“आपण सर्वानी उड्या मारीत असावं.”… इति वासंतीची पणजी.

“उड्यां मारण्यांचा प्रयत्न करा,आनंदात असताना उड्या मारा,उदास असताना उड्यामारा,आजारी, रागात,आशाजनक,उत्तेजीत,थकलेले,बेचैन,विफल,भुके,आणि थंडीने कुडकुडले असतानाही उड्या मारा.”

 

वासंतीला आजी पण आहे आणि पणजी पण आहे.
मी वासंतीला म्हणालो,
“तुझी पणजी आजीपेक्षा प्रकृतिने उत्तम आहे.तेव्हा सगळं काही वयावर असतं असं नाही.माणसाची लाईफ-स्टाईल पण बरेच वेळा महत्वाची असते.”
“अगदी बरोबर” वासंती म्हणाली.
“मी माझ्या आजीपेक्षा पणजीकडून जास्त शिकत आहे.आजीकडून शिकण्याचे आता आमचे दिवस संपले.कारण आता ती अगदीच थकली आहे.त्या मानाने माझी पणजी सुदृढ आहे.माझ्या आजीला मनोभ्रम झाला आहे.मनोभ्रम ही अशी व्याधी आहे की अशा रोग्याशी संबंध ठेवताना डोळ्यातून पाणी येतं.”
 
मी वासंतीला म्हणालो,
“कोकणात ह्या रोगाला “बाळं लागलं ” असं म्हणतात.ह्या रोगाचा अगदी परिपूर्ण अर्थ त्यात आहे.तरूणपण वगळल्यास बाळपण आणि म्हातारपण एकमेकाला पुरक आहेत.शारिरीक तुलना तर अगदीच सारखी आहे.दोन्ही वेळी कुणाचा तरी त्यांना आधार लागतो. अन्नपाण्याच्या गरजा पण तशाच सीमित असतात.”

“आणखी किती साम्य सांगावं.एकाचा मेंदु अपरिपक्व असतो तर दुसर्‍याचा अपरिपक्व होतो.एकूण परिणाम एकच.”
असं म्हणून वासंती खूप उदास झाली.
आणि पुढे म्हणाली,
“लहान बाळाबद्दल निदान आपल्याला माहित असतं की हळू हळू त्याला विचार शक्ति येत रहाणार.पण आजीच्या वयात तिचे विचार ऐकून खूप दुःख होतं.अगदी लहान बाळाला समजूत घालावी तशी तिला समजूत घालावी लागते.”
“केव्हा पासून हे तुझ्या आजीला असं व्हायला लागलं?”
मी वासंतीला विचारलं.

“मला वाटतं मी त्यावेळी पंचवीसएक वर्षाची होते.माझ्या आजीला मनोभ्रंश झाला होता.तिला आम्ही एका सुश्रुषा आश्रमात ठेवलं होतं.आम्ही आळीपाळीने जाऊन तिची दखल घ्यायचो.कधी कधी आम्ही तिला घरून जेवण घेऊन जायचो.तिला आवडणारे पदार्थ आश्रमात मिळतीलच असं नव्हतं.घरी ते पदार्थ केल्यावर तिला वगळून खायला आम्हाला जीवावरच यायचं.असे बरेच दिवस होऊन गेले.
तुम्हाला एकदाची गंमत सांगते,
एकदा दुपारचं जेवण देऊन ती जेवत असताना मी तिच्याच सोबत रहाणार्‍या दुसर्‍या एका आजीशी हंसले.तिचं प्रफुल्लित आणि मोहक हंसू चमकून दिसलं तिला पण माझ्या आजी सारखाच व्याधी होता.
मी त्या आजीला विचारलं की तिला तिथे रहायला आवडतं का?.
आणि ती म्हणाली,
“हो,मला राणीच्या बागेत रहायला आवडतं.ही फारच सुंदर जागा आहे.”
नंतर त्या आजीनेच मला प्रश्न केले,
“माझं लग्न झालं आहे का?”
“मला किती मुलं आहेत?”
“माझ्याकडे पाळीव मांजर आहे का?”
“मी कधी कॉलेजला गेली का?”
“मी ताजमहाल पाहिला का?”
ह्या सर्व प्रश्नाना मी,
 “नाही”
असंच उत्तर दिलं.
नंतर मला तिने जो प्रश्न विचारला तो जास्त अर्थ धरून होता.
“मी अजून उडी मारू शकते का?” असं तिने मला विचारलं.
मी उत्तरले,
“अर्थात मी उडी मारू शकते”
“मग अशीच उडी मारीत रहा.कारण एक दिवस तू ते करू शकणार नाहीस.”
असं तिने मला उत्तर दिलं.

तो त्या आजीचा पोरकट प्रश्न मला बरंच काही सांगून गेला.कारण त्या प्रश्नात शारिरीक उडी मारण्या व्यतिरिक्त गंभीर अर्थ होता.
उडी मारण्याच्या प्रश्नाशी जी संदिग्धता होती ती जीवन,ताकद,धैर्य, लवचिकता, स्वप्न, प्रेम,आरोग्य,आशा,भविष्य आणि स्वतंत्रतेशी संबंधीत होती असावी.उडी ह्या शब्दाचा संकेतार्थ शारिरीक आणि मानसिक आरोग्याशी वैधता ठेवून होता.”

मी वासंतीला म्हणालो,
“आयुष्य अगदी क्षणभंगूर आहे आणि मला वाटतं आपल्या उड्या आपण चालू ठेवायला हव्यात.विज्ञानात दाखवलं जातं की जे कुणी व्यायाम घेतात आणि दीर्घायुष्यी असतात त्यांना मनोभ्रम होण्याची शक्यता कमी असते.व्यायामामूळे “इंडॉर्फीन” नावाचा जो द्रव निर्माण होतो तो आपल्याला संतुष्ट ठेवीत असतो.आता हे झालं शारिरीक उड्याबद्दल.
आनंदी प्रवृती ठेवल्याने सकारात्मक दृष्टीकोन राहतो.आणि असा सकारात्मक दृष्टीकोन ठेवल्याने भविष्य उज्वल होतं. ह्या विश्वात जर का कुणी सकारात्मक कार्य-शक्ती ठेवील तर त्याची प्रतीफळं परिपूर्ण मिळतील.
एकूण काय,कसल्याही उड्यांशिवाय जीवन निराशजनक दिसतं.”
माझं हे विश्लेषण ऐकून वासंतीने त्याचा संदर्भ आपल्या आजीशी लावला.

ती म्हणाली,
 “माझी आजी भौतिक-भोगी होती.तिच्याजवळ किंमतीचे दागिने, कपडे,आणि अवधानं होती.कुठीचीच गोष्ट ती त्याज्य करीत नव्हती. तिच्या जवळ शेकडो लोकरीच्या लड्या होत्या,काचेची बरीच तोरणं होती,चांदीच्या फोटो फ्रेम्स होत्या,हे सर्व विकत घेतलेल्याच्या पावत्या होत्या.आणि हे सर्व धूळ खात पडलेलं होतं. आजीने कधी उड्या मारण्याचा प्रयत्नच केला नसावा.बैठक मारून ह्या वस्तु-संग्रहाचं ती कौतूक करण्यात घालवायची.आणि आता मात्र तिला अशा उड्या मारायला बराच उशिर झाला होता.”

प्रत्येकाच्या लाईफ-स्टाईलबद्दल मी प्रथम म्हणालो होतो त्याचा संदर्भ देऊन वासंती म्हणाली,
“माझी पणजीचं मात्र तसं नव्हतं.तिने मोठा दुर्दैवी समझोता आपल्या आयुष्याशी केला होता.तिच्या लहान वयातच माझे पणजोबा निर्वतले. तिला एक अधू मुलगा होता.पण ती आयुष्यात सकारात्मक राहिली. वेळ आल्यास धोका पत्करला.आणि उड्या ही घेतल्या. परिस्थितीचा फायदा घेण्यासाठी तिला तसं करावं लागलं. चांगल्या परिस्थितीसाठी तिने येणार्‍या संधीला उडी मारून आत्मसाथ केलं.आणि आता ९७ वर्षावर तिची बुद्धि इतरांपेक्षाही तल्लख आहे.त्यावेळी तिने डोळे मिटून उड्या मारल्या आणि आता डोळे उघडे ठेवूनही आशेने भरभरून उड्या मारते.”

“तुझी पणजी अप्रत्यक्षपणे काय सांगते माहित आहे काय?”
असा प्रश्न करून तिच्याकडून उत्तराची अपेक्षा न करता मीच म्हणालो,
ती म्हणते,
“उड्यां मारण्यांचा प्रयत्न करा,आनंदात असताना उड्या मारा,उदास असताना उड्यामारा,आजारी,रागात,आशाजनक,उत्तेजीत,थकलेले,बेचैन, विफल,भुके,आणि थंडीने कुडकुडले असतानाही उड्या मारा.परत सुरवात करताना ही उड्या मारा.उड्या हे तारूण्याचं गौप्य आहे.उडी जीवनाची सुधा आहे,आणि भावी आयुष्याची आशा आहे. मला वाटतं आपण सर्वानी उड्या मारीत असावं मग त्या शारिरीक असो किंवा मानसिक असो.”
वासंतीला हे ऐकून खूपच बरं वाटलं.तिचा चेहराच सांगत होता.

 

 

श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

 

 

2 Comments

 1. Posted नोव्हेंबर 8, 2009 at 11:44 सकाळी | Permalink

  अगदी मनापासून आवडला लेख.
  यात खुप काही घेण्यासारख आहे…

  • Posted नोव्हेंबर 8, 2009 at 3:59 pm | Permalink

   नमस्कार देवेंद्र,
   आपल्याला लेख मनापासून आवडला हे वाचून आनंद झाला.
   आपल्या प्रतिक्रियेबद्दल आभार.


टिप्पणी नोंदवा

Required fields are marked *

*
*

%d bloggers like this: