कमलचा आनंदाचा क्षण

“मला अजून माझ्या विनयचे पहाटेचे त्यावेळचे ते पाण्याने डबडलेले चमकदार डोळे आठवतात.आणि तो बहूमुल्य शब्द उच्चारतानाचा त्याचा आवाज आठवतो.अशा तर्‍हेचे क्षण माझ्या कठीण प्रसंगात मला मदत करतात.येणार्‍या उद्याकडे आशाळभूत व्हायला मदत करतात.”

ते जून महिन्याचे दिवस होते.उन्हाळा प्रचंड भासत होता.पाऊसही पडेल अशी शक्यता वाटत होती.अशावेळी आम्ही आमच्या बिल्डिंगच्या गच्चीवर जाऊन थंड हवेत गप्पा मारतो.माझी चुलत बहिण कमल कोकणातून चार दिवस माझ्याकडे राहायला आली होती.तीला भेटायला म्हणून माझी बहिण आणि माझा धाकटा भाऊ पण माझ्याकडे आले होते.जेवणं झाल्यावर आम्ही गच्चीवर गेलो.
एक विषय म्हणून प्रत्येकाने लक्षात ठेवण्यासारखा आपल्या जीवनातला एखादा आनंदाचा क्षण सांगावा असं माझा भाऊ म्हणाला.
आणि त्याची सुरवात केली ती कमलने.

“मी माझ्या मनात आलेला एक विचार सांगते.तसा ऐकायला तो काही विशेष भीषण नाही.त्यामुळे मी म्हणते, ते ऐकल्यावर तुमच्या मनात असलेले महत्वाचे विचार काही बदलणार नाहीत. फक्त एव्हडाच फरक पडेल की माझं हे ऐकून कदाचीत काही क्षण तुम्ही लक्षात आणून क्षणभर थांबून तुमच्या जीवनातल्या एखाद्या क्षणाची विशेष प्रशंसा करायला उद्युक्त व्हाल.अर्थात मला म्हणायचं आहे ते अत्यंत आनंदायी क्षणाबद्दल.”
खूप दिवसानी कमलला आम्ही भेटत असल्याने पूर्वीच्या आठवणी आणून कमल काहीतरी विशेष स्वारस्य येईल असं सांगत आहे असं समजून आम्ही ऐकायला लागलो.

“अनपेक्षीत आणि अनिमंत्रीत क्षण ज्यावेळी येतात अशा क्षणाबद्दल मी म्हणते. असे क्षण आले की बहुतेकजण त्यावर विश्वास ठेवतात,आणि अशा क्षणावर मी पण विश्वास ठेवते.
माझ्या आयुष्यातला सांगण्यासारखा क्षण म्हणजे ज्यावेळी विनय अगदी लहान असतानाचा.विनयच्यावेळी माझं पहिलं बाळंतपण होतं.तो जन्माला आला, तो तो क्षण नव्हता. कदाचीत तुमच्या सर्वांच्या मनात तसं आलं असेल.ती वेळ निराळीच होती.ती वेळ माझी परिक्षा घ्यायला आलेली वेळ होती.पांडूरंगाशी माझं नुकतच लग्न झालं होतं.”

“मी समजले.त्या दिवसात मी तुझ्याकडे राहायला आले होते. रंगाभाऊजीनी बिझीनेस काढला होता.तू पण त्यांना मदत करायचीस.”
माझी बहिण कमलला म्हणाली.

“हो,तू आली होतीस त्यावेळी नुकतीच आमची सुरवात होती.”
कमल म्हणाली.आणि पुढे सांगू लागली,
“त्यांचा नव्याने चालू केलेला धंदा त्यावेळी तसा नीटसा चालत नव्हता.त्यामुळे आमच्या डोक्यावर कर्जाच्या परत फेडीचा मोठा ताण होता.आणि हे रोजचच झालं होतं.
एक दिवस मात्र अतीच झालं..बॅन्केने आम्हाला परत फेडीचा अंतीम दिवस दिला होता.मोठं कठीण झालं होतं.त्या रात्री मला आठवतं मी गणपतीची प्रार्थना केली,मुसमुसून रडले आणि बिछान्यावर तशीच पडले.झोप केव्हा आली ते कळलंच नाही.काही अवधी गेला असेल, विनय त्यावेळी नऊ महिन्याचा असावा. काळोखात विनयचं रडणं ऐकून जाग आली. उठायला जीवावर येत होतं.मी माझे डोळे घट्ट मिटले पांघरूणात गुरफटून घेतलं आणि मनात म्हणाले
“रडूदेत हवा तेव्हडा.”

चर्चेचा विषय आनंदी क्षणाचा आहे हे लक्षात घेऊन मी मधेच अडवीत कमलला म्हणालो,
“आपण आनंदायी क्षणाबद्दल चर्चा करणार आहोत.हे तुझ्या लक्षात आहे ना?”

माझ्याकडे बघून हंसत हंसत कमल म्हणाली,
“हो,माझ्या चांगलंच लक्षात आहे.दुःख आणि आनंद एकमेकाशी पाठशिवण खेळत असतात.”
माझं कुतूहल वाढवीत कमल पुढे सांगू लागली,
“थोडावेळ गेल्यानंतर जसा मी त्याचा विषाद्पूर्ण रडण्याचा आवाज ऐकत राहिले,तसं माझ्या नैराश्याचे पडसाद त्याच्या रडण्यात मला दिसायला लागले.माझ्या यातना खूपच तीव्र झाल्या आणि मी त्याला त्याच्या पाळण्यातून बाहेर काढण्यासाठी उठले.”

“म्हणजे त्याला रागाने चापटी वगैर मारलीस नाही ना?”
माझा धाकटा भाऊ आता माझ्यापेक्षा चिंताग्रस्त होऊन तीला म्हणाला.

“मी त्याला अंगावर घेऊन खोलीत फिरत राहिले.त्याच्यासाठी गाणं म्हटलं,त्याला पाळण्यात घालून झोके देऊन पाहिलं,त्याच्या कानाजवळ हळू गुणगुणून पाहिलं पण काही उपयोग होईना.एका क्षणाला मला वाटू लागलं की त्याला गप्प करण्याचा काहीच उपाय दिसत नाही.बाहेर पहाट झाल्याचं लक्षण दिसायला लागल्यावर मी अगदी हताश झाले. त्याला मांडीवर घेऊन आराम खूर्चीवर मी अगदी निपचीत बसून राहिले.त्याला मी माझ्या छाती जवळ घेऊन थोपटूं लागले.जरा शांत झाल्यासारखा भासला पण झोपत नव्हता.वळून माझ्याकडे बघू लागला.रडून,रडून काहिश्या सुजलेल्या डोळ्याने माझ्याकडे टवकारून बघत होता.आणि पहिल्याच वेळी मला
“आई” म्हणाला.”
हे ऐकून कमल बरोबर आमच्याही डोळ्यात पाणी आलं.

“त्या क्षणाचा मला झालेला आनंद जणू एखादा तीक्ष्ण तीर माझ्या काळजात घुसल्यासारखा वाटला.त्याचा चेहरा माझ्या त्या क्षणाच्या आनंदाची साक्ष देत होता.माझ्या जीवनात आलेली निराशा मला त्याक्षणी खास वाटत नव्हती.त्या एकाच क्षणाला माझं जीवन मला परिपूर्ण वाटलं.त्या क्षणाला माझ्या मनात आनंदाशिवाय काहीही नव्हतं.निष्कपटतेचा तो क्षण मला खास वाटत होता.कदाचीत इतराना त्या क्षणाचं महत्व नसावं,पण मला होतं.”
डोळे पुसत आम्हाला कमल सांगत होती.

मी कमलचा हात माझ्या हातात घेत तीला बरं वाटावं म्हणून म्हणालो,
“तो तुझ्या श्रद्धेचा आणि आत्मबळाचा क्षण होता.तुझ्या नैराश्येमधे तुला आशा दिसायला लागली असावी.आणि भविष्यातल्या संभाव्य समस्या साध्या वाटू लागल्या असाव्यात.”

“हो अगदी बरोबर”
असं म्हणत कमल म्हणाली,
“तो क्षण माझ्या स्मृतिमधे एक चमकता तारा बनून रहिला आणि माझ्या कठीण प्रसंगात मार्गदर्शक ठरला.असे क्षण जगण्यासाठीच जीवन आहे असं वाटायला लागलं.”

हे ऐकून माझी बहिण कमलला म्हणाली,
“ह्या घटनेतून मला दिसून आलं की,खरोखरंच आनंदाचे क्षण आयुष्यात येतात.समयातले ते क्षण एक स्थिर-चित्रासारखे असून त्यातला एकूण एक तपशील जसाच्या तसा असतो.तुझ्या एकूण वर्णनावरून दिसलं”

कमल म्हणाली,
“मला अजून माझ्या विनयचे पहाटेचे त्यावेळचे ते पाण्याने डबडलेले चमकदार डोळे आठवतात.आणि तो बहूमुल्य शब्द उच्चारतानाचा त्याचा आवाज आठवतो.अशा तर्‍हेचे क्षण माझ्या कठीण प्रसंगात मला मदत करतात.येणार्‍या उद्याकडे आशाळभूत व्हायला मदत करतात.”

“कुणास ठाऊक कदाचीत आणखी एखादा असाच क्षण आसपास आलाही असेल.”
असं म्हणत माझा धाकटा भाऊ आपली गोष्ट सांगायला सुरवात करणार एव्ह्ड्यात जोराचा वारा आला.पाऊस नक्कीच पडणार असं वाटल्यामुळे आम्ही गच्चीतून उतरून घरात आलो.

श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

Advertisements

2 Comments

 1. हेमंत आठल्ये
  Posted फेब्रुवारी 26, 2010 at 1:39 pm | Permalink

  मराठी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !!!

  • Posted फेब्रुवारी 26, 2010 at 6:03 pm | Permalink

   नमस्कार हेमंत,
   मराठी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा बद्दल आभार.आपल्याला पण आमच्याकडून.


टिप्पणी नोंदवा

Required fields are marked *

*
*

%d bloggers like this: