यमदुता कधी रे नेशिल तूं?

सत्येंद्र आजगांवकर म्हणजेच डॉक्टर बंडूमामा.माझ्या आईचा चुलत भाऊ.आईला सख्खे भाऊ नव्हते.बंडूमामा उंच,गहूवर्णी आणि लाघवी स्वभावाचा.मधूनच एक नाकाची पुडी दाबून दुसऱ्या नाकपुडीतून “सॉक,सॉक “असा आवाज काढायची संवय त्याला जडली होती. बंडूमामाची हजेरी त्यावरून ओळखावी.बंडूमामाची घरची गर्भश्रीमंती आणि घरच्या शैक्षणीक वातावरणाचा वारसा,यामुळे बंडूमामाला वैद्दकीय शिक्षण घेणं फारसं कठीण झालं नाही.शिक्षण पूरं झाल्यावर जे.जे. हॉस्पिटलमधे इंटरनशिप करीत असताना त्याला स्वतःलाच टी.बी.ची लागण झाली.
हे लक्षात येताच त्याला खूपच मानसिक धक्का बसला.त्याच हॉस्पिटलात तो ट्रिटमेंट घेऊ लागला.त्यावेळी या रोगावर जालीम असा उपाय उपलब्ध नव्हता. तरीपण स्वतः डॉक्टर असल्याने अर्ध्या आवश्यक गोष्टींची तो काळजी घेऊ शकल्याने हळू हळू बरा झाला.
आमच्या घरी तो “रिकव्हरी पिर्यड” मधे येऊन राहीला.माझ्या आईने त्याची खूप सेवा केली.हे अचानक आलेलं संकट त्याच्या आयुष्याला एक कलाटणी मिळायला कारणीभूत झालं.त्याने लग्न न करण्याचं ठरवलं.पुन्हा त्याच्या डॉक्टरी शिक्षणाचा उपयोग त्याने करून घेतला.न जाणो ह्या रोगाने पुन्हा उचल खाल्ली तर त्याच्या बरोबर त्याच्या सहचरणीला आणि पुढे होणाऱ्या मुलाना नाहक क्लेश होऊ नये ह्या एक उदात्त विचाराने तो अविवाहित राहण्याच्या त्याच्या विचाराशी चिकटून राहिला.

आयुष्यात “टर्नींग पॉईंट्स “कसे येतात ते पहा.त्याच्या डॉक्टर ग्रुपमधल्या एका त्याच्या मित्र- डॉक्टरने सहज सुचना केली की,
“तू इकडे तिकडे डॉक्टरी व्यवसाय करण्या ऐवजी पांचगणीला एक टी.बी.स्यानीटोरीयम आहे.तिथे तूं इकडे तर व्यवसाय आणि इकडे तर तुझ्याच माहितीतला रोग असलेल्या रोग्याना उपाय आणि सुश्रुशा करण्याचे काम का घेत नाहीस?.नाहीतरी तुला संसार करायचा नाही,मग तिकडे तुला मिळेल तेव्हडा वेळ घालवून सेवेचे पुण्यपण मिळेल.”

हा त्याच्या मित्राचा सल्ला त्याला आवडला आणि त्या तयारीला तो लागला.त्या स्यानीटोरीयम मधे डॉक्टरांची पण जरूरी होती.पांचगणीला बंडूमामा स्थाईक झाल्याने मला सुद्धा एकदा त्याच्याकडे जायला मिळालं.

डोंगराच्या पायथ्याशी वाई गांव,डोंगर वर चढून गेल्यावर पांचगणीचे पठार आहे आणि वर चढत गेल्यास महाबळेश्वरचे थंड हवेचे ठिकाण आहे.पांचगणीपण खूप थंड असते. ब्रिटीशानी ही ठिकाणे शोधून काढून त्यांच्या सुट्टीतल्या आरामासाठी ती चांगलीच सोयीची केली होती. एका श्रीमंत पारशी गृहस्थ्याने पांचगणीला राहाण्यासाठी एक बंगला बांधला होता आणि त्याला व्यवसायासाठी मुंबईत रहावं लागायचं. त्यालाही उतारवयात टी.बी. झाला असताना त्याच्या डॉक्टरने त्याच्या पांचगणीच्या बंगल्यात राहाण्याचं सुचवलं होतं.त्यावेळीच त्याला स्यानीटोरीयम बांधण्याची कल्पना सुचली.असं मला तिकडच्या मुक्कामात राहिलो असताना कळलं.

त्याचं असं झालं,बंडूमामा तिथे असताना एका बिलीमोरीया नावाच्या श्रीमंत पार्श्याला पेशंट म्हणून ह्या स्यानीटोरीयम मधे उपायासाठी पाठवलं होतं.त्याची आणि बंडूमामाची चांगलीच दोस्ती जमली,इतकी की जेव्हा आणखी आराम मिळण्यासाठी त्या पारशाने इंग्लंडला थोडे दिवस वास्तव्य करण्याचं ठरवलं, त्यावेळी,
“तू पण माझ्या बरोबर माझा पर्सनल डॉक्टर म्हणून चल”
असं बंडूमामाला सांगितलं.त्यामुळे बंडूमामाला इंग्लंडला जायला मिळालं.मला आठवतं आम्ही त्याला सांताकृझ विमानतळावर पोहोचवायला गेलो होतो. आठवड्यातून त्यावेळी तिनदा इंग्लंडवरून फ्लाईट्स यायच्या जायच्या, आणि टर्मीनल कसलं अगदी विमानाला हात लावता येईल असा सेंन्डॉफ देता येत होता. जुन्या हिंदी सिनेमातला सीन डोळ्यासमोर जर आणला “सुनील दत्त इंग्लंडहून आल्यावर त्याला रीसीव्ह करायला हार घेवून वैजयंतीमाला उभी आहे ” असं आठवलं म्हणजे झालं.

तिकडून जाऊन आल्यावर बंडूमामाला बिलीमोरीयाने फोर्ट मधल्या बझारगेट स्ट्रीट्वर एक दवाखाना उघडून दिला.
आणि त्याच्या मागे त्याचाच एका चार मजली उंच इमारतीत अगदी वरच्या मजल्यावर एक फ्लॅट दिला.
बझारगेट वरचे भाजी विकणारे आणि काही गरिब विक्रिते डॉ.बंडूमामाचे कायमचे पेशन्ट झाले होते. “होटल मे खाना और मशिद मे सोना” हे जीवन जगत असताना अधून मधून तो आमच्याकडे रवीवारी दवाखाना बंद करून यायचा.
पुढे दिवस बदलू लागले.त्याच्या वयाला उतार येवू लागला.पुर्वी सारखा कामाचा रपाटा जमेना,हे कळू लागल्यावर बंडूमामाने आपला दवाखाना बंद केला. बिलीमोरीया पण निर्वतला. त्याच्या मुलांना पण जागा हवी होती.ह्या सगळ्यांचा विचार करून बंडूमामाने पण उर्वरीत आयुष्य कसं घालवावं याचा नीट विचार केला होता.बिचाऱ्याला बायका मुलं असती तर हा प्रश्न उद्भवला नसता.आणि तरुणपणी लग्न न करण्याच्या निर्णय घेताना एव्हडं दूरवर लक्षं कोण देतो म्हणा. त्यामुळे “आलिया भोगासी”करावं लागतंच.बंडूमामाची एक भाची मालाडला राहायची. तिची मुलं मोठी झाल्याने कामाधंद्दामुळे तिच्या पासून दूर राहायची.ती आणि तिचा नवरा दोघंच राहायची.त्यांच्याकडे तो राहायला गेला.पण जागेच्या आभावी झोपायला मात्र सामंत मास्तरांच्या गोरेगावातल्या संगीतशाळेत रात्रीचा जायचा.

सामंत मास्तरांचं आणि त्याच नात होतं.सामंत मास्तरांच्या वर्षातून एकदा होणाऱ्या गुरुपौर्णिमेच्या संगीताच्या जाहीर कार्यक्रमाला हटकून तो हजर राहायचा.  मग त्यादिवशी कार्यक्रमाच्या जय्यत तयारीला अक्षरशः अंग मेहनत आणि जरूर लागल्यास हात मेहनत पण करायचा.अशा प्रसंगी “डॉक्टरा,डॉक्टरा “असं ओरडून त्याला बोलावून लोक त्याची मदत घ्यायचे. “सॉक,सॉक”असा आवाज आल्यावर बंडूमामा आल्याचं कळायचं.

“दिवसा मागून दिवस चालले,ऋतुमागुनी ऋतू जीवलगा कधी रे येशील तूं”

हे आशाने गाईलेलं गाणं त्याला अतिप्रिय होतं.सामंत मास्तरांच्या प्रत्येक गुरुपौणीमेच्या संगीत कार्यक्रमाच्या दिवशी त्याची ह्या गाण्याची फर्माईश असायचीच. अलिकडे प्रकृती अस्वास्थ्यामुळे गुरुपौर्णिमेच्या कार्यक्रमाला बंडूमामा हजेरी देवू शकला नाही.परंतु सामंत मास्तर मात्र बंडूमामाचे आवडतं गाणं कुणाला तरी त्याची आठवण म्हणून गायला लावतात.मालाडहून रात्री झोपायला संगीत शाळेत रोज यायचं त्याला आता जमत नव्हतं.
अलिकडेच मी त्याल भेटायला मालाडला गेलो होतो.मला म्हणाला,

“नाही रे मला,आता जमत, त्या स्टेशन वरच्या ब्रिजच्या पन्नास पन्नास पायऱ्या चढायला आणि उतरायला.वय आता ब्याएंशी झालं.खरं सांगु का तुला, आता नाही जगावंस वाटंत. भोगलं सगळं.आता फक्त यमदुताची वाट पहात आहे बघ.तो केव्हा नेईल असं झालंय”
ऐकून मला पण खूप वाईट वाटलं.माझ्या डोळ्यातून नॉनस्टॉप अश्रू वाहू लागले, कींव आली त्याची.

चेंज म्हणून मी रेडिओ चालू केला,आणि योगायोग असा रेडिओवर त्याच वेळी आशाचं गाणं लागलं होतं.
“दिवसा मागून दिवस चालले
ऋतु मागुनी ऋतु
जीवलगा कधी रे येशील तूं”

बंडूमामा ते गाणं ऐकत होता, की वार्धक्यात येणार्‍या डुलक्या काढत होता ते कळलं नाही.म्हणतात ना,माणसाला दोन मनं असतात,एक चांगलं आणि दुसरं वाईट विचार आणणारं,तसंच काहीसं माझं वाईट मन मला म्हणायला लागलं,
“दिवसा मागून दिवस चालले
ऋतू मागुनी ऋतू
यमदुता कधी रे नेशिल तू ”

त्याचंच मन मला माझ्या मनातल्या गाण्यातून त्याच्याच इच्छेची जणू जाणीवच देत होतं.

 

 

श्रीकृष्ण सामंत (स्यान होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

Advertisements

6 Comments

 1. Posted एप्रिल 7, 2009 at 10:19 pm | Permalink

  मस्त जमलाय लेख..

 2. Posted एप्रिल 8, 2009 at 9:41 सकाळी | Permalink

  आपल्या प्रतिक्रियेबद्दल आभार.
  आपण पण छान लेख लिहिता.
  मी आवडीने वाचत असतो.

 3. boroleprashant
  Posted एप्रिल 8, 2009 at 10:02 सकाळी | Permalink

  आवडलेलं आहे !

 4. Posted एप्रिल 8, 2009 at 10:05 सकाळी | Permalink

  प्रशांत,
  आपल्या प्रतिक्रियेबद्दल आभार.

 5. sanjay Puranik
  Posted ऑगस्ट 16, 2016 at 11:26 pm | Permalink

  khup chan lihile aahe…. tumache sagale blog vachin vel milalywar.

  • Posted ऑगस्ट 22, 2016 at 7:04 pm | Permalink

   थॅन्क्स संजय
   लेख आवडल्याबद्दल आभार.माझे इतर लेख जरूर वाचा.बोरिंग वाटणार नाहीत.
   सामंत


टिप्पणी नोंदवा

Required fields are marked *

*
*

%d bloggers like this: