माधव आणि त्याचे आजोबा.

“मी टॉर्चचा उपयोग करतोच शिवाय शब्दकोशही जवळ ठेवतो. काही शब्द असे पाहिलेत “कर्जफेड”, “अमुच्या गावा”, “आई” “ईश्वर”.

नातवंडांचं आजोबावर प्रेम असणं स्वाभावीक आहे.ती एक नैसर्गीक प्रक्रिया आहे असं म्हटलं तरी अतीशयोक्ती होऊ नये. काहींना आजोबा आपले लाड करतात म्हणून ते आवडता.काहींना आईबाबा रागवल्यानंतर आजोबा आपल्याला जवळ घेऊन आपली बाजू सावरतात म्हणून आवडतात.काहींना आपले आजोबा अनुभवाच्या गोष्टी सांगून समजावतात म्हणून आवडतात.अशी अनेक उदाहरणं देता येतील.पण माधवला आपले आजोबा आवडतात ह्याचं कारण मला जरा जगावेगळं वाटलं.हे कारण कदाचीत जगावेगळं नसावं,मला वाटतं,माधवची अवलोकन करण्याची वृत्ती जरा जगावेगळी वाटली.

त्याचं असं झालं,माधव माझ्या नातवाबरोबर अभ्यास करायला म्हणून आमच्या घरी आला होता.जर्न्यालिझमची दोघानाही आवड आहे.कधी कधी चर्चा करण्यासाठी दोघे एकमेकाला भेटत असतात. माझा नातू त्याच्या आईबरोबर डॉक्टरकडे गेला होता.तो येईपर्यंत मी माधवला बसायला सांगीतलं होतं.

मी त्याच्या आजोबांच्या प्रकृतीविषयी त्याचेकडे पृच्छा केली.ते सांगायला त्याने जी सुरवात केली ती ऐकूनच मी त्याचं अवलोकन बघून थक्क झालो.
माधवने सुरवातच अशी केली.तो मला म्हणाला,
“गेल्या एकदोन वर्षापासून माझ्या आजोबाना हळू हळू अंधत्व येऊ लागलंय असं वाटतंय.माझे आजोबा कॉलेजात प्रोफेसर होते. लिहिणं आणि वाचणं ह्या दोन गोष्टीवर त्यांचं प्रचंड प्रेम आहे.
इच्छा शक्तिवर माझा विश्वास आहे.पण इच्छाशक्तिची वर्णनं पेपरमधे येतात त्या इच्छाशक्तिबद्दल मी म्हणत नाही.जसं माऊट एव्हरेस्टवर चढून जाण्याचं किंवा गेटवे ऑफ इंडीयाकडून एलिफंटाकडे पोहून जाण्य़ाचं अशा प्रकारच्या इच्छाशक्तिचं मी म्हणत नाही.मी म्हणतो ती इच्छाशक्ति जी जीवनात आलेल्या कसोट्यांना,बेअदबीना सामोरी जाऊन पुढे “आगे बढो” असं म्हणते त्या इच्छाशक्तिबद्दल मी म्हणतोय.”

हे ऐकून माझी खात्री झाली की माधवच्या आजोबांच्या प्रकृती विषयीच्या माझ्या प्रश्नाला उत्तर म्हणून माधव नक्कीच काहीतरी त्याच्या आजोबाच्या गंभीर आजाराविषयी सांगण्याच्या प्रयत्नात असणार.
म्हणून मी त्याला म्हणालो,
“वृद्धत्व आल्यावर प्रकृतीच्या संबंधाने काही ना काही कटकटी येतच रहातात.म्हणून कुणीतरी म्हटलंय,
“जन्मापासून मरण येई पर्यंत जीवनात ज्या अवस्था येत असतात. त्यात सर्वांत उत्तम अवस्था म्हणजे म्हातारपण.”

एव्हडं अर्धवट बोलून मी माधवकडे कुतूहलाने बघून त्याची काय उस्फुर्त प्रतीक्रिया येते ते पहात होतो.मला माधव म्हणाला,
“मात्र भरपूर पैसा आणि उत्तम प्रकृती असली तरच.”
माझ्या मनातलं बोललास असं सांगून मी पुढे म्हणालो,
“इतर कुठल्याही जीवनातल्या अवस्थेत,
“गप रे ! तुला त्याचा अनुभव नाही,त्यासाठी वर्ष काढावी लागतात.” असं म्हटलेल्ं ऐकून घेण्याची पाळी येत असते पण आजोबांच्या वयावर तसं त्य़ांना कोण म्हणू शकेल का? हे एक उदाहरण दिलं.पण एकुण सर्व बाबतीत ह्या उतार वयात इतर वयाच्या तुलनेत ह्या वयाचा आदर ठेवला जातो. निदान आपल्या संस्कृतीत तरी.म्हणून मी तसं म्हणालो.”

माधव म्हणाला,
“माझ्या आजोबांकडे भरपूर पैसा नसला तरी आता पर्यंत त्यांची प्रकृती उत्तम होती.म्हणून ते मजेत दिवस काढीत होते. अलीकडे त्यांनाच त्यांच्या प्रकृतीतला फरक दिसायला लागला आहे असं वाटतं.अलीकडे माझे आजोबा भिंग घेऊन वाचायचा प्रयत्न करतात. अलीकडे त्यांचं ऐकणं पण जरा कमी झालं आहे त्यामुळे त्यांच्याशी संपर्क करणं जरा जिकीरीचंच झालं आहे.त्यामुळे ते भारीच वैतागत असतात.इतकी वर्ष वापरात असलेली त्यांची दृष्टी आता एक वाक्य वाचू शकत नाही.माझ्यात आणि माझ्या धाकट्या भावात त्यांना फरक दिसत नाही.मला कळतं की ते काही अमरपट्टा घेऊन आलेले नाहीत.ते कुढत बसलेले दिसतात.निराश झालेलेही दिसतात. माझी आई तीला जमेल तेव्हडं त्यांच्याबरोबर जवळ बसून त्यांच्यासाठी वाचन करीत असते तरीही त्यांची तक्रार असतेच. सर्व ध्यानात रहावं म्हणून ते प्रयत्नात असतात.लिहिण्या-वाचण्याचा तो समय भरून काढण्याच्या प्रयत्नात माझे आजोबा असतात.अंधत्वाची चाहूल त्यांना लागली असली तरी ते वाचण्याच्या प्रयत्नात असतात. जेवणाच्या टेबलावर बसून मोठ्या पेनाने मोठ्या अक्षरात ते कागदावर लिहित असतात.”

मी म्हणालो,
“तुझ्या आजोबांनी तरूण वयात पुस्तकं लिहिलीली आहेत.काही त्यांची पूस्तकं टेक्स्ट बूक म्हणून शाळेत लावलेली मला आठवतात.”

“त्यांना पुस्तक लिहायला खूपच दिलचस्पी असायची.शाळेला लागणारी पुस्तकं ते जेवण्याच्या टेबलावर बसून लिहायचे. आजुबाजूला कितीही गडबड असली तरी त्यांची नजर लिहित्या पानावर केंद्रीत असायची.एखादं वास्तव त्यांच्या सापळ्यात सापडल्यावर ते तसंच वहीत लिहिलं जायचं. इंग्रज भारतात क्रिकेट खेळायला येत होते तिथपासूनचं रेकॉर्ड त्यांच्या पिवळ्या वहित लिहिलेलं असायचं.”
माधवने त्याच्या लहानपणी जे काही त्याच्या आजोबांचं अवलोकन केलं होतं ते तो मला अगदी आनंदाने सांगत होता.

मी म्हणालो,
“मग अलीकडे कसा वेळ घालवतात?”

“अलीकडे ते मित्रांना निरनीराळ्या विषयावर पत्रं लिहायचे.शिवाय दिवाळी,नववर्ष,आणखी कुणाच्या वाढदिवसाला शुभेच्छा पत्र लिहायची माझ्या आजोबाना पूर्वी पासून लय हौस असायची.”
माधव सांगू लागला आणि पुढे म्हणाला,
“माझे आजोबा काहीही वाचायला नेहमीच तयार असतात.चुकून कुणी एखादं पुस्तक वाचता वाचता खाली ठेवलं की ते हरवलं म्हणून समजा. कल्पितकथेचं,किंवा सत्यकथेचं पुस्तक असो,एखादी कादंबरी असो,मासिक असो त्यांच्यासाठी त्यांना सर्वच सारखं असतं.कुणी त्यांना जर का दोन तीन पुस्तकं दसर्‍यादिवशी वाचायला दिली तर दिवाळी येण्यापूर्वी त्यांनी ती वाचून फस्त केली म्हणून समजा.”

“अरेरे,म्हणजे ज्याची जरूरी आहे ते डोळेच अधू झाल्यावर त्यांची खूपच पंचाईत होत असेल.”
मी म्हणालो.
“तेच तर मला दुःख होतं.पण त्यांनी त्यांची जीद्द सोडलेली नाही. लिहिण्याबद्दलची त्यांची इच्छाशक्ति जब्बर आहे.”
असं सांगून माधव वाईट वाटल्यासारखा चेहरा करून म्हणाला,
“पूर्वी सारखंच अजून स्वतःचं लक्ष केंद्रीत करून ते लिहिण्याच्या प्रयत्नात असतात. पण ते ठळक अक्षर वाचायला त्यांना तेव्हडं सोपं जात नाही. त्यांनी लिहिलेल्या वाक्यांचा शेवट काळ्या ठिपक्यात होतो.किंवा शब्द रेषेच्या वर खाली लिहिले जातात.कधी कधी त्यांच्याकडून कागदाच्या बाहेर जाऊन जेवणाच्या टेबलावर लिहिलं जातं.पण आजोबा लिहितच असतात.कारण लिहिण्याचं सोडलं तर सर्वच सोडून दिल्यासारखं होईल असं त्यांना वाटतं.”

“किती रे,प्रेम करतोस तुझ्या आजोबावर.एव्हडं लक्ष देऊन तू त्यांची लिहिण्यासाठीची धडपड पहात असतोस.”
मला राहवंलं नाही म्हणून मी माधवला असं म्हणालो.

मला म्हणाला,
“तुम्हाला माझ्या आजोबांची आणखी गंमत सांगतो.
त्यांचं हस्तलिखीत आटोपशीर जरी असलं तर ती टेबलावरची अक्षरं सहजा सहजी वाचता येत नाहीत.त्यांचं ताजं ताजं लिहून झाल्यावर  किंवा त्या अगोदर कधीतरी त्यांनी जेवणाच्या टेबलावर बसून लिहिल्यावर टेबलावर चुकून लिहिल्या गेलेल्या त्या शब्दांचा किंवा अक्षरांचा अर्थ मी काढण्याच्या प्रयत्नात असतो.अशावेळी मी टॉर्चचा उपयोग करतोच शिवाय शब्दकोशही जवळ ठेवतो.
काही शब्द असे पाहिलेत “कर्जफेड”, “अमुच्या गावा”, “आई” “ईश्वर”.
मी त्या शब्दांचा संदर्भ लावण्याचा प्रयत्न करतो.पण ह्या वयावर त्यांच्या डोक्यात काय चाललं आहे याचा थांगपत्ता लागत नाही.”

मला माधवची खूपच किंव आली.त्याला त्या शब्दातून अर्थ काढता येत नव्हता असं नाही.कारण त्याचे पाणावलेले डोळे मला अर्थ सांगत होते.मी त्याला जवळ घेत एव्हडंच म्हणालो,
“धन्य तू आणि तुझे आजोबा”

श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

Advertisements

टिप्पणी नोंदवा

Required fields are marked *

*
*

%d bloggers like this: