योगायोग,योगायोग आणि योगायोग

“अनपेक्षीत घटनांची गुंतावळ ही माझ्या आयुष्याची एक मोठी खूण झाली आहे.मला वाटतं,माझ्या आयुष्यात आलेल्या योगायोगानी मला माझ्या आयुष्याचा मार्ग दाखवला,कधी धक्का पण दिला आणि तो पण अशातऱ्हेने की मी कदाचीत तो मार्ग पत्करला पण नसता,पण त्यामार्गाने मला जाण्याची जरुरी भासली म्हणून तसं करावं लागलं.
ह्या योगायोगांशी झुंझ देताना मला त्यासाठी अनपेक्षीत ठिकाणी जावून राहण्याची पाळी आली.”

मुंबईहून मद्रासला जाताना ट्रेनमधे मला एक बाई भेटली ती सहज बोलता बोलता आपली कथा मला सांगू लागली.
ती पुढे म्हणाली,
” माझी मावशी मद्रासला राहते.तिची परिस्थिती पण यथातथाच होती. पण मला एका चांगल्या जॉबची ऑफर आल्याने सुरवातीला तिच्या घरी राहून मग कुठेतरी जागा घेवून राहण्याचा माझा विचार होता.ट्रेनमधून उतरून झाल्यावर, थोडं फ्रेश व्हावं म्हणून स्टेशनच्या वेटिंगरूममधे गेले.तिथे एक वयस्कर बाई बेसीनवर तोंड धुवून नुकतीच बाहेर पडत होती,माझ्याशी शिष्टाचार म्हणून गालातल्या गालात हंसली,मी पण तिला प्रतीसाद दिला. बाहेर आल्यावर तिच बाई एका बाकावर बसून कुणाची तरी वाट बघत बसली होती.मी पण जरा विश्रांतीसाठी तिथेच बसले.
गप्पा करीत असताना मला तिच्याकडून कळलं की जिथे ती राहते त्याच्या जवळंच माझं भावी ऑफीस होतं.
मला ती म्हणाली,
“नाहीतरी तू मावशीकडे तात्पुर्तीच राहाणार आहेस त्यापेक्षा माझ्या घरी का राहायला येत नाहीस?मी पण एकटीच असते मला पण तुझी कंपनी मिळेल आणि भाड्याच्या रुपाने थोडे पैसेही मिळतील”
मला तिची कल्पना आवडली,आणि असा हा योगायोग येवून मी तिच्या घरी राहायला गेले.

परंतु,योगायोग हा नेहमीच सुखावह होईल याची खात्री नाही.आणि तसंच झालं.दोन वर्ष मी सुखासुखी तिच्याजवळ राहीले आणि एक दिवशी मी एकटीच घरी असताना एक अनोळखी माणूस घरात शिरून त्याने माझ्याशी जी हातापायी केली त्याने मला बराच धक्का अबसला.ही झालेली हातापायी आणि त्या धक्क्यातून बाहेर येण्यासाठी आणि मला पुन्हा स्थिरस्थावर होण्यासाठी लागलेले परिश्रम तसेच वाया गेलेले दिवस, लक्षात घेता हा अत्याच्यारी आघात माझ्या नशिबी असाच योगायोगाने आल्याने त्याचा अर्थ काय असावा असा प्रश्न मला सतत भेडसावत राहिला”

गाडीचा वेग वाढतच होता.किती स्टशने गाडी पार करून गेली ह्याचा थांगपत्ता ह्या बाईची कथा ऐकण्यात येवू शकला नाही.

एक मोठी जांभई देत ती मला म्हणाली,
 “माझ्या कथेने तुम्हाला बोअर होत तर नाही ना?”माझ्या हातातलं पाडगांवकरांच्या कवितेचं पुस्तक मी बाजूला ठेवून तिचीच कथा ऐकण्यात स्वारस्य घेत होतो,हे तिच्या लक्षात यायला वेळ लागला नाही.

ती पुढे म्हणाली,
” मी हे सगळं पाठिशी टाकून,आणखी जोमाने चालू लागले, नव्हेतर पळू लागले.हे घर साडून मी एका दुसऱ्या अपार्टमेन्टमधे राहू लागले. नंतर मद्रासला बाय बाय करून परत मुंबईला आले. गोरेगांवला एका गुजराथी बाईच्या फ्लॅटमधे मला एक रूमची जागा भाड्याने मिळाली.नरीमन पॉइंट्मधे मेकरटॉवर्सच्या चवदाव्या मजल्यावर असलेल्या एका बॅन्केत मला जॉब मिळाला.मी थोडं संगीतात मन रमवू लागले.बाज्याची पेटी घेवून माझी मीच गाणी वाजवायला शिकण्याचा प्रयत्न करू लागले.दादर बुक डेपो मधून गाण्यांच्या नोटेशनची पुस्तके विकत घेवून त्यातून नोटेशन प्रमाणे सुरवातीला माझ्यामीच मराठी भावगीतं वाजवू लागले.मनाला शांती मिळू लागली.पेटी वाजावताना मी हळू हळू गाऊं ही लागले,मला माहित नव्हतं की माझा आवाज गाण्यालायक पण आहे ते.
एकदां असंच मेकर टॉव्हर्सच्या लिफ्टमधे चौवदाव्या मजल्यावर जाईपर्यंग विरंगुळा म्हणून हळूवार गाणं गुणगुणत होते,
“वसंत काली वनी दिनांती
एकच पुसिते तुज एकांती
एकांती कर कोमल माझा
हाती घेशील का?
माझा होशिल का?”

माझ्या बरोबर लिफ्टमधे एक उमदा गृहस्थ होता. आणि तो मराठी होता.माझं गाणं ऐकून त्याला राहवलं नसावं जणू काय पुर्वीची जुनीच ओळख आहे असां अविर्भाव करून मला म्हणाला,
“किती सुंदर आवाज आहे तुमचा आणि ते इतकं जूनं गाणं खूप दिवसानी ऐकून खूपच बरं वाटलं.मी पण तबला शिकतो. गोरेगांवला सामंतमास्तरांच्या संगीत शाळेत.”
हे ऐकून मला जरा त्याची जवळीक वाटली.
मी म्हणाले,
“मी पण गोरेगांवलाच राहते.कुठे आहे त्यांची संगीत शाळा? गुरु शिवाय ज्ञान नाही हे खरं”
तो पर्यंत चौदावा मजला आला.लिफ्ट्चं दार उघडतांक्षणी त्याला त्याचा एक ओळखीचा माणूस भेटला आणि माझ्या प्रश्नाचं उत्तर तसंच राहून गेलं.आणि गम्मत पहा,असंच एक दिवस योगायोगाने तोच गृहस्थ मला गोरेगांव स्टेशनावर भेटला. लिफ्टमधून निघता निघतानाचा माझा तो प्रश्न अजून त्याच्या लक्षात होता.
मला म्हणाला,
“ती सगीत शाळा ईस्ट गोरेगांवला बाबूराव सामंतांच्या सामंतवाडीत आहे.कुणालाही विचारा कुणीही तुम्हाला ती जागा दाखवून देईल.”
आणि एव्हड्यात गाडी आली आणि आमचं बोलणं तिथेच संपलं. पुढच्या वीकएण्डला मी चौकशी काढत त्या क्लासात गेले. पेटी,तबला आणि गाण्याचे सुंदर आलाप ऐकून खूपच बरं वाटलं.सामंत मास्तर पेटी वाजवत होते,तोच हा गृहस्थ तबला वाजवत होता आणि एक मुलगी गात होती.ते गाणं पण मला अजून आठवतं,

“जीवनात ही घडी अशीच राहूदे
प्रीतीच्या फुलावरी वसंत नाचूं दे”

आणि आता गम्मत पहा हा सगळा योगायोग शेवटी माझा आणि तबला वाजवणाऱ्या दिवाकर धोंडचा एकमेकाचे पुढे लाईफ पार्टनर होण्यात झाला.”

मधेच मी तिला विचारलं,
“मग आता तुम्ही मद्रासला कां जात आहां?”
मला ती म्हणाली मी तुम्हाला ते सांगण्यापुर्वी योगायोगाच्या महत्वाबद्दल आणि माझ्या आयुष्यातल्या योगायोगाबद्दल मी केलेलं चिंतन तुम्हाला एक्सप्लेन करते.
तशी मी धर्म मानते.मी त्यावर खूप वाचन पण करते.ह्या गोंधळलेल्या जीवनातसुद्धा एक शिस्त असावी,अशी माझी धारणा आहे.आणि जीवनातली प्रत्येक घटना सुद्धा कुठल्या तरी शिस्तीच्या चौकटीत बांधलेली असावी. योगायोग, ह्या जीवनातल्या शिस्तीला आव्हान देत असावा.म्हणूनच ह्या आव्हानाचं स्पष्टीकरण व्हायला हवं. मी माझ्या मनात असं ठरवून ठेवलंय की,हा योगायोगच वेळोवेळी जीवनाला शिस्त आणतो.जीवनातल्या ह्या घटना आपण एखादी कला प्राप्त करून घेवून, निर्माण करू शकत नाही.
पण आपल्या मार्गात ज्या घटना येतात त्यांचा घट्ट हात धरून ते कुठे नेत असतील ते पहावं. बऱ्याच असल्या योगायोगानी, मला पुढचा मार्ग काटायला लावलं.मला त्यानी दिशा प्राप्त करून दिली आणि त्या दिशेचा अर्थ समजावला.
योगायोगाने मला दाखवून दिलंय की जीवन हे शक्यतानी ओतोप्रत भरलेलं आहे.वेटींगरूममधे भेटलेली ती बाई, लिफ्टमधे मला भेटलेले दिवाकर धोंड,गोरेगांव मधली ती गुजराथी बाई,शिवाय हातापायी करावं लागल्याचा तो मद्रास मधला प्रसंग, अशी उदाहरणं आहेत. योगायोगावरअसा विश्वास ठेवून ’चलो रे,मुसाफीर’ असं माझं मलाच मी म्हणते.

मला वाटतं,मी मद्रासला आता का जाते ह्या तुमच्या प्रश्नाचं उत्तर द्दयायला आता मला हरकत नाही.मी ही तुमच्या बरोबर गाडीतून मद्रासला जात आहे ती मी माझ्या वृद्ध मावशीला मुंबईला घेवून येण्यासाठी.तिला ह्या वयात माझ्या शिवाय कोणच नसल्याने तिच्या संमत्तीने माझ्या घरी आणून ठेवण्याचा मी बेत केला आहे.कदाचीत हा पण तिच्या आणि माझ्या आयुष्यातला योगायोगच असावा.”
हे ऐकून मी तिला हंसत हंसत म्हणालो,
“आपण आता सहप्रवासी होवून मद्रासला चाललोय हा पण एक योगायोग नसेल कशावरून?”
तिच्या मिष्कील हंसण्याने माझ्या प्रश्नाचं उत्तर मिळालं.
           श्रीकृष्ण सामंत (स्यान होझे कॅलिफोरनीया)
              shrikrishnas@gmail.com
 
            
 
 
 

Advertisements

टिप्पणी नोंदवा

Required fields are marked *

*
*

%d bloggers like this: