दुसऱ्याच्या भावनेची कदर

“म्हणूनच माझा आता पुर्ण विश्वास बसला आहे की दुसऱ्याच्या भावनेची कदर असणं म्हणजेच जसं शंकरने स्वर्गात जाण्यापेक्षा सोन्याशी संबंध ठेवून नरकात जाणं पत्करलं तसं”

काल संध्याकाळी माझा आणि प्रो.देसायांचा विषय त्यांच्या शिक्षक म्हणून कॉलेजात झालेल्या एका घटनेवर चर्चा असा होता.
मी त्यांना सहज म्हणालो,
“भाऊसाहेब तुमचा प्रोफेसर म्हणून इतकी वर्ष कॉलेजात शिकवीत असताना एखादा खास अनुभव आठवून आता मला सांगण्या सारखा एखादा विषय आहे का?”
त्यावर प्रोफेसर देसाई थोडा विचार करून म्हणाले,
“मी दुसऱ्याच्या भावना लक्षात घेवून त्या समजून घेण्याची कदर करतो.ही कदर माझ्या मनात दुसऱ्याला अगदी जवळून न्याहाळून आणि त्याच्याशी जवळीक ठेवून करण्यात माझा विश्वास वाढवते.
मी लेखक आहे तसाच मी शिक्षक पण आहे.माझा सगळा वेळ, प्रश्न समजून घेवून त्याचा दुवा दुसऱ्याशी कसा जुळेल ह्या विचारात जातो.आपल्यात आणि इतरात जो भावनेचा दुवा निर्माण होतो,त्याची निकड दुसऱ्याला समजून घेण्यात असते.
आपल्या विचाराची कल्पकता,दुसऱ्याशी जवळीक ठेवण्याची इच्छा,हे सर्व साधताना आपल्या मर्यादा उलटून जावून,नजर ताजी करून स्वतःकडे आणि जगाकडे नव्या आणि पर्यायी भिंगातून पहाण्याची संवय असावी लागते.”
एव्हडं ऐकल्यावर मी मुद्दामच त्यांना म्हणालो,
“भाऊसाहेब एखादं उदाहरण देवून सागितलत तर मला  जरा कळायला सोपं होईल.”
थोडं गालातल्या गालात हसून मला म्हणाले,
“मला माहित होतं तुम्ही असं काही मला सांगणार म्हणून.दुसऱ्याच्या भावना हे दोन शब्द माझ्या मनात आले की मला नेहमी शंकर आणि त्याचा मित्र-पांडू महाराचा मुलगा- सोन्या यांची आठवण येते.आमच्या गावात- कोकणात- सुखवस्तु पांढरपेश्या लोकांच्या वस्तिला लागून महारवाडा होता. शंकर,सोन्याला आपला जीवश्चकंटश्च मित्र समजायचा.
सोन्याशी मैत्री ठेवायची की नाही असं शंकरच्या मनात यायचं.कारण अशा लोकांशी दोस्ती ठेवणं म्हणजे मेल्यावर नरकात जायला होतं असं त्याच्या कानावर यायचं.
शंकर म्हणायचा,
“माझ्या सुखदुःखात,माझ्या अडीअडचणीत,नाचण्या गाण्यात,बोलण्या फिरण्यात खांद्याला खांदा लावून काम करण्यात सोन्या आणि मी एक्मेकाला धरून असतो.सोन्या पण एक माणूस आहे तो काही जनावर नाही,मग मी त्याच्याशी संबध ठेवल्याने नरकात गेलो तरी बेहत्तर.शंकर धर्म झिडकारत नव्हता.स्वतःच्या पावित्र्या बद्दलची फाल्तु घंमेंड आणि हट्टी वृत्तीला-स्थितप्रज्ञनतेला- झिडकारत होता.
माझ्या प्रोफेसरशीपच्या सुरवातीच्या करियरमधे हा शंकर-सोन्याचा प्रसंग मला प्रकर्षाने आठवला होता.
कॉलेजमधे एक वाद निर्माण झाला होता.त्या वादात मी कॉलेजच्या विरोधात होतो.
त्यावेळी मला एक आश्चर्य वाटलं की माझी बाजू घेणारे माझेच दोन विद्यार्थी होते.खरं तर दुसऱ्या एका  प्रश्नावर ह्या दोन्ही विद्यार्थ्याबरोबर माझा वाद झाला होता.परंतु ह्या वादात ते माझी बाजू घेतल्या शिवाय राहिले नाहित.त्यापैकी एकजण एकदा मला भेटला त्यावेळी माझी बाजू घेतल्याबद्दल मी त्याचे आभार मानले.
त्यावर तो विद्यार्थी मला म्हणाला,
“सर,आपल्याला वाटतं तेव्हडे आम्ही हट्टी नाही.पुर्वी जरी आपल्यात वाद झाला तरी ह्या कॉलेजच्या वादात आपली बाजू स्तुत्य आहे.सर,आपणच आम्हाला शंकर-सोन्याची गोष्ट वर्गात सांगत आला आहात. सोन्यासाठी शंकर एकटाच नरकात जायला तयार आहे अशातला भाग नाही.आम्ही पण आहो.”
नंतर भाऊसाहेब मला म्हणाले,
” कितीही एकमेकाच्या विचारात भिन्नता असली तरी  एकमेकाच्या भावनेबद्दलची माणसाला अनोखी ओढ असण्याच्या क्षमतेचा अनुभव पाहून माझा ह्या भावनेची कदर करण्याच्या वृतीवर जास्त विश्वास बसतो.
दुसऱ्याच्या भावनेची कदर करण्याची वृत्ती नसल्यावर, एकमेकाशी संवाद होवूच शकत नाही. अशावेळी वाटतं,दुसऱ्याच्या नशिबात काय वाढून ठेवलं आहे,ह्याचं आपल्याला असलेलं कुतुहल,आणि ते जाणून घेण्यासाठी त्याचाच बुटात आपला पाय घालून पहाण्याची आपली क्षमता,असल्यावर अशा कल्पकतेतून त्याची आपल्याला जाण निर्माण करता येते.
असं नसेल तर प्रामाणिक दुवा जुळणारच नाही.आणि आपण सतत दुरावलेलेच राहणार.
म्हणूनच माझा आता पुर्ण विश्वास बसला आहे की दुसऱ्याच्या भावनेची कदर असणं म्हणजेच जसं शंकरने स्वर्गात जाण्यापेक्षा सोन्याशी संबंध ठेवून नरकात जाणं पत्करलं तसं.

श्रीकृष्ण सामंत (स्यान होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

 

 

Advertisements

2 Comments

  1. mehhekk
    Posted जून 16, 2008 at 9:41 सकाळी | Permalink

    bilkul sehmat hai hum,har insaan ki bhavnao ki kadar honi chahiye,chahe dono ke vichar alag ho,bahut hi khubsurat har bar ki tarah.

  2. Posted जून 16, 2008 at 9:51 सकाळी | Permalink

    आपल्या टिप्पणी बद्दल आणि प्रशंसे बद्दल बहूत बहूत आभार
    सामंत


टिप्पणी नोंदवा

Required fields are marked *

*
*

%d bloggers like this: