दयाशील असणं ही एक प्रकारची देणगी आहे.

“जेव्हा दयाशीलता आणि प्रेम ह्या मधली संदिग्धता जास्त स्पष्ट होत जाते तेव्हा त्या मधली बारकाई पाहून मी बराच प्रभावित होतो.”

कमलाकर धारणकर हा माझा शाळकरी दोस्त.आपल्या आईवडीलांचा एकूलता एक मुलगा.म्हणून लाडावलेला नव्हता. लहानपणापासूनच तो हुशार आणि शिस्त बाळगून होता.हे गुण त्याच्या अंगात उपजतच आले होते.कधी कधी आम्ही भेटलो की बालपणाच्या आठवणी काढून गप्पा मारतो.आणि आता ह्या वयावर त्यावेळच्या मनावर बिंबवून गेलेल्या आठवणीत ठेवण्यासारख्या घटनांचं चर्वीचरण करून एखाद्या तरी निर्णयाला येतो.कमलाकर मनाने अळकूळा होता. जरा मन दुखलं की रडायचा.

“तू लहानपणी खूपच भावनाप्रधान होतास.तसाच आता आहेस का? असं मी त्याला विचारल्यावर मला म्हणाला, 
“जेव्हा दयाशीलता आणि प्रेम ह्या मधली संदिग्धता जास्त स्पष्ट होत जाते तेव्हा त्या मधली बारकाई पाहून अजूनही मी बराच प्रभावित होतो.
तुला मी माझी गंमत सांगतो,जेव्हा मी तिसर्‍या किंवा चौथ्या वर्गात होतो, त्यावेळी आमच्या वर्गशिक्षकानी दसर्‍याच्या सणाला वर्गात एक कार्यक्रम आयोजला होता.मी त्यावेळी माझ्या आईला म्हणाल्याचं आठवतं,
“आई,दसर्‍याच्या सणा दिवशी आम्हाला आमच्या गुरूजींनी पुजेचं सामान,रंगीत फूलं आणि सरस्वतीचा फोटो आणायला सांगून प्रत्येकाने सरस्वतीची पुजा करून झाल्यावर दसर्‍याच्या सणाचं महत्व जसं ज्याला माहित आहे तसं त्याने इतराना समजावून सांगायचं.मी एक पौराणीक गोष्ट वाचली आहे.ती सांगणार आहे.तू मला आशिर्वाद दे.”
त्याशिवाय आमच्या गुरूजीनी प्रत्येकाने आपलं रिपोर्ट कार्ड आई किंवा वडिलांची सही घेऊन न विसरता आणायला सांगितलं होतं. आणि जो कुणी रिपोर्ट कार्ड आणायला विसरेल त्याला दसर्‍याच्या पुजेत भाग घ्यायला मिळणार नाही.असं ही सागितलं होतं.”

मी कमलाकरला म्हणालो,
“हो मला आठवतं,तू तत्पर आणि वक्तशीर होतास.गुरूजी ह्या बाबत तुझं उदाहरण देऊन आम्हा सर्वांना सांगायचे.मला वाटतं तुझी आई याला कारण असायची.ती सारखी तुला मोठ्या लोकांची उदाहरणं देऊन सांगायची.होय ना?”

“माझ्या आईचे माझ्यावर खूप उपकार आहेत.ती आपल्या गुरूजींना भेटून नेहमीच माझ्याबद्दल चौकशी करायची”
डोळे पुसत कमलाकर आईची आठवण येऊन सद्गदीत झाला.अलीकडेच त्याची आई वारधक्याने गेली.
“त्या वयावर मी अभ्यासू विद्यार्थी म्हणून समजला जायचो.त्याशिवाय मी आज्ञाधारक आणि जबाबदार आहे असं ही इतर माझ्या मित्रात समजलं जायचं. माझ्या वडिलांची सही घेऊन सुद्धा मी जेव्हा रिपोर्ट कार्ड आणायला विसरलो तेव्हा त्यादिवशी मी एकदम उद्विग्न झालो.मला त्याचे परिणाम माहित होते. आमचे गुरूजी फार शिस्तीचे होते.मला सरस्वतीची पूजा करायला मिळणार नव्हतीच त्याशिवाय माझी तयार केलेली गोष्ट पण मला सांगता येणार नव्हती. माझ्या बाकावर मी निराश होऊन बसून राहिलो होतो आणि इतर मुलं पुजेची तयारी करीत असलेले पाहून,आशाभंग झालेल्या मला माझे अनिवार्य अश्रू भळभळून गालावरून खाली ओघळायचे काबूत ठेवता आले नाहीत.
पण जास्त वेळ गेला नाही,आमचे गुरूजी माझ्या जवळ आले, ओणावून माझ्या जवळ येऊन बसले आणि मला म्हणाले,
“रडूं नकोस,तू पण पूजेला लाग.आणि तुझी गोष्टपण सांग.परंतु,उद्या मात्र तुझं रिपोर्ट कार्ड आणायला विसरू नकोस.” उठल्यावर माझ्या डोक्यावरून त्यानी मायेने हात फिरवला.माझा विश्वास बसेना.माझ्या गुरूजींच्या अनपेक्षीत उपहारामुळे माझी निराशा कुठच्या कुठे लोप पावली.”

मी म्हणालो,
“मला तू त्या घटनेची आठवण करून दिलीस.मी विसरलोच होतो.”
कमलाकर म्हणाला,
“इतक्या वर्षानंतर ती घटना  मला तंतोतंत आठवते.माझ्याकडून जे अपेक्षीत होतं ते मी करू शकलो नाही.पण माझ्या गुरूजीनी समजूतदारपणा आणि प्रेमळपणा दाखवून माझा आदर केल्यासारखं मला त्यावेळी वाटलं.त्यांना हवं असतं तर त्यांनी मला मज्जाव केला असता.आणि इतर विद्यार्थ्याना उदाहरण घालून दिलं असतं.पण त्यांना माहित होतं की एखाद्या लहान चूकीमुळे मला काही नवा धडा शिकवला जाऊ नये.पण मी मात्र त्यावेळी एक धडा शिकलो की दयाशील राहून आदर केल्याने एखाद्याला किती उत्साहित केलं जातं.”
“कमलाकर अजूनही तू दयाशील आहेस.कुणी जरी घरी येऊन काही मागू लागला तर तू नेहमीच तुझा दयेचा हात पुढे करतोस.” इती मी.

“तरी पण माझ्या जीवनात असं दयाशील राहणं जरा कठीणच गेलं.कधी कधी मी ज्याचं त्याचं कर्म ह्या समजूतीचं समर्थन करीत राहिलो.”असं सांगत कमलाकर पुढे सांगू लागला,
“करावं तसं भरावं ही वृत्ती मी बाळगली.तोलामोलाने पहाण्याची ही वृत्ती माझ्याच सुखाच्या आड येऊ लागली आहे असं मला वाटत राहिलं. जर का मी किती आणि काय काय गोष्टीचा हक्कदार आहे याची गणती ठेवीत राहिलो असतो तरमाझी कधीच समाधानी होणार नव्हती.आणि जर का मी माझ्या पात्रतेपेक्षा धन्यवान झालो असतो तर मी त्यासाठी मला लायक आहे असं समजणार नव्हतो.  मला वाटलं माझ्या मलाच मी समज दिली पाहिजे की नियम मोडणार्‍या प्रत्येकाला जसं दंडीत केलं जात नाही तसंच प्रयत्न करणार्‍या प्रत्येकाला पुरस्कार दिला जात नाही.जीवनात सर्वच काही अनुकूल नसतं.  आणि त्याबद्दल मी जेव्हा बारकाईने विचार करतो तेव्हा वाटतं त्यामानाने माझा कल असंतुलनाच्या भाग्याच्या बाजूकडे  झूकतो.आणि हाच विचार आल्यावर असंच दयाशील राहून इतरांचा आदर करावा ह्या साठी मी मला प्रभावित करतो.

दयाशील राहून आदर ठेवण्यावर माझा विश्वास आहे. आदर मी मिळवला असो वा नसो दुसर्‍यानी दिलेला आदर स्विकार करण्यावर ही माझा विश्वास आहे. कधी कधी तुम्ही त्यासाठी भाग्यवान असता पण ते केवळ कुणी तरी तुमच्यावर प्रेम करतो म्हणून असेल.आणि म्हणूनच मी म्हणतो दयाशील राहून आदर करणं ही देणगी आहे, तो पुरस्कार नाही.”
“कमलाकर तू खूपच चांगला विचार सांगितलास आणि निर्णय घेतलास.मला तुझ्याशी बोलायला बरं वाटतं.काही ना काही तरी शिकवण्याची तुझी वृत्ती मात्र अजून कायम आहे.”
असं मी सांगितल्यावर कमलाकर खूश झाला.

 

 

श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

टिप्पणी नोंदवा

Required fields are marked *

*
*

%d bloggers like this: