किशोर आणि प्रकाश.

“ह्या प्रकाशावर आणि त्याच्यात असलेल्या अंतीम दयाशीलतेवर- जी दयाशीलता आपणा सर्वांत चमकून दिसते- त्यावर माझा दृढविश्वास आहे.”

असं म्हणतात चूका करतो तो माणूस असतो.पण त्याचत्याच चूका करतो तो माणूस नसतो.किशोर पाटलाने जरी त्याचत्याच चूका केल्या तरी तो माणूस होता.हा अपवाद एव्ह्ड्यासाठी की त्या चूका त्याने त्याच्या किशोर वयात केल्या होत्या.त्या वयात मेंदूचा पुढचा भाग तेव्हडा विकसीत झालेला नसतो असं म्हणतात.त्यामुळे किशोर वयात निर्णय घेणं कठीण होतं.

किशोर थोडा मोठा झाल्यावर कोकणात राहायला गेला.त्याचे आईवडीलपण त्याच्याबरोबर गेले.शहरात असताना त्याचं शिक्षणाकडे विशेष लक्ष नव्हतं. वाईट मुलांची संगत लागल्याने त्याची ही परिस्थिती झाली होती.सहाजीकच त्याच्या आईवडीलाना खूप दुःख व्हायचं.मी त्यांची नेहमी समजूत घालायचो.शेवटी त्यांनी त्याला घेऊन कोकणात जाण्याचा बेत केला.मलाही त्यांचा निर्णय आवडला.
इकडच्या वाईट संगतीला खंड येईल आणि तिकडे जाऊन थोडं फार शिकून निदान उदरनिर्वाहाला लागेल असं त्याच्या आईवडीलाना वाटलं असावं. आणि हे खरं ठरलं.किशोर तीकडे अकरावी पर्यंत शिकला आणि बॅन्केकडून कर्ज घेऊन त्याने कपड्याचं दुकान काढलं.लग्न करून आता तो सुखी झाला.

मी त्याला भेटायला गेलो होतो.गप्पा करताना मी त्याला म्हणालो,
“बाबारे,विधिलिखीत आहे ते होणारच.पण तुझं चांगलं झालं हे पाहून मला खूप आनंद होतो.”
कुणाचं चूकलं,कुणाचं बरोबर होतं,कुणी त्याला त्यावेळी फसवलं,आणि कुणी त्याला मार्गदर्शन केलं त्या जून्या आठवणी काढून तो मला सांगण्याचा प्रयत्न करीत होता.कोकणात त्याचं घर डोंगराच्या पायथ्याशी पूर्व दिशेला होतं.त्यामुळे सकाळचा प्रकाश मुबलक यायचा.किशोर खरं खोटं कसं उजेडात येतं ते सांगण्याच्या प्रयत्नात असताना मला त्याच्या घरात आलेल्या त्या लख्ख प्रकाशाची आठवण येऊन मी त्याला म्हणालो,
“मला प्रकाशाबद्दल विशेष वाटतं.प्रकाशातच सत्य उघडकीला येतं. पेचदार प्रसंग आल्यास प्रकाशात ते सुटण्यात मदत होते. सत्याच्या गाभ्यावर प्रकाशाची झोत संभ्रमाच्या समुद्रात पडून मूलभूत गोष्ट पृष्टभागावर आल्याने प्रत्येकाला पूढे जायला मार्गदर्शन होतं.”
का कुणास ठाऊक काही कारणाने किशोरला माझं प्रकाशाचं उदाहरण ऐकून, सुरवातीला तो इकडे राहायला आलेला असतानाचे दिवस त्याला आठवले.

मला म्हणाला,
“पूर्वी आम्ही समुद्राजवळ डोंगराच्या पश्चिम बाजूला पायथ्याशी रहात असल्याने समुद्रावरून सतत येणार्‍या ढगांकडून वातावरण ढगाळ केलं जायचं.
त्यामुळे दिवसभर उन नसायचं आणि शेवटी सूर्य मावळतानाचं दर्शन कठीणच व्हायचं.बरेच वेळा सकाळी मला शाळेत जाताना काळोखात गेल्यासारखंच वाटायचं.मात्र आमच्या घरात नेहमीच दिवे पेटत असायचे.बाहेर थंडी असो,पाऊस असो किंवा आणखी काही असो आमच्या घरात बिनदास दिवे पेटत असल्याने घर उजळलेलं असायचं.मी माझ्या किशोर वयात आलेल्या कठीण दिवसातून वाट काढण्याच्या प्रयत्नात असताना आणि त्याचवेळी इतर सर्व आपआपल्या जीवनात स्थीरस्थावर झाले असताना माझ्या आईबाबांनी त्यांच्या असीम बुद्धिमतेमुळे आणि सहनशीलतेमुळे माझे दिवस प्रकाशात आणले.माझ्यावर त्यांचा विश्वास बसला.मला पायावर उभा होण्यासाठी माझ्या बहिणींनी मला आंजारलं, गोंजारलं,शहाणं करून त्या सावलीतून बाहेर काढून प्रकाशात आणलं.”

किशोरचे आईवडील आता हयात नाहीत.त्यांची आठवण काढून मला म्हणाला,
“प्रकाश मंदावला. जेव्हा माझे बाबा आम्हाला सोडून गेले.अनेक महिने मी अंधारात वावरत होतो.मनात कुतूहल वाटायचं की खरंच पूर्वीचं माझं जीवन मला परत मिळेल का?.माझ्या आतल्या आवाजातून मला भरवंसा दिला जायचा की, माझे बाबा माझ्याच जवळपास वावरत आहेत.
मला नेहमीच वाटतं की प्रकाश सर्वत्र आहे पण त्यातली सुंदरता नेहमीच स्पष्ट नसते.”
मी किशोरला म्हणालो,
“पण आता ह्या तुझ्या नव्या घरात मुबलक प्रकाश आहे.समोर माडाची आणि मोठ-मोठ्या वडा-पिंपळाची झाडं आहेत. बाहेरचं दृश्य खूपच सुंदर दिसतं”
“माझे आईबाबा गेल्यानंतर आमचं ते पूर्वीचं घर मला खायला यायचं.काही दिवसानी ते घर सोडून आम्ही दुसर्‍या गावात रहायला गेलो.”
किशोर सांगत होता.पुढे म्हणाला,

“आता आम्ही रहातो ते घर डोंगराच्या पायथ्याशीच आहे पण डोंगराच्या पूर्वेला आहे.इथे सूर्योदयाच्या वेळी लख्ख उन असतं.पण ह्या गावात बरीच गरीबीची काळोखी आहे. जीवनावश्यक वस्तुंची कमतरता आणि आकाशाला भिडणार्‍या किंमतीमुळे स्थाईक लोकांचे हाल बघून डोळ्यासमोर येणार्‍या ह्या काळोखीला मी तसा अपरिचीत होतो.पण त्याही परिस्थितीत इकडच्या लोकांचा प्रेमळपणा पाहून मी पूरा प्रकाशात आलो.आता इकडच्या घरात जेव्हा मी दिवा पेटवण्यासाठी रात्री स्विच दाबतो तेव्हा घरात पडलेला रात्रीचा तो विजेचा प्रकाश पाहून ह्या गावातल्या लोकांशी मला किती कृतार्थ राहिलं पाहिजे याची समझ मिळते.”

मी किशोरला म्हणालो,
“मला वाटतं प्रकाशातही सुंदरता छ्पलेली आहे.मग तो प्रकाश श्रीमंत शहरातला असो किंवा एखाद्या गरीब गावातला असो.आपण सर्व सारखेच जन्माला येतो पण आपल्याला प्रत्येक गोष्ट सारखीच हाताला लागत नाही. तुझा मुलगा पण ह्या गावात राहून इकडचे प्रेमळ संस्कार घेऊन वाढत आहे.मला वाटतं हेच संस्कार तो पुढच्या पीढीतही जाऊ देईल.”

माझं म्हणणं किशोरला खूपच आवडलेलं दिसलं.प्रकाश डोळ्यासमोर आणून आपल्या मनातलं तो भडभडून सांगायला लागला,
“मला वाटतं प्रकाश ही एक प्रेरणा आहे.जेव्हा सूर्य मावळतो तेव्हा मी रात्री पायदुमडून झोपतो आणि दुसर्‍या दिवशी येणार्‍या सूर्याची आतूरतेने वाट पहातो.आता मी पूर्वेला राहत असल्याने तो सक्काळी पूर्वेकडून उगवणारा नारींगी गोळा पहाण्याच्या मी प्रयत्नात असतो.उंच उंच माडाच्या आणि पोफळीच्या झाडाआडून उगवणारा पूर्वेचा सूर्य रमणीय दिसतो. त्या माडा-पोफळीच्या सावल्यातून वाटकाडून मी सूर्याच्या तेजाला हुंगण्याचा प्रयत्न करतो.ते तेज मला ईशारा देतं,प्रेरणा देतं,आणि उब देतं.ह्या प्रकाशावर आणि त्याच्यात असलेल्या अंतीम दयाशीलतेवर- जी दयाशीलता आपणा सर्वांत चमकून दिसते- त्यावर माझा दृढविश्वास आहे.”

त्याचत्याच चूका करूनही माणूस म्हणून रहाणारा किशोर हा एक अपवाद आहे.अपवादामुळेच नियम सिद्ध होतो असं माझ्या मनात आलं.

श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

Advertisements

टिप्पणी नोंदवा

Required fields are marked *

*
*

%d bloggers like this: