असंभव स्वपनाचं सामर्थ्य.

“मोडकळून पडलेलं वाडवडीलांनी बांधलेलं ते जूनं घर पुन्हा बांधायची स्वप्नं तुझ्या मामाला पडत होती.”

कुसुम कर्णिक मला नेहमी म्हणायची,
“काका तुम्हाला मी एक दिवस आमच्या कोकणातल्या वाड्यात घेऊन जाणार आहे.माझे मामा आणि मामी त्या वाड्यात रहातात.त्या वाड्याला इतिहास आहे.माझ्या मामीच्याच तोंडून तो ऐकायला हवा.”
आज तो दिवस उजाडला.कुसुम बरोबर मी कोकणातल्या तीच्या गावाला गेलो होतो.वेंगुर्ल्याच्या जवळ तुळस नावाचं एक गांव आहे ते गांव पार करून पुढे गेल्यावर एक छोटसं खेडं आहे.त्या खेड्यात बर्‍याच वाड्या आहेत.तीथे मी कुसुम बरोबर गेलो होतो.

कुसुमच्या मामा-मामीने आमचं यथासांग स्वागत केलं.दोन दिवसाच्या मुक्कामात मजा आली.एका रात्री कुसुमची मामी आम्हाला आठवून आठवून सर्व हकीकत सांगत होती.
कुसुम मामीला म्हणाली,
“मामाने जीद्द करून हा सुंदर वाडा बांधला.अगदी पडक्या स्थितीत त्यावेळी असला तरी तो पडका वाडा आणि मामाचे वाडवडील ह्यांच्या बद्दल त्याला मनात भावना होत्या.”

मामी म्हणाली,
“त्याचं असं झालं,एक हरवलेला फोटो गवसला.एका जुन्या पुस्तकात तो मिळाला.जूनी पुस्तकं झाडून साफ करण्याच्या माझ्या नादात तो फोटो त्या पुस्तकातून खाली पडला.त्या फोटो मधे तुझा मामा एका कोसळून पडलेल्या जुन्या औदूंबराच्या झाडाच्या बुंध्यावर बसून त्या झाडाच्याच बाजूला पडलेल्या मोठ्या फांदीला टेकलेला अशा पोझ मधे होता.त्याच्या शर्टाच्या बाह्या दोन्ही खांद्यातून खाली उतरल्या होत्या आणि त्याची एक-टक नजर नुकत्याच संपलेल्या पावसाळ्यानंतर हिरवं गार झालेलं आसमंत पहाण्यात गुंतली आहे असं दृष्य होतं.”

मी म्हणालो,
“हा इतका सुंदर फोटो कुणी काढला?”
मामी कुसुमला उद्देशून म्हणाली,
“मला आठवतं माझं नुकतच लग्न तुझ्या मामाबरोबर झालं होतं. माझ्या पूर्वी पासूनच्या आठवण ठेवण्यासारख्या दृश्यांचा फोटो घेण्याच्या उत्कंठेमुळे हा फोटो ही त्यातला एक होता. हार कधीही मानायची नाही ह्या वृत्तीच्या तुझ्या मामाच्या संवयीचा तो एक पुरावा म्हणून मी फोटो काढला होता.मला अजून आठवतं ज्यावेळी मी माझ्या कॅमेर्‍याची कळ दाबली त्यावेळी माझ्या मनात तुझा मामा आणि त्याची असंभव स्वप्नं मला आठव्ण करून देत होती. अनेपेक्षीतपणे आलेल्या वादळात हे दोनशे वर्षापूरवीचं औदुंबराचं झाड वार्‍यापावसाला टक्कर देत देत बिचारं कोसळून खाली पडलं होतं. जीवंत रहाण्याची त्या झाडाची खोल गेलेल्या मुळांवरची पकड ढिली झाली होती.”

कुसुमने मामीला विचारलं,
“तू असंभव स्वप्नं का म्हणतेस?”
“असंभव स्वप्नं मी एवढ्यासाठीच म्हणते कारण हे औदुबराचं झाड ज्या आवारात होतं तो सर्व परिसर आमच्या घराण्यातल्या जुन्या वाड्याचा एक भाग होता.मोडकळून पडलेलं वाडवडीलांनी बांधलेलं ते जूनं घर पुन्हा बांधायची स्वप्नं तुझ्या मामाला पडत होती.ह्या घराच्या चिरेबंदी भिंतींचा आधार घेऊन तात्पुरत्या बांधलेल्या घरात गेली कित्येक वर्षं आमचेच काही जवळचे वारसदार रहात होते.जूने कागद पत्र शोधत असताना तुझ्या मामाला आणि मला जूने फोटे पाहायला मिळाले.त्या फोटोत हे त्यावेळचं भक्कम घर आणि घराच्या मागे बांधलेला मांगर दिसत होता.”
मामीने आपला विचार सांगीतला.

ती पुढे म्हणाली,
“एका फोटोत तुझ्या मामाचे पुर्वज-बायका, पुरूष आणि मुलं-दिसत होती.मुलं मोठ्यांच्या पायाजवळ बसलेली होती.मोठी माणसं नक्षीदार लाकडी खुर्च्यांवर विराजमान झालेली दिसत होती.एका फोटोत नोकरांसाठी बांधलेला मांगर आणि त्या मांगराच्या बाजूला गाई म्हशींचा विस्तारलेला गोठा दिसत होता.
मोठ्या मंडळीत वयस्कर लोक फेटा किंवा पगडी डोक्यावर घेऊन अंगात लांब मोठ्या बटणांचा कोट आणि त्यावर उपरणं घेतलेली दिसत होती. साधारण तरूण मंडळी काळ्या टोप्या,कोट आणि पाटलोण नेसलेली दिसत होती.बायका नऊवारी साड्या, लांब हाताचे ब्लाऊझ नेसून,त्यांचे पाय अनवहाणी होते.खाली बसलेली मुलं अर्ध्या पाटलोणी वर तोटका कोट आणि डोक्यात जरीच्या टोप्या घातलेली दिसत होती.बोडकं डोकं कुणाचही नव्हतं.फोटोत बोडकं दिसणं अशूभ असावं.
हा फोटो घराच्या समोरच्या अंगणात बसून घेतलेला असावा.घराच्या भिंती चिरेबंदी असल्या तरी त्याला सफेद चून्याचा रंग दिला होता.
अगदी अलीकडच्या फोटोत एक माणूस कच्च्या सिमेंटचा गिलावा केलेल्या भिंती समोर उभा राहिलेला दिसत होता. आमचे शेजारी सांगतात की, हे सर्वांत शेवटचं कुटूंब इथे रहात होतं.”

मी म्हणालो,
“एकदा का घराच्या डागडूजीकडे दुर्लक्ष झालं की एवढ्या मोठ्या घराला कोसळून पडायला वेळ लागत नाही.”
“तुम्ही अगदी माझ्या मनातलं बोलला”
असं म्हणत मामी पुढे म्हणाली,
“त्या औदुंबराच्या झाडाप्रमाणे ह्या घरानेही धीर सोडलेला दिसत होता. घराच्या वरचं छप्पर कुठे कुठे कोसळून अर्धवट खाली सरकलं होतं. प्लास्टर दिलेल्या भिंतीना चांगल्याच भेगा आलेल्या दिसत होत्या. आणि शेवटी एकदा कधीतरी आग लागून जे काही आपल्या पायावर उभारून राहिलं होतं ते त्या आगीच्या भक्षस्थानी गेलं.आणि राहिलं ते फक्त लोखंडी कांबी आणि चिरेबंदी भिंती.”

कुसुम थोडी भावनावश होऊन मामीला म्हणाली,
“हे बघून मामा खरोखरच दुःखी झाला असेल ना?”
“तुझा मामा चेहर्‍यावर कधीच दुःख दाखवीत नाही.कारण सांगते”
मामी पुढे म्हणाली,
“हे सगळं बघून तुझा मामा मला त्यावेळी म्हणाल्याचं आठवतं,
“पाया मजबूत दिसतो.”
असं म्हणून, सिमेंटची थापी आणि घमेलं भरून सिमेंट घेऊन आणि त्याच्याबरोबर त्याची स्वप्नं घेऊन तो कामाला पण लागला होता. माझा तुझ्या मामावर विश्वास होता.त्याच्या स्वप्नावरही विश्वास होता.कारण अशी स्वप्नं करताना माझ्या वडीलाना मी जवळून पाहिलं आहे.”

“तुमचे वडील गणपतीच्या मुर्त्या बनवायचे असं मला कुसुम बरेच वेळां म्हणाल्याचं आठवतं ”
मी मामीला म्हणालो.

“माझे वडील गणपतीच्या मुर्त्या बनवायचे.त्या मुर्त्या गणपतीच्या सणात शेकडोनी विकल्या जायच्या.मी लहान होते तेव्हा त्यांच्या गणपतीच्या कारखान्यात दिवसभर असायची.कधी कधी तिकडेच झोपी जायची.ती गणपती बनवायची गणपतीची चिकण माती,मुर्ती बनत असताना चिकण मातीला गणपतीचा आकार आणताना लागणारी आयुधं,ते निरनीराळ्या रंगाचे डबे,सोनेरी वर्ख आणण्यासाठी लागणारे ब्रश ही सर्व साधनं मी मोठी होईतो पहात आली होती.माझे वडील दरवर्षी गणपतीच्या मुर्त्या तयार करण्याच्या स्वपनात असायचे मग मला पण स्वप्न काय ते कळायला कठीण
गेलं नाही.”
मामीने आपल्या जून्या आठवणी उजळण्याचा प्रयत्न केला.
यावर कुसुम मामीला म्हणाली,
“मला तुझ्याकडून हे मामाबद्दल ऐकून त्याच्या बद्दल आदर वाटतो.”

“तुझ्या मामाच्या स्वपनांना पण कळायला मला कठीण गेलं नाही.
ती सहा वर्ष चिर्‍यावर चिरा ठेवण्याचा, विटेवर विट ठेवण्याचा धीर बाळगून शेवटी आम्ही हा वाडा आम्हाला रहाण्याजोगा केला.हा वाडा आणि तुझ्या मामाची तो पुन्हा बांधण्याची स्वप्नं माझ्यात असंभव स्वपनातलं सामर्थ्य दाखवयला कारणीभूत झाली आहेत.”
असं म्हणताना मामीचे डोळे पाण्याने भरले होते.पण त्यात अभिमानाची आणि तृप्तीची चमक दिसत होती.

शेवटी मी मामाली म्हणालो,
“कुसुम इकडे येण्यासाठी माझ्या मागे का लागली होती ते आता मला कळलं.कारण ह्या वाड्याचा इतिहास तुमच्याच तोंडून ऐकण्यात जी मला मजा आली ती एरव्ही आली नसती.”

श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

Advertisements

टिप्पणी नोंदवा

Required fields are marked *

*
*

%d bloggers like this: