माझे 125 वर्षाचे आजोबा.

 

“कदाचीत माझे आजोबा आता मला माझ्या जीवनात मार्ग दाखवण्याच्या रुपात असतील,माझ्या स्मृतीच्या रुपात असतील किंवा आणखी काही रुपात असतील,हे खरंच मला सांगता येणार नाही.”

आज माझे आजोबा जीवंत असते तर ते 125 वर्षाचे असते.माझ्या दहाव्या वर्षी ते गेले.त्यावेळी ते साठ वर्षाचे होते.त्यावेळी माणसाला आयुर्मान कमीच असायचं.
माझ्या आजोबांवर माझं खूप प्रेम होतं.आणि त्यांचं प्रेम आम्हा सर्व नातवंडावर होतं.माझे गोरेपान आजोबा स्वच्छ जांभळ्या रंगाचं सोवळं नेसून, वरून उघडे आणि खांद्यावरून कमरेकडे लोंबणारं त्यांचं जानवं, हातात ताम्हाण घेऊन गायत्री मंत्र मनातल्या मनात पुटपुटत संपलेल्या पुजेचं आचमन करून झालेलं ताम्हाणातलं पाणी आणि फुलं औदुंबराच्या चवथुर्‍यावर चढून औदुंबराच्या मुळाशी असलेल्या देवांच्या मुर्तिवर अभिषेक करण्या्साठी जाणारे माझे आजोबा मला अजून माझ्या चक्षु सामोरे येतात.
 
वय होत गेलं आणि त्यांची ही सर्व हालचाल कमी कमी होत गेली. नंतर नंतर ते आपल्या जीवाला अगदी कंटाळले.
अगदी सरते शेवटी जेव्हा माझ्या आजोबांनी अन्न-पाणी सोडून देलं आणि यापुढे जगायचं नाही असं ठरवलं ते ऐकल्यावर मी माझ्या आई बरोबर त्यांना भेटायला गेलो होतो.ह्या पूर्वी मी माझं जवळचं कुणीही हरवलं नव्हतं.म्हणून त्यांना भेटायला जायला मला मन होत नव्हतं.जणूं तसं केल्याने ते जीवंत राहणार होते.
तरीपण मी तिकडे पोहोचल्यावर, जीवन,मरण,आपलं कुटूंब आणि प्रेम ह्या गोष्टी काय ते मी समजलो.जणू माझ्या त्या जाण्याने माझे आजोबा माझ्या मनात जास्त जीवंत राहिले.
ह्यावेळेला प्रथम जेव्हा मी माझ्या आजोबांना पाहिलं,तेव्हा मोठ्या धक्क्याने घाबरून गेलो होतो.मी माझ्या आजोबांकडे पाहिलं तेव्हा ते कमजोर, दिसले आणि त्यांचं म्हातारं शरिर मृत्युशय्येवर निपचीत पडलेलेले होतं.मी पाहिलेले त्या प्रफुल्लीत चेहर्‍याचे ते माझे आजोबा मला दिसत नव्हते. आणि ज्यावेळेला मला हुंदका आला तेव्हा तडक न्हाणी-घरात गेलो-माझे दुःखाश्रू मला कुणाला दाखवायचे नव्हते.थोडा शांत होऊन मी परत त्यांच्या जवळ येऊन त्यांच्या डोळ्यात पाहू लागलो तेव्हा माझ्या नेहमीच्या नजरेतले माझे आजोबा मला दिसले.
तो सदाचा हंसमूख चेहर्‍याचा माझा “आजा ” जो आम्हा सर्व नातवंडाना माडा-पोफळीच्या बनात नेऊन निसर्गावर कविता म्हणून दखवायचा,तोच माझा “आजा” जो औदूंबराच्या चवथुर्‍यावर माझ्या आजी बरोबर बसून गुजगोष्टी करताना तिच्या पासून दूर बसूनसुद्धा सरळ सरळ तिच्यावर प्रेम करताना भासलेला.

त्यावेळी दिवसातल्या निरनिराळ्या वेळेला माझ्या आजोबांच्या बिछान्याजवळ बसून उरलेल्या सर्व दिवसात आम्ही त्यांच्याशी बोलायचो ते बरचसं बोलणं त्यांच्या पेक्षा आमच्यासाठीच असायचं. पण असं बोलत असताना त्यांच्या ओठावरचं ते हास्यस्फुट पहात राहायचो त्याची आठवण आता जागृत होते.मला वाटतं ते त्यांचं हंसणं ते काहीतरी बोलण्याच्या प्रयत्नात असावेत असंही भासवून द्यायचं.

त्यावेळचे त्यांचे ते बोलके डोळे, प्रेम आणि जीवन आठवून नाचत होते. त्या डोळ्यांच्या शक्तिबद्दल मला वाटत नाही की त्यावेळी त्यांना त्याची कल्पना येत असावी.कधी कधी तो त्या डोळ्यांचा नाच
आशावादी असायचा तर कधी कधी उदास आणि हृदय हेलावणारा असायचा.हे सर्व त्यांचा शेवट होई पर्यंत होतं.कधी थोडं रडण्यात,कधी कधी अनुभव घेण्यात, कधी थोडं हंसण्यात आणि कधी निष्कर्षाला येण्यात मी तो काळ घालवला. विश्वास ठेवण्यासारख्या माझ्या मनात पुष्कळ गोष्टी आहेत पण सर्वांवर मात करणारा विश्वास म्हणजे जीवन सुंदर आहे हा.मला वाटतं मी काही प्रमाणात हे मानत होतो.पण एव्हडी निश्चितता त्यात नव्हती.
 
आता मात्र मला वाटतं की ही सुंदरता आपल्या अस्तित्वातच आहे, काही समयासाठी हे अस्तित्व उसन्या शरिरात वास्तव्य करतं,ही सुंदरता आत्म्यात वास करून असते पण डोळ्य़ामधून नाचत असते. जीभेकडून होऊ शकत नाही म्हणून ती डोळ्यातून बोलकी होते.ही सुंदरता पडद्या आडचं रहस्य किंवा चमत्कार असते,आणि मृत्यु होताच शरिर सोडून जाते परंतु स्वतः मृत होत नसावी.

माझ्या हे सर्व ध्यानात आलं त्याचं फक्त कारण माझ्या आजोबांना शेवटचं अलविदा करताना ह्या दुःखाच्या दाहाला आणि भितीला मी सामोरा गेलो होतो. मला असंही वाटतं,मला त्यावेळी हे माहित नव्हतं कारण मी खरोखरीने अलविदा त्यांच्या शारिरीक अस्तित्वाला केला होता,एका अर्थी हे ही खरं आहे की माझे आजोबा एव्हडी वर्ष होऊन गेली तरी जेव्हडे माझ्या स्मृतित अजून राहिले आहेत की तेव्हडे त्यावेळी नव्हते.कदाचीत माझे आजोबा आता मला माझ्या जीवनात मार्ग दाखवण्याच्या रुपात असतील,माझ्या स्मृतीच्या रुपात असतील किंवा आणखी काही रुपात असतील,हे खरंच मला सांगता येणार नाही. परंतु,मला वाटतं ही अनिश्चितताच खरी सुंदर आहे आणि हे रहस्य जीवनाच्या रहस्यासारखंच आहे हे मात्र निश्चित आहे.

 
श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

Advertisements

टिप्पणी नोंदवा

Required fields are marked *

*
*

%d bloggers like this: