“पुन्हा कधीतरी नक्कीच भेटूंया!”

“आपल्या कडून झालेली प्रत्येक क्रिया आणि उच्चारलेला प्रत्येक शब्द पुढे काय करू शकेल किंवा काय करणार आहे हे ज्या उमेदीतून निर्माण होणार आहे ती उमेद अगोदरच माहित असणं म्हणजेच खूश असणं,म्हणजेच प्रसन्न असणं.”

अगदी लहानपणापासून म्हणजेच सहा सात वर्षाची असल्या पासून सुधा, शाळा संपून घरी आल्यावर संध्याकाळी आपल्या मैत्री्णीना जमवून “टीचर,टीचर ” खेळायची. टीचर स्वतः सुधा व्हायची.आणि इतर मैत्रीणी तीच्या विद्यार्थीनी असायच्या.सुधा टीचर सारखं दिसण्यासाठी आपल्य शाळेतल्या खर्‍या टीचरची कॉपी करून मग तो पार्ट संध्याकाळी आपल्या लुटूपुटूच्या वर्गात करायची.आणि त्यासाठी आपल्या मोठ्या बहिणीच्या साड्या त्या वयात सुद्धा स्वतः नेसायची.  एव्हड्या लहानपणी साडी नेसायचं कसब सुधाने केवळ संवयीने आत्मसात केलं होतं.

सुधा कानडे नंतर खूप शिकली.पण तीचा कल शिक्षीका होण्याकडेच होता.बी.ए. झाली इंग्रजी घेऊन एम.ए झाली.नंतर लहान मुलांच्या मनोविज्ञानावर प्रबंध लिहून डॉक्टरेट पण घेतलं.आणि अंधेरीच्या एका शाळेत प्रवेश करून नंतर असिस्टंट प्रिन्सीपॉल होऊन रिटायर्ड झाली.एव्हडी तीच्याबद्दलची माहिती मला होतीच.पण काल मी आणि माझा पुतण्या त्याच्याच गाडीतून लोखंडवाला कॉम्पलेक्समधे त्याच्याच घरी जाण्याच्या वाटेवर असताना धाके कॉलनी जवळ सुधाला रस्त्यावरून आमच्या उलट्या दिशेने जाताना त्यांने पाहिलं.गाडी बाजूला पार्क करून मला म्हणाला,
“सुधाबाईंची जरा दखल घेऊन येतो.खूप दिवसानी मला त्या दिसल्या आहेत.”

मला माहित नव्ह्तं की सुधा माझ्या पुतण्याला पण शिकवत होती. मी गाडीत बसलो आहे ते त्याने सुधाला सांगीतल्यावर ती त्या गाडीपर्यंत आली.आणि आपल्या घरी यायचा मला आग्रह करू लागली. जवळच्याच बिल्डींगमधे तीचं घर होतं.मला पण कुणाचं मन  मोडायला आवडत नसल्याने,
“पुन्हा कधीतरी नक्कीच येईन”
असं म्हणायला जरा माझ्या जीवावर आलं.आणि सुधाचा आग्रहही मनस्वी होता.त्या बिल्डींगला पाचच मजले होते. बिल्डींगच्या पाचव्या मजल्यापर्यंत चढत गेलो. बिल्डींगला पाच पेक्षा जास्त मजले असल्यास कायद्याने लिफ्टची जरूरी लागते असं असल्याने ह्या बिल्डींगवर पाचव्या मजल्यापर्यंत  चढत जाणं भाग होतं.मी वरपर्यंत एका दमात मजले चढून गेल्याचं पाहून सुधा जरा खजील झाली.
“तुम्ही तिकडे हायकींग वगैरे करता त्यामुळे इथे हे मजले चढणं तुम्हाला सोपं गेलं असेल”
असं म्हणून सुधाने मला थॅन्क्स वजा शाबासकी दिली.

तिच्या पाचव्या मजल्यावर हवा मस्त येत होती.जुहूच्या समुद्रावरून सुटलेले गार वारे आणि तिच्या फ्लॅटमधे असलेल्या क्रॉस व्हेन्टीलेशनमुळे चौपाटीवर बसल्याची मजा येत होती.
“पाचव्या मजल्यावर यायचे कष्ट पडले तरी एकदा आल्यावर हे हवेचं सुख सर्व क्षीण घालवून टाकतं.”
असं म्हणून मी सुधाला तीने म्हटलेल्या थॅन्क्सचे प्रत्युत्तर म्हणून,
“नो, इट्स माय प्लेझर ”
असं म्हटल्यासाखंच केलं.
थोडा वेळ बसून झाल्यावर माझ्या पुतण्याने,
“तुम्ही गप्पा मारीत बसा.मी तास-दीडतासात तुम्हाला न्यायला येतो”
असं सांगून आम्हाला गप्पा मारण्याची संधी देऊन तो गेला.

सुधा रिटायर्ड झाल्यावर आता अंधेरीतल्या एका झोपडपट्टीत असलेल्या गरीब मुला-मुलींच्या शाळेत शिकवायला जाते.तीचा मुलगा अवी अमेरिकेला गेला आणि तिकडेच लग्न करून स्थाईक झाला. असं मला सुधा म्हणाली.सुधाचे पती चार वर्षापुर्वी हार्ट ऍटेक येऊन निर्वतले ही वाईट बातमी मला तीने सांगीतली.आता ती एकटी असल्याने सहाजीकच वेळ जावा म्हणून आणि शिकवण्याची हौस म्हणून ती त्या शाळेत जाते.
मी तीला तीच्या लहाणपणातल्या “टीचर टीचर” खेळाची आठवण करून देत म्हणालो,
“सुधा, मला वाटतं काही व्यक्ती टीचर व्यवसाय म्हणून घेतात.काही ना टीचींग करायची आवड असते.पण तू मात्र “बॉर्न टीचर” आहेस.”
तीच्या लहानपणाच्या संवयी अजून माझ्या आठवणीत आहेत हे ऐकून सुधा थोडी लाजली आणि मला म्हणाली,
“काका,त्याचं काय आहे,माणसाला आपल्या कामात स्वारस्य वाटलं पाहिजे आणि तसं वाटायला त्याचं त्या कामावर प्रेम पाहिजे.तुम्हाला कसं वाटतं?”
मी म्हणालो,
“यात काहीच वावगं नाही.पण तुझ्या शिक्षीकेच्या पेशात नासमज मुलांची जबाबदारी असल्याने त्यांना समज आणण्याच्या प्रयत्नात स्वतःला मोठ्या शिस्तीत ठेवायला मनावर दबाव आणावा लागतो.तो दबाव सकाळी उठण्यापासून ते शाळा सुटे पर्यंत असतो.”

“मी तुम्हाला माझा विचार सांगते”
असं म्हणून सुधा पुढे म्हणाली,
“मला नेहमीच वाटतं की आपलं मन सकाळीच प्रसन्न असतं.नसेल तर असलेलं बरं.जर ती प्रसन्नता सक्काळी पाच वाजता आली तर मी अंथरूणातच पडून राहण्याच्या प्रयत्नात असेन.मी एका शाळेत शिक्षीकेचं काम करते.पाचवीच्या वर्गात भाषा शकवते. आमचा दिवस सकाळी सातला चालू होऊन संध्याकाळी पाचला संपतो.सर्वच दिवशी सकाळची वेळ आरामात असते अशातला भाग नाही.आपण सूर्योदय होण्यापूर्वीच अंथरूणातून उठवले जाऊन सकाळची नित्यकर्मं करण्यात ढकले जातो.पण प्रसन्नता येते ती सहज म्हणून येत नाही ती आलीच पाहिजे म्हणून येते.”

“तू काय लहान मुलांच्या मनोभावनेचा अभ्यासच केला आहेस तेव्हा तुला समजायला सगळं सोपं जात असेल.”
असं म्हणून मी सुधाकडून आणखी काय माहिती मिळते ते बघत होतो.

मला म्हणाली,
“मी नेहमीच विचारात असते की माझ्या विद्यार्थ्यांची सकाळ कशी जात असेल.माझे विद्यार्थी/विद्यार्थीनी आणि त्यांचे आईवडील त्यांच्या मुलानी सकाळी शाळेत सात वाजता हजर रहाण्यासाठी ती नुसताच सकाळच्या झोपेचाच त्याग करतात असं नसून त्याहूनही अधीक काही करीत असावेत.

नुसतच नित्याचं काम करण्यासाठी सगळे मिळून आपण एव्हडा लांब दिवस वापरतो कां? सकाळची वेळ माझ्या विद्यार्थ्याना कठिण जात असेल तर ते माझ्या दृष्टीने ठिक आहे. त्याशिवाय शाळाही त्यांना कठिण वाटत असेल तरीही माझ्या दृष्टीने ते ठिक आहे.पण हेच जर सर्व काही असेल -म्हणजे सकाळ पासून रात्रीपर्यंतचे हे एव्हडे परिश्रम -तर मग मात्र त्यांनी अंथरूणातच असलेलं बरं.”
मी म्हणालो,
“ही मुलं आपल्याकडून प्रेमाची,सद्भाभावनेची आतुरतेने अपेक्षा करीत असतात.”
“अगदी बरोबर”
असं म्हणत सुधा म्हणाली,
“माझ्या विद्यार्थ्यांना सकाळच्या पाचच्या अंथरूणातल्या त्या प्रसन्नतेपेक्षाही खोल आणि बहुमुल्य प्रसन्नता सकाळी वाटली पाहिजे.सकाळी उठल्यावर कालच्यापेक्षा आज त्यांच्यात जरा जास्त सुधारणा झाली आहे असं त्यांना वाटलं पाहिजे.”

“त्यांची सकाळची वेळ कशी असावी,हे आपल्या हातात नसतं.कुणाचा काय प्रॉब्लेम तर कुणाचा काय? खरं ना?
एखादी सकाळीच उठून दिवसभर स्वतःशीच बडबड करायला मागत असेल,दुसरा एखादा पुस्तकातल्या धड्यातल्या प्रत्येक शब्द समजून घेण्यासाठी सकाळी धड्पडून उठत असेल”
मी सुधाला म्हणालो.

“काही मुलांचे चेहरेच सांगतात की त्यांच्यावर दिवसभरातली किती संकटे आहेत ती. मला त्यांना सल्ल्ला द्यावासा वाटतो की त्यांनी त्यांना रोज सकाळी नवीन व्यक्ती म्हणून पहावं”
हे सांगून सुधा म्हणाली,
“काका, मी तुम्हाला एका विद्यार्थीनीचं उदाहरण देऊन सांगते.
पुष्पा नावाच्या माझ्या एका विद्यार्थीनीच्या सकाळ कशा असतात ते मला माहित नाहीत.गेल्या उन्हाळ्याच्या सुट्टीत मला कळलं की ती जरा विशेष विद्यार्थीनी आहे.गेली दोन वर्षे ती पाचवीतच आहे.माझ्या वर्गात येऊन तीने मला अगदी थकवलं असं म्ह्टलं तर अ्तीशयोक्ती होणार नाही..मला आठवतं एके दिवशी सकाळी ती माझ्याकडे अगदी फुरगंटतच आली.
सकाळी तीच्या मैत्रीणी बरोबर तीचा काहीतरी वाद झाला. सर्व दिवसच फुकट गेला असं तीला सकाळीच वाटायला लागलं.मी तीला आमच्या शिक्षकांच्या खोलीत बोलावलं.थोडसं चिडचीडूनच मी तीला सांगीतलं,
“रोज सकाळी माझ्या खोलीत येऊन तू “नमस्ते टीचर” असं मला म्हणून जा.आताच इथून बाहेर जा आणि लगेच आत येऊन तसं म्हण.काही शब्द न उच्चारता ती बाहेर गेली आणि आत येताना म्हणाली “नमस्ते टीचर”.आणि गेलं वर्षेभर ती मला असं म्हणते.
तीच्या त्या रोजच्या फसव्या हंश्याने, “नमस्ते टीचर” म्हणण्याने माझी फसगत झाली असेल.पण माझी खात्री झाली झाली होती की आदल्या दिवसाचं संकटाचं ओझं उतरून रोज पुष्पा माझ्या खोलीत सकाळी येऊन कुणी तरी नवीन व्यक्ती म्हणून यायची. काराण मला वाटतं प्रसन्नतासकाळीच येते.”
मी सुधाला म्हणालो,
“आदल्या दिवशी झालेलं कठिण पांडित्य घेऊन आपण रोज सकाळी उठतो. ह्या विद्यार्थ्यांच्या जीवनात येत असलेली वास्तविकता बरेच वेळां अपरिहार्य असते असं मला वाटतं.”

“पण म्हणून त्यासाठी आपल्याला बेचैन व्ह्यायचं कारण नाही. खूश असणं,किंवा प्रसन्न असणं, म्हणजे काही मस्तीखोर असणं नव्हे,किंवा भोळसट असणं नव्हे.उलटपक्षी खूश असणं म्हणजेच उद्देशपूर्वक उन्नती करण्याच्या इराद्यात असणं.”
आपल्या कडून झालेली प्रत्येक क्रिया आणि उच्चारलेला प्रत्येक शब्द पुढे काय करू शकेल किंवा काय करणार आहे हे ज्या उमेदीतून निर्माण होणार आहे ती उमेद अगोदरच माहित असणं म्हणजेच खूश असणं म्हणजेच प्रसन्न असणं.”

असं म्हणून सुधा दरवाजा उघडायला गेली.सुधाचं हे प्रसन्नतेवरचं भाष्य ऐकत असताना दारावरची बेल वाजलेली मी ऐकलीच नाही.
माझा पुतण्या मला नेण्यासाठी आलेला पाहून एक तास केव्हा संपला आणि सुधाशी बोलण्यात वेळ केव्हा निघून गेला हे मला कळलंच नाही.
ऊठता उठता मी सुधाला म्हणालो,
“तू खाली गाडी जवळ मला बोलवायला आली होतीस तेव्हा माझ्या मनात तुला सांगायचं आलं होतं की पुन्हा केव्हा तरी भेटूया.पण तसं मी तुला सांगीतलं नाही ते मी माझ्या मनातच ठेवलं.तुझ्याकडून एव्हडं ऐकल्यावर खूपच बरं वाटलं.पण आता जाता जाता मला तुला नक्कीच सांगावसं वाटतं
“पुन्हा कधी तरी नक्कीच भेटूंया”
असं म्हणून आम्ही-मी आणि माझा पुतण्या- पाच मजले भरकन खाली उतरत गेलो.

श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

Advertisements

टिप्पणी नोंदवा

Required fields are marked *

*
*

%d bloggers like this: