माझ्या यशाची पहिली चव.

कोकणातल्या पिंगुळी गावात जाऊन एका शाळेला भेट देण्याचं कारण,मी माझ्या मावशीच्या मांडकूली गावात गेलो होतो.तिथे पिंगुळी गावचा विषय- नलिनीने- माझ्या एका मावस बहिणीने काढला.ती मला म्हणाली,
“अरे पिंगुळी गावात वसुंधरा साने नावाची माझ्या वयाची मुलगी माझ्या जवळ फार पूर्वी आली होती.आणि मी तुझी त्यावेळी तिच्याशी ओळख करून दिल्याचं तुला आठवत असेल.ती आता तशी मुलगी राहिली नाही.मुंबईत चांगलं शिक्षण घेऊन तिकडेच नोकरी करण्याचं नाकारून आपल्या गावाची उर्जितावस्था करण्याच्या इराद्दाने,पिंगुळीला आली.बरीच वर्ष ती इकडे आहे आणि तिने शिक्षणाच्या दृष्टीने खूपच कायापालट केला आहे.हवं तर आपण तिला भेटायला जाऊया.तू तिची स्टोरी ऐकून नक्कीच खजील होशील.मला ही तिला बरेच दिवसानी भेटण्याचं निमीत्त मिळेल.
दुसर्‍या दिवशी आम्ही वसुंधराला भेटायला पिंगुळीला गेलो.मांडकूली पासून ते अवघ्या तीन मैलावरच आहे.आम्ही चालत चालत गेलो.आम्हाला पाहून वसुंधरेचा आनंद गगनात मावेना.आमचं आगत-स्वागत वगैरे करुन झाल्यावर आमची तिच्या एकंदर कार्याची चर्चा झाली.
मी तिला म्हणालो,
“ह्या व्यवसायात तू स्वतःला कसं झोकून दिलंस?”
मला वसुंधरा म्हणाली,
“जेव्हां जव्हां मी इकडे यायची तेव्हा तेव्हा इथल्या लोकल जनतेचं सांगणं,
“आम्ही खूप प्रयत्न करतो पण मुलंच शिकत नाहीत.”
माझा माझ्या शिक्षणातला अनुभव जमेला धरून मी हे एक चॅलेंज घेतलं की ही सबब खोटी करुन दाखवायची.
मुलं शिकत नाहीत ही सबब मी कधीच स्वीकारू शकत नाही.तुम्हाला मुलांना दोष देता येणार नाही.मुल जर शिकण्यात यशस्वी झालं नाही तर समजावं की त्याच्या सानीध्यात असलेल्या माणसाचं ते अपयश आहे,मुलाचं नाही.
मी ज्यावेळी म्हणते की सर्व मुलं शिकू शकतात आणि हे असं मी मानते हे ऐकल्यावर काही लोकांचा गैरसमज होतो.
कारण मी माझ्या गावातल्या अगदी गरीब लोकांच्या वस्तितल्या मुलांशी जवळून गेली पंचवीस वर्षे काम करीत आलेली आहे.काही लोकाना वाटतं की त्या वातावरणातल्या  मुलांमधल्या चांगल्या हुषार मुलांविषयी मी बोलत असते त्या मुलांमधल्या बुद्धिवान मुलांना चांगलं शिक्षण दिलं तर ती यशस्वी होतात असं मला म्हणायचं आहे असं वाटून बोलते.तसं होणं हे अगदी खरं आहे.पण मला तसं मुळीच म्हणायचं नाही.
हे पहा,मला अगदी मनापासून वाटतं की सर्व मुलं शिकू शकतात.मी तसं मानते.मी ते पाहिलंय.आणि मी त्याचा अनुभवही घेतलाय.
 मी माझं शिक्षण घेताना अगदी कठीण समस्या असलेल्या मुलांबरोबर काम केलं आहे.भावना दुखावलेली मुलं,स्वलीन(autistic)मुलं,थोड्या मंद बुद्धिची मुलं,वागायला कठीण जातील अशी मुलं,थोडक्यात त्या मुलांच्या आईबाबानी संभाळायला त्यानी हात टेकलेली मुलं अशा प्रकारच्या मुलांबरोबर काम केलं आहे.
एक साधी गोष्ट पहा.मी आणि माझे सहकारी ह्या मुलांबरोबर एखादी खाण्याची गोष्ट कशी बनवायची ह्या पासून सुरवात करायचो.आता नानकटाई बनवण्याचंच घ्या.त्याना बेकिंग पावडर आणि मीठ ह्यातला समोर बघून फरक कळत नसायचा.पण एकदा का ती गरम गरम नानकटाई भट्टीतून काढून त्यावर थोडं साजूक तूप आणि मधाचा एक चमचा वाढून त्यानी खाल्ली,का मग ती मुलं नवीन नानकटाई कशी करायची ह्यासाठी प्रेरीत व्ह्यायची.

एकाएकी जी मुलं स्थीर न बसता सारखी चुळबुळ करीत र्‍हायची किंवा नीट एकाग्र होत नसायची ती आता एखादी डीश बनवली तर त्याला लागणार्‍या निरनीराळ्या मूळ पदार्थाचं प्रमाण किती असतं त्याकडे निक्षून बघायची.साध गणीत किंवा स्पेलिंग करायची.कालान्तराने मला आठवतं त्यांचे आईबाबा ही त्यांची प्रगती पाहून आनंदाने रडायची.

नानकटाई,बर कां,खूप चवदारी होती.आणि आता आज  मला त्याची चव आठवते. आणि त्याशिवाय त्यानी  मला शिकवलेला धडा आठवतो की जरका आपण मोठी माणसं,त्यांच्यासाठी योग्य अशी प्रेरणा त्या मुलासाठी निर्माण केली तर ते मुल शिक्षीत व्ह्यायची आशा करायला हरकत नाही.
सध्या मी आजूबाजूच्या खेड्यातली मुलं शाळेत जावी म्हणून शाळा निर्माण करायच्या खटपटीत असते.शेकडो मुलांबरोबर मी संपर्क ठेवून असते.माझ्या सर्व सहकर्‍याना माहित आहे,की मला अमुक अमुक मुल शिकत नाही ही सबब मुळीच पसंत नाही.मुलांना तुम्ही दोषी ठरवू शकत नाही.माझ्या कारभारात जर का मुल यशस्वी होऊ शकलं नाही तर त्याचा अर्थ त्याच्या भोवतालची मोठी माणसं अपयशी ठरली आहेत.
त्याचं कारण अति कठीण समस्या घेऊन मुलं एकाएकी स्वतःला शिकवायला जाणार नाहीत.मी मानते की मोठ्यानी त्यांना मदत केली पाहिजे.आणि ते प्रत्येक मुलाकडे निरखून पाहून त्यांना कशाने स्फुर्ती मिळते ते पाहून त्यांच्या त्या स्फुर्तीला अगदी नीगरघट्ट होवून चालना देता आली पाहिजे.

माझे वडील हयात नव्हते.माझ्या आईने आम्हा चार मुलांना वाढवलं.मी तर अभ्यासात दुर्लक्ष करीत राहिले.जर का माझी त्या दोन शिक्षकांशी भेट झाली नसती तर मी कुठच्या कुठे वाईट मार्गाला लागले असते.त्यानी मला आवडतील अशी पुस्तकं-साने गुरजींच काही पुस्तकं,काही सुंदर सुंदर कवितांची पुस्तकं देवून माझ्या मनात वाचनाची गोडी आणून दिली नसती तर हा माझ्यातला फरक तुम्हाला दिसलाच नसता.
अशा चांगल्या चांगल्या लेखकांच्या पुस्तकांचं वाचन माझ्या पचनी पडलं.आता मी माझ्या ह्या गावातल्या आणि आजुबाजूच्या गावातल्या मुलांसाठी वाहून घेतलं नसतं तर माझी होणार असती ती परस्थिती आज त्या मुलांची झाली असती.ती मुलं आयुष्यातून फुकट गेली असती.

माझ्या यशाची पहिली प्रचिती त्यावेळी झाली की ज्यावेळी त्या गावातल्या मुलानी मला जी गरम गरम नानकटाई आणून दिली आणि त्याची चव इतकी मधूर होती की मी मानते तुमच्या डोळ्यातून अश्रू टपकले असते.
मी वसुंधरेला म्हणालो,
“तुझी ही तपश्चर्या बघून माझ्या डोळ्यातून अश्रू नक्कीच टपकले हे निश्चीत.पण तुझ्या नानकटाईची चव मात्र मी घेतल्या शिवाय इकडून जाणार नाही.”
मला वसुंधरा म्हणाली,
“अरे,नानकटाई अवश्य खा.पण त्या अगोदर कर्ली नदीतून गुंजूल्याच्या गातनी एका कोळ्याने मला आज त्याच्या मुलाचा शाळेत पहिला नंबर आला म्हणून खूष होऊन आणून दिल्या आहेत.त्याचं चांगलंच तिखलं करते तू आणि नलिनी जेवूनच जा. मला पण बरं वाटेल.”
मला कुणाच्या आग्रहाला नकार देऊन नाराज करता येत नसल्याने आम्ही दोघं वसुंधरेकडे जेवायला राहिलो.

 

श्रीकृष्ण सामंत (स्यान होजे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

टिप्पणी नोंदवा

Required fields are marked *

*
*

%d bloggers like this: