जर,तर,पण,परंतु.

 

“माझं ह्या प्रश्नाला उत्तर एव्हडंच की जरूरीपेक्षा ग्लास दुप्पट मोठं असावं.”

आज प्रो.देसाई तळ्यावर भेटले तेव्हा मीच त्यांच्याकडे विषय काढला.
मी म्हणालो,
भाऊसाहेब,मी ऐकलंय की जगात दोन प्रकारची माणसं असतात.आशावादी आणि निराशावादी.सहाजीकच,ह्या दोघातला फरक कळण्यासाठी आणि एखादा कुठच्या वर्गात मोडतो हे कळण्यासाठी प्रसिद्ध उदाहरण आहे ग्लासाबद्दलचं.
ग्लास अर्ध भरलं आहे की ग्लास अर्ध रिकामं आहे?.आशावाद्याची बाजू घेतल्यास, “काहीही होणं शक्य आहे” ह्या म्हणण्याला चिकटून रहावं लागणार.”

“तुमचं म्हणणं “काहीही होणं शक्य आहे” ह्याबद्दल विचार केल्यास, एक दिवस समजा असं समजून घेतलं की,उंदीर पण अकाशात उडू शकतो. तर तसं आशावादी रहायला हरकत नाही.ते तुमच्या दृष्टीने ठीक आहे.कारण विकासाच्या किंवा उन्नतिच्या तत्वानुसार हे ही कधी तरी शक्य आहे.ते तत्व तुमच्या विचाराशी सहमत आहे.”
एव्हडं म्हणून भाऊसाहेब आवंढा गिळत पुढे म्हणाले,
“परंतु,समजा जर का जगातल्या सर्व संशोधकानी समज करून घेतली असती की काही गोष्टी अशक्य आहेत तर मात्र हे विश्व आपण हरवून बसलो असतो.आणि मनुष्याची प्रगती कधीच झाली नसती. माझं हे शक्यतेबद्दलचं तत्व, कुणीसं म्हटलंय त्यातून अभिव्यक्त होतं.

“ऐक कुणी म्हणे हे अनिवार्य आहे. बाळा!
अन कुणी म्हणे हे करू नये
ऐक कुणी म्हणे हे अशक्य,असंभव आहे. बाळा!
अन कुणी म्हणे हे होणे नलगे
ऐकशील का माझं बाळा!
काही ही अघडीत नाही
घडणे क्रमप्राप्त आहे.
क्रमप्राप्त आहे. बाळा!”

हे ऐकून मी म्हणालो,
“मनुष्याला कल्पनाशक्ती असते.हे त्याला मिळालेलं उत्तम साधन आहे.
त्यामुळे जीवनातल्या वास्तविकतेतल्या परिसीमेचं हे साधन उन्मूलन करून टाकतं. ह्या कल्पनाशक्तीच्या स्वप्नलोकात संभावनेला पुरेपुर अस्तित्व असतं. आणि तिथे संदेह लुप्त झालेला असतो. ही जादूनगरी सोडली तर मात्र वास्तविकतेची सीमा ह्या स्वप्नलोकात शिरकाव करते आणि ती सीमा स्वप्न-भरारीला अवरोध करते. तुम्हाला हा माझा विचार कसा वाटतो भाऊसाहेब?”

माझ्या प्रश्नाला उत्तर देताना विचार करून प्रो.देसाई म्हणाले,
“मला वाटतं वास्तविकतेला उगाच किंमत दिली जाते.जर सर्व गोष्टी प्रतिभाशाली व्यक्तीना सीमित असत्या तर e=mc2 हे आपल्याला कधी कळलंच नसतं.स्वतःचे उद्देश साध्य करताना दुसर्‍याच्या परिसीमा पाहून चालत नाही.स्वतःवर स्वतःचा विश्वास हवा. परिसीमा मिथ्या आहेत.आभाळ पण अनंत असतं.”

“म्हणजे तुम्हाला म्हणायचं आहे की ग्लास अर्ध भरलेलं असत्तं?”
मी त्यांना उलट पश्न केला.

“नव्हे,नव्हे,माझ्या ह्या विचारवरून कुणाला वाटेल की माझी समजूत आहे की ग्लास अर्ध भरलेलं आहे.खरं तर प्रत्येक विचाराला दोन बाजू असतात.मस्तक असतं तिथे शेपूट असतं,”इन फॉर यान्ग” असं चीनी भाषेत म्हणतात तसं.”
असं उत्तर त्यांनी मला दिलं.

“मग भाऊसाहेब,मला असं वाटतं काही ही शक्य आहे.आणि ते होण्यासाठी एखाद्याने आपले सर्व परिश्रम सर्व काळ वापरलायला हवेत.ढिलाईला वाव नसावा. अवसर घेऊन चालणार नाही.माझं हे म्हणणं कुणाला भयभीत केल्यासारखं दिसेल. पण माझं भाकित आहे की सरतेशेवटी परिश्रम आणि मिळणारं फळ यात संतुलन होत असतंच.” मी म्हणालो.

“मला वाटतं,आपल्या करणीचं आपल्याकडेच उत्तरदायित्व असावं, आणि दोषारोपण करणं म्हणजे आपल्याच अयोग्यतेचं लटकं कारण दाखवणं.”
असं म्हणून झाल्यावर प्रो.देसायानी एक छान उदाहरण दिलं.
ते म्हणाले,
“माझं ग्लासाबद्दलचं उदाहरण हे वयक्तिक दृष्टीकोनावर अवलंबून आहे.
मुंगी होऊन मी जर ह्या बदनाम ग्लासाजवळून जाताना वर दृष्टीकरून पाहिलं तर मला ग्लास अर्ध भरलेलं दिसणार.पण मी जर का एखादा तहानेलेला दैत्य होऊन वरून ग्लासाकडे पाहिल्यास नक्कीच ग्लास अर्ध रिकामं दिसणार.”

ह्या विषयावर आणखी बोलण्यासारखं काही राहिलं नाही हे माझ्या लक्षात येताच मी समारोप करताना प्रो.देसायांना म्हणालो, 
“ह्या प्रश्नाला माझ्या कडून उत्तर एव्हडंच की जरूरीपेक्षा ग्लास दुप्पट मोठं असावं.”

 

 

श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

 

 

 

Advertisements

टिप्पणी नोंदवा

Required fields are marked *

*
*

%d bloggers like this: