अभिवचन.

“हल्ली माझ्या पत्नीला आणि माझ्या मुलांना मी नवीन वचनं देत असतो.विपत्तिशी परिचित असल्याने पुन्हा एकदा, ज्यांच्यावर प्रेम करतो त्यांनाच कवटाळून असतो.”

त्यादिवशी मी लालबागचा गणपति बघायला म्हणून गेलो होतो.मंडपात मला रघू घुर्ये,त्याची पत्नी सुलभा आणि त्यांची दोन गोंडस मुलं भेटली. कित्येक वर्षानी मला रघू भेटला.मला पाहून तोही खूप आनंदी दिसला.

“तुमच्याशी मला खूप खूप काही बोलायचं आहे.या नां माझ्या घरी येत्या रविवारी.मी तुम्हाला पत्ता देतो.”
असं म्हणून आपलं व्हिझीटींग कार्ड मला त्याने दिलं.

“येत्या रविवारी येईन असंच काही मला सांगता येणार नाही.पण वेळात वेळ काढून एखाद्या रविवारी तुझ्याकडे जरूर येईन.पण येण्यापूर्वी फोन करीन.”
मी रघूला म्हणालो.रघू खूप खुश झालेला दिसला.मला म्हणाला,
“सुलभा,तिरफळं घालून बांगड्याची आमटी मस्त करते.तुम्ही जरूर जेवायला या.”

“अरे आपण गणपतिच्या मंडपातच मास्याबद्दल बोलतोय.हे अशुभ नाही ना?”
असा मी विनोद केला.पण सुलभा माझ्याकडे बघून हंसली.त्यातच मी यावं अशी तिची संमत्ती आहे असं मला वाटलं.

त्या रविवारी आमच्या खूपच गप्पा झाल्या.रघू मला म्हणाला,
“मी दोन वचनं माझ्या मला दिली होती.एक आईबद्दल आणि दुसरं माझ्या बाबांबद्दल.
मी वचनावर भरवंसा ठेवतो.ही वचनं कोणत्या प्रकारची माहित आहेत का?, जी वचनं दिलेली असतात किंवा दिली आहेत हे गृहीत धरली जातात,जी वचनं विनवण्या केल्याने दिली जातात किंवा स्वेच्छापूर्वक दिली जातात,ज्या वचनांचा आदर केला जातो किंवा जी वचनं पूर्ण केली जातात. अशी वचनं की जी स्वतःला दिली जातात किंवा दुसर्‍याला दिली जातात.जी वचनं न-जन्मलेल्याला, जन्मलेल्या आणि दिवंगत झालेल्यांना दिली जातात.जी वचनं बोलून दिली जातात वा न-बोलूनही दिली जातात.
तुम्हाला काय म्हणायचं आहे?”

“हलकी-फुलकी वचनं असतात ती उस्फुर्तपणे उफाळून येतात,ती आपल्या हृदयातून उसळून येतात.ती आनंदायी असतात आणि अपेक्षापूर्ण असतात.ही वचनं संभाळून ठेवायला आपल्याला अवधी नसतो.एक ना एक दिवस समुद्रावर जाऊन सूर्यास्त पहाण्याच्या कल्पनेने भारावून जाऊन दिलेल्या वचनासारखी ती वचनं असतात.
काही वचनं कठीण असतात,गंभीर असतात,दडपणाने भयभीत होऊन,गोंधळून जाऊन अनिच्छापूर्वक दिलेली असतात.त्या वचनांबद्दल मनात खात्री नसते किंवा वचनपूर्ती कशी व्हावी हे माहित नसतं.”
वचना बाबत माझ्या विचाराची मी भर टाकून बोलत होतो.

“तसंच तीव्र दुःखाचा क्षण असताना दिलेली वचनं,आपलं हरवलेलं अगदी जवळचं माणूस,शोधून काढण्यासाठी दिलेलं वचन,मुलांच्या सुरक्षीत आणि उज्वल भवितव्यासाठी केलेलं वचन.
ही पण एकप्रकारची वचनं आहेत.
प्रत्यक्षात मात्र  ह्या असल्या सार्‍या वचनात आपल्या मनातल्या प्रार्थनेपेक्षाही थोडा अधिकांश असतो.”
असं रघूने म्हटल्यानंतर रघूच्या मनात काय चाललं आहे, त्याचा मला अंधूक अंदाज आला.
त्याच्या आईबाबांना तो लहानपणी दुरावला होता.आणि त्याचं त्याला खूप वाईट वाटायचं. हे स्वाभाविक होतच,पण त्याच्या मनात त्याबद्दल खंतही होती.

मी रघूला म्हणालो,
“आनंदाच्या उच्चांकात असताना,लग्नात दिलेलं वचन,जसं,
“आनंदात वा दुःखात असो,आजारात वा सधृड असताना असो,फक्त मृत्युच आपल्याला एकमेकापासून दूर करील.”
असलं हे वचन कदाचीत नैराश्येच्या दरीत कोसळावं लागलं तरी ते गहन असल्याने सन्मानीत केलं जातं.
मला वाटतं वचन देणं हे आपलं पवित्र कर्तव्य असून, असं वचन निष्ठेत सीमित ठेवून त्या निष्ठेमार्फत अगदी गहन दायित्व म्हणून लादलं जावं.
मला वाटतं,आपली मोठ्यातमोठी वचनं बरेचदा मूक असतात. तरीपण,जीवनभर आपल्याला जखडून ठेवून आपल्याच व्यक्तित्वाचा निश्चित अर्थ लावतात.”
माझं म्हणणं रघूला अगदी पटलेलं दिसलं.नव्हेतर त्याच्या मनात जे काही खतखतंत होतं ते अप्रत्यक्षपणे त्याने मला सांगण्यासाठी मी त्याला उद्युक्तच करीत आहे असं त्याला वाटलं असावं.

मला म्हणाला,
“आत्महितापासून दूर राहिल्याने आपण काय करायला हवं हे आपल्याला स्पष्ट दिसायला लागतं.वचन देण्यासाठी आलेल्या संधीवर कार्यरत होण्याऐवजी जर का आपण सहजपणे दूर राहिलो तर आपण दुर्बळ झालो असं आपल्याला वाटायला लागतं.पण मात्र एक आहे,हा आपल्यात कायापालट होण्यासाठी आलेला क्षण पुन्हा कदापी उपस्थित होणार नाही हे निश्चीत.
वचानामधूनच आपण आपल्या स्वभावधर्माच्या उच्चांकाला अंगीकारणाच्या प्रयत्नात असतो. जसं, आपल्यात असलेल्या उत्तम प्रवृतीमुळे आपण चांगलं आचरण करण्याच्या प्रयत्नात रहातो, जसं,दुसर्‍या कुणाच्या दैवाची चिंता करून कदाचीत त्याचं केवळ आणखी चांगलं व्हावं ह्या विचारमार्गदर्शनामुळे, आपल्याला जणू वरून आलेला संदेश असावा हे स्वीकारण्याच्या तयारीत रहातो.”

असं सांगत असताना रघू अजूनही मनातलं खरं काय ते सांगायला आढेवेढे घेतोय हे माझ्या लक्षात आल्यावाचून राहिलं नाही.मी म्हणालो,
“एकदा आपण वचन दिलं की आपल्याकडून नुसतं उत्तम नव्हेच तर अत्त्युतम वागणं व्हायला हवं,हे अपेक्षीत असतं. त्या शाश्वत क्षणी जणू (नव्हेतर खरंच) अख्या मानवतेचं भवितव्य निष्ठेने केलेल्या आपल्या सहाय्यावर जग अवलंबून आहे असं अपेक्षीत असतं.सर्व आत्म्यातलं नातं हा जणू मानवी श्रुंखलेतला दुवा आहे असं मान्य करणं अपेक्षीत असतं.
कसं झालं तरी योग्य ते करावं हे आपल्याला माहित असतं.फक्त त्यातला अदभूत प्रकार हा की त्याचं जे समर्पक उत्तर येतं त्याचा उगम कुठून होतो आणि आपण त्याबाबत संपूर्णपणे असंदिग्ध कसे असतो हे माहित असणं.”

आता मात्र रघूला रहावेना असं मला दिसून आलं.अगदी भावनाप्रधान होऊन रघू मला म्हणाला,
“मला वाटतं जे वचन देतात ते “निवडले गेलेले”असतात.वचन अंगीकारणं हे नुसतं दायित्व नसून एक वरदान मिळाल्यासारखं असतं.वचन देण्यासाठी आपल्याला कुणी दुसर्‍याने निवडलं, की आपल्या आपण आपल्याला निवडलं, ही बाब अगदी असंबद्ध आहे.खरा मतलब वचन स्वीकारण्यात आहे.
माझ्या लहानपणी मी दोन वचनं माझ्या मलाच दिली होती.पहिलं म्हणजे माझ्या आईला शोधून काढण्याचं वचन.
माझा मामा सांगायचा त्याप्रमाणे सुरवातीला माझ्या आईबाबांचं ठीक चालायचं.माझ्या जन्मानंतर त्यांचे खटके उडायचे. माझ्या मामाच्या म्हणण्याप्रमाणे माझे बाबा थोडे सरफिरे होते.कुणाचाही राग ते माझ्या आईवर काढायचे. खूपच वैतागायची.असंच एकदा जरा मोठं भांडण झालं.त्यावेळी मी दोनएक महिन्याचा असेन,असं मला मामा म्हणाला. माझे बाबा घरातून तोंड घेऊन निघून गेले.माझ्या मामाने मला आणि आईला आपल्या घरी आणलं. माझ्या आईच्या डोक्यावर घोर परिणाम झाला होता.माझी आई मी तीन वर्षाचा असताना मला सोडून कुठेतरी निघून गेली.

माझ्या मामाकडे मला सोडून ती कुठे गेली ते कळलंच नाही. माझ्या मामाने माझं संगोपन केलं.आणि मी शिक्षणाच्या वयाचा झाल्यावर मामाने मला बोर्डींगमधे शिकायला ठेवलं. मधून मधून तो मला भेटून जायचा.मला कुणी विचारलं तर माझ्या लहानपणी मी सांगायचो की मला आईच नाही.त्यानंतर जवळजवळ तीसएक वर्षं मी माझ्या मनातच म्हणायचो की मी माझ्या आईचा तिरस्कार करीत आहे.परंतु एक मात्र खरं की माझ्या रागाची शक्ति मला तिच्याशी बांधून ठेवायची.तसं मी तिला सहजासहजी विसरायला तयार नव्हतो.कधी ना कधी कुठे ना कुठे मला तिला शोधून
काढायचंच होतं.मग तिला शोधून काढण्यासाठी मी देशात कुठेही जायला तयार होतो.
मला माझ्या आईला समजावून घ्यायचं होतं.मला ती अशीकशी सोडून गेली हे विचारायचं होतं. एक तर मी मुल म्हणून विकृत होतो नाहीतर ती आई म्हणून विकृत होती असं माझ्या मनात यायचं.मला नेहमीच वाटायचं की ह्यात दोन कुठचीतरी विकृत स्पष्टीकरणं मिळण्याचा संभव आहे.”

“मग तुझ्या आईला तू शोधून काढलंस की नाही?”
जरा उतावीळ होऊन मी रघूला प्रश्न केला.

“प्रथम ज्यावेळी मी माझ्या आईला भेटलो,तेव्हा ती मला म्हणाली,
“मी तुला जन्म दिला.तुझं माझ्यावर प्रेम असायाला हवं.”
मी तिला प्रतिसाद देताना म्हणालो,
“तेच तर तू माझ्यावर कधीही केलं नाहीस.”
रघू मला सांगू लागला,
“पण आम्हा दोघांमधला जो कच्चा धागा कित्येक वर्षं निरंतर राहिला होता तोच मला माझ्या आईला वरचेवर भेटायला उद्युक्त करीत होता.त्यानंतर बरीच वर्षं मी तिला भेटत असायचो.तिचं निधन होण्यापूर्वी अनेक वर्षें मी तिला भेटत राहिलो. एकमेकाला समजून घेऊ लागलो.
आमच्या दोघांमधल्या ताटातूटीचं कारण ती किंवा मी विकृत असण्यात नव्हतं.किंबहूना,आम्हा दोघांना जे भोगावं लागलं तेच मुळी विकृत होतं.आईला मुलाची,किंवा मुलाला आईची हानि होणं हे खरोखर विचारापलिकडचं आहे. ताटातूटीच्या दुःखातून आम्ही जेमतेम सावरलो गेलो होतो.”

“मग तू तुझं दुसरं वचन-तुझ्या बाबांना शोधून काढण्याचं पुरं केलंस की नाही?”
मी असं विचारल्यावर,रघू जरा हळवा झाला.मला म्हणाला,
“माझ्या बाबांना शोधून काढण्याचं,माझं दुसरं वचन अजून अधूरंच राहिलं आहे.कदाचीत अधूरं राहिलही असं मला कलकत्याला जाईपर्यंत उगाचच वाटायचं.
कलकत्याला जाण्याचं,आणि माझ्या बाबांचा माग काढण्याचा माझा प्रयत्न होता.मुंबईला एका मोठ्या रेस्टॉरंटमधे ते कामाला होते.त्या रेस्टॉरंटची शाखा कलकत्याला होती.तिथे ते गेले होते म्हणून मी ऐकलं होतं.
जेव्हा मी पहिल्यांदा कलकत्यात गेलो त्यावेळी,ज्या जागी ते रहात होते असं मला कळलं होतं त्या जागी ते भेटतील ह्या विश्वासावर मी होतो.ती माझ्या मनातली भावस्पर्शी वास्तविकता होती.ती माझी एकतर्‍हेची खात्री होती.
कलकत्याच्या हावडा ब्रिजवरून ज्या ठिकाणाहून त्यांनी हुगळी नदीत उडी मारली होती त्या जागी मला त्यांच्या शेजार्‍याने नेलं.मी त्याठिकाणी फुलाचा गुच्छ ठेवला.आणि कलकत्याहून परत येताना त्यांची आठवण राहिल अशा त्यांच्याच वस्तू घेऊन आलो.”
आपल्या बाबांच्या वस्तू मला दाखवायला म्हणून आणण्यासाठी आतल्या खोलीत रघू गेला.मला हे सर्व ऐकून रघूची खूपच किंव आली. जीवनात सुखापेक्षा दुःखच किती आहे असा विचार माझ्या मनात आला.

मला रघू म्हणाला,
“मी जर का माझी ही दोन वचनं विसरून गेलो असतो,तर आता मी जो आहे तसा दिसलो नसतो-हट्टी,आग्रही,संघर्षाशी हातमिळवणी करण्यासाठी आणि दुःखाला भिडण्यासाठी तत्पर.
हल्ली माझ्या पत्नीला आणि माझ्या मुलांना मी नवीन वचनं देत असतो.विपत्तिशी परिचित असल्याने पुन्हा एकदा, ज्यांच्यावर प्रेम करतो त्यांनाच कवटाळून असतो.”

“ज्याचा शेवट गोड ते सर्वच गोड”
असं म्हणतात.मला जे काही तुला सांगायचं होतं ते सांगून तुला नक्कीच बरं वाटलं असणार.”
असं मी रघूला जवळ घेत म्हणालो.त्याला बरं वाटलं हे त्याचा चेहराच सांगत होता.

तेव्हड्यात रघूच्या पत्नीने-सुलभाने,पानं वाढलीत म्हणून आतून ओरडून सांगीतलं.तिरफळं घालून केलेली बांगड्याची आमटी आणि भात खूप दिवसानी जेवायाला मी तरी अधीर झालो होतो.

श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

Advertisements

2 Comments

  1. Maithili
    Posted मे 30, 2010 at 10:50 pm | Permalink

    Khoop sunder lekh….

  2. Posted मे 31, 2010 at 9:25 सकाळी | Permalink

    नमस्कार मैथिली,
    आपल्या प्रतिक्रियेबद्दल आभार.


टिप्पणी नोंदवा

Required fields are marked *

*
*

%d bloggers like this: