ते पिंपळाचं झाड, चिनारी वृक्षापरी!

ते पिंपळाचं झाड, चिनारी वृक्षापरी

खूप दिवसानी मी धामापुरला गेलो होतो.धामापुरातला परिसर अत्यंत सुंदर आहे.लहानपणी मी माझ्या मामाच्या टुमदार घराच्या आजुबाजूला शेतीवाडी असलेल्या परिसरात वेडा होऊन जायचो.जवळच्याच उंच डोंगरातून येणार्‍या पाण्याच्या प्रवाहाला सुंदर वाट करून डोंगर्‍याच्या उतारावरून पाट बांधून सपाटी आल्यावर लोकांच्या शेतीला मुबलक पाणी देण्याची सोय करून ठेवली होती.त्यामुळे बारमास शेतीला पाणी मिळायचं.त्याच कारणाने हा सर्व परिसर गर्द झाडीने भरलेला असून नारळ, पोफळ,सुपारी,पानवेली आणि इतर रानटी झाडांच्या डोंगरा वरच्या आणि उतारावरच्या जमिनीवर विखूरलेल्या झाडीने भर उन्हात सुद्धा संध्याकाळ निर्माण करण्याचं वेगळंच वातावारण निर्माण झालं होतं. तशात ते सपाटी वरचे भातशेतीचे हिरवे गार कुणगे-चौकोनी आकाराच्या जमिनी-गालिच्या सारख्या वाटतात.डोंगरच्या एका जास्त खोलगट जागेत धामापुरचं प्रसिद्ध तळं निर्माण झालं होतं.आणि त्याच तळ्याच्या आजूबाजूला लोकांची कौलारू घरं होती. मधेच एक देवीचं सुंदर मंदिर होतं.
अश्या ह्या रम्य परिसरांवर चित्रपट काढणार्‍यांचं लक्ष गेलं नाही तर नवल म्हणावं लागेल. चिं.त्र्य.खानोलकरांच्या चानी ह्या कादंबरी वरून “चानी” -खारीला-स्किवरल- मालवणीत चानी म्हणतात-ह्या चित्रपटाचं बाह्य चित्रीकरण इकडेच झालं असं म्हणतात.
माझी मामेबहिण वासंती उच्च शिक्षणासाठी मुंबईला जाऊन रहायची.त्यानंतर ती पुढे लग्न झाल्यावर आपल्या नवर्‍याबरोबर थोडी वर्षं इंग्लंडला जावून राहिली होती.नंतर उतार वयात ती आपल्या नवर्‍याबरोबर धामापुरला आपल्य वडलांच्या घरात स्थाईक झाली.मामाची एकुलती एक मुलगी असल्याने तिला ते सर्व घरदार मिळालं होतं.लहानपणापासून धामापुरातच वाढल्याने ह्या परिसराची तिला ओढ असणं स्वाभाविक होतं.तिची मुलं नातवंडं पण मुंबईला स्थाईक झाली होती.
वासंतीच्या लहानपणीचच तिच्या समोर वाढीला लागलेल्या एका पिंपळाच्या झाडावर तिचा खूप जीव होता.ते मोठं झाल्यावर त्या झाडाच्या बुंध्याखाली बसून अभ्यास करायची.मी आणि ती ह्या झाडाखाली गप्पा मारायचो.
ह्यावेळेला तिची माझी जेव्हा भेट झाली तेव्हा बोलता बोलता ह्या झाडाचा विषय निघाला.आता ते झाडपण बरंच उंच झालं होतं.आता वासंतीचे विचार जरा फिलॉसॉफीकल झाले होते.
मला ती म्हणाली,  काही लोकांना त्या पिंपळाच्या झाडाच्या आयुष्यापेक्षा माझ्या आयुष्याला जास्त महत्व द्दावसं वाटतं पण माझा ह्यावर विश्वास नाही. मला तसं वाटत नाही.
आमच्या घराच्या पडवीत बसून तांदूळ निवडताना माझी ती मानलेली बहिण माझ्या इतकीच वृद्ध झालेली
पिंपळाचं झाड माझी करमणूक करते.
ते झाड खूप उंच आहे.जवळ जवळ चाळीस फूट उंच.आणि जवळ जवळ माझ्या इतकंच वयाने असेल.ते आता थोडं वाकलं आहे,मी पण तशीच वाकली आहे.
ते झाड अनेक पक्षांची काळजी घेतं.ते सर्व बघायला मला पण खूप आनंद होतो.त्यावर राहणारे पक्षी प्रेम करतात,भांडतात पण.आणि त्या झाडाच्या फांद्दांवर घरटी पण बांधतात.सणावारी काही देवभोळ्या बायका ह्या झाडाच्या बुंध्याची पुजा करतात.
ते झाड अजून हिरवं गार आहे.आणि बर्‍याच फांद्दा जुन्या आणि पिंगट रंगाच्या झाल्या आहेत.जणू माझे केस अधून मधून पांढरे असून त्यावर काळ्या केसांच मधूनच वेष्टन आहे तसंच.
आम्ही दोघी उन्हात करपतो आणि हवेत गारठतो आणि सुखाने जगण्याची धडपड करतो.एकना- एक दिवस ते पडणार आणि मातीशी एक रूप होणार. जमिनीला खत मिळणार.जसं माझं पण तसंच होणार.माझा मनाला धीर देणारा हा विचार असावा. आपली मुलं आणि नातवंड त्यांच्या आणि आपल्याच आयुष्याची साखळी करून पुढे सरसावतात.एक अदभूत शक्ति मझ्यात आणि त्या पिंपळाच्या झाडात आहे हाच विचार मला जास्तीत जास्त त्या पिंपळाच्या झाडाच्या जवळ नेतो.
चाळिस वर्षापूर्वी मी आणि माझे पति ह्या धामापुराच्या परिसरात येवून राहिलो.आमची राहती जागा त्या तळ्याच्या सभोवतालच्या उंच उंच पोफळीच्या आणि सुपारीच्या झाडांच्या गराड्यात वसली आहे.घराच्या उतरंडीवरून एकदम सपाटी दिसू लागते आणि सर्व परिसर मावळत्या सूर्याच्या केशरी किरणानी उजळून निघतो.तुझे आईवडिल इकडे एकदा येवून गेले तेव्हा त्याना हा परिसर खूपच आवडला होता.मी तशी शहरी मुलगी असल्याने मला आनंद व्हावा म्हणून कदाचीत ते मला प्रोत्साहन देत असावे.
माझी आई निर्वतल्या नंतर मी एकटी झाले आणि तिची मला जरूरी होती. मी तळ्याकाठी असलेल्या सुंदर मंदिरात जाऊन मुसमुसून रडले.देवळातल्या पुजार्‍याची आणि माझी तोंड ओळख होती.पण त्याने मला पाहिलं न पाहिल्या सारखं केलं.मी देवळातून त्या मावळत्या सूर्याच्या केशरी किरणांकडे बघून माझी मी समजूत घातली.निदान त्या क्षणाला तरी.त्या घटने नंतर मी चिखलात खणायचे पण गांडूळाना दोष देत नव्हते.माझ्या म्हणण्याचा अर्थ स्पष्ट आहे ना?त्या परिसरात असल्या प्रवृती पासून मी दूरच रहात होते.नव्हे तर ती आता माझी नित्याची संवयच झाली होती.दर गुरवारी मी त्या देवळात जाऊन माझा असा वेळ घालवीत होते.
एकदा मी अशीच त्या तळ्याच्या आत जाणार्‍या पायर्‍यावर पाण्यात पाय बडवून उभी होते.बारिक बारिक मासे माझ्या पायाच्या तळव्या पासून बोटांच्या टोकांपर्यंत चावा घेत असताना करमणूक करून घेत होते.पायाला हलक्याश्या गुदगुदल्या होत होत्या.त्याची मजा घेत घेत त्या मावळत्या सूर्याच्या केशरी किरणांचा तो उजाळलेला परिसर पाहून धुंद झाली असताना अशीच एक अनोळखी व्यक्ति त्या तळ्यावर फिरायला आली असताना माझ्याकडे बघून मला म्हणाली,
“तुम्हाला मी वरचेवर ह्या तळ्यावर येवून हे सूर्य दर्शन घेताना पाहातोय आपण हे धार्मिक दृष्टीने करता की आध्यात्माच्या?”
मी म्हणाले,
“मी हे आध्यात्माच्या दृष्टीने करते”
त्याचं कारण त्याने विचारल्यावर मी त्याला माझ्या बहिणी सारख्या वाटणार्‍या त्या पिंपळाच्या झाडाबद्दल सांगून म्हणाले,
” कुणी तरी मला सांगितलंय की एखादा परिसर किती सुंदर आहे ते त्या परिसरात खूप वर्ष राहून कळतं,तशी मी वरचेवर माझ्या मुलांना आणि नातवंडाना भेटायला शहरात जावून येत असते.त्यांना भेटल्यामुळे मला निराळंच समाधान वाटतं.अजूनही मी तसंच वरचेवर करीत असते,पण ह्या परिसराला मी मुकत असते. वहिवाटीत विचार करून राहणारे चांगल्या समजणार्‍या लोकांच्या स्वर्ग-नरकात जाण्याच्या विचारांचे विषय आता पार मी विसरून गेली आहे.त्या पिंपळाच्या झाडात आणि त्याच्यावर वास करणार्‍या पक्षी-प्राण्यात मला एखादी अद्भूत शक्ति दिसायला लागली आहे.छोटे छोटे गाणी गुणगुणनारे पक्षी त्या लालपोट्या सुतार पक्षाला आपल्या घरट्याच्या खूपच जवळ झाडाच्या बुंध्याला टोच मारताना पाहून त्याच्या विरूद्ध गलगलाट करताना पाहून मी विचारात पडते.मश्गूल होवून जाते.एका विचारातून दुसर्‍या विचारात जाण्याची क्रिया पुर्ण झाल्यासारखी वाटते.
मी त्या पिंपळाच्या झाडाला देत असलेलं महत्व पाहून इतर लोक उलट मला महत्व देण्यात धन्य वाटून घेतात.पण मला ते पटत नाही. त्यांची समजूत आहे की मला स्वर्गात एक खास जागा आहे पण मला ते काही पटत नाही.माझं पिंपळाचं झाड आणि त्या झाडावर वस्ति करणारे पक्षि-प्राणी ह्याना मी मानते.आणि त्यांची जीवन जगण्याची पद्धतही मानते.माणूस म्हणून जितकं जगावं, वागावं तेव्हडं वागण्याचाच मी प्रयत्न करते.माझं पिंपळाचं झाड आपलं कर्तव्य करून त्या अद्भुत शक्तिच्या इच्छेनुसार जसं वागतं तसंच.
वासंतीचं हे सर्व ऐकून मी तिला म्हणालो,
“जस जसं माणसाचं वय होत जातं तस तसं ते जास्त
फिलॉसॉफीकल होतं हे तुझ्याच उदाहरणावरून दिसतं”
माझं हे ऐकून वासंती गालातल्या गालात हंसली.

श्रीकृष्ण सामंत (स्यान होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

Advertisements

टिप्पणी नोंदवा

Required fields are marked *

*
*

%d bloggers like this: