” हे विस्मित करणारं स्मारक ह्या धरतीवर कुणी बरं निर्माण केलं असेल?”

“एखादं लहान मुल आपल्या बोटांचं निरिक्षण करून आणि ती बोटं कुशलतेने वापरून ज्ञान घेण्याच्या प्रयत्नात असतं तेंव्हा ते ज्ञान अनियंत्रित आणि अपरिपक्व असतं.”

आज प्रो.देसाई जरा खुशीत दिसले.बरेच दिवस ते आपल्या मुलाकडे राहायला होते.मधून मधून माझ्याशी फोनवर बोलायचे.पण आज त्यांची तळ्यावर भेट झाल्यावर मी त्यांच्या आनंदी चेहर्‍याकडे बघून म्हणालो,
“भाऊसाहेब,चेहर्‍यावरच्या छटा इतक्या बोलक्या असतात की मनातलं शब्दात येण्यापूर्वी चेहर्‍यावरच्या छटा शब्दापेक्षा बोलक्या होतात.
तुम्ही मला आज कसलं तरी लेक्चर देणार आहात हे निश्चितच आहे.तुमच्या मुलाच्या लायब्ररीत फक्त कायद्याची पुस्तकं असतात.वकिलाला त्याची जरूरी असते.पण कायदेकानूवर तुम्ही चर्चा करणार नाही हे नक्कीच.तुमचा विषय काही तरी वेगळाच असणार.”
हे माझं बोलणं निमुट ऐकून घेऊन झाल्यावर प्रोफेसर
हंसत हंसत मला म्हणाले,
“आमच्या मुलाच्या शेजारच्या घरात प्रिन्सिपॉल वैद्य म्हणून एका गृहस्थाची भेट झाली.हे विद्वान गृहस्थ मला बौद्धिक व्यायाम द्यायला माझ्या मुलाकडच्या मुक्कामात साहाय्य करायला उपयोगी झाले.त्यामुळे मला पुस्तकं ह्यावेळी वाचावी लागली नाहीत.”
मी म्हणालो,
“मग आम्हाला तुम्ही बौद्धिक व्यायाम आज देणार हे नक्कीच”
“तुम्ही जर का काही पुस्तकं अलीकडे वाचली नसतील तर आजची आपली चर्चा तुम्हाला नक्कीच बौद्धिक व्यायाम देईल.”
असं बोलून झाल्यावर भाऊसाहेब, प्रि.वैद्यांबरोबर सुरवात कशी केली ते सांगायला लागले. भाऊसाहेब प्रि.वैद्याना म्हणाले,
“ज्यावर आपलं अत्यंत प्रेम असतं आणि जे अविचल राहावसं वाटतं त्याचा विध्वंस करण्यासाठी अस्त्रांची निर्मिती एखाद्या विचारातून झाली असावी.पर्यावरणाचा नाश करणं, गरिबीचं कालचक्र चालूच ठेवण्याचा प्रयास करणं,विषयुक्त केमिकल्स आपल्या शरिरात आणि ह्या पारितंत्रात मिलावट करण्याची कामं ह्या असल्याच विचारातून झाली असावीत. आपल्याला कसं वाटतं.?”
वैद्य म्हणाले,
“मला वाटतं कुठल्याही गोष्टीचं नुसतं मनन करून चालत नाही.मनन करणं हे विचारमग्नतेतून निर्माण होतं.मानव जातिचे प्रश्न सोडवण्यासाठी ह्या असल्या विचारमग्नतेच्या पुढे आपल्याला गेलं पाहिजे.
आपल्याला बुद्धिमत्तेची जरूरी आहे.ढोबळ अर्थाने बुद्धिमत्ता म्हणजेच जीवनाच्या मूल्यांची असलेली जागरूकता.ही बुद्धिमत्ता शिकण्यासाठी विचारमग्नतेचं आणि अनुभूतिचं म्हणजेच संवेदनाचं,मन आणि शरिराचं,विज्ञान आणि आत्म्याचं,ज्ञान आणि मूल्यांचं, मेंदु आणि ह्रुदयाचं एकीकरण व्हायला हवं.बुद्धिमत्ता आत्मसात करण्यासाठी विद्येची जास्त आणि प्रशिक्षणाची कमी जरूरी आहे.असं मला वाटतं.”
मधेच प्रो.देसायाना अडवून मी म्हणालो,
“भाऊसाहेब हे प्रि.वैद्यांचं म्हणणं मला पटतं.पण प्राचिन काळात विद्या प्राप्त करताना किंवा अध्ययन करताना अनुभूति आणि विचारमग्नता संयोजित केली जाऊन अंतर्ज्ञानाच्या उसळण्याने बुद्धिची वृद्धि होत होती. असं तुम्हाला नाही का वाटत?”

“वैद्यानी एक सुंदर उदाहरण दिलं आहे ते मी तुम्हाला ओघाओघाने सांगणारच आहे.तुम्ही बुद्धिच्या वृद्धिबद्दल जे काही म्हणत आहात त्यासाठी ते उदाहरण ऐकून तुमची समाधानी होईल असं मला वाटतं.”
असं सांगून झाल्यावर भाऊसाहेब आपला विचार सांगू लागले,
“एखादं लहान मुल आपल्या बोटांचं निरिक्षण करून आणि ती बोटं कुशलतेने वापरून ज्ञान घेण्याच्या प्रयत्नात असतं तेंव्हा ते ज्ञान अनियंत्रित आणि अपरिपक्व असतं.परंतु,हा ज्ञान मिळवण्याचा प्रकार मात्र आश्चर्याने भरलेला वाटतो आणि ही एक अलौकिक वयक्तिक उपलब्धि वाटते. ही उपलब्धि शालेय शिक्षणापेक्षा अगदी निराळीच वाटते. पुर्वीच्या त्या विद्या प्राप्तीतल्या अनुभवात सहायता असायची, आव्हानं असायची,प्रेम आणि आस्था असायची.
आता अगदी बालपणापासून ही विद्या मिळवण्याची प्रक्रिया समयपरत्वे हरवली जात आहे. आणि जसं शालेय शिक्षण मिळत आहे त्यामधे विचार करणार्‍याला,मनन करणार्‍याला फक्त पुरस्कार दिला जातो,पण अनुभूतिबाबत सर्वच निराशा आहे.”

प्रि.वैद्यांचं काय म्हणणं आहे पहा.ते म्हणतात,
“मनोभाव किंवा आवेश गाडले जात आहेत आणि कधी कधी घातक कारणाला ते विस्फोटीत करायला वापरले जात आहेत. त्या आवेशांचा उपयोग सुसंगत ज्ञानासाठी केल्याने कुशल अनुभूतिला चालना मिळेल असा विचार फार क्वचित केला जातो.”
लहान वयातला सुसंगत ज्ञानोपयोग आणि वयस्क असतानाचा असुसंगत ज्ञानोपयोग ह्यातला फरक समजण्यासाठी वैद्यानी असं हे उदाहरण दिलं.
ते म्हणतात,
“एखाद्या बाल वयातल्या तरूण व्यक्तिने क्षितीज्यावरचा सूर्योदय कधीच पाहिला नसावा अशी कल्पना करूया.अशा वेळी  सूर्योदय पाहाण्याच्या त्या बाल तरूणाच्या पहिल्याच सामन्यात तो समुद्रातल्या खोल पाण्यात सतत बद्लणार्‍या पाण्याचा रंग पाहिल, सकाळच्या उगवत्या सूर्याचं ते तेजोमय बिंब पाण्यात परावर्तीत होऊन दूरवरच्या लाटांच्या शिखरावर नृत्य करताना पाहिल.त्या अफाट समुद्राची तेजस्विता उभारली जात असलेली पाहिल.त्या समुद्राच्या महातरंगाच्या होणार्‍या गर्जना ऐकील आणि त्या एका मागून एक येणार्‍या लाटातली महाशक्ति किनार्‍यावर येऊन आपटल्यावर त्या शक्तिचा परित्याग होत असताना तो पाहिल. अशावेळी किनार्‍यावर उभ्या असलेल्या त्याला त्याच्या चेहर्‍यावर पाण्याचे शिंतोडे उडलेले दिसतील. ते शिंतोडे सुकून जाता जाता चेहर्‍यावर राहून गेलेले मिठाचे पटल त्याला दिसतील.
अशा क्षणी ज्ञानप्राप्ती होत असताना ते बालमन विचारील,
” हे विस्मित करणारं स्मारक ह्या धरतीवर कुणी बरं निर्माण केलं असेल?”
कदाचीत अश्या क्षणी तो तरूण इश्वरावर भरवंसा ठेवील.
आणि नंतर ह्याच तरूणाला आपण समुद्रापासून अति दूरवर शाळेत पाठवून महासागराची फिझिक्स, केमिस्ट्री,आणि बायालॉजी शिकू दिली की त्या तरूणाच्या पहिल्या सामन्यात त्याला मिळालेल्या ज्ञानाच्या जागेचं हळू हळू हे तथ्यपूर्ण ज्ञान स्थान घेणार.”

हे वैद्यांनी दिलेलं उदाहरण भाऊसाहेबांकडून ऐकून मला त्यांना विचारल्या शिवाय राहवलं नाही.
मी म्हणालो भाऊसाहेब,
“प्रि.वैद्यानी दिलेलं सुंदर उदाहरण ऐकून मला वाटतं,खरं तर शिक्षणाच्या सहाय्याने मनुष्यजातिच्या समस्यांच्या रहस्यांचं उलघडण करण्याचा मार्ग धुंडाळाला जात असला तरी,ज्या ज्ञानाची आपल्याला जरूरी असते त्या ज्ञानापासून हे असंतुलीत शाळकरी शिक्षण आपल्याला वंचीत करत आहे. असं तुम्हाला नाही का वाटत?”
“मला खात्री होती की तुम्ही असंच काही तरी मला विचारल्या शिवाय राहणार नाही.”
असा शेरा देत प्रो.देसाई मला म्हणाले,
“खरं म्हणजे जे शिक्षण विस्मयतेला प्रोत्साहित करून सख्त बौद्धिक क्षमता देऊन आपल्याला सक्रिय करतं अशा शिक्षणाची आपल्याला जरूरी आहे.
अशा तर्‍हेचं ज्ञान विकसित होईल अशा वातावरणाचं ध्यान ठेवणारा समाज जेव्हा मनन आणि अनुभूति किंवा संवेदना म्हणा ह्या दोन्हींचा गौरव करतो आणि सुखशांती, आरोग्य, मैत्री,प्रेम,न्याय,स्वातंत्र्य,उत्तरदायित्व,लोकतंत्र आणि लाभकारी कामं ही सर्व मूल्यं सुनिश्चित ठेवण्याच्या प्रयत्नात असतो त्या समाजात अपेक्षीत फळ मिळणारच.”
मी म्हणालो,
“म्हणजे ह्याचा थोडक्यात अर्थ असा की, अशा तर्‍हेच्या ज्ञानासाठी मननाची जरूरी आहेच आहे, मात्र फक्त मनन अपुरं आहे.
आज खूप दिवसानी आपण दोघे तळ्यावर भेटलो आणि बौद्धिक व्यायामाला मिळालेला आराम आज भरून काढला.”
सुरवातीला भेटल्यावर त्यांच्या चेहर्‍यावर दिसलेल्या बोलक्या छटा उठतां उठतां बरचसं बोलून गेल्या.

 

श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

Advertisements

टिप्पणी नोंदवा

Required fields are marked *

*
*

%d bloggers like this: