ती तात्या अभ्यंकरांची भयंकर ओळ.

“बापाने यावं आणि दोन सणसणीत कानशिलात ठेऊन द्याव्यात असं आजही कुठेतरी वाटतं!”
 आई आणि मुलांत जसे भावबंध असतात, तसे बाप मुलांत का निर्माण होत नाहीत. बापाबद्दल कायम भीती का वाटत राहाते?

 त्याचं काय झालं मंडळी,सौ. अनुराधा सचिन म्हापणकर ह्यांनी ही खालील सुंदर कविता लिहिलेली माझ्या वाचनात आली,

आज तू आमचं सारं ऋण फेडलंस..

वा.. बेटा .. वा..!!
आज तू आमचं सारं ऋण फेडलंस..

पुन्हा पुन्हा डोळे भरून येतात..
तू मात्र डोळ्याला डोळाही देत नाहीस
असं रे काय.. निघता निघता..
साध्या आशीर्वादालाही वाकत नाहीस
.
का आशीर्वादाच्या हक्कापासूनही आम्हाला तू तोडलंस
वा..बेटा..वा..आज तू आमचं सारं ऋण फेडलंस..

नव्हतं पटतं मान्य..
कदाचित आमचंही काही चुकलं असेल
आमची लूडबूड.. अधे मधे करणं..
तुम्हालाही कधी खटकलं असेल
.
म्हणून का रे अडगळीसारखं घराबाहेर फेकलंस..
वा..बेटा..वा..आज तू आमचं सारं ऋण फेडलंस..

सवंगडी सखे सोबती.. इथे
आम्हाला भरभरून म्हणे मिळतील
गप्पागोष्टी .. नी थट्टा मस्करीत
आमचे दिवस भरभर म्हणे पळतील..
.
पण नातवाशी खेळायचं होतं.. ते स्वप्न का मोडलंस…
वा..बेटा..वा..आज तू आमचं सारं ऋण फेडलंस..

वेळ भरभर जाणार..
हो.. म्हणजे शॉर्टकटने मृत्यूला गाठायच..
चार पावलावर उभा आहेच तो
नाहीतरी आता कोणासाठी आहे साठायचं..
भळभळत्या जखमेला कसं अचूक वेळी छेडलंस..

वा.. बेटा .. वा..!!
आज तू आमचं सारं ऋण फेडलंस..
आयुष्याच्या मावळतीला ….
आम्हाला वृद्धाश्रमात नेऊन तू सोडलंस…

ह्या कवितेखाली त्यांच्या एका वाचकाचा प्रतिसाद मी वाचला तो असा होता,
“कवितेतल्या त्या मुलाचा किंवा मुलीचा दृष्टीकोन वेगळा असूं शकेल ना?कदाचीत त्यांची मतं ह्या वृद्धांच्या व्यथेपेक्षां भिन्न असतील ना?”
आणि ते वाचक सौ.म्हापणकरांना पुढे लिहितात,
“आता मला तुमच्याकडून एखादी कविता मुलांच्या दृष्टीकोनातून,म्हणजे वृद्धांबद्दल त्यांचं मत मांडणारी कविता अपेक्षीत आहे.”

झालं,मी ती कविता  वाचून आणि ती प्रतिक्रियावाचून आमच्या कवीमनाचा किडा चाळवून घेतला.
वरील कवितेचं किंचीत-विडंबन किंवा-आणखी काही म्हणा- केल्यासारखं करून आपणच मुलांचा दृष्टीकोन लिहावा असं मनात आलं आणि कविता लगेचच तयार झाली.

शिर्षक होतं,
तुमचं ऋण फेडायला कधी चान्स देता?

तुमचं ऋण फेडायला कधी चान्स देता?

वा…बाबा..वा!!
आज तुम्ही आम्हाला घरा बाहेर काढता

पुन्हा पुन्हा डोळे भरून येतात
तुम्ही मात्र डोळ्याला डोळा देत नाहीत
असं हो काय…निघता निघता
साध्या आशीर्वादालाही दोन हात लावत नाहीत
का आशीर्वादाच्या हक्कापासून आम्हाला तुम्ही वंचीत करता
वा…बाबा..वा!!
आज तुम्ही आम्हाला घरा बाहेर काढता

नव्हतं पटंत मान्य..
कदाचित आमचंही काही चुकलं असेल
आमची अडचण…अधे मधे करणं
तुम्हालाही कधी खटकत असेल

म्हणून काहो कचऱ्यासारखं घराबाहेर फेकतां
वा…बाबा..वा!!
आज तुम्ही आम्हाला घरा बाहेर काढता

मित्र मंडळी…तिकडे
आम्हाला भरभरून म्हणे मिळतील
गप्पागोष्टीत…नी थट्टा मस्करीत
तुम्हाला विसरण्यात जातील

पण नातवाशी खेळायचं होतं..ते स्वप्न कसं पुरं होणार…
वा…बाबा..वा!!
आज तुम्ही आम्हाला घरा बाहेर काढता

वेळ भरभर जाणार….
हो..म्हणजे शॉर्टकटने सोयीना गाठायच..
लांब लांब पावलावर उभ्या आहेत त्या
नाहीतरी आता कोणासाठी त्या करायच्या..
घाबऱ्या घुबऱ्या जीवाला कसं अचूक वेळी सोडता…

वा…बाबा..वा!!
आज तुम्ही आम्हाला घरा बाहेर काढता
आयुष्याच्या सुरवातीला…
आम्हाला वेगळं घर घ्यायला सांगता..

मंडळी,तात्यांच्या प्रतिक्रियेला अन्वय यांनी त्यांच्या उत्तरात म्हटलंय,
“पण आई आणि मुलांत जसे भावबंध असतात, तसे बाप मुलांत का निर्माण होत नाहीत. बापाबद्दल कायम भीती का वाटत राहाते, हा प्रश्‍न अजून सतावतो आहे.”

मंडळी खरं सांगू का,वडलांचं चुकतं की मुलांचं चुकतं ह्याचा सर्व साधारण न्याय देणं कठिण आहे.त्याला अनेक कारणं आहेत.प्राप्त परिस्थिती,व्यक्तित्व,संस्कार आणि असे अनेक दबाव त्याला कारणीभूत आहेत.आणि हे मी पूर्वीच्या तरूण मुलाच्या भूमिकेतून आणि आता म्हातार्‍या बापाच्या भुमिकेतून स्वानुभवावरून सांगत आहे.पण एक मात्र नक्की मग ते वडील असोत की मुलं असोत,
“जो तो आपल्या अक्कले प्रमाणेच वागत असतो.”
नाहीपेक्षा सर्वच ज्ञानेश्वर माऊली का होत नाहीत?
माऊली वरून आठवलं,ती परमपूज्य माऊली-एकाशी लग्न करून आणि दुसर्‍याला जन्म देऊन- ह्या बाप-मुलांच्या-वादात हजर असतानाही एका कोपर्‍यात बसून बिचारी दुःखाने अश्रू ढाळण्यापलिकडे काही करूं शकत नाही.
कदाचीत,
“लळा जिव्हाळा शब्दच खोटे”
असंच तिचे अश्रू सांगत नसतील नां?
म्हणून म्हणतो तात्यानु,
“तरच आपल्या पितृत्वाचं सार्थक होईल…!”
ह्या आपल्या म्हणण्याशी मी पण सहमत आहे.

 

श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

Advertisements

2 Comments

 1. Posted जून 24, 2009 at 9:29 pm | Permalink

  कोणाचं चुकतं आणी कोणाचं बरोबर असतं ते फक्त त्या दोघांच्या व्यतिरिक्त कोणालाच माहिती नसतं. इतर लोकं फक्त ऐकिव गोष्टींवर आपापले ठोकताळे बांधत असतात.
  बापाची नेहेमी भिती कां वाटते? ह्या प्रश्नाचं उत्तर कदाचित कोणालाच देता येणार नाही. प्रत्येकाच्या मते वेगवेगळे उत्तर असेल. लहानपणची एखादी कटू आठवण, किंवा त्या प्रसंगाचा मनावर झालेला आघात.. काहिही असूं शकतं.
  पण एक गोष्ट सगळेच मान्य करतिल, लहान पणापासुन.. अरे बाबा आलेत निट रहा, उगिच गोंधळ करु नकोस.. आणी जर बाबांचा मुड खराब असेल तर लहान सहान कारणाने कानाखाली वाजवल्या जाण्याच्या आठवणी बऱ्याच लोकांच्या मनात घर करुन बसलेल्या असतात..

 2. Posted जून 26, 2009 at 5:42 pm | Permalink

  महेंद्रजी,
  आपल्या म्हणण्याशी मी पूर्ण सहमत आहे.
  आपल्या प्रतिक्रियेबद्दल आभार.


टिप्पणी नोंदवा

Required fields are marked *

*
*

%d bloggers like this: