारी क्वार्टरसमधे तिन रूमचा ब्लॉकपण मिळाला.तो आता तिकडे राहायला गेला.दर रविवारी आमच्या घरी यायचा.येताना एक डझन उत्तम केळी घेऊन यायचा.माझ्या हातात देताना म्हणायचा “हिरव्या सालीची आसत पण आतून मात्र पिकी आसत हां! ” हे त्याचे बोलणे ऐकून आई हंसायची.”मावशे हंसू नकोस आता मी शुद्ध मराठीत बोलतंय हां! ” असं तिला निक्षून सांगायचा. आई म्हणायची “अरे दाजी,आता लग्न कर बघू! म्हणजे तुझ्या पायाच्या चाकाना ब्रेक लागेल.” त्यावर तो म्हणायचा ” मावशे, पोस्टमनाच्या पायांक सदाचीच चाकां,पत्रां टाकूक गांवभर फिरूक लागतां. ” दाजी एकटाच एव्हड्या मोठ्या ब्लॉकमधे राहतो म्हणून लोक त्याला पेईंग गेस्ट ठेव म्हणून सुचना करायचे पण दाजी कसला रिटायर्ड होई पर्यंत त्याने आपला हेका सोडला नाही.” मी सरकारी नोकर असल्याने कायद्दयाने मला असं करता येत नाही,जे करतात त्याना बापड्याना करू देत,मी  कोर्टाची पायरी चढणार नाही ” असं ठासून सांगायचा.

एका वर्षी दाजीचे वडील त्याच लग्न करून टाकण्यासाठी पहिल्यांदाच मुंबईला आले होते.वडीलाना तो आमच्या घरी घेऊन आला होता.आईकडे वडीलांसमोर लग्नाचा विषय काढून कसा म्हणतो” मावशे, पोस्टमनाच्या जातीक लग्न परवडूचां नाय. बायकोच्या लिपस्टीक आणि पावडरीत सगळो पगार संपतलो,मग महिनाभर खावूंचा काय? ” आई नेहमीप्रमाणे हंसायची.त्यांच्या मुक्कामात वडीलानी मोठा प्रयत्न करून एक मुलगी दाखवली तिचा इंटरव्ह्यू घेणार म्हणून त्यांच्या खणपटीला बसला.आणि त्यात त्याने तिला स्पष्ट विचारलं ”  काय हो,तुम्ही माझ्याशी लग्न करायला निघालात पण तुम्हाला माझ्यापेक्षा चांगला  मुलगा मिळाला नाही काय ? ” मुलीच्या बापाने कपाळावर हात मारून घेत त्याची रजा घेतली.नंतर कंटाळून दाजीचे वडील कोकणात परत गेले.

दाजी कायमचा ब्रम्हचारी राहीला आणि रिटायर्ड होवून ६० वर्षावर कोकणात परत गेला.आता तो त्याच्या वडीलांच्या गावी आजगावात रहातो.आई वडील केव्हाच निर्वतले.दाजी जाताना सरकारी कपडे घेवून गेला.गावात फिरताना ते मधून मधून वापरतो.नोकरीवर असताना पावसाळ्याच्या दिवसात सरकारने त्यांना लांब प्यांन्ट भिजूनयेत म्हणून शॉर्ट प्यान्ट्स (तो त्याला “हाफ प्यांन्ट” म्हणायचा.) त्याही नेल्या होत्या.त्या “हाफ प्यांन्ट्स ” घालून कोकणात खूप उकडतं म्हणून वरती उघडाच राहून गांवभर भटकत असतो.आपल्या ४० वर्षाच्या सरकारी नोकरीतला अनुभव न विचारला असतानाही सांगत असतो.त्याच्या उजव्या हाताचा आंगठा सरळ न रहाता खांद्दयाकडे वळलेला दिसतो त्यावर कुणी प्रश्न केल्यास “रिटायर्ड होता होता सॉरटरची जागा मिळाल्याने हजारो पत्रे सॉर्ट करून करून आंगठा हा असा वाकला “असे अभिमानाने सांगत असतो.
कुणी म्हणतात “दाजीचं डोकं फिरलंय” म्हणून तो असा बडबडत असतो.एकएकाच्या आयुष्यात कायमचा संघर्ष असल्यावर “डोकं फिरलं नाही तर नवलच म्हटलं पाहिजे”

     श्रीकृष्ण सामंत (स्यान होझे कॅलिफोरनीया)
       shrikrishnas@gmail.com

Advertisements

टिप्पणी नोंदवा

Required fields are marked *

*
*

%d bloggers like this: