असंच एक कोकणातलं गाव.

“हे तुझं निसर्गाचं वर्णन ऐकून आणि तुझ्या गावातलं तळं आणि आजूबाजूचं सृष्टी सौन्दर्य पाहून मला पुढेमागे इथेच स्थाईक व्हावं असं वाटायला लागलंय.”

“आमच्या कुटूंबात मी पहिलाच कॉलेजात जाणारा ठरलो.आमचा शेतकी व्यवसाय असल्याने व्यवहारापूरतं पुस्तकी ज्ञान असलेलं पूरं असं माझ्या इतर नातेवाईकाना वाटायचं.शेतीतून पैसा येत असल्याने जीवनात लागणार्‍या इतर गरजा भागवल्या जायच्या.पण माझ्या आजोबांचं तसं नव्हतं.ते जरी सातवी पर्यंत शिकले असले तरी मिळेल ते ज्ञान संपदान करताना पुस्तकी ज्ञानाच्या जरूरीचं महत्व त्यांना माहित झालं असावं”
शंकर माझा- शाळकरी- मित्र मला सांगत होता.

शेतकी व्यवसायवर डिग्री घेऊन त्याने आपल्या शेतीवाडी परिसरात प्रचंड सुधारणा केली होती.जेव्हा जेव्हा मला तो मुंबईला भेटायचा तेव्हा तेव्हा तो माझ्या मागे लागायचा,आणि म्हणायचा,
“एकदा तरी येऊन बघ आमचं शेत आणि आजुबाजूचा परिसर.केवळ जादा ज्ञान घेतल्याने मी ह्या परिसराचा कायापालट केला आहे.पैसे असायचे पण पैसे सर्व काही नसतं.पैशाबरोबर ज्ञानाचा उपयोग करूनच असं करता येतं.”

आज योग आला होता.मलाही एक आठवड्याची फुरसत मिळाली होती.वाटलं शंकरच्या गावी जावं,मला बघूनही तो खूशही होईल. आणि मला पण तो काय म्हणायचा ते प्रत्यक्ष बघता येईल.
मला पाहून शंकरला खूप आनंद झाला.शंकरचं घर डोंगरावरच्या एका सपाटीवर होतं.रिक्षातून उतरल्यावर पायी वर चढून जावं लागायचं.वर गेल्यावर मात्र एकदम मोकळं वाटलं.मागे वळून पाहिल्यावर खालच्या सपाटीवरचं दृष्य अगदी डोळ्याचं पारणं फेडील असं दिसलं.पण काळोख व्हायला आला होता.जेवणं झाल्यावर काळोख जरी झाला होता तरी घराच्या अंगणात गप्पा मारीत बसलो होतो.खाली रस्त्यावरून जाता-येताना बरीच मंडळी दिसत होती. मधून मधून शंकरला हात करून सलामी देत होती.शंकरच्या घराशेजारी एक घर होतं.त्याचे मालक सुरेश देसाई असं शंकर मला म्हणाला.
तेव्हड्यात सुरेश देसाई आम्हाला अंगणात बसलेले पाहून गप्पा मारायला म्हणून येऊन बसले.शंकरने माझी त्यांच्याशी ओळख करून दिली.

गप्पा मारताना मला शंकर म्हणाला,
“उद्या सकाळी लवकर उठून आपण शेतावर जाऊया.सकाळच्या सूर्योदयाच्या वेळी इथे उभं राहून खाली पहिल्यावर तुला किती रम्य वाटेल ते तुच ठरव.”
मी म्हणालो.
“मी मघाशी आलो तेव्हा जरा पाठ फिरवून मागे बघीतलं तेव्हाच मला कल्पना आली होती.पण नंतर पटकन काळोख झाला. तू म्हणतोस तसं नक्कीच रम्य दिसेल यात शंका नाही.”

“मी माझं आयुष्य अधिक ज्ञान संपादन करण्यासाठी वाहून घेतलं होतं.मला वाटतं ज्ञानाच्या ठिणगीमुळे एखाद्याचं जीवन दैदिप्यमान होत असावं. ज्ञान हे असंच काहीतरी आहे की ज्यामुळे मनुष्याला माणूसकीच्या वरच्या पातळीवर उचलून ठेवलं जात असावं.नियतीचा मनुष्यप्राण्याला त्या जागी आणून ठेवण्याचा पूर्वनियोजीत विचार आसावा.माझ्या आजोबांना मिळेल ते ज्ञान संपादन करायचं वेडच होतं.माझ्या आईने माझ्या आजोबांना नेहमीच आदर्श मानलं होतं.”
शंकर आपले पूर्वीचे दिवस आठवून सांगत होता.

मी आजोबापासून दूर शिकण्यासाठी म्हणून गेल्याने आई योग्य तेच करीत असावी असं मला त्यावेळी वाटायला लागलं होतं.”
शंकर तल्लीन होऊन मला सांगत होता.
बरीच रात्र झाली होती.
“उद्या सकाळी शेतावर जाता जाता आपण गप्पा करूंया.”
असं सांगून शंकरने मला झोपायची खोली दाखवून गुड नाईट केलं.
सकाळी लवकरच उठलो.चहा नास्ता झाल्यावर आम्ही खाली शेताकडे जायला निघालो.

खरंच उंच डोंगरावरून पाहिल्यास एखाद्या रंगीत साडी नेसलेल्या स्त्रीच्या साडीचा पाठीवरचा लोंबता पदर पसरून दाखवल्यावर किती हिरवा दिसतो त्याची कल्पना ह्या भातशेतीच्या कुणग्याकडे पाहून होत होती.
खाली आल्यावर पोफळींची -सुपारीची- उंचच उंच झाडं माडाच्या बनाशी जणू उंचीसाठी स्पर्धा करताना दिसत होती.

मला शंकर म्हणाला,
“तळ्याजवळचे सपाट शेतीचे कुणगे जरी उन्हाळ्यात भकास दिसले तरी पाऊस येऊन भाताची पेरणी होऊन दोन तिन महिने गेल्यावर आमच्या गावी यावं.कोकणातलं नंदनवन दिसेल.”
“सुरेश देसाई इकडे केव्हा पासून राहायला आले?”
मी सहज प्रश्न केला.
मला म्हणाला,
“अलिकडेच ते आमच्या गावात येऊन स्थाईक झाले आहेत.माझ्या शेजारचं घर आणि वाडी त्यांनी विकत घेतली. माडा-पोफळीच्या झाडांबरोबर आंब्याची कलमी झाडं पण त्या वाडीत होती.पुर्वीच्या मालकाने ही सर्व इस्टेट त्यांना विकून तो मुंबईला धंदा करायला गेला होता.
सुरेश देसायांचा मुंबईत कार डिलर्सचा धंदा आहे.तो त्यांनी आपल्या मुलाला सोपवून ते आमच्या गावात येऊन स्थाईक झा्ले.”

पुन्हा आपल्या आजोबांच विषय काढून शंकर म्हणाला,
“लोकं माझ्या आजोबांच्या ज्ञानाचा,त्यांच्या सज्जनपणाचा, सन्मार्गीपणाचा आणि मदतीचा हात पुढे करण्याच्या वृत्तिचा आदर करीत असंत.माझे आजोबा रात्र जागून वाचन करायचे. नुसतंच त्यांच्या मनाला पटतं तेच वाचत नव्हते तर दुसर्‍याचं म्हणणं काय असावं हे पण मोठ्या उत्साहाने, उत्सुक्ततेने वाचत असायचे.उघडं मन ठेवून पक्षपाती न रहाता दुसर्‍याचा दृष्टीकोन समजाऊन घेत असायचे.
वाचनाच्या वेडाने माझे आजोबा ज्ञानी झाले.त्यांचं ज्ञान आणि त्यांच्या नम्रतेने वागण्याच्या स्वभावामुळे ते लोकांच्या डोळ्यात भरले जायचे.”
मी शंकरला म्हणालो,
“तुझं तुझ्या आजोबावर फारच प्रेम होतं असं दिसतं.शहरात शिकायला गेलास त्यावेळी त्यांना सोडून जायला तुझ्या जीवावर आलं असेल नाही का?”

“काय सांगू तुला?”
मी जणू शंकरच्या जून्या आठवणीना उजाळा देत होतो.
“मला वाटतं जवळच्या नातलगापासून दूर राहणं म्हणजे महाकठीण असतं, आणि एकाकी वाटण्यासारखं असतं.आणि अशावेळी माझ्या घराची आणि विशेष करून माझ्या आजोबांची मला आठवण आल्याशिवाय कशी राहिल?”
शंकर त्याना सोडून जातानाच्या आठवणी काढून म्हणाला,
“मी ज्यावेळी कॉलेजमधे शेतकी इंजिनीयरींग शिकायला जायाला निघालो तेव्हा माझे आजोबा शरीराने सशक्त होते. आणि त्यांना वाटत असलेल्या श्रद्धेबद्दल ते खंबीर होते. त्यांचं जीवन हे माझं मार्गदर्शन झालं होतं.मला माहित आहे की त्यांच्या सुखाचा उगम त्यांच्या श्रद्धेमधून झाला होता.मी त्यांच्या पासून दूर राहायला जात्त असताना मला अशिर्वाद देऊन वर ते मला म्हणाले होते की,
“तू ज्ञान मिळवण्यासाठी जात असल्याने मी अतिशय खूष आहे.”
त्याना वाटणार्‍या त्या आनंदाने त्यांच्या डोळ्यातली चमक अजून माझ्या लक्षात आहे. आणखी ज्ञान मिळण्यासाठी त्यांना जाणं वयामुळे कठीण होतं तरी माझ्या सारखं कुणी जवळचं जात आहे हे पाहून त्यांना समाधानी वाटत होती. मला ते नेहमी म्हणायचे,
“हताश होऊं नकोस आणि श्रद्धेवर भरवंसा ठेव.”
हे सांगत असताना त्यांचा चेहरा विशेष खुलून दिसायचा.ही साधी घटना मला वेळोवेळी आठवते.आणि माझ्या अडचणीच्या वेळी मला आधार देते.त्यांच्याकडून मिळणारी अविरत मदत आठवते.”

मी शंकरला म्हणालो,
“निरहंकारी राहून मिळेल ते ज्ञान घेण्याची कोशीश करत रहाणं खरंच फायद्याचं ठरतं. जीवनात  दृढवि़श्वास ठेवून आणि आशा बाळगून पावलं टाकीत राहिलं पाहिजे.मला वाटतं आपलाच आपण शोध घेतला पाहिजे.त्यामुळे इतराना समजायला मदत होते.”

“तू म्हणतोस ते अगदी बरोबर आहे”
असं सांगून शंकर म्हणाला,
“मी माझ्या जवळच्या नातेवाईकापासून दूर राहिल्याने माझ्या जगातल्या लोकांना समजू शकलो होतो.माझे आजोबा सांगायचे,
“सर्व धर्मात सत्य आणि स्वातंत्र्यावर सारखच प्रेम करावं असं म्हटलं गेलं आहे.आणि हा मार्ग शांतीचा ठरतो. त्यामुळे एकमेकातले हेवेदावे कमी होऊन मन जुळायला मदत होते. भयभीति तसंच गैरविश्वास, अज्ञानातून जन्म घेतात.आणि ह्या सर्व दूराव्यामधले पूल ज्ञानाद्वारे बांधले जातात. ज्ञानामधूनच विश्वास आणि मैत्रीचे दुवे माणसा-माणसामधे निर्माण केले जातात.”
माझे आजोबा जर कॉलेजपर्यंत शिकले असत तर नक्कीच प्रोफेसर झाले असते.”

आपल्या आजोबांबद्दलचं प्रेम आठवण काढून काढून सांगत शंकर आपलं मन माझ्याकडे मोकळं करीत होता.
त्याच्या शेतीच्या परिसरात रोजच फिरत फिरत शंकर बरोबर अशाच गप्पा मारीत आठ दिवस कधी निघून गेले ते कळलंच नाही.
मला निरोप देताना शंकर मला म्हणाल्याचं आठवतं,
“आंब्या-फणसाच्या दिवसात कोकणात कुणी ही कुठे ही जावं.पण आमच्या गावात आल्यावर नुसतेच फणस आणि आंबेच झाडावर दिसणार नाहीत आणखी अनेक तर्‍हेची फळं, झाडावर दिसतील त्यात पांढरे जांब,लाल केशरी रातांबे-ज्या पासून आमसोलं करतात-आंबट गोड फाल्गं,रसाळ हिरवे गार रायआवळे,चॉकलेटी रंगाची -साल फूटल्यामुळे -दिसणारे आंबट गोड चिंचांचे फाद्यांवर लटकणारे घोस.एक ना दोन.”

मी त्याला निरोप देताना म्हणालो,
“हे तुझं निसर्गाचं वर्णन ऐकून आणि तुझ्या गावातलं तळं आणि आजूबाजूचं सृष्टी सौन्दर्य पाहून मला पुढेमागे इथेच स्थाईक व्हावं असं वाटायला लागलंय.”

श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

टिप्पणी नोंदवा

Required fields are marked *

*
*

%d bloggers like this: