आणि कुणासाठी तरी तो सूर्य उगवत असतो.

“सरतेशेवटी आपण लहान मोठ्या आपत्ती विसरून जातो.मी नेहमीच माझ्या मनात ठरवत असतो की जीवन मार्गस्थ होण्यासाठी होणार्‍या गोष्टी होऊं द्याव्यात.”

 

सुरेशची आणि माझी फार जूनी दोस्ती आहे.अलिकडे तो निवृत्त होऊन ठाण्या जवळच्या एका खेड्यात रहायला गेला आहे.मी मात्र मुंबईलाच चिकटून आहे.मला तो आपला पत्ता देऊन गेला होता.ह्या आठवड्यात मला तसा विरंगुळा होता,म्हणून त्याला भेटायला त्याच्याकडे जायचं ठरवलं.त्याला फोन करून कळवलं.तो मला न्यायला बसस्टॅन्डवर आला होता.संध्याकाळी बाहेर अंगणात  ज्यावेळी आम्ही गप्पा करायला बसलो त्यावेळी असाच काही तरी विषय निघाला.

“अलीकडे सूर्य लौकर मावळतो.त्यामुळे अंधार लवकर पडतो.”असं मी सुरेशला  म्हणालो.

“अगदी ज्यावेळी मनुष्य आंकडे मोजायला शिकला अगदी त्यावेळे पासून पृथ्वीवरच्या सर्वांना शिकवलं जात होतं की दिवस २४ तासाचा असतो.हे काही खरं नाही.प्रत्येक दिवस २३.९३४ तासाचा असतो आणि दिवसाचे २४ तास धरल्याने जो जास्त वेळ धरला जातो तो लिप इयरमधे जुळवला जातो.आणि म्हणून फेब्रुवारीचा एक दिवस-म्हणजेच २४ तास फरक केला जातो.”
मला सुरेश माहिती देत होता.

“मला माहित आहे की मी चवथी पाचवीत असताने हे शिकलो होतो.”
असं म्हणून, सुरेशलाच आणखी माहिती द्यावी म्हणून मी त्याला पुढे सांगितलं.
“आपल्याला सांगितलं जातं प्रत्येक १२ तासात-अर्थात दीड तासाचा जास्त कमीचा फेरफार धरून- सूर्य उगवतो आणि मावळतो.हे पण जरा स्तोम आहे.सूर्य कधीच वर किंवा खाली जात नाही.पृथ्वीच्या गरगर फिरण्याने हा भ्रम निर्माण होतो.अगदी सेकंदाच्या अंशाच्या भागामधे सूर्य कुठे तरी ह्या पृथ्वीवर उगवत असतो किंवा मावळत असतो.”

“हो अगदी बरोबर आहे तुझं म्हणणं.रात्रीच्या काळोखात मी बसलो असताना मला शांत बसून विचार येतो की कुठेतरी पृथ्वीच्या पाठीवर काही लोक स्वच्छ सूर्यप्रकाशात असतील तर मी इकडे झोप येण्याच्या प्रतिक्षीत असतो.आणि हे पाहून मी थोडा उद्विग्नही होतो.”
सुरेश अगदी वैतागून सांगत होता.
आणि पुढे म्हणाला,
“मी ज्या खेड्यात सध्या राहत आहे ते आत्ता काळ्या पडद्याखाली पहूडलं जाणार आहे तर ह्याच वेळी चीनमधे लोक खेळात कुदत आहेत. अमेरिकेतल्या कुठल्यातरी शहरात गाडीच्या अपघातात एखादी कमनशिबी स्त्री मृत्यु पावली आहे तर तिचा आत्मा दुसर्‍या कुणाच्या शरिरात शिरून कुणाला तरी जन्माला आणीत आहे.मला फार पूर्वी ऐकल्याचं आठवतं की वाईट गोष्ट होत असताना सरतेशेवटी त्यातून चांगली गोष्ट बाहेर येते.”

सुरेश असले विचार सांगण्यात पहिल्यापासून वाकबगार होता.त्याचाअसल्या तत्वज्ञानावर दृढविश्वास होता.
आपल्या म्हणण्याला दुजारा देण्यासाठी सुरेश मला म्हणाला,
“तू मला हंसशील,पण खरं सांगू माझा ह्यावर पूर्ण विश्वास आहे.वानगी दाखल तुला सांगतो,
माझी आई सांगायची की ती लहान असताना तिचा एक काका लांबलेल्या आजाराने निर्वतला.तिला त्यावेळी खूपच वाईट वाटलं होतं.
पण त्यातून एक चांगलं झालं की तिची कॉलेज शिक्षण घेण्याची जी प्रबळ इच्छा होती ती पूरी झाली.तिच्या काकाने तिच्या नावावर पैसे ठेवले होते ते त्यांच्या मृत्यु नंतर तिला मिळाले.आणि तिचे काका गेले नसते तर आईला शिक्षण पूर्ण झाल्यावर ज्या नोकरीवर काम मिळालं तिथे माझ्या बाबांची भेट झाली नसती.मी पण शिक्षणासाठी मुंबईत आलो नसतो आणि आता ह्या खेड्यात निवृत्तीत दिवस घालवू शकलो नसतो.”
सुरेशची विचारसरणी अगदीच काही चुकीची नव्हती.
मी म्हणालो,
“मला माहित आहे की आपल्या कुटूंबात ही स्थित्यंतरं झाली नसती तर आपलं जीवन आता आहे तसं झालं नसतं.सरतेशेवटी आपण लहान मोठ्या आपत्ती विसरून जातो.मी नेहमीच माझ्या मनात ठरवत असतो की जीवन मार्गस्थ होण्यासाठी होणार्‍या गोष्टी होऊं द्याव्यात.”

बाहेर खूपच काळोख झाला होता.लहान लहान मुर्कुटं अंगाला चावत होती.सुरेशच मला म्हणाला,
“चल आपण आत घरात जाऊया.पण हा माझा विचार संपवण्यासाठी जाता जाता मी तुला एक सांगतो.
अगदी शेवटची गोष्ट मी आठवणीत ठेवण्याच्या प्रयत्नात असतो ती ही की दिवसाच्या २३.९३४ तासाच्या प्रत्येक मिनीटाच्या प्रत्येक सेकंदाला सूर्य मावळत असतो आणि कुणासाठी तरी तो सूर्य उगवत असतो.”
घरात येता येता मी माझ्याच मनात म्हणालो,
“चला आज मस्त जेऊन झोपूया.उद्या आपल्यासाठी सूर्य नक्कीच उगवणार आहे.”

 

 

श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

Advertisements

टिप्पणी नोंदवा

Required fields are marked *

*
*

%d bloggers like this: