विजय अणावकरचा समजूतदारपणा.

“मी बरेच वेळा अपयशी ठरलो,खूप ठोकरी खाल्ल्या,पण असं होऊन सुद्धा मला वाटतं मुर्खता,क्लेश आणि दयनीयता जरी आजुबाजूला असली तरी हे जग चांगलं आहे.”

“मला नेहमी असं वाटतं की जीवनात आनंदी-आनंद अगदी साध्या साध्या गोष्टीतून मिळतो.एखादं रानटी रंगीबेरंगी फूल पहाण्यात, आवाज करीत जाणारा एखादा ओहळ पहाण्यात,नुसतं जरी कुणी सकाळी नमस्ते म्हणण्यात,एखादं सुंदर हस्त-चित्र पहाण्यात,एकांतात, एखाद्या पक्षाचं सुंदर गाणं ऐकण्यात,खूप धावून आल्यानंतर एखादं थंडगार दूधाचं ग्लास पिण्यात,आणि अशा लहानसहान किती गोष्टी सांगता येतील.
जेव्हा आमची छोटीशी मुलगी एखादं सुंदर फूल आम्हाला आणून द्यायची तेव्हा मला आणि माझ्या पत्नीला खूप उमेद यायची.किंवा आमच्या दोन्ही मुलांबरोबर जेव्हा आम्ही सूर्यास्त पहायला जायचो तेव्हा ही खूप आनंद व्हायचा.”
मला विजय अणावकर आवर्जून हे सांगत होता.

विजय मनःशांतीसाठी हे सांगत असला तरी त्याला आतून खूपच त्रास होत होता.त्याच्या मुलाच्या अपघाती निधनानंतर मी त्याला भेटत होतो. हाता-तोंडाला आलेलं मुल असं अचानक गेल्याने मुलाच्या आईवडीलांना काय होत असेल याची कल्पना फक्त ते भोगत असलेल्याच जाणवतं.
विजयचा मुलगा सोळ वर्षाचा होणार होता.आपल्या मित्राच्या स्कुटरवर मागच्या सीटवर बसला होता.एक अगदी शार्प वळण घेत असताना त्याचा तोल गेला आणि मागच्या मागे तो पडला.डोक्यावर हेल्मेट नसल्याने त्याच्या डोक्याला जबर मार बसला होता.आणि जागच्या जागीच तो गेला.
मी ज्यावेळी विजयला भेटायला गेलो होतो तेव्हा बोलायला सुरवात कशी करूं असा प्रश्न पडला होता.

मी विजयच्याच बालपणाची आठवण काढून त्याला बोलता केला.
मी त्याला म्हणालो,
“कोकणात तुझं बालपण गेलं.तू लहान असतानाच तुझे वडील गेले.आठवतात का तुला तुझे ते दिवस?”

मला विजय म्हणाला,
“अगदी लहानपणाचे दिवस जरी आठवले नाहीत तरी काही वेळा सांगून ऐकलेले आणि काही स्मरणात राहिलेले दिवस नक्कीच आठवतात.
मी तीनएक वर्षाचा असेन जेव्हा माझे बाबा मला सोडून गेले.आणि त्यांच्या जाण्यानंतर आमच्या आईने आमच्यासाठी जे कष्ट घेतले त्याला सीमाच नाही.आमचं घर साधं असायचं आणि स्वच्छ आणि आकर्षक असायचं. शाळेतून किंवा कामावरून जेव्हा आम्ही घरी यायचो तेव्हा आमची आई आमच्यासाठी सदैव असायची.खूप थकलेली किंवा खूप व्यस्त असलेली कधीही वाटायची नाही.शनिवार हा विशेष लक्षात ठेवण्यासारखा दिवस असायचा.त्यादिवशी आमच्या घरात, खाण्याची विशेष डीश असायची.मग ती झुणका-भाकरी असो,चपाती-शिखरण असो वा एखादी केळं घालून शीर्‍याची डीश असो.”

मी विजयला म्हणालो,
“मला आठवतं तुझ्या मोठ्या भावाच्या आग्रहास्तव मी कैक वेळा तुमच्याकडे जेवायला राहिलो आहे.तुझी आई आपल्या सर्वांना आग्रह करून वाढल्यानंतर आपल्याला जेवताना पाहून तुझ्या आईच्या चेहर्‍यावरची तृप्ती पाहून मला तीच्या विषयी खूप आदर वाटायचा.बरं तू काय सांगतोस ते सांग”

मला म्हणाला,
“माझा पण एखादा मित्र आमच्या बरोबर जेवायला असायाचा. त्या दिवशी आम्ही मारूतीच्या मंदीरात न चूकता जायचो.
मारूतीचं मंदीर आमच्या रहात्या घरापासून बरचसं दूर असल्याने बरीच शेतं ओलांडून जायला लागायचं.वाटेत रानटी फूलं,केवड्याची बनं दिसायची आणि वेणीचा सर करण्यासाठी ओवळीची फुलं नविसरतां वेचून घरी आणायचो.देवाला वहाण्यात किंवा बायकानी डोक्यात माळण्यात त्या वेणीच्या सरांचा चांगलाच उपयोग व्हायचा.
मी शिकत असतानाच आईला मदत होण्यासाठी काही परचूटण कामं करायचो.चांगल्या लोकांच्या सानीध्यात मला काम करायला संधी मिळायची.मला नेहमीच वाटतं की कुठचही काम करताना ते चांगल्या तर्‍हेने करण्यात खरा अर्थ आहे. मग त्या कामासाठी मिळणार्‍या मोबदल्यापेक्षा त्यासाठी घेतलेली मेहनत जास्ती का असेना.मी असंही पाहिलंय एखाद्या कामासाठी पराकाष्टा केल्यास ते जास्त सोपं जातं, आणि दुसरं म्हणजे कुठचंही कठीण काम सोडून देण्यात हाशील नाही.तसंच कुठच्याही कामाची टाळाटाळ केल्यास ते जास्तच कठीण जातं.ही सर्व शिकवण आम्हाला आमच्या आईकडून मिळाली.”

मी विजयला म्हणालो,
“आणि आता तू आणि तुझी पत्नी मिळून कामं करीत असता.किती लोकाना मदत करीत असता.मला बर्‍याच जणानी तुझ्याबद्दल असं सांगीतलं आहे.”
विजयला त्याच्या विषयी असं लोक बोलतात हे माझ्या तोंडून ऐकून खूप आनंद झालेला दिसला.
मला लागलीच म्हणाला,
“मला आणि माझ्या पत्नीला एकत्र काम करायला खूप मजा येते. आमच्या हाताने,आमच्या डोक्याने आणि आमच्या ह्रुदयापासून ही कामं होतात. सृजनशील कामाचं शांतीदायक महत्व,सत्यशोध,आणि नव्या व जून्या मित्रांकडून मिळणारी प्रेरणा हे सर्व अनमोल आहे. मला वाटतं सर्वात जास्त समाधान जीवनात मिळतं जेव्हा आपण मदतीचा हात पुढे करतो आणि तो सुद्धा त्याना जे स्वतःहून वर येण्याच्या प्रयत्नात असतात तेव्हा.माझ्या दृष्टीने जास्तीत जास्त लोक जे काही मला माहित आहेत ते दयाशील,उदार आणि सहयोगशील असतात.”

आता मात्र विजयला आपल्या मुलाबद्दल विषय काढ्ण्यापासून राहावलं नाही.कारण त्याचा मुलगापण त्याच्या कामात त्याला मदत करायचा.त्याची आठवण येऊन विजय मला म्हणाला,
“सोळावं लागण्याच्या बारा दिवस अगोदर माझा एकच एक मुलगा अपघातात निधन पावला.ह्या अपघातातून तो वाचू शकला असता.पण आमचं कमनशीब म्हणावं लागेल.माझ्या स्वपनातलं आणि माझ्या आशेतलं सर्व काही त्याच्याकडे होतं.माझं सर्व जग त्याच्या जाण्याने संपूष्टात आलं.इतरा प्रमाणे मी ही त्या अघोर धक्क्यातून जगायला शिकलो.एका वेळी एक मिनीट,एक तास,एक दिवस.त्यापूढे सांगण्यात अर्थच नाही.
ह्या अपघातानंतर मी मनात कडवटपणा ठेवला नाही.उलट माझा देवावारचा विश्वास द्वीगुणीत झाला.मी बरेच वेळा अपयशी ठरलो,खूप ठोकरी खाल्ल्या,पण असं होऊन सुद्धा मला वाटतं मुर्खता,क्लेश आणि दयनीयता जरी आजुबाजूला असली तरी हे जग चांगलं आहे.”

आलेल्या दुःखातून सावरून,समजूतदारपणा ठेवून विजय स्वतःला संभाळून घेत आहे हे पाहून माझ्या डोळ्यात पाणी आलं.मी त्याला जवळ घेत म्हणालो,
“विजय,हे ही दिवस जातील.”

श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

Advertisements

2 Comments

 1. Posted फेब्रुवारी 7, 2010 at 3:59 सकाळी | Permalink

  खरं आहे! जग हे चांगलेच आहे ! बाकी काय? तर …. इप्सित गाठ्ण्यासाठी करावी लागणारी धड्पडच ना!!..

  • Posted फेब्रुवारी 7, 2010 at 4:43 pm | Permalink

   आपल्या म्हणण्याशी मी सहमत आहे.
   आपल्या प्रतीक्रियेबद्दल आभार


टिप्पणी नोंदवा

Required fields are marked *

*
*

%d bloggers like this: