वकीलाचा कुत्रा.

“माझा मोती मला प्रत्येक गोष्ट मी माझ्या ताब्यात ठेऊ शकत नाही,आणि त्याची जरूरीही नाही ह्याची एक प्रकारे समज देतो.”

रिधमहाऊस मधून मदनमोहनच्या काही सीडीझ विकत घेण्यासाठी म्हणून मी चर्चगेटवरून फौन्टनच्या दिशेने जायला निघालो होतो.हायकोर्टचा रस्ता आल्यावर पुढे पुढे फौन्टनपर्यंत जाऊन वळण्यापेक्षा हायकोर्टच्याच रस्त्यावर वळलो. कोर्टाच्यासमोर काळे कोट घातलेले बरेच वकील आपआपल्या सहाकारी मित्राबरोबर बोलण्याच्या नादात होते. सुरेश प्रधानाला पाठमोरा पाहिला.तोही त्याच्या वकील मित्राबरोबर गप्पात रंगला होता.मला पाहून हंसला  आणि हाताने थांब जरा म्हणून खूणावू लागला.मित्राला बाय करून माझ्याशी बोलायला आला.
“अरे,तू असतोस कुठे?”
असं खास मालवणी पद्धतीने मला विचारायला लागला.
“मी पण तुला तेच विचारतो”
असं मी सुरेशला म्हणालो.
इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्यावर मला म्हणाला,
“खरंच तू पुढल्या रविवारी माझ्या घरी ये.तुझ्याशी खूप गप्पा मारायच्या आहेत.”

त्याच्याकडे जाण्याचं आश्वासन देऊन मी रिधमहाऊसच्या दिशेने जायला निघालो.
त्या रविवारी त्याचं घर शोधीत जाता जाता सुरेशच रस्त्यावर भेटला.
“तू घरी आल्यावर तुला बसून राहायला सांगायचं मी माझ्या बायकोला सांगून आमच्या मोत्याला चक्कर मारून आणीन म्हणून खाली उतरलो.बरं झालं तू इकडेच भेटलास ते.”
सुरेश मोत्याच्या पाठीवर हात फिरवीत मला म्हणाला.

सुरेशचा मोत्या आलसेशन-जर्मन शेफर्ड- जातीचा होता.मी त्याच्या अंगावरून हात फिरवला.त्याचं उघडं तोंड त्याने बळेच बंद करून माझ्याकडे मान करून बघायला लागला.
“चावणार नाही ना बाबा?”
मी सुरेशला विचारलं.
“चल, तू पण आमच्याबरोबर चक्कर टाकायला ये.मोत्या तुला मुळीच काही करणार नाही.”
सुरेश मला खात्रीने सांगत होता.
“वकीलाचा कुत्रा आहे.कायद्याचं पालन करणाराच.”
मी सुरेशला कोपरखीळी दिली.

सुरेश हंसत हंसत मला म्हणाला,
“मोत्याला बाहेर फिरायला घेऊन जायला मला आवडतं.तसं मला दांत स्वच्छ ठेवायला आवडतं,बाजापेटीवर रियाज करायला आवडतं,फळं आणि भाज्या खायला आवडतात,पण ह्या गोष्टींकडे दुर्लक्ष केलं तरी चालतं म्हणा.पण मोत्याला बाहेर न नेऊन चालणार नाही.”

“त्याची काय बाहेर फिरण्याची ठरावीक वेळ असते का?”
मी सुरेशला विचारलं.
“मी घरी आल्यावर मोती दारातच उभा असतो.अगदी नम्रकसा, पण चुळबूळ करून तंग करत रहातो, मी केव्हा एकदा त्याच्या मानेला साखळी लावीन याची वाट बघत असतो.काही कर्तव्यं आहेत,काही गोष्टींना सीमारेषा असतात ह्याची त्याला ठूम पर्वा नसते.त्याला आणि त्याच्याबरोबर मला एव्हडंच माहित की फक्त बाहेर फिरायला जायचं.”
सुरेश सांगू लागला.

“मोत्याला बाहेर घेऊन जाण्याने शरीरात प्राणवायु वाढवून घ्यायच्या व्यायामाचा-एरोबीकचा- प्रकार केला जातो असं मुळीच नाही.फक्त बाहेर चक्कर मारून आल्यासारखं होतं.
अधुनमधून वाटेत थांबावं लागतं.त्यामुळे मोत्याला त्याच्या लांब, सुरेख,कळीदार नाकातून अलीकडचे नवीन वास हुंगून ठेवायला मिळतात.आम्ही जवळच्या पार्कमधे जातो,पावाच्या बेकरी जवळ जातो किंवा आजुबाजूच्या शेजारात भटकून येतो.ह्या सर्व ठिकाणी जायला मोती अधीर असतो. तो एका टोकाला आणि मी साखळीच्या दुसर्‍या टोकाला असतो.वेळ मजेत जात असतो.कुणी म्हणेल थोडा बाहेर जाऊन व्यायाम होतो म्हणून कुत्रा बाळगतात.किंवा त्याला फिरायला घेऊन जाण्याचं निमीत्त साधून घराबाहेर पडायला मिळतं म्हणून कुत्रा बाळगतात.पण माझ्या बाबतीत तसं काही नाही.”

“तुमच्या वकिली व्यवसायात, सतत वापरण्याची नेहमीची आयुधं म्हणजे कायद्याचा आणि शब्दांचा वापर.
आणि असल्याच गोष्टी सतत तुमच्या डोक्यात असतात पण मोत्याला घेऊन बाहेर पडल्यानंतर नेहमीचे जगातले देखावे पहाण्यासाठी आणि वास हुंगण्यासाठी, मोती जो तुला वाटेत रोखून ठेवतो त्यामुळे व्यवसायतल्या गोष्टी डोक्यात न येण्यासाठी मोत्याचा उपयोग होत असेल.नाही काय?”
मी सुरेशला माझ्या मनातलं सांगीतलं.
मला सुरेश म्हणाला,
“माझ्या अगदी मनातलं सांगीतलंस.
वकिल नेहमी कायदे,करारनामे,वचनबंधने ह्यानी बांधलेले असतात.
कुणाचं किती दायीत्व आहे आणि कशासाठी आहे आणि ते बंधनकारक होण्यासाठी आम्ही शब्दांच्या व्याख्या करतो. नंतर ती दायीत्वं वास्तवीकतेशी जोडण्याचा प्रयत्न करून कुणाच्याही समस्या सोडवण्याचा प्रयत्न करतो.अशावेळी मोत्याबरोबर चक्कर मारून आल्यावर माझ्या कामावर मन केंद्रीत करायला मला सुलभ होतं.”
एव्हडं सांगून सुरेश गप्प झाला नाही.

मला म्हणाला,
“मोत्याकडून चक्कर मारायला जवळजवळ माझ्यावर जबरदस्तीच होत असते.अशावेळी मला कायदेकानू आणि वास्तविकता ह्याकडे लक्ष देण्याचं बंद करून,आत्ता इथे काय होत आहे त्याकडे लक्ष केंद्रीत करावं लागतं.जसे कांव कांव करणारे कावळे गुलमोहरच्या झाडावर बसून गलगलाट करतात तेव्हा माझा मोती तिथेच थांबून झाडाकडे मान उंचावून एक टक पाहत नसता तर झाडावर काय चालंय ते दृश्य मला चुकलं असतं.
कुणातरी लहान मुलाचा एकच लालभडक पायमोजा पाहून तो उचलून तोंडात घेण्यासाठी मोती जर का मला ओडत ओडत रस्त्याच्या कडेला घेऊन गेला नसता आणि आपली जीत झाली असं कुत्र्याच्या भाषेत दाखवण्यासाठी माझ्या जवळ तो पायमोजा घेऊन आला नसता तर तो पायमोजा ओलांडून मी पुढे गेलो असतो.”

मला हे सुरेशचं विश्लेषण ऐकून गंमतच वाटली.
मी हंसत हंसत त्याला म्हणालो,
मोत्याला घेऊन चक्कर मारायला गेल्याने तुला जरा हलकं वाटत असणार.आणि तुझ्या डोक्यांत व्यवसायाबद्दल लक्ष घालण्यापेक्षा आजुबाजूच्या जगातल्या छोट्या छोटया अनपेक्षीत आनंदाकडे लक्ष घालायला तुला फुरसत मिळत असणार.”

“माझा हा मोती मला घरातल्या चार भिंती-काम,घड्याळ,कंप्युटर आणि फोन – पासून बाहेर आणून वास,रंग आणि आकस्मिक लाभाच्या दुनियेत आणून सोडतो.माझा मोती मला प्रत्येक गोष्ट मी माझ्या ताब्यात ठेऊ शकत नाही,आणि त्याची जरूरीही नाही ह्याची एक प्रकारे समज देतो.”
मोत्याच्या अंगावर हात फिरवीत सद्गदीत होऊन सुरेश सांगू लागला.पुढे म्हणाला,
“काही धर्मात पायीचालण्याची क्रिया ही चिंतनाची पातळी आहे असं सांगीतलं जातं.म्हणून काय मी त्या पातळी पर्यंत पोहोचत नाही.मी साधारण चमत्कारावर विश्वास ठेवतो.जसे गलगलाट करणारे ते कावळे,तो, लालबुंद पायमोजा आणि हे माझं वृद्धत्वाकडे झूकणारं शरीर अजून काम करतंय असल्या चमत्कारावर मी विश्वास ठेवतो. म्हणूनच मी लक्ष केंद्रीत करण्यावर,चक्कर मारण्यावर विश्वास ठेवतो.अगदी मनापासून सांगायचं तर मी मोत्याला घेऊन बाहेर चक्कर टाकण्यावर विश्वास ठेवतो.”

सुरेशबरोबर बोलता बोलता त्याची चक्कर पूर्ण झाली आणि त्याच्या बिल्डिंगकडे केव्हा आलो ते एरव्ही कळलं नसतं. मोती जेव्हा भुंकायला लागला तेव्हा सुरेशने मोत्याची साखळी त्याच्या मानेपासून अलग केली,आणि मोती धुम ठोकत जीना चढत गेला आणि आपल्या घराच्या बंद दरवाज्यावर उभा राहून जोराजोरात भुंकत राहिला.

“बघ,हा आणखी एक तुझ्या मोत्याचा फायदा मला दिसला.तुला वर जाऊन दरवाज्यावरची बेल दाबायचा व्याप त्याने सोडवला.तुझ्या बायकोला नक्कीच कळलं असणार की तुझी चक्कर संपून तू आला आहेस.”
असं मी म्हणत म्हणत, आम्ही दोघे जीने चढत वर गेलो.

श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

Advertisements

4 Comments

 1. Mangesh Nabar
  Posted मार्च 31, 2010 at 7:39 pm | Permalink

  Dear Shri Shri(Krushna) Saamant,
  You are one of the few persons who can use two shri before your name! I don’t knwo why it is applied to the name of Swami Ravishankar. BTW, I liked your above post. I admire your style and wonder how you present your thoughts despite staying away from India. Keep writing such posts. I may not register my appreciation every time you write, but this post forced me to write. Regards.
  Mangesh Nabar

  • Posted एप्रिल 1, 2010 at 8:07 pm | Permalink

   नमस्कार नाबरसाहेब,
   आपल्याला माझा पोस्ट आवडल्याचं वाचून बरं वाटलं. आपल्यासारख्या माझ्या वाचकानां आनंद देण्यासाठीच मी लिहित राहाण्याचा अवश्य प्रयत्न करीन.
   परदेशात राहिल्याने मायदेशाची उत्कंठा जरा जास्तच असते. आपल्याला त्याचा अनुभव आहेच.
   मायदेशापासून बर्‍याच “अंतरावर” असलो तरी मायदेश सदैव “अंतरात” असतो.तेच माझ्या लेखनाचं कारण असावं.
   आपल्या प्रतीक्रियेबद्दल आभार.
   आपला
   श्रीकृष्ण सामंत

 2. kshirsagar
  Posted जानेवारी 13, 2011 at 2:42 सकाळी | Permalink

  good

 3. Posted जानेवारी 13, 2011 at 8:01 pm | Permalink

  आपल्या प्रतिक्रियेबद्दल आभार.


टिप्पणी नोंदवा

Required fields are marked *

*
*

%d bloggers like this: