डोंबार्‍याची कसरत.

“जसं योगासनं करताना योगाला शरीराच्या केंद्र-भागातून क्षमता घ्यावी लागते,तसं जीवनातलं संतूलन संभाळताना जीवनमुल्यांतून श्रद्धेमधून आणि मुलतत्वातून क्षमता घ्यावी लागते.”

“रस्त्यावरचा डोंबारी रस्त्यावर दोन बाजूला तीरकांड ठेऊन मधे घट्ट दोरी बांधून हातात एक काठी घेऊन तोल संभाळून त्या दोरीवरून चालाण्याचा त्याचा प्रयत्न पाहून मी ते लक्षात घेऊन आयुष्यात तोल संभाळायचं शिकले.”
रेखा खानोलकर असं म्हणून,मी देत असलेल्या सर्कसबद्दलच्या माहितीशी आणि तीच्या डोक्यात असलेल्या डोंबा‍र्‍याच्या दोरीवरच्या कसरतीशी तुलना करून ती आपलं आयुष्य कसं जगली ते सांगत होती.

त्याचं असं झालं,रेखा शिक्षीकेच्या पेशातून निवृत्त होऊन आता जवळपासच्या मुलाना घरी ट्युशन देते.हे केवळ ती तीचा वेळ जाण्यासाठी करीत असते.माझी आणि रेखाची जूनी ओळख होती.
माझी बहिण मला म्हणाली,
“तुझी रेखाशी ओळख आहे.मृणालीनीला-{म्हणजे तीच्या मुलीला-)त्यांच्या घरी आणखी शिकण्यासाठी पाठवायचं माझ्या मनात आहे.पण त्या ठरावीकच संख्येत मुलाना शिकवतात.त्यांच्याकडे बॅकलॉग पण खूप आहे.तू जरा त्यांना सांगून पहाशील कां?”
मी प्रयत्न करतो असं माझ्या बहिणीला म्हणालो.

त्यासाठी एकदा वेळ काढून रेखाच्या घरी गेलो होतो.
घरी कोणच नव्हतं फक्त रेखा सोडून.
“कुठे गेली सगळी मंडळी?”
मी तीला विचारलं.रेखाचे पती आणि त्यांची नातवंड सर्व मिळून गावात आलेल्या सर्कसला गेली होती.रेखालापण त्यांच्याबरोबर जायचं होतं.पण मी तीला भेटायला येत आहे म्हणून फोन केल्याने ती माझ्यासाठी सर्कसला न जाता घरी वाट बघत थांबली होती.
“अगं,मी नंतर कधीतरी आलो असतो.तू माझ्यासाठी त्यांच्याबरोबर जायचं का रद्द केलंस?”
असं मी तीला म्हटल्यावर हंसली आणि म्हणाली,
“तुमच्याबरोबर चर्चा करण्यात आणि लहानपणाच्या गोष्टी आठवून मन रिझवण्यात मला जास्त दीलचस्पी वाटली.बरेच दिवस आपण भेटलो नव्हतो. आणि अलीकडे मला गर्दीत जायला जरा कंटाळा येतो.हे दुसरं कारण.म्हणून मी गेले नाही.”

सर्कसचा विषय निघाल्याने मी रेखाला म्हणालो,
“तुम्ही सर्व बिल्डींग मधली मुलं आमच्या मुलांसकट ग्रेट रेमन सर्कसला जायचा.तुला आठवत असेल.रेमन सर्कसचा मालक माझ्या ओळखीचा असल्याने एकदा मी तुम्हा सर्वांना प्रयोग चालू होण्यापूर्वी पडद्याच्या मागे घेऊन गेलो होतो.”
मला रेखा म्हणाली,
“नक्कीच मला आठवतं.
सर्कसमधे एखादा विदूषक सिंहाचा तोंडावळा मानेत धरून केसाची आयाळ पाठीवर पसरून सिंहाची डरकाळी देतो तो सिंह माझ्या लक्षात आहे.खर्‍या सिंहावर काबू ठेवण्यासाठी हातात चाबूक घेऊन तो चाबूक हवेत हलवून आवाज काढणारा तो रिंगमास्टर माझ्या लक्षात आहे.दोरीवर चालून दाखवण्याच्या रियाजामधे त्याला प्रथम म्हणे जमीनीवर पट्टी चिकटवून ती पट्टी दोरी समजून प्रत्येक पुढचं मागचं पाऊल त्या पट्टीवरच राहिल अशा तर्‍हेने चालण्याची कसरत करावी लागते हे त्याने सांगीतलेलं ही माझ्या लक्षात आहे.”

“नजर समोर असूदे,एका पाऊलासमोर दुसरं पाऊल पडूदे,खाली नजर न टाकता तोल संभाळ”
असं तसली कसरत करणार्‍याला सांगीतलं जायचं.”
हे त्यावेळी त्यांचा ट्रेनर सांगायचा हे ही तुला आठवत असेल.”
मी रेखाला म्हणालो.

“ही सर्कस मधली शिकवणूक माझ्या लहानपणात मी पाहिली होती.
पण हा तोल सभांळण्याचा धडा मी माझ्या आयुष्यात उपयोगात आणला.जीवनातला बराचसा काळ असाच तोल संभाळायच्या कृतीत घालवला.”
रेखा मला जरा गंभीर होऊन म्हणाली.
“शाळेतली शिक्षीका म्हणून विद्यार्थ्याबरोबर,माझ्या पतीबरोबर आणि मुलांबरोबर वेळेच्या संतुलनाची कृती करण्यात मी माझा वेळ घालवला.शाळेत विद्यार्थ्यांबरोबर वापरल्या गेलेल्या शक्तिचा तोल संभाळून घरी आल्यावर माझ्या मुलांबरोबर उरलेली शक्ति वापरली. रोज शाळेत विद्यार्थ्यांना वाचायचे धडे देण्याच्या जबाबदारीचं संतूलन राखून रोज सकाळी आलेली वर्तमान पत्रं वाचायला अवसर राखून ठेवला.रोजचा व्यायाम करण्यात,शांत झोप घेण्यात हे संतूलन उपयोगी होत होतं.

अलीकडे मला ह्या संतूलनाची जरूरी भासली की योगासने करते.”
योगासनात संतूलनाची भारी जरूरी भासते.योगामुळे मन,शरीर आणि श्वासाला मेळ आणला जातो.ह्या गोष्टी आंतरिक ध्यान ठेवण्यास नक्कीच मदत करतात.जसं योगासनं करताना योगाला शरीराच्या केंद्र-भागातून क्षमता घ्यावी लागते,तसं जीवनातलं संतूलन संभाळताना जीवनमुल्यांतून,श्रद्धेमधून आणि मुलतत्वातून क्षमता घ्यावी लागते.

तेव्हा परत सर्कशीच्या वातावरणाचा विचार केल्यास,मी जर का सिंह झाले असते तर डरकाळी कशी द्यायची शिकले असते.रिंगमास्टर असते तर चाबूक हाणायला शिकले असते.परंतु हे सर्व सर्कशीतलं वातवरण झालं असतं.पण त्या दोरीवर चालणार्‍या डोंबार्‍यासारखं नजर अगदी समोर ठेवून चालायला शिकल्याने अगदी जवळच्या क्षणांकडे जास्त केंद्रीत रहाण्यापासून टाळाटाळ करणं मला शक्य झालं.एका पाऊला पुढे दुसरं पाऊल टाकून लहान लहान पाऊलं टाकताना मोठे उद्देश साध्य करायला मला जमलं.आणि खाली नजर न टाकल्याने मी तोल संभाळू शकले.

शेवटी मी तीला गंमतीत म्हणालो,
“तुझ्या ह्या बोलण्यावरून एक मात्र मला नक्कीच माहित झालं आहे की,कधी कधी तुला, तू पन्नास फुट उंच हवेत असल्यासारखं आणि कधी कधी केवळ जमीनीवरच्या चिकटपट्टीवरून चालल्या सारखं वाटत असणार.”
माझ्या विनोदावर रेखा हंसली आणि म्हणाली,
“तुमचं माझ्याकडे काय काम आहे ते तुम्ही सांगीतलं नाही”

नंतर मृणालीनीचा विषय काढून मी माझ्या बहिणीचं तीच्याकडून काम करून घेतलं.

श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

Advertisements

टिप्पणी नोंदवा

Required fields are marked *

*
*

%d bloggers like this: