आयुष्यात येणार्‍या धूसरपणाला मी मानते.

आज एक गंमतच झाली.ईंगळ्यांची यमी आमच्या घरी बसायला आली होती.तशी यमी मला लहानच.
आमच्या बालपणात कोकणात मृगनक्षत्रात पावसाच्यापहिल्या सरीत बाहेर अंगणात जाऊन पावसात न्हाऊन घ्यायची आमच्यात चढाओढ असायची.
“सर्वांत प्रथम तू सुरवात करायचीस होना यमे?”
असा मी प्रश्न केल्यावर यमी म्हणाली,
“हो एकदा मला आठवतं माझ्या अंगात एक ताप होता.ते ढगांचं गडगडणं,विजांचं चमकणं,पाहून मला अंथरूणात पडून रहायला कसंसंच वाटत होतं.मी बाबांचा डोळा चुकवून सर्वांच्या अगोदर अंगणात आले होते.”
“हो मला आठवतं त्यावेळी तुझ्या बाबांनी तुला बाहेर येऊन फरफटत घरात नेलं होतं.तू रडत होतीस. आणि काही वेळाने घरातून तू आमच्याकडे पावसात न्हाताना हताश होऊन पहात होतीस.आम्ही तुला चिडवायला वाकुल्या दाखवीत होतो.”
असं मी म्हणाल्यावर,
“अरे सगळ्यांचेच आईवडील बाहेर जास्त वेळ न्हाऊं नका आजारी पडायला होईल. आणि मग शाळा चुकेल”असं ओरडून सांगायचे.पण अंगणातली आरडाओरड ऐकून वाड्यातली सर्वच मुलं घरात बसायला कबूल नसायची.”
असं सांगून यमी म्हणाली,
“माझ्या लहानपणी कुणी पावसाळ्याला बघून किंवा ढगाळ आकाशाकडे बघून कुरकुर केली तर ते मला आवडत नसे.हे तर खरे माझे आवडीचे दिवस असायचे. प्रखर उन्हाचे दिवस मला जास्त बचैन करायचे. मला करडे ढग आकाशात तरंगताना पाहून,किंवा काळेकूट्ट पाण्याने भरलेले वादळी ढग जमलेल्या पाण्याचा भार ह्या धरतीवर मुक्त करणारे ढग पाहून मन प्रसन्न व्हायचं. वीजेची चकमक आणि ढगांची गर्जना ऐकून मी अचंबित व्ह्यायचे.
कधी कधी शांत करड्या ढगानी आच्छादलेलं आकाश मला परम संतोष द्यायचं.
ह्या धूसर रंगाच्या ढगानी आच्छादलेल्या आकाशाचं माझं वेड माझ्या प्रौढतेतपण वाढत गेलं.त्यावेळी मी माझ्या मुलांना आमच्या मागच्या परसात नेऊन झोपाळ्यावर बसवून गार हवेचा,नाकात शिरणार्‍या वासाचा,आणि आवाजाचा अनुभव घेण्यासाठी,आणि मृगनक्षत्राच्या आगमनाची आठवण करून देण्यासाठी जागृत रहायची.ह्या वातावरणाची त्यांच्या मनात भिती येऊ नये ह्याची दखल घ्यायची. लहानपणातल्या माझ्या मनातला ह्या वातावरणाचा विस्मय त्यांनाही अनुभवायला द्यायची.”
असं यमी आवर्जून सांगत होती.
मी म्हणालो,
“पण यमे,आतापण तुझ्या नातवंडाना पावसात न्हायाला देतेस का?
की अरे,पावसात भिजून आजारी व्हाल असं आजीच्या नात्याने त्यांना ओरडतेस?”
थोडं मिष्किल हंसून म्हणाली,
“काय रे माझी थट्टा करतोस.
आता मी वयस्कर झाली आहे. मुलंपण मोठी झाली आहेत.नातवंड पण आता नव्या जमान्यातली आहेत.माझ्या पतीना आणि मुलांना आणि नातवंडाना पण उन्हाळ्याचे दिवस चांगले वाटतात.आणि त्यांच्याबरोबर मी पण लख्ख उन्हाच्या दिवसांबद्दल  प्रशंसा करायला लागली आहे.माझ्या कुंटूबाच्या आनंदात मश्गुल होण्यात मी माझ्या वृतीत बदलाव आणला आहे.

त्या माझ्या प्रौढवयात ज्यावेळी मी स्वतःच्या विचारधारांचं आणि मूल्यांचं अन्वेषण करायची त्यावेळी जास्तकरून प्रत्येक गोष्टीत माझी निवड एकतर फक्तकाळं किंवा सफेद ह्याच दृष्टीकोनातून पहाण्यात असायची. पटकन निर्णय घ्यायची.  पटकन कोणतीही गोष्ट अस्वीकार करायची.आणि पटकन माझंच खरं मानायची. मला त्यावेळी वाटायचं की योग्य मार्गाची निवड करणं, नैतिकतेची वरची पातळी निवडणं ही एक ज्याची त्याची स्वाभाविक पसंती असते.”
“आणि त्यानंतर तू डॉक्टर झालीस.तुझ्या विचारसरणीत सहाजीकच त्यामुळे आणखी बदलाव आला असावा.”
“हो अगदी बरोबर बोललास”
असं म्हणून यमी म्हणाली,
 “नंतर माझ्या डॉक्टरी पेशामधे जशी मी आजा‍र्‍यांना आणि त्यांच्या कुटूंबियाना हाताळायची तशी माझ्या लक्षात यायला लागलं की पुष्कळशी आव्हानं आणि जीवनात येणारी वादळं क्वचितच संपूर्ण काळी किंवा संपूर्ण सफेद असतात. माझे बरेचसे सहकारी एखाद्या आजार्‍याला तो व्यसनी आहे म्हणून निकाल द्यायचे, त्यावेळी मी समजायचे की ह्यातील बरचसे आजारी निष्ठा ठेऊन असायचे की एक ना एक दिवस ते सुधारणार आहेत.आपल्या आजारावर मात करणार आहेत.फक्त फरक एव्हडाच की त्यांच्याहून त्यांना सुधारायला ते असमर्थ आहेत.
मी ह्यातून शिकले की क्वचितच ह्या व्याधींची चिकित्सा अशीच काळी तरी किंवा सफेद तरी असावी.ह्या चिकित्सा  पुस्तकात लिहिल्या प्रमाणे बहुदा नसायच्या.काही व्याधी  तर अश्या आहेत की त्यांच्या चिकित्सा शंभर टक्के खात्रीलायक असणं दुरापास्त आहे. एखाद्या साध्या कानाच्या दुखण्याचं गांभिर्य अनेक छटामधे दिसून येईल.
हे प्रकृतीचे औषोधोपचार सर्व कूट प्रश्नात सामाविष्ट आहेत.त्यांना स्वाभाविक किंवा सहज उत्तरं नाहित.त्याचं उत्तर काळं तरी किंवा सफेद तरी असं मुळीच नाही.
 
परंतु,आता मात्र माझ्या बालपणात वाटायचं तसं ह्या धूसर वाटणार्‍या जीवनामधे मला शांती मिळायला लागली आहे.सहजगत्या आणि पटकन निर्णय घेणार्‍या बर्‍याच लोकांकडे बघून मी उदासिन होते.माझ्या कुटूंबात, माझ्या विचारसरणीत, माझ्या व्यवसायात,माझ्या मैत्रीत आणि माझ्या वयक्तिक मुल्यांत मला रंगांचा वर्णक्रम दिसतो,तसंच एक सातत्यही दिसतं.
ह्या धूसर वाटणार्‍या जीवनात मला उदासिनतेची नव्हे तर शांती आणि समाधानाची उपलब्धता होते.”
हा विषय बदलण्यापूर्वी मी यमीला म्हणालो,
“यमे,हा हवामानाचा परिणाम की वयोमानाचा परिणाम असावा?”
“तुझी आपली नेहमी थट्टाच असते”
असं म्हणून यमीने हा विषय बदलला.

 
श्रीकृष्ण सामंत (कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

Advertisements

2 Comments

 1. sagar
  Posted मे 24, 2009 at 6:54 सकाळी | Permalink

  म्हनुनच Nirvana चं 1 song आहे “All Apologies” नावाचं –
  What else should I be? All apologies.
  What else could I say? Everyone is gay.

  i always read this as “Everyone is gray.”
  no-one, nothing is either complete black or white , सगळ्यांचं हे ग्रे-पण मान्य केला की खुप easy होतं वागणं !!!

 2. Posted मे 24, 2009 at 7:23 सकाळी | Permalink

  आपल्या म्हणण्य़ाशी मी पूर्ण सहमत आहे.
  प्रतिक्रियेबद्दल आभार


टिप्पणी नोंदवा

Required fields are marked *

*
*

%d bloggers like this: