शिरोड्याचं हवामान.

 

बरेच दिवसानी मी कोकणातल्या शिरोडे गावात गेलो होतो.गोव्यातपण एक शिरोडे आहे.रेडीचा समुद्र किनारा जवळच आहे.ह्या समुद्रामुळे जवळच्या या गावात हवामानवर खूपच परिणाम होत असतो.
आपण ज्यावेळी भेटतो त्यावेळी बहुदा हवामान हा विषय म्हणून कधी कधी आपल्या बोलण्यात  येत असतो.हवामान हे एक कारण आहे.ते आपला दुवा सांधून वास्तविकतेला आकार देते.आपण त्या हवामानातून श्वसन करतो.आपण त्यातच असतो. आता ह्या क्षणी मी शिरोड्या गावात आहे तिथे असाधारण गरम, ह्युमीड आणि स्थीर अशी हवा आहे.जमिनीकडून समुद्रावर आणि उलट जाणारे वारे हे आपले नैसर्गिक एअरकंडिशनर आहेत.
शिरोड्याचं हवामान प्रसिद्ध आहे.तुम्हाला ते हवामान आवडत नसेल तर एक मिनीट थांबा,ते लागलीच बदलेल.एकाएकी वावटळ येऊन आकाश ढगानी भरून जाऊन पावसाचे शिंतोडे पडायला वेळ लागणार नाही. कधीही तुम्ही पेपरात इकडचं हवामान बघीतलंत तर ते नेहमी गरम,ह्युमीड असंच लिहिलेलं असेल.आणि ते पण दिवसभर.सदाची इकडे हिटवेव्ह असते.
माझे मित्र नेहमीच मला सांगतात की पृथ्वीवरचं हवामान कसं बदलत राहिलंय ते.धृवावरचं बर्फ वितळायला लागल्या पासून तिकडची अस्वलं पाण्यात डुबत आहेत.आणि कुठे प्रचंड दुष्काळ पडतोय तर कुठे वाळवंटं तयार झाली आहेत. वाटतं जरा आपल्याच आजूबाजूला न्याहाळून ह्या धरतीची काळजी घेण्याची वेळ आली आहे.वनस्पती,प्राणी,वारे,पाऊस,सूर्य आणि चंद्राचे आभार मानले पाहिजेत.ह्या सर्वानी आपली इतकी वर्ष काळजी घेतली आहे आणि आपली जोपासना केली आहे.आणि त्या विधात्याचे पण आभार मानले पाहिजेत.आपण इतकं सगळं सहजगत्या स्विकारलं असंच करतो.बरेच आपल्यातले आपण ह्या धरतीवर खरोखर कोण आहोत हे विसरून गेलो आहोत.
माझा एक ह्या विषयावर अभ्यास केलेला मित्र सांगतो,
“हे एका टोकाला गेलं तर?-आणि ते जाणारही-जर का आपण आपल्याच वागणुकीत बदल केला नाही तर.?
आपल्याला परत आदिवासी व्हावं लागेल.” वनस्पती,प्राणी आणि वार्‍यांची स्तुतीसुमनं गावी लागतील,की ज्यांच्यामुळे आपण जगलो आहो.मला वाटतं,आताच सुरवात केली पाहिजे.हवामान अनुकूल आहे आणि ते आपल्या विचारांचं आणि क्रियेचं समापन आहे.
काल शिरोडे गावात खेळाचे सामने झाले.खो खो,हुतुतू,आट्यापाट्या,आणि कुस्तिचे खेळ.हे खेळ कौशल्याचा आधारावर आहेत.एक तरी भिडू शेवट पर्यंत टिकण्यावर त्याचं कौशल्य दिसून येतं. कुस्तिच्या खेळातून आपल्याला रोजच्या आयुष्यात शक्तिमान बनयाला मदत होते.त्यामुळे घरातली जड वजनं उचलायला मदत होईल.बाजारातून जड पिशव्या घरी आणायला सोपं जाईल.आणि चालायचा व्यायाम केला किंवा धावायचा व्यायाम केला तर कदाचीत जवळपास पायी जायला सोपं जाईल.आणि गाडीत इंधन कमी घातलं जाईल.आणि त्यामुळे प्रदुषण कमी होईल.आणि चिकन तंदुरीचे पाय भिरकावून दिल्यास?चरबी सकट तळलेले तिन चार पाय खाऊन झाल्यावर जरूरी नसलेला उरलेला पाय किती लांब भिरकावता येतो ते पाहिल्यावर तुमचं काही पौन्ड वजन कमी होईल आणि कदाचीत एकाददोन वर्षानी आयुष्य वाढवील.  
आपण प्रत्येकजण असेच जीवनातल्या खेळात सामिल झालेलो आहोत.आणि ही धरती आपलं खेळाचं मैदान आहे.जन्माला येऊन जीवन कंठताना आपलं चैतन्य घेऊनच आपण जगणार आहोत.आपल्याला आव्हान असं आहे की,आपल्या यशापयशाची एक चमकदार कहाणी आपल्याकडून निर्माण झाली पाहिजे. आपलं हताशपण आणि आपली प्रसन्नता याचा उपयोग- आपल्या एकमेकाची आणि एकमेकाच्या योग्यतेची- काळजी घेण्यात झाला पाहिजे.
कधी अगदीच कंटाळा आला की मग मी रेडीच्या समुद्रावर जाऊन एखाध्या काळ्या खडकावर बसून पाडगांवकरांच्या कविता वाचत बसतो.खडकावर आपटणार्‍या लहान लहान लाटा परत जाताना फेसाळपणा सोडून जातात.त्या फेसात जमलेली हवा पुन्हा लाट येई पर्यंत बाहेर पडताना आवाज करतात.तो आवाज ऐकून ग्लासात सोडावाटर ओतल्यावर फेसाळ पाण्याला आवाज येतो तसाच काहीसा वाटतो.क्रिया एक असल्याने परणिम सारखेच असणार.हेच तर पदार्थ-शास्त्राचं तत्व आहे.रेडीच्या किनार्‍यावरून -आकाश स्वच्छ असेल तर- दूरवर वेंगुर्ल्याच्या बंदराचा भाग दिसतो.दुपारची वेळ असेल तर शुभ्र स्पटिकासारखी वाळू तापल्यानंतर चमकते आणि कधी कधी किनार्‍याच्या पाण्याचं प्रतिबिंब दिसतं.ते विलोभनीय असतं. बंदरावर येणार्‍या बोटीना रात्रीचा मार्ग दाखवायला भर समुद्रात लाईट हाऊस असतात.त्या रात्रीच्यावेळी रेडीच्या समुद्रावरून स्पष्ट दिसतात.
शिरोडा सोडून परत जायला खूप वाईट वाटतं.पण काय करणार.?

 
श्रीकृष्ण सामंत (स्यान होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

Advertisements

टिप्पणी नोंदवा

Required fields are marked *

*
*

%d bloggers like this: