सर्व देशाला जेवणाचं निमंत्रण.

 

“तिला सहनशीलता म्हणा,किंवा सहिष्णुता म्हणा,ती अंगात असली की दुसर्‍याला सन्मान द्दायला पुढाकार घेतला जातो आणि सरतेशेवटी स्नेह निर्माण होतो.एखाद्दाची खरीच पूर्ण ओळख होणं जरा कठीण आहे पण त्याच्याशी स्नेह करून राहायला किंवा त्याचा स्वीकार करायला हरकत येत नाही”

नेहमी प्रमाणे काल माझी आणि प्रो.देसायांची तळ्यावर भेट झाली. भाऊसाहेबांबरोबर एक गृहस्थ होते.माझी ओळख करत देत भाऊसाहेब म्हणाले,
हे शुभ्रतो चक्रबोरती.आमच्या कॉलनीत राहायला आले आहेत.आमच्या कॉलनीत जवळ जवळ बारा बिल्डिंग्स असून देशातले निरनीराळ्या प्रांतातून आलेले लोक राहतात.
शुभ्रतो मुंबईत आल्याआल्या प्रथम वसईला राहिले.नंतर ते गोरेगाव इस्टला बरीच वर्षे राहिले.अलिकडेच आमच्या कॉलनीत राहायला आले.मुंबईत इतके दिवस राहिल्याने त्यांना आणि त्यांच्या कुटूंबियाना मराठी चांगलीच अवगत झाली.
हे मुळचे कलकत्याचे.नावारून तुम्ही ओळखलं असेलच.त्यांचं तिथे एक बुकस्टोअर होतं. तिकडे त्यांनी एक नाटक कंपनीपण काढली होती.मुंबईला आल्यापासून ते एका प्रसिद्ध पत्रकात रिपोर्टर म्हणून काम करतात.तुम्हाला आज रात्री त्यानी घरी जेवायला बोलवलं आहे.ते तुमच्या घरीच येऊन आमंत्रण देणार होते.पण मीच म्हणालो त्यांना नाही तरी आपण तळ्यावर भेटतोच,तिथे मी तुमची आणि त्यांची ओळख करून देईन मग तुम्ही त्यांना आमंत्रण द्दा.
शुभ्रतो मला म्हणाले,
“दर आठवड्याला रवीवारी मी माझ्या घरी जेवणाची पार्टी करतो.असं गेले तीस वर्ष करीत आलो आहे.ही माझी कलकत्यापासूनची सुरवात आहे. बोलवल्यातले पन्नास ते साठ टक्के लोक येतात.काही फोन करून- येणार नसल्यास- अगोदर कळवतात.खूप लोक जमले तर मग मी आमच्या घराच्या गच्चीत सगळ्यांना घेऊन जातो.
प्रत्येकजण आपल्या घरून एखादा पदार्थ घेऊन येतो.जमल्यावर एकमेकाची भेट होऊन एकमेकाच्या ओळखी होतात. निरनीराळ्या वयाचे,निरनीराळ्या प्रांतातले, तसंच निरनीराळ्या व्यवसायातले लोक जमतात आणि मी कसलीच बैठकीची सोय करीत नसल्यामुळे एकमेकात मिसळून गप्पागोष्टी करीत राहून आपली सोय करून घेतात, तेच बरं वाटतं. ह्या पेक्षा कसलीचांगली सोय होणार?
मला अस्त-व्यस्तपणा आवडतो. एकमेकाची ओळख करून द्दायला मला आवडतं. मला एक उपजत संवय आहे जे लोक येतात त्यांची नावं,ते कुठून आले,ते काय करतात,हे चांगलं लक्षात राहतं.त्यामुळे मला एकमेकाला ओळख करून द्दायला सोपं होतं.मला जर शक्य झालं असतं तर मी सगळ्या जगाची ओळख करून दिली असती.
लोकांचं अस्तीत्व माझ्या जीवनात महत्वाचं मी मानतो.बरेच लोक प्रवासाला गेले की निरनीराळी प्रेक्षणीय स्थळं बघायला जातात.मी मात्र मित्रमंडळीना भेटायला जातो,जादाकरून ज्यांना मी कधीच भेटलो नाही अश्याना.

दहा वर्षापूर्वी देशातल्या निरनीराळ्या प्रांतातली मी एक पुस्तीका छापली होती.गाईडबुकच समजा.कुठलीही प्रेक्षणीय स्थळं त्यात नव्हती. तसंच, कुठलेही शॉपींगमॉल आणि म्युझियम नव्हते.त्या ऐवजी त्यात मुख्य शहरातल्या बर्‍याच अशा होतकरू लोकांची त्रोटक व्यत्किचित्रं आणि ज्याना नवीन लोकाना भेटून ओळख करून घेण्याची आवड आहे अश्या लोकांची यादी असायची.शेकडो मित्रांची नाती ह्या प्रयत्नामुळे विकसीत झाली.त्यात काही लोकांची लग्नंपण करता आली.
माझ्या रवीवारच्या जेवणाच्या कार्यक्रमाने चर्चा-परिचर्चा घडवता येते.हल्लीच एका रवीवारी एक वीस वर्षाची पंजाबी मुलगी आणि एक पंचवीस वर्षाचा कलकत्याचा मुलगा यांची ओळख होऊन त्याचं रुपांतर त्यांच्या  दोस्तीत झालं.माझ्या ह्या कार्यक्रमात देशातले चारही बाजुचे लोक असतात.बहुतेकाना हिंदी अवगत असतं. निदान दुसरी भाषा म्हणून.

एकदा गंमतच झाली.कॉलनीतल्या लोकांमधे एक कार्टूनिस्ट होता,एक पेंटर होता,एक ट्रक ड्रॅव्हर होता,एक बुकसेलर होता,एक न्युझपेपर एडिटर होता आणि काही विद्दार्थीपण होते,आणि काही निवृत्त लोक होते ह्यातले सर्वच काही कॉलनीत राहाणारे नव्ह्ते.काही त्यांचे पाहूणे म्हणून त्यांच्या घरी आले होते.ते  त्यांच्याबरोबर जेवायला आले एव्हडंच.
मी पूर्वी पासून मानत आलो आहे की इतराना, व्यक्तीव्यक्तीना,देशवासियाना समजून घेणं अनावश्यक आहे.फारफार तर इतराना नुसतं सहन करून घ्यावं.
तिला सहनशीलता म्हणा,किंवा सहिष्णुता म्हणा,ती अंगात असली की दुसर्‍याला सन्मान द्दायला पुढाकार घेतला जातो आणि सरतेशेवटी स्नेह निर्माण होतो. एखाद्दाची खरीच पूर्ण ओळख होणं जरा कठीण आहे पण त्याच्याशी स्नेह करून राहायला किंवा त्याचा स्वीकार करायला हरकत येत नाही”

मी शुभ्रतोनां विचारलं,
“हे तुम्हाला आर्थिक दृष्ट्या जमतं कसं?”
मला म्हणाले,
“मी थोडा खर्च करतो,येणारे पाहूणे काहीतरी डीश घेऊन येतात,आणि अवांतर खर्च आला तर माझी न्युझपेपर कंपनी मला सहाय्य म्हणून देते. तुम्हाला आज आल्यावर कळेलचकी खाणं थोडं मचमच भारी असते.आणि भेटण्याचा उद्देश साध्य होतो.”
 मी एकदा जावून आल्यावर शुभ्रतोचं म्हणणं मला खरं वाटलं.

 

श्रीकृष्ण सामंत (स्यान होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

Advertisements

टिप्पणी नोंदवा

Required fields are marked *

*
*

%d bloggers like this: