पंढरीचा विठोबा…ओबामा.माझा प्रेसिडेन्ट भाग चवथा.शेवटचा.

अमेरिकन निवडणूकीत दोन्ही पार्टीचे उमेदवार प्रेसिडेन्टच्या अखेरच्या निवडणूकीसाठी निवडून आले की त्यांची नोव्हेंबरच्या अखेरच्या निवडणूकी पुर्वी तिन,चार डिबेट्स होतात.ही डिबेट्स न्युझमिडीयाचे लोक घडवून आणतात.प्रत्येक डिबेटला लाखो अमेरिकन फार महत्व देतात.सुरवातीला जरी टिव्हीवर तेव्हडी गर्दी नसली तरी शेवटच्या डिबेटला खच्चून गर्दी करून लोक प्रतिसाद देतात.

ओबामा आणि मेकेनच्या डिबेटमधे पहिल्या पासून ओबामाचीच सरशी होती. ओबामा बोलायला फाकडा होता,त्याची विश्वासपुर्वक पुर्व तयारी असायची,आणि त्याचा शांत स्वभाव हे त्याचे गुण त्याला फायद्याचे होत होते.उलट मेकेन उत्तर देताना विचलीत व्हायचा,थोडाफार चिडून बोलायचा, आणि त्याच्या इतक्या वर्षाच्या राजकारणातल्या जीवनाबद्दल त्याला अभिमान होता. त्याची तुलना तो ओबामाशी त्याच्या अगदीच तुटपुंज्या राजकारणातल्या अनुभवाशी करायचा. विशेषकरून मेकेनचा मिलिटरीतला अनुभव नक्कीच डोळ्यात भरण्यासारखा होता. त्यामानाने ओबामाला त्या क्षेत्रात अनुभव नगणतीतला होता म्हणायला हरकत नाही.पण ओबामा मेकनेच्या मिलटरीतल्या क्षेत्राच्या अनुभवाचा आदर ठेवून स्तुती करायचा.आणि एकॉनॉमी,अमेरिकन घटना,आणि प्रे.बुशच्या असफल झालेल्या फॉरेन-पॉलिसीबद्दल अचूक निदानं करायचा.

आणि एक दिवस एका डिबेटच्यापुर्वी अमेरिकन एकॉनॉमी जाम कोसळली.चवदा हजारच्या टंकशीवर गेलेला डाऊजॉन एकदम सात हजारावर येऊन आदळला. बॅन्का कोसळायला लागल्या.प्रे.बुश काळजीत पडला.कॉन्ग्रेसची आणि सिनेटची तातडीची मिटीन्ग बोलवण्यात आली.नाहीतरी मेकेनची आदल्या दोन डिबेट्समधून घसरण चालूच होती.मेकेन ओबामाला म्हणाला,
“येणारं डिबेट रद्द करूया”.
ओबामाचं म्हणणं डिबेट रद्द करण्याची काही आवश्यक्यता नाही. प्रेसिडेन्ट झाल्यावर कुणालाही अश्या एकावेळी दोन तीन समस्यांना तोंड देण्याची पाळी आल्यास एका वेळी एक समस्या सोडवायची विलासीता कशी घ्यायला जमणार?. आपण डिबेटची तारीख न बदलता ही समस्या सोडवूया.असा प्रस्ताव त्याने मेकेन जवळ मांडला.डिबेट घेणार्‍या कमिटीने पण ओबामाचीच बाजु धरली. पण मेकेन अतिशय गंभिर घटना असताना असं करणं बरोबर नाही असं म्हणून ताबडतोब वाशिन्गटनडीसीला निघून गेला.आपण भावी प्रेसिडेन्ट आहे अशा अविर्भावात तो प्रे.बुशने बोलावलेल्या मिटिन्गला हजर झाला.बुशने अर्थात मेकेनला महत्व दिलं नाही हा भाग वेगळा. ओबामा आरामात मिटिन्गच्या आदल्या दिवशी वाशिन्गट्नडीसीला गेला होता.

ही घटना सांगण्याचा उद्देश असा की देशाला समस्या आल्यावर प्रेसिडेन्ट झाल्यास मेकेन सैरभैर होऊ शकतो आणि हा त्याचा कमकुवतपणा आहे. असा ह्यातून लोकानी उलट अर्थ काढला.

ओबामाच्या लहानपणी जेव्हा तो आईबरोबर इंडोनेशीयाला गेला होता तेव्हा तिथे तो हायस्कुलला जाई पर्यंत शिकत होता.मधल्या काळात त्याच्या आईने त्यावेळी इंडोनेशियात स्थाईक झालेल्या आणि पुर्वी इडोनेशियातून हवाईला शिकायला आलेल्या आणि तिकडे तिच्याबरोबर कॉलेजमधे शिकणार्‍या माणसाबरोबर दुसरं लग्न केलं. आणि तिला त्याच्या पासून एक मुलगी झाली.तिच ओबामाची सावत्र बहिण.तिचं नाव माया होतं. ओबामाचं तिच्यावर खूप प्रेम होतं.ह्या दोघां लहान मुलांना सांभाळून नोकरी करताना त्याच्या आईचे नाकीनऊ यायचे.एकदा काय झालं, ओबामा म्हणतो,

“एकदा शाळेतून घरी येत असताना बरोबरच्या एका शाळा सोबत्याबरोबर माझी बाचाबाची होऊन जमिनीवर पडून माझ्या हातापायाला लागलं होतं.कामावरून घरी आल्यावर आईने मला त्या परिस्थितीत पाहून धसका घेतला.क्लिनीकमधे नेऊन माझ्यावर उपचार केले.पुढेमागे मी उनाड होईन असं समजून लवकरच माझी हवाईला आजीआजोबाकडे तिने रवानगी केली.”

ओबामा आजीआजोबांकडे राहून हायस्कूलचं शिक्षण पूर्ण करून झाल्यावर मेनलॅन्ड अमेरिकेत कॅलिफोरनीयात लॉसएन्जालीसला आला.तो लॉसएन्जालीसच्या ऑक्सिडेन्टल कॉलेजमधे दाखल झाला.  नंतर ओबामा तिथून निघून न्युयॉर्कच्या कोलंबीया युनिव्हर्सिटीला जॉईन झाला.इथे ग्रॅज्युएट झाल्यावर अवघ्या तेवीस वयावर तो शिकागोला आला.आणि तिथे त्याने लोकोपयोगी कामं करायचं ठरवलं.गरीब वस्तीत फिरून तो त्यांच्या समस्या सोडवायच्या प्रयत्नाला लागला.व्हालेन्टियर होऊन वर्षाला मिळणार्‍या अवघ्या बारा हजार डॉलरवर तृप्त राहिला.नंतर त्याच्या लक्षात आलं की जनसेवा करताना थोडी कायद्याची माहिती असण्याची गरज आहे.म्हणून तो हार्वर्ड लॉकॉलेज मधे दाखल झाला.हार्वर्ड लॉकॉलेजमधे कायद्याचा अभ्यास पुर्ण करताना अमेरिकेच्या घटनेचा त्याने जीव टाकून अभ्यास केला.लॉकॉलेजमधे त्याने स्टुड्न्टयुनीयनची निवडणूक जिंकून तो त्या युनियनचा प्रेसिडेन्ट झाला.इथेच त्याला लोकांसमोर बोलायाची संवय लागली. पब्लिकस्पिकींगचा त्याने अभ्यास केला.नंतर तो भाषणाची तयारी करून झाल्यावर लिहिलेल्या भाषणाची कसलीही मदत न घेता मुद्देवार स्मृती ठेवून अस्खलीत बोलायला लागला.ह्याची त्याला शिकागोला त्या राज्याच्या सिनेटमधे निवडून यायला मदत झालीच त्या शिवाय पुढे देशाच्या सिनेटमधेही निवडून यायला सफल झाला.हल्ली तर तो कसलेही भाषण फक्त त्याची  तयारी करून येतो आणि उस्फूर्तपणे देतो.कधीकधी मुळ भाषण बाजूला ठेऊन आणखी काही उस्फुर्त बोलतो.हार्वर्डमधे शिकून झाल्यावर तो अमेरिकेच्या घटनेवर शिकवायला काही दिवस हार्वर्डमधेच प्रोफेसर म्हणून राहिला.आज त्याला प्रेसिडेन्ट झाल्यावर ह्या विषयाच्या अभ्यासाचा पुरेपूर फायदा होत आहे.

ओबामाने सुरवाती पासून इराक युद्धाला विरोध केला होता.युद्धाने प्रश्न सुटत नाही हे तो जीव तोडून सांगायचा.इराक युद्धाला कंटाळलेली अमेरिकन जनता,
 “मी प्रेसिडेन्ट झालो तर इराक मधून सैन्य काढून घेईन”
हे त्याच्या तोंडातून ऐकायला आतूर व्हायची.
उलट मेकेन,
“असं सैन्य काढून घेतलं तर,अमेरिकेची नामुष्कि होईल”
असं म्हणायचा.
शेवटी नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात निवडणूकीचा दिवस उजाडला.मेकेन हरला.रिप.पार्टी हरली.ओबामा जिंकला.डेमो.पार्टी जिंकली.
दोन वर्षं अगोदर पासून मेहेनत घेऊन केलेल्या कष्टाचं ओबामाला फळ मिळालं.
त्या समयामधे तो युरोपला,इराकला,अफगाणीस्थानला,इझराईलला भेटी देऊन आला.युरोपमधे जर्मनीमधे एका सभेला त्याला बघायला दहालाखाच्यावर गर्दी जमली होती.
“तो मनापासून बोलत आहे.अमेरिकेच्या उतरत्याकळेला वर नेईल.”
असं लोकाना वाटायचं.
गेल्या आठवर्षाच्या बुशच्या कारभाराला-युद्धखोरीला- अमेरिकाच नव्हे तर सर्व जगच कंटाळलं होतं.
ओबामा जिंकून आल्यावर झालेल्या पहिल्याच सभेला अतोनात गर्दी झाली होती.
सभेत तो बोलत असताना गोर्‍यापासून काळ्यापर्यंत,लॅटिनोपासून एशियनापर्यंत अनेकजण आश्चर्याने आणि आनंदाने रडत होते.टिव्हीचे कॅमेरे ही दृष्य उस्फूर्तपणे टिपीत होते.
“यस विई क्यान”
चा उदघोष होत होता.

आणि नव्या वर्षाच्या २००९च्या जानेवारीच्या २० तारखेला प्रे.बुशकडून देशाचा कारभार ओबामाने हाती घेतला.तेव्हा,
ओबामाच्या डोक्यावर एक ट्रिलियन डॉलर्सचं -१,०००.०००,०००,०००- (एक निखर्व डॉलर्सचं) कर्ज होतं.एकॉनॉमी रसा तळाला गेली होती. अमेरिकेबद्दल रिप.पार्टीच्या आठ वर्षाच्या धोरणामुळे जगात नाचक्कीचं वातावरण निर्माण झालं होतं,उत्तर कोरिया आणि इराणकडून न्युक्लीअर बॉम्बच्या धमकीचं ओझं होतं, आतंकवाद्यांनी धुमाकूळ घालून न्युक्लीअर बॉम्ब असलेल्या पाकिस्तान सारख्या देशाला गिळंकृत करायचा चंग लावला होता,घराच्या कर्जाचा हाप्ता फेडता येत नाही म्हणून लाखो अमेरिकन लोकाना घरं सोडून रस्त्यावर येण्याची पाळी आली होती.महिन्याला सात लखावर लोकाना नोकरीवरून काढलं जात होतं,मोठ मोठ्या बॅन्का कोसळत होत्या,आणखी किती गोष्टींचा पाढा सांगावा?
अशा परिस्थितीत -संदर्भ नसताना- शक्यतो कुणालाही दोष न देता, कुणावरही ठपका न ठेवता,कुणावरही न चिडता,सतत हंसरा चेहरा ठेवून, ओबामाने कारभार हाती घेतला होता.

कुरूक्षेत्रावर ह्या अनेक “संकटरूपी कौरवांच्या” सैन्यांचा पाडाव करण्यासाठी रथाचं सारथ्य करारायला पुढे आलेला हा, 
“धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे”
म्हणणार्‍या कृष्णासारखा मला वाटू लागला.
अजूनही ह्या पंढरीच्या विठोबाच्या दर्शनाला अमेरिकन वारकर्‍यांची दिंडी गाजत वाजत येत असते.
“विठ्ठल विठ्ठल जय जय विठ्ठल”  
“ओबामा,ओबामा,ओबामा…”
असा गजर करतात.
म्हणूनच,
“पंढरीचा विठोबा..ओबामा. माझा प्रेसिडेन्ट म्हणायला मी काहीसा भारावून उद्युक्त झालो आहे.एव्हडंच.
समाप्त.

 

 
श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

2 Comments

 1. Posted ऑक्टोबर 22, 2009 at 4:40 सकाळी | Permalink

  mala, lekh aavadala
  vsant bansod

  • Posted ऑक्टोबर 22, 2009 at 9:08 सकाळी | Permalink

   नमस्कार वसंत,
   आपल्याला लेख आवडला हे वाचून बरं वाटलं.
   आपल्या प्रतिसादाबद्दल आभार.


टिप्पणी नोंदवा

Required fields are marked *

*
*

%d bloggers like this: