आयुर्वृद्धितली सूंदरता.

गिरगावातल्या कुडाळदेशकर निवासातल्या सहा नंबरच्या चाळीत माझा मित्र भाली(भालचंद्र) रेडकर राहायचा.अलीकडेच तो गेला.त्याची मोठी बहिण अर्थू रेडकर त्याच्याच घरी राहायची. तिने लग्न केलं नव्हतं.वयस्करपणाचा परिणाम तिच्या चेहर्य़ावर उठून दिसत होता.मी अर्थूला ओळखलंच नाही.मला तिने ओळखलं.तिला पाहून माझा चेहरा तिला काही तरी सांगून गेला हे केव्हाच माझ्या लक्षात आलं.
मला म्हणाली,
“तू मला ओळखणार नाहीस.कित्येक वर्षानी आपण भेटतोय.तू मात्र आहेस तसाच आहेस.”
“पण तू इतकी खराब कशी झालीस?.
असं मी म्हणता म्हणता मला अर्थू म्हणाली,
“अरे हे सर्व प्रश्न दारातच विचारणार की आत येणार?”
मी आत गेल्यावर प्रथम सहाजीकच इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्या.चहापाणी झालं.आणि नंतर अर्थू मला म्हणाली,
“मगासच्या तुझ्या प्रश्नाचं उत्तर मी तुला सविस्तरपणे सांगते.
आता माझं वय सत्तरीकडे आलं आहे.तू मला पाहिलंस त्यावेळचा माझा चेहरा अजून कसा रहाणार?
आयुर्वृद्धि होत असतानाच्या प्रक्रियेतील सुंदरता मला भावते. जी नैसर्गिक आयुर्वृद्धि आहे,जी सन्मानाने होणारी आयुर्वृद्धि आहे,जी आयुर्वृद्धि होत असताना चेहर्य़ावरच्या सुरकुत्या जशास तशा राहत आहेत अशी आयुर्वृद्धि मी म्हणते.”
मी अर्थूला म्हणालो,
“मला वाटतं ऐन तारुण्य आणि त्या तारुण्याचं वैभव उपभोगताना न सापडणारी उदाहरणं उतार वयात सापडतात.खरं आहे ना?”
मी तिची बाजू घेऊन बोलतोय हे समजायला अर्थू खूळी नव्हती.मला म्हणाली,
“खरं म्हणजे, तारुण्य अनेक आणि विशिष्ट उदाहरणाने ओतोप्रत भरलेलं असतं.ही गोष्ट नाकारताही येत नाही आणि त्याचं महत्व कमी होत नाही.पण एकप्रकारची अंगात आलेली विनम्रता,चेहर्यावरच्या सुरकुत्यांची आठवण करून देणारी विनम्रता,पिकलं जाणं,केस विरळ होणं,कंबर जाड होणं  हे सर्व आयुर्वृद्धिची आठवण करून देतं.तसंच विनम्रता ठेऊन जीवनाकडे पहाण्याचा प्रयत्न केल्यास तो डोळ्यांना दिसणारा प्रकाशपुंजही आठवण करून देतो.”
“अर्थू,तुझ्याशी चर्चा करायला नेहमीच मजा येते.तू दादरच्या कन्याशाळेत शिक्षीका होतीस. तिथूनच निवृत्त झालीस असं भाली मला बोलला होता.नंतर तू क्लासिस्स घ्यायचीस.तुझं वाचनही दाणगं असणार.तू आत्ता म्हणालेल्या मुद्यावरून माझ्या लक्षात आलं की तू कुठच्याही गोष्टीचा सारासार विचार करून तुझं मत बनवित असावीस.खरं ना?”
माझं हे बोलणं ऐकून अर्थूला मला काहीतरी आणखी सांगायचं आहे असं तिच्या चर्येवरून मला भासलं.
मला म्हणाली,
मी तुला एक किस्सा सांगते. मागे एकदा चौपाटीवर फिरत असताना मला वाळूत एक जूना खडबडीत झालेला शंख दिसला.तो मी उचलून घेतला.तो मी घरी आणला.नंतर गंमत काय झाली, दिवस निघून जाऊ लागले आणि पावसाळा जाऊन थंडी आली थंडी जाऊन उन्हाळा आला आणि मी तो शंख नेहमी उचलून उलटा सुलटा ठेऊन न्याहाळत असायची. माझ्या हाताची बोटं त्या शंखावरून फिरवताना डोक्यात नेहमी त्या शंखाच्या भंगुरतेचे आणि त्याच्या बळाचे विचार यायचे आणि वाटायचं की मला हा शंख इतका जगावेगळा का वाटत आहे?
तो जसा गुळगुळीत होता तसा सर्व ऋतुतून मुरून गेला होता.झिजून गेला होता.काही जागेवर तो चांगलाच झिजलेला दिसत होता. त्यावरची काही छिद्र पाहून माझ्या मनात कुतूहल निर्माण झालं होतं.
हल्ली एकदा दिवाळीच्या एका थंडीच्या दिवसात मी चहा घेत बसले होते.एक गमतीदार दृश्य माझ्या डोळ्यांना दिसलं.तो शंख खिडकीच्या पट्टीवर ऐटबाज बसलेला दिसला.आणि नंतर माझ्या चहाच्या गरम गरम वाफेतून पलिकडे पाहिल्यावर थंडीच्या वातावरणातला वाटणारा मंद प्रकाश त्या शंखाच्या छिद्रातून बाहेर पडताना दिसत होता.त्याचं ते खडबडीतपण, घासून गेलेलं,आणि क्षीण झालेलं अंग त्या प्रकाशाला बाहेर येऊं देत होतं.
तो एक साधा क्षण होता,जो अजून माझ्या बरोबर आहे.”
मी अर्थूला मधेच अडवीत म्हणालो,
“मला वाटतं निसर्ग देवतेला ती काय करते ते अवगत असावं.”
“माझ्या अगदी मनातलं बोललास”
असं म्हणत अर्थू मला म्हणाली,
“माझ्या घरातल्यांचे,माझ्या मैत्रिणींचे आणि माझे पण चेहरे मृदु-कोमल होत आहेत हे पाहून चेहर्‍यावरची प्रत्येक सुरकुती मला आवडते,पिकलेला प्रत्येक केस मला आवडतो. आता समजायला लागलंय की मला सगळंच काही माहित नाही.मी आता ऐकायला शिकले आहे. हंसायला चालू केलं आहे.आणि ते सुद्धा दहा मजली हंसणं.मी देणं तसंच घेणं शिकत आहे.माझा प्रेमाचा अनुभव मी विकसीत करायला शिकत आहे.शेवटी  “मी आहे म्हणून कसं असावं” हे शिकत आहे.मलापण आता थोडा नरमपणा आल्यासारखं थोडं झीज झाल्यासारखं वाटत आहे.मला वाटतं माझ्यावर पण एखाददुसरं छिद्र असल्याचा भास होत आहे.आणिकदाचीत त्यातून तो मंद प्रकाश पण येत असल्यासारखं वाटत आहे.तू कदाचीत माझे हे विचार ऐकून मला हंसशील,पण खरं सांगायचं तर जावे त्याच्या वंशातेव्हां कळे.”
“अर्थू,मी तुझ्या विचारांना मुळीच हंसणार नाही.तू इतकी खराब कशी झालीस हे तुला विचारल्याबद्दल सुरवातीला मला वाईट वाटलं होतं.पण जर ते मी म्हटलं नसतं तर मला हा तुझा शंखाचा अनुभव कसा कळला असता ह्याचा विचार येऊन आता बरं वाटतं.”
असं मी म्हणाल्यावर अर्थूचे डोळे पाणावले,मी तिचा हात माझ्या हातात घेत म्हणालो,
“ह्यातून सर्वांना जावं लागतं.आज तू आहेस उद्या मी असणार.”
श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

Advertisements

2 Comments

 1. chitra mantri
  Posted ऑगस्ट 25, 2009 at 11:04 सकाळी | Permalink

  lekh vachla, avadala

  • Posted ऑगस्ट 25, 2009 at 8:17 pm | Permalink

   चित्रा,
   लेख आवडला हे वाचून बरं वाटलं. प्रतिक्रियेबद्दल आभार


टिप्पणी नोंदवा

Required fields are marked *

*
*

%d bloggers like this: