घडता घडता घडेल ते घडेल

 

माझा एक मित्र अरूण ढवळे जे.जे.स्कूल ऑफ आर्टस मधे डिप्लोमा घेऊन झाल्यावर एका नावजलेल्या वर्तमानपत्रात कार्टूनीस्ट म्हणून काम करायचा. धोबीतलावला त्याचा एक स्टुडियो पण आहे. आणि बरं चाललं आहे.मी मेट्रोसिनेमा जवळ बसची वाट बघत उभा असताना आमची नजरा नजर झाली. मला त्याने बसला उभ्या राहिलेल्यांच्या रांगेत हाताला ओढून माझ्या बरोबर चल म्हणून घेऊन गेला,तो एकदम त्याच्या स्टूडियोत.
निरनीराळे फोटोझ,फ्रिहॅन्ड स्केचीस,कार्टून्स,म्युझीयम मधे ठेवण्यालायक काही आडव्या फोटो फ्रेम्स,लॅन्डस्केप्स वगैरे बघून मला बरं वाटलं.
एका गिर्‍हाईकाला पटवून झाल्यावर माझ्या बरोबर गप्पा मारायला बसला.लंच टाईम असल्याने शेजारच्या हॉटेल मधून दोन प्लेट्सची ऑर्डर देऊन आला.जुन्या आठवणीना उधाण आलं.माझ्याकडून काही गोष्टी त्याने ऐकल्यावर मी म्हणालो,
“आता तुझा जीवन प्रवास कसा झाला तो सांग”
अरूण सांगू लागला,
“माझ्या पूर्वीच्या कथा ऐकशील तर तू तोंडात बोटच घालशिल.कुठे हा माझा फोटो स्टुडियो आणि कुठे मी सुरवातीला कित्येक वर्षापूर्वी प्रयत्न केलेली आणि असफल झालेली माझी खानावळ.
कोकणात काहीच नाही जमलं तर खानावळ घालण्याचा प्रयत्न अगदीच असफल होईल असं नाही.म्हणजे मी तो धंदा काही असातसा समजत नाही.पण अन्नछत्र उघडण्याचं एक पुण्यकर्म करतो हे वाटत असताना अगदी नव्याने प्रयोग करण्यात खूप काही भांडवलाची जरूरी भासत नाही.
असाच विचार करून मी वेंगुर्ल्या जवळ उभ्यादांड्यावर एक छोटीशी खानावळ उघडली.सुनील गांवसकरचं हे मुळगांव हे तुला माहित असेलच.चिं.त्र्य. खानोलकरची पण अशीच एक खानावळ होती.आणि त्या धंद्यात त्यांच लक्ष लागत नव्हत.पण पोट्यापाण्याची सोय म्हणून करीत होते.
खानोलकरांच उदाहरण देण्याचा मतितार्थ असा की कुठे खानवळीचा धंदा आणि कुठे शेवटी महान नाटककार कथाकार म्हणून नावाजायला येणं.माझं थोडंफार तसंच झालं.त्या अयशस्वी प्रयत्नातून पुढे जे.जे स्कूल ऑफ आर्टसमधे शिकून इथे आता हा स्टुडियोच्या धंद्यात गुरफटणं.”तरट्यात”काय लिहून ठेवलेलं असतं हे कळत नाही तेच बरं.
मी म्हणालो,
“तुझ्या त्या खानावळीचं काय झालं ते सांग”
अरूण म्हणाला,
“तेच सांगायचं आहे.सहा ताटं,तीन फूलपात्र असली तरी बारा लोकांची जेवायची सोय करायला कठीण वाटण्याचं काहीच कारण नाही.चहाचे कप,किंवा पितळेच्या वाट्या पाणी पिण्यासाठी,आणि केळीची पानं किंवा फणसाच्या पानाच्या पत्रावळी ताटं म्हणून वापारता येतात.एकदा एका मित्राच्या घरी पार्टी होती म्हणून चिकन तयार करण्यापूर्वी चिकन कापायला एकच सूरी होती तरी मी कात्री वापरून काम पार पाडलं होतं.मी तसा ह्या बाबतीत सुधारणावादी आहे.ही माझी वृत्ति उत्तेजन देणारी, साहसी,आव्हान देणारी आणि सृजनशील बनायला अवसर देते.
योजना आखून,निर्धारीत मार्ग पत्करून अडकून रहाण्यापेक्षा अशा तर्‍हेने काम करताना गंमतीदार गोष्टी  घडायला मोका मिळतो.पदार्थ बनविण्याच्या सुची प्रमाणेच डीश बनवली पाहिजे असं नाही.मी नेहमीच एखाद्दा पदार्थात तूप आणि लसूण सुचीपेक्षा जास्तच वापरायचो.एकच दुष्परीणाम म्हणजे थोडं वजन वाढतं.

मी कुणाकडून खानावळ कशी चालवायची याचे धडे घेतले नव्हते.घडता घडता घडेल ते घडेल हीच वृत्ती ठेवली.खानावळ चालवण्याच्या स्वैर कल्पनेने मी भारावलो होतो.त्यात मी अपयशी होईन असं मला कदापी वाटलं नव्हतं.खानावळ चालू केल्यावर तसं होईल असा मला भासायला लागलं.पण त्याला उशिर झाला होता.
आणि अर्थात पैसे कमविण्याचा मुद्दा माझ्या यादीत अगदी शेवटचा होता.त्यामुळे काही तरी अद्भुत करून पाहाण्याकडे लक्ष केंद्रीत करायला मला स्वातंत्र्य मिळालं. कुठलीही गोष्ट कशी असावी ह्याचं माझ्याकडे कसलंच अनुमान नव्हतं.गाडा मी पुढे रेटीत गेलो आणि ना ना तर्‍हेच्या संभावनांचा शोध लावला,बरोबर खूप चूका पण केल्या.खरंच ह्यामुळे शिकायला मोठी संधी चालून आली.एखादी गोष्ट यशस्वी झालीच तर ठीक आहे. झालीच आहे.आणि नाहीच झाली तर मात्र मला का नाही झाली ह्याचा विचार करावा लागायचा आणि यशस्वी व्हायला नंतर कुठला दुसरा मार्ग हुडकून काढावा लागायचा.

चुका होतानाच शोध लागतात.कलिंगड खाताना चिमूट भर मीठ चोळ तेच कलिंगड किती गोड लागतं हे लक्षात येईल.विश्वास ठेव माझ्यावर.एकदा करून बघ.साखरेच्या चिमूटा ऐवजी मी चुकून मीठाची चिमूट कलिंगडाला लावली होती.
माझ्या खानावळीत वेटर म्हणून शिकलेली पोरं मी ठेवली नाहीत.ते इतकं मला महत्वाचं वाटलं नाही.जोपर्यंत गिर्‍हाईकाला काय हवंय हे ओळखणं,त्यांच्याशी चांगली वागणूक ठेवणं, आणि गिर्‍हाईकाचं समाधान होईल अशी त्याना ट्रिटमेंट देणं हे झाल्यावर वेटरला युनीफॉर्म असला पाहिजे ह्याची मी कधीच पर्वा केली नाही.त्यांचे कपडे स्वच्छ असले म्हणजे झालं.
खरं म्हणजे विचित्रताच प्रत्येकाला विपुलता आणते.

काही लोक मला म्हणाले खानावळीचा माझा धंदा अपयशी ठरला.का तर मला दिवाळखोरी करावी लागली.खरं तर मी एव्हडा धनवान-पैशाच्या दृष्टीने नव्हे- होतो की दुसरा एखादा यशस्वी खानावळवाला एव्हडं स्वपनातही आणू शकणार नाही.
माझ्या सुधारणावादावरच्या विश्वासाला माझी खानवळ बंद करून पुष्टी मिळाली.खानावळ सरळ बंद करून मी चालू पडलो.मी कसलेच प्लॅन केले नाहीत.मागे सगळं टाकून मुंबईला आलो.चित्रकला शिकलो आणि हा स्टुडियो घातला.
मला वाटतं कोणतीही गोष्ट करायला एकच मार्ग नसावा.जो मार्ग माझ्या कामाला येतो तो आता आहे तोच.पण हा उद्दा बदलू शकतो.”
 अरूण ढवळ्याचं हे सर्व ऐकून त्याचं एक म्हणणं पटलं की “कुणाच्या तरट्यात काय लिहून ठेवलंय कुणाष्टाऊक”

 

श्रीकृष्ण सामंत (स्यान होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

Advertisements

टिप्पणी नोंदवा

Required fields are marked *

*
*

%d bloggers like this: