विनम्रता

आज प्रो.देसाई ज्यावेळेला तळ्यावर आले त्यावेळी मी एक पुस्तक वाचण्यात गर्क झालो होतो.ते माझ्या जवळ येवून केव्हा उभे राहिले आहेत ते मला कळलंच नाही.
मला म्हणाले,
“कसल्या विषयात एव्हडे मग्न झाला आहात?”
मी त्यांना म्हणालो,
“भाऊसाहेब,मी एका प्रसिद्ध लेखकाचं विचार चिंतन वाचत आहे.हे पुस्तक हातातून सोडवत नाही.”
प्रो.देसाई मला म्हणाले,”काय विषय आहे असा?”
मी म्हणालो,
“विषय तसा साधा आहे.पण तुम्ही नक्कीच तुमचा विचार जास्त विस्तारून सांगाल.”
विषय आहे “The Presumption of Decency ”
हे ऐकून प्रोफेसर मला म्हणाले,
“मी ह्या डीसेन्सी-म्हणजेच विनम्र राहून दुसऱ्याचा सन्मान करणं- ह्या बद्दल मला काय वाटतं ते तुम्हाला थोडक्यात सागतो.”
मी पुस्तक बंदच केलं. आणि भाऊसाहेब कसलं लेक्चर देतात याची प्रतिक्षा करीत म्हटलं,
“बोला आता तुमचंच ऐकुया”

मला सागू लागले
 ” जशी एखादी व्यक्ति वेळेचा आणि साधनाचा विचार करून पाऊल टाकते तशा प्रकारचा विचार करणारा मी मला समजतो. एखादा साधा गुन्हा झालेला पण मला क्षणभर का होईना आत्मघातकी वाटतो आणि माझा मीच वैतागतो.
एखादा टॅक्सीवाला नियमितपणे वेग सांभाळून कायद्याचे बंधन पाळून टॅक्सी चालवित असतो ती त्याची विनम्रता असते. माझ्या घाई साठी वेगाचा नियम तोडतो त्यावेळी त्याने केलेली ही घटना सुद्धा माझी मलाच लज्जास्पद करते. त्याने जाणून बुजून केलेल्या चुकीचा, दंड म्हणून त्याला देऊ घातलेली टिप मी पंधरा पर्सेंन्टने कमी केली तरी पुढची माझी सगळी वेळ हा टॅक्सी ड्रायव्हर देशातल्या कुठच्या प्रांतातून आला,ह्याला टॅक्सी घ्यायला कुठच्या बॅंकेने पैसे दिले असतील असल्या गोष्टीचा विचार करून माझा मीच जरा घुश्यात राहतो.
एखादा बातमी-पत्राचा संपादक मी पाठवलेल्या टिपणाचा उलटा अर्थ लावून ते परत पाठवून देतो तेव्हा, त्याचा मला व्यक्तिशः खूप राग येतो,एखाद्या रेस्टॉरंटने माझं बुकींग आयत्या वेळेला नाकरणं,किंवा राजकारणी माणसाने मी विरोध केलेली पॉलीसीच  खंबीरपणे आचारणात आणण्याचा प्रयत्न करणं, ह्याचा ही मला खूप राग येतो. पण हे असले आचरण पाहून विनम्रता नजरे समोर ठेवून प्रसंग टाळता येतात.
आमच्यासारखी शैक्षणिक जगात वावरणारी व्यक्ति काही प्रमाणात उद्धट असणं स्वाभाविक आहे. त्याशिवाय माझं व्यक्तिमत्व काहीसं तसंच असून, मीच बरोबर आहे आणि दुसरा कुणीतरी चूक करत असतो असं माझ्या मनात आणून माझ्या मनाचं समाधान करून घेतो हे मी रास्त करतो असं मी मानत असतो.
कुणाकडून कुणाला चुकीचं मार्गदर्शन झालं असेल असं समजून राहणं ही एक बाजू झाली पण ते झालं याचं कारण ते वाईट प्रवृत्तीचे आहेत म्हणून असं झालं, असं समजणं दुसरी गोष्ट झाली.उगीचच त्रागा करणाऱ्यांचा, किंवा अगदी दारूण स्थितित असलेल्यांचा, कुणी मुद्दाम द्वेष करीत नसतो.खरं म्हणजे द्वेष करण्याजोगी व्यक्ति ती, की जी एकतर दुष्ट प्रवृत्तीची असते किंवा तिच्या जवळ मुळीच विनम्रता नसते. तसं पाहिलं तर द्वेषकरण्याची प्रवृत्ती ही एक भावनिक स्थिति आहे, आणि ती सहजगत्या टाळता येते. स्वतःहून कुणाचा द्वेष करणं खरंच तापदायक असतं. त्या वृत्तिमुळे आपल्या सद्सद्विवेक विचारावर पगडा येतो,आणि त्यामुळे एखादी व्यक्ति मनात डूक धरून दुसऱ्या व्यक्तिला कष्ट देण्यात प्रवृत्त होत असेल तर, त्यापासून काहीही चांगलं होत तर नाहिच नाही.

विनम्रता असणं हा व्यक्तिवरचा एक चांगला संस्कार आहे.आणि ही विनम्रताच, एखाद्याला त्याचा जेव्हा द्वेष करण्याकडे कल होतो तेव्हा त्याला गोंधळात जाण्यापासून परावृत्त करते.  मन घट्ट करून एखाद्याने समजूत करून घेतली की आपल्या सभोवतालचे लोक आपल्या सारखेच विनम्र आणि सभ्य आहेत,आपल्या सारखेच प्रयत्न करून सन्मानाने गोंधळातून स्वतःला सोडवून घेणारे आहेत,अशी समजूत करून घेतल्यावर अशा लोकांना दुषणं देणं म्हणजे आपल्या आपणच स्वतःला अविचारी वृत्तिचे महात्मे समजून घेणं.
 
आपण विनम्र आहो असं समजून वागणं म्हणजे सर्व काही झालं असं नाही.उलट त्या वागण्यात सत्यता असली पाहिजे.त्यात सत्यता नसेल तर एखादी व्यक्ति विनम्र असूनही बेजबाबदार लोकांवर सतत चिडचिडेपणा करीत राहणार.उलटपक्षी योग्य मार्ग तो की जो माणसा-माणसातली हतबलता लक्षात घेवून मोठ्या मनाने निर्णय घेण्याकरीता  सफलता आणतो.
सभोवतालचं जग विचाराने अपरिपक्व असलं म्हणून ते भयंकर आहे अशी समजूत करून चालणं योग्य होणार नाही. त्यांचं वागणं चुकीचं असलं म्हणून काही ते दुष्ट विचाराचं आहेत असं मानणं हे खरं नाही.
 दुसरे विनम्र असतीलच अशी समजूत करून घेवून मी नेहमीच यशस्वी होईन असं ही नाही.पण मला यशस्वी होण्यासाठी माझ्याकडून प्रयत्नांची पराकाष्टा केली गेली पाहिजे.इतरांसारखा मी पण बराचसा दोषी असू शकेन. पण विनम्र होण्याचा प्रयत्न मी केला पाहिजे.आणि मी विश्वास धरला पाहिजे की इतरही माझ्या सारखेच प्रयत्नशील असावेत.”
हे सर्व ऐके पर्यंत तळ्यावर काळोख झाला होता.भाऊसाहेब चर्चेच्या ओघात घरी जायला उशिर होतोय हे विसरूनच गेले.

श्रीकृष्ण सामंत (स्यान होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com   

टिप्पणी नोंदवा

Required fields are marked *

*
*

%d bloggers like this: