सातबंगल्याची विभा कर्णिक

विभा आणि तिचा नवरा ज्ञानेश कर्णिक हे जोडपं त्यावेळी अंधेरी वेस्टला सातबंगल्याला रहात होतं.सातबंगल्याच्या फिशरीज इन्स्टिट्युटमधे ज्ञानेश रिसर्च असिस्टंट म्हणून काम करत असायचा.जवळच्या एका बिल्डिंगमधे तेराव्या मजल्यावर त्यांचा फ्लॅट होता.माझी त्यांची ओळख वर्सोवाच्या चौपाटीवर सकाळीच फिरायला जात असताना झाली.विभाला त्यावेळी दोन लहान मुलं होती.आणि विभा जवळच्या वर्सोवा वेल्फेअर शाळेत शिक्षिका म्हणून काम करायची.ही मंडळी आंध्रप्रदेश मधल्या चित्तूर ह्या गावात केव्हा गेली ते मला कळलं नाही.पण अलीकडे जेव्हा माझी विभाशी गाठ पडली तेव्हा मला सर्व हकिकत कळली.
जवळ जवळ पंचवीस वर्षानी ही मंडळी पुन्हा आपल्या सातबंगल्याच्या फ्लॅटमधे राहायला आली.आणि माझी गांठ पुन्हा वर्सोवा चौपाटीवर अशीच सकाळी विभाशी पडली.खरं मी तिला ओळखलीच नसती.सहाजीक आहे.ती आता पन्नास वर्षाची झाली होती.ह्या वयावर स्त्रीयांची शरिरयष्टी बदलते.पोक्तपणा बरोबर स्थुलपणा पण येतो.पण विभाचं तसं नव्हतं.फार तर विभा अपवाद समजली पाहिजे.तिच तिची शेवग्याच्या शेंगेसारखी शरिरयष्टी, गोरा रंग,चाफेकळी सारखं नाक,तोच लयबद्द आवाज,प्रत्येक वाक्याअंती खुदकन हंसण्याची लकब हे सर्व कायम होतं.पण विचारात पोक्तपणा जाणावला.मला तिने पटकन ओळखलं.
मला विभा म्हणाली,
“काका,जुन्या आठवणी नेहमीच येतात असं आपण म्हणतो आठवणी कधी जातात असं होत नाही.मी आजच चौपाटीवर सकाळीच पाय ठेवला त्यावेळी पंचवीस वर्ष मागे जाऊन माझी स्मृति जागृत करण्याचा प्रयत्नात होती.तुम्हाला पाहिल्यावर मी ओळखलं.”
“मी पण तुला ओळखलं.तुझ्यात काहीही बदल झालेला दिसत नाही.काही वेळेला देव एखाद्याला चीरतारुण्य देतो तसं तुझं आहे.ह्याचं काय गुपित तुझ्या जवळ आहे ते मला सांग.”
असं म्हटल्यावर विभा जरा लाजली पण लगेचच म्हणाली,
“ऐकायचं असल्यास आमच्या घरी या.ज्ञानेश पुन्हा थोडे दिवस चित्तूरला गेला आहे.मी आणि माझी मुलगीच आहो.माझे दोन्ही मुलगे अमेरिकेत असतात.हे शेंडे फळ मला चित्तूरला गेल्यावर झालं.आता इकडे भवन्स कॉलेजमधे तिला शिकायला आणली आहे.तुम्ही घरी या मग तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तर देईन.”

विभा चित्तूरला गेली कारण ज्ञानेशला तिकडच्या एका रिसर्च कंपनीने त्याला बोलावून डायरेक्टरच्या जागेवर घेतलं होतं.आणि मग त्याचं तिथेच मन रमलं.विभा तिकडे राहून तेलगु बोलायला शिकली.थोडं थोडं कानडी पण बोलायला शिकली.लोकल भाषा, राहतो त्या ठिकाणचे व्यवहार करायला खूप मदत करते.एका विकएन्डला मी विभाकडे गेलो होतो.त्यावेळी अवांतर गोष्टी मला तिच्याकडून कळल्या.
मला विभा म्हणाली,
“त्या दिवशी काका तुम्ही मला म्हणाला होता की माझं असं दिसण्याचं गुपित काय? मला जे वाटतं ते मी तुम्हाला सांगते.एक म्हणजे माझा काही गोष्टीवर दृढ विश्वास आहे.त्यापैकी एक म्हणजे कुणावरही करुणामय प्रेम करावं.त्याने शारिरीक बळ येतं.ते कसं ते मला माहित नाही.नंतर मी तुम्हाला माझ्या आयुष्यात झालेली एक घटना सांगेन.त्यामुळे मी काय म्हणते ते तुमच्या लक्षात येईल.पण सर्वसाधारणपणे जरूरी पुरतं खाणं आणि नियमीत व्यायाम घेणं ही चांगली प्रकृती ठेवण्याची गुरूकिल्ली आहे.अजून पर्यंत मी रोज पाच मैल चालते.जसं वय होतं तशी आपली हालचाल कमी होते,त्यानुसार आपला आहार पण बदलला पाहिजे.बॅंकेत पैसे सेव्हिंग आणि विथड्रॉ करतो तसंच काही ह्या शरिरातल्या फॅटचं आहे.फरक फक्त उलटा आहे.बॅंकेत पैसे जास्त सेव्हिंग करण्याच्या दृष्टीने आपण पहातो इथे शरिराच्या बाबतीत फॅट सेव्हिंग न करता विथड्रॉ करण्याच्या दृष्टीने पाहिलं पाहिजे.एव्हडंच.”
मी, विभाला ती सांगणार होती त्या घटनेची आठवण करून देत म्हणालो,
“तुझे आणखी कसले दृढ विश्वास आहेत ते सांग”
“तेच मी तुम्हाला सांगणार आहे पण त्यापूर्वी हा चहा घ्या”असं म्हणत विभा पुढे सांगू लागली,
“ज्या गोष्टीवर मी दृढ विश्वास ठेवते त्याबद्दल विचार करायला लागल्यावर पंधरा वर्षापूर्वी मला जो अनुभव आला त्याची मला आठवण येते.त्या अनुभवाने माझ्या मनातल्या अनेक दृढ विश्वासापैकी एकाला बळ आलं.करुणामय प्रेम हे नक्कीच भितीबद्दलचा तणाव कमी करतं हा त्यातला एक दृढ विश्वास आहे.त्याचा जो बोध झाला तो एखादा परंपरागत धर्मनिष्ट अनुभव नव्हता.तो काही धक्का देण्यासारखा उसळून माझ्यावर आला नव्हता.पण ते उदाहरण माझ्या मनातले दृढ विश्वास माझ्या अनुभवाला किती जीवंतपणा आणतात हे त्यातून दिसून आलं.”
“म्हणजे असं विशेष काय घडलं ” इती मी
“थोडक्यात सांगायचं तर माझ्यावर माझ्याच नोकराने अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला होता.त्यावेळी मी घरात एकटीच होते.ती घटना होत असताना माझ्या ध्यानात आलं होतं की त्याच्याकडून मला ठार मारण्याचा पण प्रयत्न झाला असता. त्यावेळी माझ्या हे ही मनात आलं होतं की मला भितीपोटी मरायचं नव्हतं.उत्तरदायित्व,म्हणजेच ज्याला अभिक्रिया (react)ऐवजी प्रतिक्रिया (respond)दाखवण्याची क्षमता,म्हणतात ती माझ्या दृढ विश्वासाची महत्वपूर्ण बाब होती,आणि त्यावेळी मला माहित झालं की जो मला दुःख देण्याच्या प्रयत्नात होता त्या इसमाशी मी भितीपोटी अभिक्रिया करीत होते.पण ज्यावेळी मी त्याला प्रतिक्रिया द्यायला सुरवात केली,पण ती घाबरटपणाची नव्हती,उलटपक्षी माझ्या हृदयातली होती,म्हणून माझ्या जे काही मनात येत होतं ते मी माझ्या मुखावाटे येऊ देत होती.माझ्या अंगात -शारिरीक नव्हे- प्रचंड बळ आलं,आणि मला ज्ञातही झालं की जरी हा इसम माझी शारिरीक हानी करायला टपला होता तरी तो माझ्या आत्म्याला हानी करूं शकत नव्हता कारण माझा आत्मा पवित्र होता,पूर्णरूप होता.मी त्यावळेचं एव्हडं सांगू शकेन की तो इसम माझ्या चालीमुळे आणि माझ्या बातचीतीमुळे चक्रावला गेला.त्या बातचीतमधे मी हे ही त्याच्या निदर्शनाला आणलं की त्याने मला असं करूं नये.
मानसिक रूपाने पाहिल्यास त्या माझ्या अंतर्दृष्टितल्या विधात्याकडे माझा संवाद चालला होता की,
” हे दयाघना,मी मरण पत्करायला तयार आहे-त्या क्षणाला मला मरणाची भिती वाटत नव्हती-माझी बछडी मात्र आयुष्यमान होऊ देत.”
मला वाटतं माझ्या मनातल्या करूणामय प्रेमाबद्दलच्या दृढ विश्वासाचं मर्म ह्या इसमाच्या तावडीतून बचावण्यात कार्यरत झालं.दुसर्‍या एखाद्याने माझे प्राण घेतले असते.”
मी विभाला विचारलं,
“काय भयंकर प्रसंग तुझ्यावर आला. विभा,पण तुला एक विचारायचं आहे की,तू तिकडची लोकल भाषा-तेलगू-शिकलीस ती तुझ्या मदतीला आली का? कारण मला वाटतं अशा प्रसंगी भाषा एकमेकात जवळीक आणून आस्था निर्माण करीत असावी.”
“काका,तुम्ही माझ्या मनातलं बोललात” असं म्हणून विभा सांगू लागली,
“हो,त्या इसमाला मी परकी वाटली नाही.मी अस्खलीत तेलगूत बोलते असं पाहून त्याच्या चेहर्‍यावर खूनशीपणा ऐवजी सहानुभूती मला दिसली.
परंतु,ह्या विशिष्ट इसमाबरोबर माझी प्रतिक्रिया देत असल्याने मी अक्षरशः माझ्या हल्लेखोरापासून चालू पडले.त्याच्या कडून मला बोललेले शेवटचे शब्द होते,
 “जा तुझ्या मुलांचा सांभाळ कर जा!”
 हे ऐकून माझ्या मनात आलं की माझ्या त्या दयाघनाने माझी प्रार्थना ऐकली असावी.मुळ दृढ विश्व्वसाची प्रतिक्रिया निरनीराळी रूपं घेतात.अर्थात त्या त्या दृढ विश्वासावर ते अवलंबून असतं.मी नशिबवान होते की माझा दृढ विश्वास प्रेमावर होता भितीवर नव्हता.मला वाटतं आपल्या मनात जे दृढ विश्वास असतात ते आपल्या जीवनाची प्रतिबिंबं असतात.मला असंही वाटतं की वाटलं तर आपण आपल्या मनातला मुळ दृढ विश्वास बदलू शकतो.माझ्या आयुष्यात असल्या अतिप्रसंगाची पाळी पूर्वी कधीतरी आली असती तर माझा प्रतिसाद निराळाच झाला असता.”
मी विभाकडून सर्व हे ऐकत असताना एव्हडा अंतर्मुख झालो होतो,की मी मनात म्हणालो,
“स्त्रीला निसर्गाने प्रेमळपणा भरभरून दिला आहे.निसर्गाची निर्मिती करण्याच्या स्त्रीच्या क्षमते बरोबर तिला निसर्गाने प्रेमा बरोबर सहनशीलता,दया,समजूतदारपणा कमीपणा सहन करण्याची शक्ती विचार करूनच दिली असावी.आणि म्हणूनच हा निसर्ग टिकून आहे.धन्य,धन्य,विभा, तू बोलत रहा,मी ऐकत राहिन”
“माझ्या मते आपल्या मनात असलेले लहान मोठे दृढ विश्वास मुळ दृढ विश्वासाच्या आजूबाजूला त्याचं प्रतिबिंब म्हणून फिरत असावेत,आणि त्यांचा वास्तविकतेत बदल होत असावा.तसंच नवीन ज्ञान आणि अनुभव त्या वास्तविकतेची दखल घेत असावं.एखादा कांदा सोलावा तसं माझ्या मुळ दृढ विश्वासाचं आहे.त्याच्या पर्यंत पोहोचणं तसं थोडं जटिल असतं,ते चालू असतं आणि वेळ घेणारं असतं.तशी मी माझ्याशी समजून उमजून राहते.कारण मुळ दृढ विश्वासाची उत्पत्ति निरनीराळ्या जडांतून होत असते.आणि मला हे ही माहित झालंय की वास्तविकतेसाठी माझ्या अंतरदृष्टीत माझे दृढ विश्वास जीवंतपणा आणतात,आणि जमेल तेव्हडं त्यांच्यासाठी अभिज्ञ राहण्यासाठी उत्कंठा निर्माण करतात.”
हे सर्व ऐकल्यावर मी माझ्या खुर्चीवरून उठून विभाजवळ गेलो आणि तिच्या डोक्यावर हात फिरवीत तिला म्हणालो,
“असा प्रसंग वैर्‍यावर पण येऊं नये.तू नुसतीच दिसायला चीरतरूण दिसत नाहीस,तुझं मन पण चीरतरूण आहे आणि त्या तुझ्या मनात वयाचा पोक्तपणा मिसळून गेला आहे.”
हे मी म्हणालो ते तिने ऐकल्यावर विभाचा चेहरा पाहून मला ती पंचवीस वर्षापूर्वीची सातबंगल्याची विभा कर्णिक दिसली.

 

श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

Advertisements

टिप्पणी नोंदवा

Required fields are marked *

*
*

%d bloggers like this: