सचोटी.

“तुझ्या बाबांचे संस्कार तू नीट पाळले आहेस.पण त्यांना जमलं ते तुला जमेलच असं शक्य नाही.कारण त्यासाठी पराकाष्टेची मेहनत आणि हृदयापासून श्रद्धा असावी लागते.”

“सचोटी ह्या शब्दाचा ढिंगोरा माझ्या डोक्यात पिटत रहायचा तो मला कंटाळा येई पर्यंत,वैताग येई पर्यंत तासनतास दिवसानदिवस टिकायचा.एकदा मी ह्या विरूद्ध बंड करायचं ठरवलं.पण मला मोनोमनी वाटायचं हे असं करणं बरोबर नाही.”
करमकरांची मालती मला सांगत होती.

कमरकर कुटूंब म्हणजे खरोखरच आदर्श कुटूंब म्हटलं पाहिजे.प्राप्त परिस्थितित सच्चाईने रहाण्याची करमरकरांची धडपड वाखाणण्यासारखी आहे.
आर.टी.ओ.च्या ऑफिसमधे एका जबाबदार हुद्यावर काम करीत असताना,कोणत्याही लोभाला बळी पडायला मन विचलित न करता शेवटी चाळीस वर्षं त्याच खात्यात नोकरी करून निवृत्त झाल्यावर त्याच रहात्या जागेत ते राहात होते.
त्यांच्या बरोबरचे बरेच सहकारी, नोकरीतून लवकर राजीनामा देऊन जमवलेल्या पैशातून मोठमोठ्या टॉवर्समधे केव्हाच रहायला गेले होते.मालतीला आपल्या बाबांबद्दल फार अभिमान होता.

मला म्हणाली,
“सचोटी ह्या शब्दातून माझ्या बाबांच्या जीवनाची गोळा-बेरीज होईल.सचोटी अगदी साधा शब्द आहे.सच किंवा खरं ह्या शब्दातून त्याचा उगम झाला असावा.सचोटी म्हणजे जे खोटं नाही ते.
माझे बाबा ह्याच मार्गाने गेले.एखादं बॅन्डचं पथक बॅन्डच्या संगीताबरोबर जसं त्या लयीत मार्ग काटीत असतं अगदी तसंच आहे.त्या संगीताची लय अजून माझ्या कानात घुमत आहे.”

मी मालतीला म्हणालो,
“मला वाटतं तू तुझ्या बाबांची परंपरा चालवीत आहेस.मोठ्या कठीण प्रसंगातून मार्ग काढीत असताना तू हा सचोटीचा धडा शिकली असावीस.सचोटीने तुझं जीवन तू जगायला हवं असं तुला वाटायला लागलं असावं.”

मला मालती म्हणाली,
“मला लहानपणीचा एक प्रसंग आठवतो. माझ्या इतर मैत्रीणींना मिळायची तशी मला खर्ची मिळत नसायची.एकदा मी टेबलावर पडलेले सुटे पैसे घेतले आणि माझ्या इतर मैत्रीणीबरोबर मजा करण्यात उडवले.ते माझं वयात येणारं वय होतं.मी माझ्या मैत्रीणीना सांगीतलं की,माझ्या आईबाबांना त्या पैशाने फरक पडणार नाही,आणि त्यांना ते माहितही होणार नाही.”

मी मालतीला म्हणालो,
“मला आठवतं सचोटी ह्या विषयावर तुझ्या बाबांशी माझी चर्चा झाली होती.त्यांनी मला सचोटी ह्या शब्दाचा सुंदर अर्थ सांगीतला होता.मला म्हणाल्याचं आठवतं तेव्हडं तुला सांगतो.”

मला तुझे बाबा म्हणाले होते,
“सचोटी ह्याचा अर्थच असा की मी माझा शब्द पाळला पाहिजे.मी जे म्हणतो तसंच केलं पाहिजे. मला करावंसं वाटो न वाटो मी करीन असं म्हटल्यावर त्याच मार्गाने गेलं पाहिजे.ह्याचा अर्थ दरदिवशी मी कसं जगावं ह्याची निवड करायला हवी.”अशी अपेक्षा” आहे ह्या शब्दांची निवड करण्याची चिल्हाट जी माझ्या कानात होत असते त्याबद्दल मी सतर्क राहिलं पाहिजे.”

हे ऐकून मालतीला रहावेना.तो लहानपणचा प्रसंग सांगून झाल्यावर पुढे काय झालं ते मला सांगू लागली.
“काही दिवसानंतर एकदा मी घरी आले असताना माझ्या लक्षात आलं की माझे आईबाबा माझ्याशी बोलण्यासाठी माझ्या येण्याची वाट पहात होते.
माझ्या आईला खूपच काही सांगायचं होतं.आणि ते तिने सांगीतलं आणि ते सुद्धा मोठा आवाज काढून,मोठ्या नाटकी ढंगाने सांगीतलं. माझे बाबा तिथेच तिच्या मागे उभे होते पण एक चक्कार शब्दही बोलले नाहीत.त्यांची ती शांतताच मला तो शब्द ओरडून सांगत होती,सचोटी.
नंतर,मला त्यांनी सरळ विचारलं की मला एक सच्चा माणूस व्हायचं आहे की नाही आणि त्यांना भरवंसा वाटत होता की, त्यांना वाटत होतं तशी मी व्यक्ति बनण्याची माझ्यात क्षमता आहे.खरंच, त्यांचा तो हळूवार आवाज,एकच वाक्य,क्षण भरंचंच बोलणं आणि त्यांच्या मनात असलेली मोठी धारणा मला अजून आठवते.”

मी मालतीला म्हणालो,
“तुझ्या बाबांचे संस्कार तू नीट पाळले आहेस.पण त्यांना जमलं ते तुला जमेलच असं शक्य नाही.कारण त्यासाठी पराकाष्टेची मेहनत आणि हृदयापासून श्रद्धा असावी लागते.”

“लवकरच,सचोटी हा शब्द माझी सावली होऊन राहिला.माझ्या अंगाच्या प्रत्येक रंध्रात घट्ट चिकटून राहून,अन्य काही चांगल्या आणि चमक-दमक गोष्टीचा इशारा आला तरी माझ्या पासून अलिप्त व्ह्यायला तयार नव्हता.”
मालती आपल्या जीवनाचा अनुभव मला सांगत होती.

“मी माझ्याकडून हा शब्द झटकून टाकण्याचा प्रयत्न केला,गाडून टाकण्याचा प्रयत्न केला,नव्हेतर त्याचं घातक अस्तित्व माझ्या जीवनातून नाकारण्याचाही प्रयत्न केला.
प्रत्येक वेळी मी त्या शब्दाकडे काणाडोळा करण्याच्या प्रयत्नात यशस्वी झाले असं मला वाटता वाटता,माझ्या बाबांचा आवाज कुजबुजून मला मार्गस्त करायचा.त्यांचा आवाज मला कष्ट करण्याची जबरदस्ती करून विचारणा करायचा की ईश्वरी देणगीचा मी सन्मान करते की नाही.”

“पण मग आता तुझी मुलं तुला कसं सहकार्य देतात?”
मी कुतूहल म्हणून मालतीला विचारलं.

“आता माझ्या मुलांना आपल्या आतल्या आवाजाची हांक ऐका असं सांगीतल्यावर ते आपले डोळे फिरवतात.मी ज्यावेळी कामातल्या, शाळेतल्या, संबंधातल्या किंवा कुटूंबातल्या कुचराई किंवा लबाडी बाबतच्या परिणामाची पडणारी किंमत सांगायला गेले की ते एका कानानेच ऐकतात.पण मला ठाऊक आहे की,मी त्यांच्याशी बोलत राहिलं पाहिजे.माझी खात्री आहे की,माझ्या शब्दांकडे आणि गोष्टीकडे ती आपलं लक्ष वेधून घेत असावीत.
शांतीचं लाभदायक जीवन जगण्यासाठी आपल्या जीवनमुल्यांशी एकरूप असणं हा एकच मार्ग आहे,जसा मी अंगिकारला आहे.ही परंपरा माझ्या बाबांकडून माझ्याकडे,आणि माझ्याकडून मुलांकडे येत आहे.”
मालतीने भरवंसा ठेऊन सांगीतलं.

मी तिला शाबासकी दिली.

श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

Advertisements

टिप्पणी नोंदवा

Required fields are marked *

*
*

%d bloggers like this: