आठवणींची निर्मिती.

आज आमच्या शेजारांच्या घरात खूपच गडबड आणि आवाज होत होता.त्यांना दरवाजा खटखटून चौकशी करण्याचा माझा मानस नव्हता.पण काही वेळाने माझाच दरवाजा खटखटून गडकर्‍यांची भारती आली आणि मला म्हणाली,
“काका,एकदोन खूर्च्या कमी पडतायत,तुमच्या खुर्च्या मिळतील काय?”
मी म्हणालो,
“त्यात विचारायचं काय घे तुला हव्या तेव्हड्या. पण काय गं भारती कसली गडबड चालली आहे बर्‍यांच बायकांचा आवाज येतोय.”
मला म्हणाली,
“आज आमच्या घरी “पॉटलक” आहे.”
“म्हणजे ग काय?”
ह्या माझ्या प्रश्नाचं उत्तर न देता हात करीत म्हणाली “मग सांगते. ”
आणि नंतर ती गडबडीत यायचीच विसरून गेली.
तिची आई सरिता गडकरी अशीच दोन तीन दिवसानी गप्पा करायला आली होती.
त्या दिवसाची आठवण करून मी तोच प्रश्न तिला विचारला.
मला म्हणाली,
“अहो,अमेरिकेत त्याला “पॉटलक” म्हणतात ना तोच प्रकार इकडे करतात.
आमच्या आईच्या आणि मावशीच्या हाता खाली जेवण शिकून मी तयार झाले,आणि माझ्या हाताखाली माझी मुलगी आता जेवण करण्यात तयार झाली आहे.तिच्या मैत्रीणी महिन्याला एकदा सर्व जमून पार्टी करतात.हा एक चांगला सामाजीक कार्यक्रम असतो.त्यावेळी प्रत्येक जण आपआपली डीश तयार करून घेऊन येतात.सर्वच जणी ह्यामुळे एकमेकाची डीश वाटून घेऊन नुसती खात नाहीत तर त्यातून एकमेकाच्या डीश करण्याच्या पद्धतीची चर्चा करतातच आणि खाऊन त्यांच्या जीवाला तृप्ती मिळते.
माझी भारती सांगत होती की,एका पार्टीला तिच्या एका मैत्रीणीने आंब्याचं पन्हं करून आणलं होतं.ते सर्वांना इतकं आवडलं की त्याची करण्याची पद्धत सर्वांनी लिहून घेतली.नंतरच्या एका पार्टीला माझ्या मुलीने कानडी “एल्लापे” करून नेले होते ते खाऊन सर्वांनी फस्त केले.तुम्हाला माहित आहे की भारती कर्नाटकत दिली आहे.काही कानडी डीश ती शिकली आहे.उरलं सुरलं अन्न मग ही मंडळी घरी नेऊन आपआपल्या कामवाल्या बायकाना वाटतात असं माझी भारती मला सांगत होती.

तुम्हाला सांगू का,स्वयंपाकी फक्त स्वयंपाक तयार करीत नाहीत-म्हणजे जेवणाची निर्मिती करीत नाहीत- ते आठवणींची पण निर्मिती करतात.
माझ्या स्वतःच्याच जून्या आठवणीमधे स्वयंपाक करणार्‍या व्यक्तिंच्या पण आठवणी आहेत.
माझ्या लक्षात आलंय की ही मंडळी माझं पोट नुसतं रुचकर जेवण करून भरत नव्हती तर माझ्या स्मृतित सजीव गोड सुगंधाने भरलेल्या स्वयंपाक खोल्यांच्या छब्यांची निर्मिती करीत होती.

माझी आई आणि मावशी समारंभाला घरीच जेवण करीत.मला आठवतं माझी आई चवदार कोशिंबीरी करायची. चटण्यांचे अनेक प्रकार करायची.कोथिंबीर घालून नारळाच्या चूनाची चटणी,मिरचीपूड घालून खसखसट्लेल्या नारळाच्या चूनाची चटणी,कवठाच्या – हे पोपटी रंगाचं गोल आकाराचं कडक फळ असतं- किसात कैरीचा कीस टाकून केलेली चटणी,दाणे,सुकं खोबरं किसून,तीळ आणि सुक्यामिरच्या घालून कुटलेली सुकी चटणी,कच्च्या कैर्‍या कापून त्याच्या लहान लहान फोडी करून त्यात मिठ मिरची टाकून करमट करायची,अश्या नानातर्‍हेच्या चटण्या खाल्याची आठवण येते.
मी म्हणालो,
“तुझी मावशी सुद्धा स्वयंपाक करण्यात तरबेज होती ना?”
“माझी मावशी स्वयंपाकघरात काही अपरिचीत पाहूणी नव्हती.तिनेच मला समजायला मदत केली की विशेष पदार्थ तयार करून इतराना तृप्तीचा आनंद कसा देता येतो.माझ्या चक्षूस्मृतित ती आता दिसते.निरनीराळी कडधान्यं मिसळून खमंग पिठ घरच्याच जात्यावर दळून गरम गरम थालिपीठं करून त्यावर ताज्या लोण्याचा गोळा वाढून समोर ठेवायची.”
“मला आठवतं तुम्ही सगळे लहानपणात सुट्टीत कोकणात न चुकता जात होता.जवळ जवळ अर्धी एस.टी तुम्ही बूक करायचा.डी.एन. नगरमधे एस.टीच्या खास गाड्या येऊन सर्वाना कोकणात जाण्याची सोय केली जायची हे मे महिन्यात व्हायचं त्याशिवाय गणपती उत्सवात परत ती सोय दिली जायची.”
असं मी म्हटल्यावर सरिता आपल्या लहानपणाच्या गोष्टी अगदी तालात येऊन सांगायला लागली.

“लहान असताना मी माझ्या मावशीच्या घरी सुट्टीत जायचे.पिंगुळी गावात मावशीचं टुमदार घर होतं.आजुबाजूची वनश्री डोळ्यांना आल्हादायक वाटायची.जेवणाची सर्व तयारी झाल्यावर पाट-पाणी ठेवण्यासाठी मी तिला मदत करायचे.सर्वांना जेवायला बोलवल्यावर मावशी ताटात एक एक पदार्थ वाढायची.
उकडलेल्या बटाट्याची भरपूर कांदा घातलेली भाजी, पोरसातलं माजलेलं अळू काढून आणल्यावर स्वच्छ धूवून लसणीची फोडणी दिलेली अळूची लोण्यासारखी शिजलेली भाजी,गरम गरम उकड्या तांदळाच्या वाफेला खमंग वास येणारा भात,फणसांच्या घोट्या घालून केलेली हिंगाचा सुगंध येणारी डाळीची जाड आमटी आणि वाटी वाटी आमरस असा बडेजाव असायचा.

दिवाळी,दसरा,गणपती उत्सव हे सण फक्त धार्मिक आणि आणि सांस्कृतीक घटना लक्षात ठेवण्यासाठी नसून ते प्रसंग नातेवाईक आणि मित्र-मंडळीना एकत्र येऊन खास केलेले पदार्थ वाटून घेऊन खाण्यासाठीही आहेत.अन्न आणि स्मृति एकत्र असतात.

जशी मी वयाने मोठी होत चालेय,तशी माझे ह्या बाबतीतले विचार पण पोक्त होत चाल्लेत.स्वयंपाक करणारी व्यक्ति नुसतीच स्वयंपाक करीत नाहीत तर स्वयंपाक करण्या व्यतिरिक्त आठवणींची पण निर्मिती करते हे मी पक्क लक्षात आणलं आहे.
तुम्ही हंसता कां?”
असा मला सरिताने प्रश्न केल्यावर मी म्हणालो,
“पुढच्या खेपेला हे पॉटलक केलंत तर मला पण एक शेयर डीश आणून दे.मी पण माझ्या आठवणीची निर्मिती पुढे कधी तरी उपयोगात आणीन.”
“हे आपलं बरं”
एव्हडंच सरिता बोलून जायला उठली.

श्रीकृष्ण सामंत (स्यान होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gamil.com

Advertisements

टिप्पणी नोंदवा

Required fields are marked *

*
*

%d bloggers like this: