सुरेश कामताची प्रवृत्ति.

“जीवनात आपल्याला सुख मिळायला सर्वात मोठा वाटा आपल्या प्रवृत्तिचा असतो. आलेल्या परिस्थितिचा नसतो.”

ह्यावेळी सुरेश कामतची आणि माझी गोव्याच्या एका होटेलमधे पुन्हा एकदा भेट झाली.ह्यावेळी आम्ही दोघे भेटलो तेव्हा पण गोव्यात पावसाचे दिवस होते.मला पहिल्यापासून कोकणातल्या पावसाळातल्या दिवसात कोकणात वेळ घालवायला खूप आवडतं.सुरेशचं पण तसंच आहे.तो पूर्वीपासून पावसाळयाच्या दिवसात गोव्याला पंधराएक दिवसाच्या सुट्टीवर येतो. त्याला गोव्याची काजूपासून केलेली फेणी फार आवडते.रशीयन लोकाना व्होडका आवडते तशीच गोव्याच्या लोकांना फेणी आवडते.गोव्याच्या बिचच्या जवळ एखाद्या होटेलात समुद्र दिसेल अशी रूम घेऊन तासन तास खिडकीत
बसून फेणीची चव घेत तो दिवस घालवतो.समुद्रात अशा दिवसात तुफानाचं वातावरण असतं.कधी हवा आणि पावसाच्या पाण्याचा एव्हडा कहर होतो की खिडकीतून समुद्राकडे पाहिल्यावर समुद्र दिसतच नाही.

अशावेळेला काही कोळी एकट्याला झेपेल असं जाळं आणून किनार्‍यावर पाण्यात ते जाळं पसरून लाटेच्या प्रवाहाच्या जोराबरोबर एकटा दुकटा मोठा मासा वाहून आल्यास जाळ्यांत पकडण्याच्या अपेक्षेत असतो.आणि अशा प्रकारच्या बिचवरच्या वातावरणात बिनदास मजा पाहायला येणार्‍यांची
“जाळ्यात काय गावलं काय? ”
हे पहाण्यासाठी कुतूहलता शिगेला पोहचलेली असते.आणि माझ्यासारखा एखादा लागेल ती किंमत देऊन तो मासा विकत घेण्याच्या मनस्थितित असतो.एव्हड्या ताज्या माशाची तीख्खट आमटी किंवा आंबट-तीख्खट तीखलं “दोम्पारच्या जेवणात” मिळाल्यास काय विचारता? आणि सुरेश कामाता सारख्या मुळ गोव्यातल्या माणसाला ह्या जेवणा बरोबर फेणीची संगत “लय भारी” वाटली तर नवल कसलं?

ह्यावेळेला सुरेश एकटाच आला होता.त्याच्या पत्नीबरोबर तो बरेच वेळा आलेला आहे.कधी कधी त्याचा मोठा मुलगा त्याला कंपनी देतो.सुरेशचे मुंबईत दोन पेट्रोल पंप आहेत.पावसाळ्यात मुंबईत पेट्रोलचा खप जरा कमीच असतो.त्यामुळे पंधरा दिवस गोव्यात घालवायला त्याला उसंत मिळते असं मला त्याने पूर्वी सांगीतलं होतं.त्यामुळे सुरेशची भेट मला अपेक्षीत होती.होटेलच्या रजीस्टरमधे माझ्या नावासमोर सही करताना मी सुरेश कामत हे नाव वाचलं.होटेलच्या काऊंटरवरच मी एक फेणीची बाटली विकत घेतली.मी सुरेशला भेटल्याबरोबर ती फेणीची बाटली त्याच्या हातात प्रेझेंट म्हणून दिली.

“आज एक दिवस तू माझ्या खोलीत बस.आपण गप्पा मारूया.मला माहित आहे तू काही “घुटूं” घेत नाहीस.पण तुला जुन्या गोष्टी काढून तासनतास गप्पा मारायला आवडतात.आज पाऊस खूपच पडत आहे.नाहीतरी तू बिचवर फिरायला जाऊ शकणार नाहीस.”
असं म्हणून सुरेशने माझ्यासाठी वेलची घातलेली पाणीकम दुधाची कॉफी आर्डर केली.
“तुला त्या दुधाऐवजी कडक काळ्या स्ट्रॉन्ग कॉफीत दिलचस्पी नाही हे मला ठाऊक आहे.”
असं वर मला म्हणाला.
“कळलं,कळलं हे तू बोलत नाहीस फेणी बोलतेय.”
असं माझ्याकडून बोलून झाल्यावर आम्ही दोघे मनमुराद हंसलो.

फार पूर्वी एकदा सुरेश आणि त्याचा मुलगा असाच गोव्याला पावसाच्या दिवसात गेला होता.आणि गोव्याहून परत आल्यावर पेट्रोलपंपावर ठेवलेल्या त्याच्या गाडीची मागची काच आणि दरवाजाच्या काचा फुटलेल्या अशा स्थितित मी त्याची गाडी पाहिली होती.त्या ट्रिपमधे काहीतरी हातसा झाला होता.त्याची आठवण येऊन मी त्याला म्हणालो,
“आठवतं का तुला तो आंबाघाटातला प्रसंग.ते पावसाचे दिवस,आणि तुझी झालेली चोरी”

“एरव्ही आठवलं नसतं पण तू याद दिल्याने आणि आता पडतोय तो पाऊस बघून त्या प्रसंगाची आठवण यायला वेळ लागणार नाही.”
असं म्हणत सुरेश मला म्हणाला,
“मी आणि माझ्या मुलाने भर पावसाळ्यात आमची गाडी काढून मुंबई ते गोवा चार दिवसाचा प्रवास करायच्या आमच्या विक्षिप्त निर्णयानंतर, नशिबाबद्दलचा विषय पहिल्यांदा आमच्या दोघात निघाला.गोव्याला ऐन पावसात पंधराएक दिवस राहून तिकडच्या बिचवरची मजा लुटायची,पावसात मासे पकडायला समुद्रात पडाव जात नसल्याने खाडीतले मासे गुंजूले,सूळे,शेतकं,बुरयाटे असल्या मास्यांवार ताव मारायचा, भर पावसात सावंताच्या हाटलात जाऊन कांद्याची भजी आणि दुध-कम-पाणी असलेला चहा मारायचा,शांतादूर्गा,मंगेशीच्या मंदिरात जाऊन किर्तनात भागघ्यायचा,ह्यासारख्या
मजा करायचं ठरवलं होतं.”

हल्ली तरी हवामान खात्याचा अंदाज बराचसा बरोबर येतो.त्या दिवसात हवामान खात्याच्या अंदाज एक असायचा आणि प्रत्यक्ष घडायचं ते अगदी उलटं असायचं.त्या दिवसात शेतकर्‍याचं भाकित खरं ठरायचं.ते कसं? असं विचारल्यावर कोकणातला कुठचाही शेतकरी सांगायचा,
“सोपं आहे,आम्ही हवामान खात्याचा अंदाज ऐकून ते सांगतील त्याच्या विरूद्ध भाकित करायचो.भाताच्या लावणीला प्रारंभ करू नका पाऊस उशीरा पडणार आहे असं हवामान खात्याने फरमान काढल्यावर आम्ही लावणीच्या तयारीला लागायचोच.”

हे सर्व माहित असल्याने, आम्ही दोघांनी हवामान खात्याचा अंदाज,
“दोन चार दिवसात कोकणात आणि गोव्या परिसरात जोरदार पावसाच्या सरी कोसळणार आहेत तेव्हा प्रवास जपून करावा”
असं लिहीलेलं पेपरात वाचून निदान प्रवासात पावसाचा त्रास होणार नाही असा अंदाज केला होता.कारण तो हवामान खात्याचा अंदाज होता ना! मग शेतकर्‍यांच्या म्हणण्याप्रमाणे उलटं होणारच.
पण गंमत म्हणजे उलट्याचं उलटं झालं. ह्यावेळी हवामान खात्याचा अंदाज खरा ठरला आणि ऐन प्रवासात आम्हाला कोकणातल्या पावसाला सामोरं जावं लागलं.
कोल्हापूर सोडल्यानंतर आंबाघाटात जी पावसाला सुरवात झाली ती घाट उतरून गेल्यानंतरही पाऊस थांबेना.पुढे गेल्यावर एका गावाच्या बाहेर गाडी रस्त्यावर ठेऊन काचा वगैरे लाऊन बंद करून एका छोट्याश्या होटेलमधे रात्र काढायची ठरवलं.बाहेरून कुणी संगीतकार मंडळी त्या होटेलात रहायला आली होती.
आणि त्यांचा संगीताचा प्रोग्राम होता.त्यामुळे आमची ती रात्र मजेत गेली.पण दिवस उजाडला तरी पाऊस काही थांबेना. सुट्टीतले दिवस फुकट जाऊ नयेत म्हणून सकाळी उठून आम्ही पुढच्या प्रवासाला निघायचं ठरवलं.
गाडीजवळ येऊन पहातो तर दरवाजाच्या काचा फुटलेल्या दिसल्या.धो,धो पडणार्‍या त्या पावसात जेमतेम छत्रीचा आधार घेत निरीक्षण करताताना लक्षात आलं की आमची कपड्याची सुटकेस चोरीला गेली होती.जरा आणखी विचार केल्यावर आमच्या लक्षात आलं की आम्ही तसे नशीबवान होतो.गाडीत असतानाच जर का चोरट्यांनी गाडी थांबवून आम्हाला लुटायचं ठरवलं असतं तर कदाचीत आमच्या प्राणावर बेतलं असतं.आम्ही आपआपसात विनोद करीत होतो की आमच्या पाचदाहा जुन्या वापरलेल्या कपड्यासाठी चोरानी जेलमधे जाण्याचा धोका पत्करलेला दिसतोय.
अर्थात आमच्या ह्या घटनेत काही तरी उपयोगातल्या वस्तूंची चोरी झाल्याचं उदाहरण होतं.नशीबाबद्दलचा प्रश्न जास्त किचकट होतो जेव्हा जनन-मरणाचा सवाल येतो तेव्हा.”
सुरेशचा हा नशीबाबद्दलचा तर्कवितर्क ऐकून मला माझ्या वहिनीच्या आजाराची आठवण आली,मी सुरेशला म्हणालो,

“मग मी काय म्हणतो ते ऐक,नित्याची गोष्ट म्हणून माझी वहिनी वार्षीक हेल्थ-चेकअपसाठी डॉक्टरांकडे गेली होती. ब्लडप्रेशर,वजन,आणि ब्लडशूगरची चांचणी केल्यावर लक्षात आलं की तीचं कलेस्टरॉल वाढलेलं आहे.आणि तीला ऍन्जियोप्लास्टी करावी लागेल.हृदयालाच रक्ताचा पुरवठा करणार्‍या नळ्यांमधे चरबी जमल्याने चोंदलेल्या नळ्यातून रक्तपुढे जायला रुकावट आली होती.ती दूर करण्यासाठी ऍन्जियोप्लास्टी करावी लागते.काही लोकांचं म्हणणं की माझी बहिण तशी नशीबवान समजली पाहिजे.तीचा “तारणारा” तीच्या पाठीशी होता.सर्व साधारणपणे आजारी पडल्याशिवाय लोकं डॉक्टरकडे जात नाहीत असं असताना माझी बहिण वार्षीक हेल्थ-चेक करायच्या फंदात पडली म्हणून ती नशीबवान समजली पाहिजे.
पण माझी बहिण नशीबवान होती असं मानलं तर जेव्हा चरबी तीच्या नळ्यात सांचत होती तेव्हा हा “तारणारा” कुठे गेला होता?.का चोंदलेल्या नळ्या शोधल्या गेल्यामुळे ती नशीबवान होती कारण त्या नळ्या साफ करता येतात.?का ती कमनशीबी होती कारण तीला हॉस्पिटलमधे जाऊन शस्त्रक्रिया करावी लागावी.?
माझ्या बहिणीची घटना जास्त किचकट व्हायला लागली कारण तीच्या दोन वर्षाच्या मोठ्या मुलाकडून प्रताप घडल्यावर हे सर्व जास्तच किचकट मिश्रण व्हायला लागलं होतं.त्याचं असं झालं की माझ्या बहिणीची शस्त्र्क्रिया होण्यापूर्वी तीची नणंद तीला मदत आणि आधार द्यायला तीच्या गावाहून मुद्दाम आली होती.घरी माझ्या बहिणीची दोन लहान मुलं होती.ती सकाळी येऊन पोहचते ना पोहचते तेव्हड्यात बहिणीचा मोठा मुलगा सकाळीच पलंगावरून घसरून खाली पडला आणि त्याचं मनगटाचं हाड दुखावलं गेलं.त्याला ताबडतोब त्याच हॉस्पिटलात प्लास्टर लावण्यासाठी न्यावं लागलं.
सुरेश, तू आता सांगा,त्याची आत्या त्याचवेळी घरी आल्याने तो नशीबवान होता का?का कमनशीबवान होता कारण त्याच हॉस्पिटलात त्याची आई एका खोलीत सर्जरी झाल्यावर सुधारत होती आणि हा प्लास्टर लावून दुसर्‍या खोलीत उपाय करून घेत होता.
अलीकडे माझ्या वाचनात आलं की कुणीसं म्हटलंय,
“वृत्तिपेक्षा सत्यस्थिती जास्त महत्वाची असते.”

माझा हा किस्स्सा ऐकल्यावर सुरेश जरा गंभीर झालेला दिसला.त्याचा चेहरा तसा दिसत होता.पण माझं अनमान चुकलं असं मला वाटलं.कारण सुरेशचा चेहरा माझ्या किस्स्यामुळे गंभीर झाला नव्हता.फेणीची चव जरा जास्तच झाली असावी.पण तो प्रासंगिकता ठेऊन बोलला.आणि मला त्याचं बोलणं पटलं.
मला म्हणाला,
“ह्या हिरव्यागार धरतीवर रहाणारा प्रत्येकजण कमनशीबाचा अनुभव चाखणारा प्राणी ठरतो.
“अशुभ न बोलेलं बरं”
असं म्हणून किंवा कुणाच्या,
“पांढर्‍या पायामुळे झालं ”
असं म्हणून काही त्यात बदल होणार नाही.समीक्षात्मक मुद्दा असा की जीवनातल्या नकारात्मक घटनेला कोण कसा प्रतीसाद देतो ते पहायला हवं.मला अशावेळी आपली पहाण्याची प्रवृत्ति जास्त भावते.
तुझ्या बहिणीला सर्जरीनंतर प्रकृती नीट व्हायला काही दिवस उपायाना तोंड द्यावं लागलं.पण ती सकारात्मक राहिल्याने आता ती हदयाला झटका येण्यापासून दूर राहिली.ती़च्या मुलाची झपाट्याने सुधारणा होऊन तो आपल्या लहान बहिणीशी खेळायलाही तयार झाला असेल.
ह्या सर्व प्रकारातून मी एका अपरिहार्य निर्णयाला आलो की,कुणी म्हटलंय ते खरं आहे,
“जीवनात आपल्याला सुख मिळायला सर्वात मोठा वाटा आपल्या प्रवृत्तिचा असतो. आलेल्या परिस्थितिचा नसतो.”

माझ्या कपातली कॉफी केव्हाच संपली होती.फेणीची शेवटची चव घेऊन झाल्यावर, सुरेशने जेवणाची ऑर्डर दिली.

श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

Advertisements

2 Comments

 1. Posted मार्च 6, 2010 at 8:00 pm | Permalink

  संतानी उगीच नाही म्हंटले ’ठेविले अनंते तैसेची रहावे”

  • Posted मार्च 6, 2010 at 8:02 pm | Permalink

   खरं आहे आपलं म्हणणं.
   आपल्या प्रतीक्रियेबद्दल आभार.


टिप्पणी नोंदवा

Required fields are marked *

*
*

%d bloggers like this: