पहिल्या नजरेतलं प्रेम.

“ज्यामुळे क्षणार्धात कुणाच्या तरी आपण प्रेमात पडावं,एखाद्याला ओळखत नसतानाही त्याच्या जवळ आपलं मन उघडं करून टा्कावं, आणि आपली मनोभावना पाहून त्याने ती स्विकारावी वा स्विकारू नये,आपल्यात अश्या प्रकारची क्षमता असणं,त्या क्षमतेला काय म्हणावं.?”

सुशा,उषा आणि निशा अशा ह्या तीन बहिणी.प्रत्येकाची वागण्याची तर्‍हा आणि विचार निरनीराळे.सुशा योग्य वयात लग्न करून संसाराला लागली.
आपल्या संसारात ती सूखी होती.उषा तशी दिसायला चांगली.बॉलीवूडमधे कोरसमधे मिळणार्‍या कामात समाधान असायची. एखाद्या सिनेमात हिरॉईनकडे जादा एक्सपोझर मिळाला तर तीला धन्य वाटायचं.कदाचीत मागे पुढे हिरोईनचा लागला लग्गा तर लागला अशा प्रयत्नात असायची.आता आता तीला टी.व्ही.सीरियलमधे थोडी कामं मिळायला लागल्याने चेहर्‍याला जरा एक्सपोझर जास्त मिळतो म्हणून समाधान होती. तीचं टी.व्ही.वरच्या एका कॅमेरामन बरोबर लग्न ठरलंय म्हणून मागे एकदा मला निशा भेटली होती तेव्हा तीने मला सांगीतलं होतं ते आठवलं.

निशा पण उषापेक्षा दिसायला एक पायरी उत्तम वाटायची.पण निशाचं फॅड म्हणजे तीला लग्न करायचंच नव्हतं.लग्न करून आपलं स्वातंत्र्य हिरावून बसतो असा तीचा समज होता.निशाला मागण्या बर्‍याच यायच्या.आता पर्यंत किती मुलगे सांगून आले त्याचा ती गणती ठेवायची.
मी तीला एकदा न-विचारलेला उपदेश दिला-म्हणजे ज्याला अनसॉलिसीटेड ऍडव्हाईझ म्हणतात-तो उपदेश दिला.
मी निशाला म्हणालो होतो,
“तरूण वयात काही व्यक्तींची जरा हटकून मतं असतात.जसं लग्न न करण्याच्या तुझ्या मता सारखं.अर्थात हा प्रत्येक व्यक्तीचा खासगी प्रश्न असतो यात वाद नाही.पण वडीलधार्‍या मंडळीच्या अनुभवावरून म्हण किंवा आणखी काही म्हण,वय निघून गेल्यावर मग लग्न होणं जरा कठीण होतं आणि लग्न वेळेवर न केल्याने त्यातून येणार्‍या काही समस्यांना तोंड द्यावं लागतं.आणि विशेष करून आपल्या समाजात स्त्रीवर्गाला तो दाह जास्त सहन करावा लागतो.तू बहूश्रूत आहेस तुला,
“जास्त सांगणे न लगे.””

त्यावेळी मला निशा म्हणाल्याचं आठवतं,
“काका,मी तुमच्या मताशी सहमत आहे.पण आता परिस्थिती बदलली आहे.स्त्रीया सुशिक्षीत झाल्या आहेत. आपल्या पायावर उभ्या राहू शकतात.
स्वतःची देखभाल स्वतः करू शकतात.लग्न झाल्यावर,मग मुलं होणं ओघाने आलं.त्या मुलांचं संगोपन.त्यांच्या जबाबदार्‍या.अर्ध आयुष्य त्यात निघून जातं.तुम्ही म्हणाल त्यातच मजा असते,तेच तर जीवन असतं वगैरे वगैरे.पण खरं सांगू मला त्यात स्वारस्य नाही.”

निशाच्या बोलण्याचा कल पाहून माझं बोलणं आवरतं घेत मी तीला एव्हडंच म्हणालो होतो,
“पसंत अपनी अपनी और ख्याल अपना अपना.”
पण निशा, ह्या वयात कधी कधी,
“पहिल्या नजरेतलं प्रेम होतं.”
आणि मग,
“आपल्यात अश्या प्रकारची क्षमता असणं, की ज्यामुळे क्षणार्धात कुणाच्या तरी आपण प्रेमात पडावं,एखाद्याला ओळखत नसतानाही त्याच्या जवळ आपलं मन उघडं करून टा्कावं,आणि आपली मनोभावना पाहून त्याने ती स्विकारावी वा स्विकारू नये,आपल्यात अश्या प्रकारची क्षमता असणं, त्या क्षमतेला काय म्हणावं?.
पहिल्या नजरा-नजरेतल्या प्रेमाबद्दल जरा उपहास केला जातो.आणि नंतर सुखी संसार करणारी जोडपी अगदी हंसून सांगायला धजतात की ते आमचं
“पहिल्या नजरेतलं प्रेम होतं.”

पण खरं सांगायचं तर निशाच्या मनात जे विचार आले ते विचार त्यावेळी माझ्या मनात नव्हते.जीवनाच्या नंतर नंतरच्या टप्प्यात एक वेळ अशी येते की कुणी तरी आपल्याबरोबर असावं ज्याला हिंदीत “हमसफर” म्हणतात,तसं वाटायला लागतं.अशावेळी एखादीचा नवरा किंवा एखाद्याची बायको “हमसफर” असते.ते नाही झालं तर आपलीच मुलं बरोबर असूं शकतात किंवा नातवंड बरोबर असूं शकतात.म्हणूनच लग्न करणं हे अनेक कारणामधे हे एक कारण असू शकतं. आणि म्हणूनच हा सगळा व्याप पुढच्या दृष्टीने फायद्याचा असतो. आता हे सगळ्यांच्या बाबतीत खरं होईल असं नाही.पण त्या आशेवर माणूस जगतो.

हे सगळं सांगण्याचं कारण,ह्यावेळी खूप वर्षानी मी निशाला तिच्या घरी भेटायला गेलो होतो.त्यावेळी मला जरा धक्काच बसला.निशा त्याच घरात रहाते जिथे तीचे आईवडील राहायचे ते मला माहित होतं.कारण आपल्या मुलीने -निशाने-लग्न केलेलं नाही तेव्हा पुढे मागे त्यांच्या पश्चात त्यांच्या जागेत तीने रहावं अशी त्या दोघांची इच्छा होती तसं एकदा मला दोघानीही बोलून दाखवलं होतं.
ह्यावेळी मी तीच्या दरवाज्याची बेल दाबली त्यावेळी एका दहा-बारा वर्षाच्या मुलीने दरवाजा उघडला.सूदर हंसली.आणि का कुणास ठाऊक,
“कोण हवंय तुम्हाला?”
असा प्रश्न मला विचारण्या ऐवजी,
“आई कुणीतरी तुला भेटायला आलंय.”
असं मोठ्याने ओरडून सांगून,
“मी जाते गं!.रात्री उशीर होईल.”
असं म्हणून दरवाज्यात माझ्या मागे दोन तीच्याच वयाच्या मुली उभ्या होत्या त्यांच्याबरोबर ती गेली.
“माधुरी,कोण गं आलंय?”
असा प्रश्न करीत ते पहाण्यासाठी निशा दरवाज्याजवळ आली तेव्हा मला ओळखायला तीला वेळ लागला नाही.आत शिरता शिरताच मी तीला प्रश्न केला,
“आई! म्हणून तुला हांक मारली त्या मुलीने,तुझं लग्न केव्हा झालं?,तू तर लग्न करण्याच्या विरोधात होतीस.मग विचार कसा बदललास? आणि तुझी मुलगी हंसली तेव्हा मला माधुरी दिक्षीत सारखीच हंसताना भासली.”
गप्प सगळं ऐकून घेत निशाने मला हाताने खूणावीत बसायला सांगीतलं.आणि म्हणाली,
“हे सर्व प्रश्न तुमच्याकडून मला अपेक्षीत होते.आणि बर्‍याच वर्षापूर्वीचं तुमचं आणि माझं ह्या लग्नाच्या विषयावर बोलणं झालं होतं त्याची आठवूण येऊन ते दिवस आठवले.”
खरं सांगू का त्यावेळी तुम्ही म्हणालेल्या ह्या पहिल्या नजरेतल्या प्रेमावर माझा नंतर विश्वास बसला.मला वाटायचं की मी नुकत्याच भेटलेल्या कुणालाही माझं सर्वस्व द्यायला प्रवृत्त व्हावं.मला वाटतं हे प्रेम वास्तवीक प्रेम असतं.असल्याच प्रकारच्या प्रेमाने त्यावेळी माझ्या जीवनात चांगला बदल आणला.”
माझं कुतूहल वाढवीत निशा कोड्यात बोलत होती.

“काही वर्षापूर्वी मी एकाच्या प्रेमात पडले.
माधुरीच्या.
एका तीन वर्षाच्या मुलीच्या.
तीने केलेलं एकच स्मित-हास्य तुमच्या चेहर्‍यावर हसूं आणील असं होतं.तीच्या एका मधूर हास्याने एखाद्याचं रिक्त मन भरून येईल असं मला त्यावेळी वाटलं.
मी ज्या दिवशी माधूरीला भेटले त्यादिवशी मला आठवतं कमालीचा उष्मा होता.जवळ जवळ चाळीस डीग्री तपमान. आणि बाहेर हवा पण कमालीची चीडचीडी होती.नुकतीच मी माझ्या कामावरून घराकडे आली होती.अगदी आमच्या घराच्या पायर्‍या समोर कुरकुर आवाज करणार्‍या झोपाळ्यावर बसून एक मुलगी आपले नाजूक पाय जमीनीवरच्या मातीत खूपसून मागे पुढे झोका घेत बसली होती.संध्याकाळची वेळ असली तरी उकाडा होत होता.मी घामाघूम झाली होती. आणि जीव नकोसा झाला होता.मी त्या मुलीच्या जवळ गेली तेव्हा तीने वर पाहिलं.तीचे ते काळेभोर डोळे सूर्याच्या उन्हाकडे पाहून किलकीले झाले होते.तशातही ती माझ्याकडे बघून खुदकन हंसली.मी तीच्याजवळ त्या झोपाळ्यावर बसले आणि तीला झोका देऊ लागले.ती मला आणखी चिकटून बसली.नंतर मी तीला माझ्या मांडीवर घेतलं.झोक्याने जरा थंड हवा अंगावरून गेल्याने मला अंमळ बरं वाटलं.तीने दिलेलं ते हास्य पाहून मला तीची किंव आली.कारण ते तीचं हंसं मला उपेक्षित वाटलं.तीच्या नकळत ते उपेक्षित हंसं मला बरंच काही सागून गेलं.मी शिकले की कसं का असेना कधी कधी प्रेम आपली जागा शोधून काढतं.

मला तीच्याकडून कळलं की तीची आई वर आमच्या घरात काम करीत आहे.आमच्या कामाला येणार्‍या बाईला सहाएक मुलं असावीत.
ही सगळ्यात धाकटी असं मला कळलं.हीला मी आमच्या बाईने घरी घेऊन आलेली पुर्वा कधी पाहिली नव्हती.
अगदी गरीब कुटूंबातलं हे शेंडे फळ इतरांबरोबर जगण्याच्या प्रक्रियेत जगत होतं.एका खांद्यावर फाटलेला आणि तीच्या शरिरापेक्षा मोठा असलेला तो झगा तीच्या दुसर्‍या खांद्यावरून खाली घसरत राहायचा आणि तो ती वर करण्याच्या प्रयत्नात असायची.पण काही कारणाने ती माझ्याशी लगट करताना माझ्यावर एव्हडी विश्वासलेली दिसली की पैसा आणि उपभोग्य वस्तूंच्या गराड्यात सांपडलेलं हे जग तीच्या कडून मिळणार्‍या प्रेमाला विसरलं आहे असं मला त्यावेळी भासलं. त्यावेळी मला दिसलेल्या एका साध्या उपेक्षितेकडून मिळालेल्या त्या नाचणार्‍या प्रसन्नेतेचा नादवृंद माझ्या
शिवाय आणि कुणीही ऐकू शकलं नसेल.
पहिल्या नजरा-नजरेतल्या प्रेमावर माझा भरवंसा त्यावेळी वाढला. त्या प्रेमाबरोबरच माझा तो घामाने डबडबलेला चेहरा आणि ती तीन वर्षाची मला चिकटून बसलेली मुलगी माझ्या नजरेतून नीसटली नाही.”

“मग ही मुलगी तुझ्याकडे कशी राहायला आली.?
माझा स्वाभावीक प्रश्न होता.
निशा म्हणाली,
“थोडे दिवस मी जाऊ दिले.माधुरी तिच्या आई बरोबर वरचेवर आमच्याकडे यायची.आमचं एकमेकावरचं प्रेम लक्षात घेऊन मी तीच्या आईला सांगायचं धारीष्ट केलं.
“राहूदेत ह्या मुलीला माझ्याकडे. मी तीला वाढवीन,चांगलं शिकवीन.ती तुझीच मुलगी आहे.फक्त माझ्याकडे राहते असं समज.”
तीच्या आईला “आंधळा मागतो एक ….” असंच झालं.
सात आठ वर्षं कशी निघून गेली ते कळलंच नाही.ती शिकायला पण हुशार आहे.आता तर ती मला माझ्या मैत्रीणी सारखीच वाटते.”

हे सगळं ऐकून मी निशाला म्हणालो,
“खरंच प्रेमाला उपमा नाही.असं म्हणतात ते खोटं नाही.प्रेम आंधळं असतं हे ही चुकीचं नाही.पण प्रेमाचे अनेक प्रकार आहेत.आणि स्त्री ही खरीच प्रेमपुजारी आहे.आई,बायको,बहिण,मैत्रीण आणि अशा अनेक प्रकारची त्या पुजार्‍याची तीची रुपं आहेत.आणि त्यात श्रेष्टतम रूप म्हणजे स्त्रीचं आईचं रूप.ते अनकंडीशनल रूप आहे.निसर्गाने स्त्री-जन्म देऊन आपल्यातली कमाल दाखवली आहे.
मघाशी तुला तुझी माधुरी,
“आई कुणीतरी तुला भेटायला आलंय.”
असं म्हणून निघून गेली ते ऐकून माझा  तुझ्याबद्दलचा आदर द्विगुणीत झाला.
निशा आपल्या पदराने आपले डोळे पुसत होती.ते अश्रू होते आनंदाचे.आणि माझ्या डोळ्यातले पण.

श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

6 Comments

 1. Prasad Kanitkar
  Posted जून 3, 2011 at 4:42 सकाळी | Permalink

  Your style of writing is too goood. Subtle thoughts expressed in your articles remind me of famous marathi writer – Va Pu Kale.
  Keep writing please !

  • Posted जून 4, 2011 at 11:02 सकाळी | Permalink

   नमस्कार प्रसाद,
   आपली प्रतिक्रिया वाचून मला बरं वाटलं.व.पु.काळे यांच्या लेखनाशी माझ्या लेखनाची तुलना करून आपण मला सन्मात दिलात,यात सगळं भरून आलं.आ्पलं मत मला अमुल्य आहे.
   आपल्या प्रतिक्रियेबद्दल आभार.

 2. omshreehari
  Posted एप्रिल 30, 2013 at 4:04 सकाळी | Permalink

  mast ahe
  heart touching

 3. Posted सप्टेंबर 11, 2013 at 4:49 सकाळी | Permalink

  Nice one..every one should think like this…


टिप्पणी नोंदवा

Required fields are marked *

*
*

%d bloggers like this: